15 Sep Current Affairs

15 Sep Current Affairs
15 Sep Current Affairs

पाक सैनिकांनी दाखवले पांढरे निशाण पाकव्याप्त काश्मीर

[सध्या POK सतत चर्चेत आहे] Pok म्हणजे Pakistan Occupied Kashmir

 • पाकव्याप्त काश्मीरमधील हाजीपीर भागात नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांच्या गोळाबारात दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. त्यांचे मृतदेह घेण्यासाठी पाक सैनिकांना अखेर पांढरे निशाण दाखवून युद्धविरामाची विनंती करावी लागली.
 • भारतीय लष्कराने एक मिनीट ४७ सेकंदांचा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांच्या गोळीचे लक्ष्य झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी पांढरे निशाण दाखवताना दिसत आहेत.
 • भारतीय जवानांच्या गोळीबारात ११ सप्टेंबरला पाकव्याप्त काश्मीरमधील हाजीपीर सेक्टरमधील त्यांच्या पंजाब रेजिमेंटचा शिपाई गुलाम रसूल याचा मृत्यू झाला होता. पंजाबी मुस्लिम असलेला रसूल पंजाब प्रांतातील बहावलनगर येथील रहिवासी होता. सुरुवातीला पाक सैनिकांनी त्याचा मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. 
 • मात्र यामध्ये अन्य एका पंजाबी मुस्लिम सैनिकाचा मृत्यू झाला. दोन दिवसांनंतरही या दोघांचे मृतदेह घेऊन जाण्यात यश न आल्याने अखेर १३ सप्टेंबरला त्यांना पांढरे निशाण दाखवून शांतता व युद्धविरामाची विनंती करावी लागली. 
 • भारतीय जवान शस्त्रूच्या मृत सैनिकांचा आदर करत असल्याने पाक सैनिकांना हे दोन्ही मृतदेह घेऊन जाऊ दिले.
   

शहरी कुपोषणग्रस्तांवर लक्ष

 • पोषण अभियानांतर्गत शहरातील झोपडपट्टीवासीय; तसेच स्थलांतरित गरीबांच्या कुपोषणाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करावे, असे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत. सप्टेंबर महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या 'पोषण महिन्या'अंतर्गत राज्यांनी पुढाकार घेऊन या संदर्भात पावले उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
 • शहरी भागातील कुपोषणाच्या समस्येस मुख्यत्वे गरीब लोकसंख्येमध्ये वाढ, अन्नसुरक्षेस धोका; तसेच अस्वच्छ वातावरण हे घटक कारणीभूत असल्याचे महिला व बालकल्याण मंत्रालयाने म्हटले आहे. 
 • या अभियानासाठी राज्य, जिल्हा आणि विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांची जबाबदारीही स्पष्ट करण्यात आली आहे. सरकारी खात्यांमधील समन्वय वाढवणे, शहरी आरोग्य अभियानाचा प्रसार करणे; तसेच स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करणे अशी पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 • प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे आणि अॅनिमिया शिबिरे शहरी भागांत; तसेच झोपडपट्टी भागात घेऊन जनजागृती करण्यास सांगण्यात आले आहे.

पोषण अभियान:-

 • २०२२ पर्यंत कुपोषण निर्मूलन, बाल व माता मृत्यू कमी करणे स्त्रिया आणि तरुण मुली यांचा अनिमिया कमी करणे.
 • जन्मत: कमी वजनाच्या बालकांची संख्या कमी करणे आणि या सर्वावर एकत्रित यश प्राप्तीसाठी ग्रामविकास करणे.
 • आरोग्य, शिक्षण , महिला व बालविकास, स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग, अण्णा व पुरवठा विभाग यांच्या एकत्रितकरणातून ही मोहीम राबवली जात आहे.
   
15 Sep Current Affairs
15 Sep Current Affairs

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह

[कोणाच्या वाढदिवसानिमित्त्त सेवा सप्ताह साजारा केला जातो/गेला असा साधा प्रश्न आयोग विचारू शकतो.]

 • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) स्वच्छता मोहीम राबविली. त्यांनी साफसफाई कर्मचाऱ्यांशी आणि रुग्णालयात दाखल मुलांशीही संवाद साधला. निमित्त होते 'सेवा सप्ताहा'च्या प्रारंभाचे. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस असून, तो शनिवारपासून सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्तीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. हे अभियान २० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 

पंतप्रधान मोदींच्या भेटींचा लिलाव:-

 • पंतप्रधानांना गेल्या वर्षभरात भेट म्हणून मिळालेल्या सुमारे २७०० वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून जमा होणारी रक्कम 'नमामि गंगे' प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या या वस्तूंमध्ये शाली, पगड्या, जॅकेट, स्मृतिचिन्हे यांचा समावेश आहे.
 • नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे शनिवारी, ३ ऑक्टोबरला हा लिलाव होणार आहे. त्यात भाग घेण्यासाठी www.pmmementos.gov.in या वेबसाइटवर नावनोंदणी करता येईल. स्मृतिचिन्हांसाठी २०० रुपयांपासून अडीच लाख रुपयांपर्यंत किंमत अपेक्षित आहे.

सौदी अरेबिया अरामको कंपनीच्या प्लान्टवर ड्रोन हल्ले

[सध्या सतत चर्चेत असणारा देश]

 • जगातल्या सर्वाधिक श्रीमंत तेल कंपन्यांपैकी एक अशी ओळख असलेली सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या दोन फॅसिलीटी केंद्रांना शनिवारी सकाळी आग लागली. या केंद्रांवर ड्रोन हल्ले झाल्याने ही आग लागल्याची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली.
 • पहाटे चार वाजता औद्योगिक सुरक्षा बलाच्या सैनिकांनी गोळीबाराचे प्रत्युत्तर दिले. अबकेक आणि खुराइस येथील फॅसिलीटी सेंटर्सवर ड्रोन हल्ला झाला होता.
 • आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दरम्यान, मंत्रालयाने कळवलं आहे की देशातील पूर्वेकडील भागात झालेल्या ड्रोन हल्ल्यांची चौकशी सुरू आहे. हे कोणाचं कारस्थान आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. मागील महिन्यातदेखील अरामकोच्या नॅचरल गॅसच्या फॅसिलिटी सेंटरवर हल्ला झाला होता. यात जीवितहानी झाली नव्हती. यमनच्या हूथी विद्रोही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

सौदी अरेबिया:-

 • सौदी अरेबियाचे राजतंत्र हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. 
 • रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर मक्का व मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारिया कायदा चालतो.
 • सलमान हे सौदीचे सध्याचे राजे आहेत.
 • सौदी अरेबिया देशामध्ये जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे (एकुण जगाच्या १९.८ टक्के) आहेत. जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर तेलाची निर्यात करणार्‍या सौदीची ९० टक्के व सौदी सरकारची ७६ टक्के अर्थव्यवस्था ह्या निर्यातीवर अवलंबून आहे.

 

15 Sep Current Affairs
15 Sep Current Affairs

गृहनिर्माण निर्यात क्षेत्रासाठी अर्थबळ

 • देशाच्या मंदावलेल्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी गृहबांधणी आणि निर्यात क्षेत्रासाठी प्रोत्साहनपर उपायांची घोषणा केली. या दोन महत्त्वाच्या रोजगारप्रवण क्षेत्रांसाठी ७० हजार कोटींचा निधी सरकारने खुला केला आहे.
 • चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत विकासाचा दर सहा वर्षांतील तळ दाखविणारा पाच टक्के नोंदला गेला आहे. विकासदराची ही घसरण थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या चार आठवडय़ांत योजले गेलेले हे तिसरे अर्थ-प्रोत्साहक उपाय आहेत. 
 • यापूर्वी विदेशी गुंतवणूकदारांवरील कर अधिभार रद्दबातल करण्यात आला आहे, तसेच दहा सरकारी बँकांचे महाविलीनीकरण करून चार मोठय़ा बँकांची निर्मितीची वाट खुली करण्यात आली आहे.

गृहप्रकल्पांना प्राधान्य:-

 • परवडणारी घरे (४५ लाख रुपये किमतीपर्यंतची) ते मध्यम उत्पन्न श्रेणीतील घरांच्या प्रकल्पांसाठी ही वित्तपुरवठय़ाची विशेष खिडकी तयार केली गेली आहे. या निधीचे व्यवस्थापन सरकारमार्फत नव्हे, तर व्यावसायिक व तज्ज्ञ मंडळींकडून केले जाईल. मात्र दिवाळखोरी प्रक्रिया सुरू असलेल्या, तसेच थकीत कर्ज असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना हा निधी दिला जाणार नाही. 
 • दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाकडे वर्ग असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील घर खरेदीदारांना या न्यायिक प्रक्रियेतून न्याय मिळू शकेल.
 • याशिवाय, पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्पांना वित्तपुरवठा करणाऱ्या बँका आणि वित्तसंस्थांना विदेशातून व्यापारी कर्जउभारणीस मुभा दिली जाईल. रिझव्‍‌र्ह बँकेशी सल्लामसलत करून या संबंधाने मार्गदर्शक अटी लवकरच जाहीर केल्या जातील. यातून परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीस आणखी चालना मिळू शकेल.
 • घरांच्या मागणीत सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याने, त्यांना घरखरेदी अथवा घराच्या बांधकामासाठी मिळणाऱ्या विनातारण अग्रिम अथवा कर्जावरील व्याजदर कमी करण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. दहा वर्षांच्या सरकारी कर्जरोख्यांच्या परतावा दरानुरूप या व्याजदराची निश्चिती केली जाईल. सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल.

निर्यातवाढीसाठी ५० हजारांचे प्रोत्साहन:-

 • निर्यातीला चालना देण्यासाठी १ जानेवारी २०२० पासून कर परतावा आणि शुल्क प्रतिपूर्तीची नवीन योजना लागू केली जाईल. नव्या योजनेमुळे सरकारला सुमारे ५० हजार कोटींचा निधी निर्यातदारांना दरसाल प्रतिपूर्ती स्वरूपात द्यावा लागेल. विद्यमान प्रतिपूर्ती योजना डिसेंबर २०१९ पर्यंत कायम राहतील. देशाची वस्तू निर्यात ६.०५ टक्क्यांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमूल्यन होत असून त्याचा निर्यातवाढीसाठी फायदा करून घेण्यासाठी निर्यात प्रोत्साहन दिले जाणार आहे.
 • जीएसटीतील इनपूट टॅक्स क्रेडिटची रक्कम तातडीने मिळावी यासाठी ई-रिफंडचा मार्ग अवलंबला जाणार असून याच महिनाअखेरपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. याचा सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगाला आवश्यक खेळत्या भांडवलाचा प्रवाह खुला होईल.
 • जुन्या निर्यात सवलत योजनेनुसार वस्त्रोद्योगाला २ टक्के अनुदान दिले जाते. नव्या योजनेतही त्याचा समावेश करण्यात आला आहे. निर्यात अनुदानाचा विस्तार केला गेला आहे.
 •  निर्यातदारांसाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करण्यासाठी निकष बदलले जाणार असून, यातून अतिरिक्त ३६ हजार ते ६८ हजार कोटींचा निर्यातपूरक वित्तपुरवठा खुला होऊ शकेल.

बँकप्रमुखांशी बुधवारी चर्चा:-

 • बँकेतर वित्तीय कंपन्या व गृहवित्त कंपन्यांना रोकडसुलभता खुली करणे, गृहनिर्माण प्रकल्पांना कर्ज उपलब्धता, व्याजाचे दर हे रेपो दराशी संलग्न करून सर्वसामान्यांना स्वस्त दरात कर्जपुरवठय़ाचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. बँकांच्या या संदर्भातील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी येत्या १९ सप्टेंबरला अर्थमंत्री सीतारामन या सरकारी बँकांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. 
 • वस्तू व सेवा कर परिषदेची २० सप्टेंबरला गोव्यात महत्त्वपूर्ण बैठक होत असून, त्यापूर्वी वित्तीय क्षेत्राला चालना देण्यासाठी योजलेल्या उपायांची परिणामकारकता अर्थमंत्री चाचपणार आहेत.

रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी २० हजार कोटीं:-

 • देशभरातील अपूर्ण अवस्थेतील गृहनिर्माण प्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वास नेण्यास वित्तसाहाय्य म्हणून २० हजार कोटी रुपयांचा कोष तयार केला जाईल.
 • केंद्र सरकारचे १० हजार कोटी रुपये आणि तितकाच निधी एलआयसी आणि तत्सम वित्तीय संस्थांकडून उभा केला जाईल. देशभरातील अशा रखडलेल्या प्रकल्पांमध्ये सुमारे तीन ते साडेतीन लाख घरे असण्याचा अंदाज आहे.
 • देशभरातील घरासाठी पैसा गुंतविलेल्या, परंतु प्रकल्प अपूर्ण व बांधकामाधीन असल्याने ताबा मिळण्यास विलंब होत असलेल्या मध्यमवर्गीय ग्राहकांचे घराचे स्वप्न यातून पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला.

चार शहरांत शॉपिंग फेस्टिव्हल:-

 • दुबईप्रमाणे भारतातही चार शहरांमध्ये दरसाल ‘मेगा शॉपिंग फेस्टिव्हल’ पुढील वर्षी मार्चपासून आयोजित करण्याची योजना आहे. यातून रत्न व आभूषणे, वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, योग, पर्यटन आदी क्षेत्रांतील मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे. छोटे कारागीर, हस्तशिल्प व दस्तकारांना यातून व्यवसाय संधी निर्माण होतील.
 • औद्योगिक उत्पादन वेग पकडू लागल्याचे संकेत आहेत. चलनवाढीचा दर सध्या चार टक्क्यांच्या घरात म्हणजे आटोक्यात आहे. उद्योग क्षेत्राला आर्थिक साहाय्य दिले जात असले, तरी वित्तीय तूट नियंत्रणात ठेवली जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पातील निर्धारित लक्ष्याच्या मर्यादेतच ती राहील. सरकारने दोन आठवडय़ांपूर्वी योजलेल्या उपायांचा अनेक संकटग्रस्त बँकेतर वित्तीय संस्थांना फायदा होत असल्याचेही दिसून येत आहे.
   

लादेनचा मुलगा हमजा मारला गेल्याच्या वृत्तावर अमेरिकेकडून शिक्कामोर्तब

 • ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन अमेरिकेने केलेल्या कारवाईत ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज या वृत्तास दुजोरा दिला. अमेरिकेने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत हमजा बिन लादेनला ठार मारण्यात आल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
 • अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागात अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली आहे. याच कारवाईत हमजाचा खात्मा करण्यात आल्याचे व्हाइट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 
 • ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्यानंतर 'अल-कायदा' ची सूत्रे हमजाच्या हाती आली होती. हमजाचा खात्मा झाल्याने दहशतवादविरोधी कारवाईला मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे.
 • दरम्यान, हमजाला नेमकं कधी ठार करण्यात आलं, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
   
15 Sep Current Affairs
15 Sep Current Affairs

जागतिक कुस्ती स्पर्धा ग्रीको रोमनमध्ये चार मल्लांची हार

 • जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या ग्रीको रोमन गटातील मोहिमेला पहिल्याच फेरीत धक्का बसला. ग्रीको-रोमन प्रकारात शनिवारी भारताचे चारही कुस्तीगीर एकही फेरी न जिंकताच पराभूत झाले. 
 • ग्रीको रोमन प्रकारातील ऑलिम्पिक वजनी गटात नसलेल्या गटात भारतीय खेळाडू खेळत होते. त्यात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता हरप्रीतसिंग (८२ किलो), सागर (६३ किलो), मनजीत (५५किलो) यांना तर एकही गुण मिळविता आला नाही. केवळ ७२ किलो वजनी गटात योगेशने अमेरिकेचा प्रतिस्पर्धी रेमंड अँथनी बंकरला चांगली झुंज दिली आणि ५-६ अशा फरकाने तो पराभूत झाला.
 • पहिल्या फेरीत अमेरिकेच्या खेळाडूने ४-० अशी आघाडी योगेशविरुद्ध घेतली होती; पण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या मिनिटाला योगेशने गुण मिळविले आणि त्यात आणखी चार गुणांची भरही घातली. त्यामुळे योगेश ५-४ असा आघाडीवर होता; पण बंकरने ५-५ अशी बरोबरी साधली व त्यानंतर विजय साकारला. पराभवानंतर बोलताना योगेश म्हणाला, की मी संयम बाळगला नाही. 
 • मी विजयाच्या खूप जवळ आलो होतो; पण मी संयम न राखल्यामुळे पराभूत झालो. याची जबाबदारी माझीच आहे. मी जर ही फेरी जिंकलो असतो तर उपांत्य फेरीत जाण्याची संधी होती. भारतीय संघाचे प्रशिक्षक टेमो कझाराशविली यांनी भारताचे ग्रीको रोमनमधील स्थान खूपच वाईट असल्याचे मत व्यक्त केले. 
 • माजी विश्वविजेता असलेल्या कझाराशविली यांनी सांगितले की, भारतीय खेