13-14 Oct Current Affairs

13-14 Oct Current Affairs
13-14 Oct Current Affairs

मुंबईतील या ३ वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

 • मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील चार हेरिटेज वास्तूंना युनेस्कोचा यंदाचा एशिया-पॅसिफिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • सांस्कृतिक वारसा स्थळांचं जतन व संवर्धनासाठी युनेस्कोकडून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदा भारत, भूतान, चीन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील १६ वास्तूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • या पुरस्कारासाठी १४ देशांमधून ५७ वास्तूंची नोंदणी करण्यात आली होती. त्यातून या १६ वास्तू निवडण्यात आल्या आहेत.
 • विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट या वास्तूला डिस्टिंक्शन कॅटगरीत पुरस्कार मिळाला आहे तर मेरिट या कॅटगरीत नेसेट एलियाहू सिनागॉग व आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च या वास्तूंना पुरस्कार जाहीर झाला आहे. मान्यवरांची शिफारस म्हणून फ्लोरा फाउंटनने या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

पुरस्कार मिळालेल्या वास्तूंविषयी:-
फ्लोरा फाउंटन:-

 •  ब्रिटिशकाळात १८६४ मध्ये स्थापत्य आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या फ्लोरा फाउंटनची उभारणी करण्यात आली होती.
 • सर हेन्री बेरटल आणि एडवर्ड फ्रेर यांच्या सन्मानार्थ ही वास्तू तयार करण्यात आली होती. वास्तुविशारद नरिमन शॉ यांनी या वास्तूचा आराखडा तयार केला होता.
 • ही वास्तू पोर्ट लँड दगडापासून बनवण्यात आलेली आहे. कारंजे, रोमन देवता तसेच भारतीय उद्योगधंदे, झाडे, फळे, धान्य यांच्या प्रतिकृतीसह युवतीचा पुतळा अशा प्रकारचे हे शिल्प आहे.
 • काळाच्या ओघात या वास्तूच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आणि फ्लोरा फाउंटनची रयाच निघून गेली. २००५ मध्ये या वास्तूचे काही प्रमाणात नुतनीकरण करण्यात आले.
 • मात्र पुन्हा त्याकडे दुर्लक्ष झाले व २००७ मध्ये कारंजी बंद पडली व वास्तूचीही दुरवस्था झाली. त्यानंतर तब्बल १० वर्षांनंतर मुंबई महापालिकेने या वास्तूच्या नुतनीकरणाचा निर्णय घेतला.
 • सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून कारंजे व मध्यभागी असलेल्या शिल्पाचे नुतनीकरण करण्यात आले. वास्तूच्या मूळ ढाचाला कोणताही धक्का न लावता हे नुतनीकरण करण्यात आले. यावर्षी जानेवारी महिन्यातच नव्याने झळाळून निघालेल्या फ्लोरा फाउंटनचे लोकार्पण करण्यात आले.

नेसेट एलियाहू सिनागॉ:-

 • फोर्ट परिसरातील नेसेट एलियाहू सिनागॉग हे यहुदींचे प्रार्थनास्थळ असून १८८४ मध्ये ही वास्तू उभारण्यात आली होती.
 • या वास्तूचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले असून इस्रायलमधील मान्यवर तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत या नुतनीकृत वास्तूचे उद्घाटन करण्यात आले आहे.

आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च:-

 • मुंबईतील सर्वात जुन्या रोमन कॅथलिक चर्चपैकी हे एक चर्च आहे. भायखळा-माझगाव येथे हे चर्च असून ही मूळ वास्तू १६३२ मध्ये उभारण्यात आली होती.
 • १९११ ते १३ यादरम्यान या चर्चची गॉथिक शैलीत पुनर्बांधणी करण्यात आली. चर्चच्या आतील डोम म्हणजे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.

जपानला हगिबिस चा फटका

 • गेल्या सहा दशकांतील सर्वाधिक शक्तिशाली 'हगिबिस' चक्रीवादळाचा फटका शनिवारी जपानसह राजधानी टोकियोला बसला. यामध्ये ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले असून, अनेक नागरिक बेपत्ता आहेत.
 • वादळादरम्यान झालेला जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्याने टोकियोला अक्षरश: झोडपून काढले. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने रस्त्यावरील वाहनेही दूरवर फेकली गेली.
 • चक्रीवादळाच्या थैमानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील विविध देशांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली व्यक्त केली आहे.
 • टोकियोमधील हवामान विभागाने नागरिकांना वादळाची पूर्वसूचना दिली होती. यामुळे सरकारने धोकादायक ठिकाणच्या नागरिकांचे शुक्रवारीच स्थलांतर सुरू केले होते. तरीही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 • टोकियोमधील रेल्वेसेवा शनिवारी बंद ठेवण्यात आली होती. मदतकार्यासाठी सरकराने १७ हजार पोलिस कर्मचारी आणि सैनिकांची नेमणूक केली आहे. अद्यापही भूस्खलनचा धोका असल्याने प्रशासनाने धोकादायक ४२७ घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या आहेत. किनारी भागात मदत केंद्र उभारण्यात आली आहेत.
 • नागानो शहरातील शिन्कान्सेन बुलेट ट्रेन व ट्रेनडेपो हगिबिसमुळे बुडाले.

जपान:-

 • जपान हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत.
 • जपानी भाषेत "जपान" या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा  अर्थ "सूर्य उगम" असा होतो. त्यामुळे आणि जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते.
 • जपान प्रशांत महासागरामधील एकूण ६,८५२ बेटांवर वसला असून होन्शू, क्युशू, शिकोकू व होक्कायडो ही येथील चार प्रमुख बेटे आहेत. सुमारे १२.८ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दहावा क्रमांक लागतो.
 • टोकियो हे जपानमधील सर्वात मोठे शहर, राष्ट्रीय राजधानी व जगातील सर्वात मोठे महानगर आहे. प्राचीन इतिहास असलेला हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून जपानची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर (अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीनच्या खालोखाल) आहे.
 • येथील राहणीमानाचा दर्जा उच्च असून एका अंदाजानुसार जपानमधील लोकांचे आयुष्यमान जगात सर्वाधिक आहे. वयाची शंभरी म्हणजेच १०० वर्ष पार केलेले लक्षावधी लोकं जपानमध्ये आहेत.
 • जपान भौगोलिकदृष्ट्या ६,८५२ बेटांचा स्ट्रॅटोव्होल्कॅनिक द्वीपसमूह आहे. होन्शू, क्युशू, शिकोकू व होक्कायडो या चार मोठ्या द्वीपगटांनी जपानच्या जमीनी क्षेत्राचा ९७% भाग व्यापला आहे आणि त्यांना मुख्य बेट म्हणून ओळखले जाते.
 • जपान देश ८ विभागांतील ४७ प्रांतांमधे विभागला आहे, ज्यात होक्कायडो सगळ्यात उत्तरेकडील, आणि ओकिनावा सगळ्यात दक्षिणेकडील प्रांत आहे. जपानच्या एकूण लोकसंख्येच्या ९८.५% लोक हे जपानचे मूळ निवासी आहेत. ९.१ दशलक्ष लोक टोकियोमध्ये राहतात.
13-14 Oct Current Affairs
13-14 Oct Current Affairs

इराण सौदी तणावात पाकची मध्यस्थी

 • इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी त्यांनी रविवारी इराणला भेटही दिली. दरम्यान, 'या दोन्ही देशांमधील चर्चा घडवून आणण्यात आम्हाला आनंद असेल,' अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली.
 • सौदी अरेबिया आणि इराण यांच्यामध्ये पश्चिम आशियातील प्रभावासाठी पारंपरिक शत्रुत्व आहे. येमेनमधील हुती बंडखोरांवर २०१५मध्ये सौदी अरेबियाने हवाई हल्ला केल्यानंतर आणि २०१६मध्ये शिया धर्मगुरूंना देहदंड दिल्यानंतर हा तणाव वेगाने वाढला.
 • आताही पश्चिम आशियातील विविध देशांमध्ये या तणावाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवर ड्रोन हल्ला केला. सौदी अरेबियाने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. तर, ११ ऑक्टोबर रोजी इराणच्या तेलाच्या टँकरवर रॉकेटने हल्ला करण्यात आला.
 • या पार्श्वभूमीवर, इम्रान खान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याच्या विचारात आहेत. या विभागात शांतता व सुरक्षा निर्माण करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान इम्रान खान यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी इराणला भेट दिली, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे.
 • इम्रान खान यांचा या वर्षातील हा दुसरा इराण दौरा आहे. त्यांनी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. त्यात इम्रान खान म्हणाले, 'आम्हाला इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील संघर्ष नको आहे. या दोन्ही देशांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आम्हाला आनंद असून, रुहानी यांच्याबरोबरी चर्चा खूपच सकारात्मक झाल्यामुळे मी आशावादी आहे.'

सौदी अरेबियाला जाणार:-

 • इराणच्या दौऱ्यानंतर इम्रान खान मंगळवारी सौदी अरेबियाला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांना भेट देत, तेथील राजनैतिक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याचे सांगण्यात येते. इम्रान खान यांनी गेल्या महिन्यातील भेटीवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराण-सौदी अरेबिया यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी भूमिका बजावण्याचे आवाहन केले होते.

 

दिल्लीची हवा बिघडली

 • शहरातील वायू प्रदूषण वेगाने कमी करण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लान (ग्रॅप) लागू करण्यास काही दिवस उरले असताना, रविवारी दिल्ली राजधानी परिसरावर दाड धुरक्याचे साम्रामज्य पसरले आणि हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट या प्रकारची झाली.
 • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हवेच्या गुणवत्तेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत वायू प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत केलेले उपाय व्यर्थ गेल्याबद्दल खेद व्यक्त केला.
 • हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आनंद विहार, वझीरपूर, विवेक विहार, मुंदका, बावना, जहांगिरपुरी येथे अनुक्रमे ३२७, ३२३, ३१७, ३०९, ३०२ व ३०० मोजला गेला. हा निर्देशांक २६८पेक्षा खाली गेल्यास ती हवा अत्यंत वाईट दर्जाची समजली जाते.
 • रविवारी सायंकाळी साडेचार वाजता राजधानीनजीकच्या गाझियाबाद (३२०) व उत्तर प्रदेशातील नोएडा (३१०), हरयाणातील अलिपूर खालसा (३५१) व पानिपत (३३९) या शहरांची हवाही अत्यंत खराब या गटात नोंदली गेली.

तण जाळल्याचा परिणाम:-

 • दिल्ली परिसरात येणारा धूर हा शेजारी राज्यांतील शेततण जाळल्यामुळे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार सुरूच राहिल्यास १५ तारखेपर्यंत दिल्लीच्या हवेतील एकूण प्रदूषकांमध्ये तण जाळल्यामुळे येणाऱ्या धुराचे प्रमाण सहा टक्के असेल, अशी भीती सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च या संस्थेने व्यक्त केली आहे.

पंजाबातही पेटले तण:-

 • पंजाबमध्ये भातशेतीचा हंगाम सुरू झाला असून ११ ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये शेतामध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 • तण काढण्यापेक्षा ते पेटवण्यावर शेतकरी भर देत असल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराचा त्रास दिल्लीला सर्वाधिक होत आहे.
 • आगीच्या घटनांच्या दृष्टीने १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर हा काळ महत्त्वाचा मानण्यात येतो. पंजाब सरकारने तण काढण्यासाठी यंत्रे, ट्रॅक्टरच्या जोडण्या, औषधे आदींचा पुरवठा करूनदेखील शेतकरी तण जाळण्याचा पारंपरिक उपाय करत आहेत.

 

13-14 Oct Current Affairs
13-14 Oct Current Affairs

भारताचा विकासदर ६ टक्क्यांवर वर्ल्ड बँकेचा अंदाज

 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात (IMF)नंतर वर्ल्ड बँकेच्या ताज्या अहवालाने केंद्र सरकारला मोठा धक्का दिला आहे. सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या विकासदरात आणखी घसरण होणार असल्याचा आंदाज वर्ल्ड बँकेने वर्तवला आहे.
 • २०१९-२०मध्ये भारताचा विकासदर ६ टक्क्यांपर्यंत घसरेल, असं वर्ल्ड बँकेनं म्हटलंय. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर हा ६.९ टक्के इतका होता. तर २०२२ पर्यंत भारताचा आर्थिक विकासदर हा ७.२ टक्क्यांपर्यंत जाईल, असा दावा सरकारकडून केला जात होता.

विकासदरात आणखी घसरण,IMFचा अंदाज:-

 • IMF ने याच आठवड्यात भारताचा या वर्षाचा आर्थिक विकासदर घसरणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. IMF ने ०.३० टक्क्यांनी घटवून विकासदर आता ७ टक्के इतका वर्तवला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने भारताचा विकासदर ६.८ टक्क्यांवरून घसरून ६.१ टक्के इतका अंदाज वर्तवला आहे. देशांतर्गत मागणीत घट झाल्याने आर्थव्यवस्थेला मरगळ आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सलग दोन वर्षांपासून आर्थिक विकासदरात घसरण:-

 • आयएमएफ आणि वर्ल्ड बँकेची वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी हा अंदाज आला आहे. २०१७-१८मध्ये विकासदर ७.२ टक्क्यांवर पोहोचला होता. हा विकासदर २०१८-१९मध्ये ६.८ टक्क्यांपर्यंत घसरला. आता त्यात आणखी घसरण होऊन विकासदर केवळ ६ टक्के होण्याचा अंदाज आहे.

कृषी विकासदर २.९ टक्के:-

 • चालू आर्थिक वर्षात औद्योगिक उत्पादनाच्या विकासदरात वाढ झाली आहे. औद्योगिक उत्पादन आणि रियल इस्टेट क्षेत्राचा विकासदर ६.९ टक्क्यांवर गेला आहे. तर कृषी विकासदर २.९ टक्के आणि सेवा क्षेत्राचा विकासदर ७.५ टक्के राहील, असा अंदाज वर्ल्ड बँकेने आपल्या अहवालात वर्तवला आहे.

भारतानं इतिहास रचला मायदेशात सलग ११ कसोटी मालिका जिंकल्या

 • विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं पुणे येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका खिशात घातली.
 • या कसोटी मालिका विजयासह भारतीय संघानं इतिहास रचला. मायदेशात सलग ११ कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम भारतीय संघानं केला.
 • पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली. भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि १३७ धावांनी पराभूत केलं.
 • भारतानं पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर पाहुण्या संघाचा पहिला डाव २७५ धावांवर आटोपला आणि त्यांना फॉलोऑन मिळाला. चौथ्या दिवशी रविवारी भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून दक्षिण आफ्रिकेला १८९ धावांत गुंडाळले.
 • दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात डीन एल्गारनं सर्वाधिक ४८ धावा केल्या. तर तेंदा बावुमा यानं ३८ धावा केल्या. वर्नोन फिलँडरनं ३७ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजा आणि उमेश यादवनं प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर आर. अश्विननं दोन गडी बाद केले. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-०ने आघाडी घेतली.

भारत वि. दक्षिण आफ्रिका, पुणे कसोटीचे स्कोअरकार्ड:-दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतानं दणदणीत विजय मिळवून मालिका खिशात घातली. या कसोटी मालिका विजयासह भारतानं विश्वविक्रमाला गवसणी घातली.

 • भारताला २०१२/१३ पासून आतापर्यंत कोणत्याच संघानं मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत केलं नाही. याआधी मायदेशात सर्वाधिक कसोटी मालिका विजयाचा विक्रम ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर होता.
 • ऑस्ट्रेलियानं १९९४/९५ ते २०००/०१ या कालावधीत सलग दहा, तर २००४ ते २००८/०९ या कालावधीत दहा कसोटी मालिका जिंकल्या होत्या.

विदेशात दक्षिण आफ्रिकेचा सलग सहाव्यांदा पराभव:-

 • दक्षिण आफ्रिकेचा विदेशात सलग सहा कसोटी मालिकांमध्ये पराभव झाला आहे. २०१७ पासून दक्षिण आफ्रिकेला विदेशात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. याआधी फेब्रुवारी १९११ ते ऑगस्ट १९२४ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा सलग ११ कसोटी मालिकांमध्ये पराभव झाला होता.
 • भारतानं २०१२/१३ ते आतापर्यंत मायदेशात सलग ११ कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
 • ऑस्ट्रेलियानं १९९४/९५ ते २०००/०१ या कालावधीत मायदेशात १० कसोटी मालिका जिंकल्या होत्या.
 • २००४ ते २००८/०९ या कालावधीत ऑस्ट्रेलियानं मायदेशात सलग १० कसोटी मालिका जिंकल्या होत्या.
 • वेस्ट इंडीजनं १९७५/७६ ते १९८५/८६ या कालावधीत सलग आठ कसोटी मालिकांमध्ये विजय मिळवला होता.

 

13-14 Oct Current Affairs
13-14 Oct Current Affairs

ऐतिहासिक कसोटीत विराटचा Super 30 क्लबमध्ये समावेश

 • भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर दक्षिण आफ्रिकेवर १ डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग ११ वा मालिका विजय ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाहीये. कर्णधार विराट कोहलीसाठीही हा सामना अतिशय महत्वाचा ठरला आहे.
 • कर्णधार या नात्याने विराट कोहलीसाचा हा ५० वा सामना होता. याच सामन्यात विराटने पहिल्या डावात नाबाद द्विशतकी खेळी करताना २५४ धावा केल्या.
 • याचसोबत विजयानंतर विराटचा Super 30 क्लबमध्ये समावेश झाला आहे. कर्णधार या नात्याने पहिल्या ५० कसोटी सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्यांच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानी आहे. विराटचा कर्णधार म्हणून हा ३० वा विजय ठरला आहे.
 • या मालिका विजयामुळे भारताचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं पहिलं स्थान अधिक भक्कम होणार आहे. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ पराक्रम; मोडला धोनीचा विक्रम:-

 • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर ऐतिहासिक कामगिरीची नोंदवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली.
 • या विजयासह घरच्या मैदानावरचा भारतीय संघाचा हा विक्रमी सलग ११ वा कसोटी मालिका विजय ठरला. याशिवाय कर्णधार म्हणून हा विराटचा १३ वा कसोटी मालिका विजय ठरला. विराट हा कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक मालिका विजय मिळवणारा भारतीय ठरला. त्याने महेंद्रसिंग धोनी याला मागे टाकले. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करताना १२ कसोटी मालिकांमध्ये भारताला विजय मिळवून दिला. तो विक्रम विराटने मोडला. या यादीत ९ मालिका विजयांसह सौरव गांगुली तिसऱ्या स्थानी आहे.
 • आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने दमदार खेळी केली. विराटने भारताच्या डावाला आकार देताना धमाकेदार नाबाद २५४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने ६०० धावांपार मजल मारली. ६०१ धावांवर भारताने डाव घोषित केला. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ३३६ चेंडूत २५४ धावांची खेळी केली. त्या खेळीत त्याने ३३ चौकार आणि २ षटकार लगावले.
 • दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ६०१ धावांवर डाव घोषित केला. आफ्रिकेचा पहिला डाव २७५ धावांवर आटोपला. भारताकडे त्रिशतकी आघाडी असल्याने आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांचा डाव १८९ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने सामना एक डाव व १३७ धावांनी जिंकला.

BCCI चा बिग बॉस होण्याचा गांगुलीचा मार्ग मोकळा

 • भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा होती.
 • मात्र आज (सोमवारी) केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता गांगुली BCCI चे अध्यक्षपद भूषवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांची सचिवपदी, तर अरुण धुमाळ यांची खजिनदारपदी निवड होणेही जवळपास निश्चित आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय २३ ऑक्टोबरला BCCI च्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात येणार आहे.
 • BCCI ची २३ ऑक्टोबरला होणारी वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. त्यात अध्यक्षपदासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती.
 • BCCI च्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. या मुदतीत केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करून वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी १५ ऑक्टोबरला BCCI कडून जाहीर केली जाईल. तर १६ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दिली जाईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला निवडणूक पार पडून नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येणार आहे.
 • सौरव गांगुली सध्या पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे गुजरात क्रिकेट संघटनेचे तर अरुण सिंग धुमाळ हे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत. आसामच्या देबाजित सैकिया यांना संयुक्त सचिवपदासाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
13-14 Oct Current Affairs
13-14 Oct Current Affairs

क्रिकेटमधला तो वादग्रस्त निर्णय ICC कडून रद्द

 • २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र मर्यादीत षटकं आणि सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिल्यामुळे इंग्लंडला अधिक चौकारांच्या निकषावर विजेता जाहीर करण्यात आलं. आयसीसीच्या या निर्णयावर नंतर टीकाही करण्यात आली होती.
 • अखेरीस आयसीसीने तो वादग्रस्त निर्णय रद्द केलेला आहे. सोमवारी आयसीसीवे यासंदर्भात पत्रक जाहीर करत माहिती दिली आहे.
 • “आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावण्यात येण्याचा निर्णय कायम असणार आहे.
 • मात्र साखळी फेरीत जर सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला तर तो अधिकृतरित्या अनिर्णित घोषित केला जाईल. मात्र उपांत्य किंवा अंतिम फेरीत सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.” आयसीसीने आपली बाजू स्पष्ट केली आहे.
 • २०१९ साली विश्वचषकात अंतिम सामन्यात झालेल्या प्रसंगानंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी आयसीसीच्या निर्णयावर टीका केली होती. त्यामुळे आयसीसीच्या या निर्णयावर आता काय प्रतिक्रीया येतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय महिलांची मालिकेत बाजी कर्णधार मिताली राजचं अनोखं शतक

 • मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात बाजी मारली आहे. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने आफ्रिकेवर ६ धावांनी मात करत मालिकेत ३-० असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताच्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या महिला १४० धावांपर्यंतच मजल मारु शकल्या.
 • भारतीय संघाचा हा विजय कर्णधार मिताली राजसाठी महत्वाचा ठरला आहे. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने मितालीचा हा शंभरावा विजय ठरला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली राज ही दुसरी कर्णधार ठरली आहे.

MITHALI RAJ as Indian captain:-

 1. ODIs: Played – 129, Won – 80
 2. T20Is: Played – 32, Won – 17
 3. Tests: Played – 6, Won – 3
 • दरम्यान, नाणेफेक जिंकत सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार मिताली राजने घेतला. मात्र भारतीय फलंदाजांची सामन्यात पुरती भंबेरी उडाली. जेमायमा रॉड्रीग्ज, पूनम राऊत, मिताली राज, प्रिया पुनिया या महत्वाच्या फलंदाज झटपट माघारी परतल्या. अवघ्या ५५ धावांमध्ये भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता.
 • अखेरीस मधल्या फळीत हरमनप्रीत कौर आणि शिखा पांडे यांनी फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. हरमनप्रीतने ३८ तर शिखा पांडेने ३५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅरिझन कपने ३, शबनीम इस्माईल-अयबोंगा खाकाने प्रत्येकी २-२ तर तुमी सेखुखूने-नोंदुमिसो शँगेस-सून लुसने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
 • प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या महिला संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नव्हती. ५० धावांत आफ्रिकेच्या पहिल्या फळीतल्या ३ फलंदाज माघारी परतल्या. यानंतर सून लुस आणि मॅरिझन कपने थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला.
 • मात्र ठराविक अंतराने त्यादेखील माघारी परतल्या. अखेरच्या षटकांमध्ये आफ्रिकेला विजयासाठी अवघ्या १०-१५ धावांची गरज होती. मात्र तळातल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय महिलांनी ६ धावांनी सामन्यात बाजी मारली. भारताकडून एकता बिश्तने ३, दिप्ती शर्मा-राजेश्वरी गायकवेडने प्रत्येकी २-२, तर मानसी जोशी-हरमनप्रीत कौर आणि जेमायमा रॉड्रीग्ज यांनी १-१ बळी घेतला.

 

13-14 Oct Current Affairs
13-14 Oct Current Affairs

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा मंजूला रौप्यपदक

 • अंतिम फेरीत रशियाच्या एकतारिनाकडून पराभूत; भारताला चार पदके
 • भारताची युवा बॉक्सर मंजू राणी हिची विजयी घोडदौड अखेर रशियाच्या एकतारिना पाल्टसेव्हा हिने रोखली. लाइट फ्लायवेट (४८ किलो) गटाच्या अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागल्याने मंजू राणी हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली.
 • जागतिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या हरयाणाच्या सहाव्या मानांकित मंजू राणीला दुसऱ्या मानांकित एकतारिनाकडून १-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. एम. सी. मेरी कोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांना उपांत्य फेरीतच पराभूत व्हावे लागल्यानंतर मंजू राणीने अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली होती.
 • मंजू राणी आणि एकतारिना यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळावर भर दिल्यामुळे दोघींचेही पारडे जड मानले जात होते. मात्र रशियाच्या एकतारिनाने डाव्या बाजूने हुकचे अप्रतिम फटके लगावत बाजी मारली.
 • दुसऱ्या फेरीत मंजू राणीने सरळ ठोसे लगावत एकतारिनाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. चाहत्यांचाही तिला पाठिंबा मिळू लागला. पण तिसऱ्या आणि अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्रा अवलंबला. त्यामुळे पंचांना अनेक वेळा मध्यस्थी करावी लागली. तुल्यबळ लढतीनंतर या दोघींमध्ये विजयी कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच पंचांनी एकतारिनाचा हात वर केल्यानंतर भारतीय गोटात निराशा पसरली. अचूक ठोसे लगावल्याचा फायदा एकतारिनाला झाला.
 • शनिवारी मी २०व्या वर्षांत पदार्पण करणार असल्यामुळे त्याआधीच रौप्यपदकाचे बक्षीस मला मिळाले आहे. विजेंदर सिंग आणि एम. सी. मेरी कोमचा खेळ पाहून मी बॉक्सिंगकडे वळले. अतिशय खडतर परिश्रम करून त्यांनी आपली कारकीर्द घडवली आहे. आता कारकीर्दीच्या पहिल्याच टप्प्यावर मी घवघवीत यश मिळाल्याचा आनंद होत आहे. – मंजू राणी
 • ४ जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताने चार पदकांची कमाई केली. मंजू राणीने भारताला रौप्य तर एम. सी. मेरी कोम, जमुना बोरो आणि लव्हलिना बोर्गोहेन यांनी कांस्यपदक मिळवून दिले.

 

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »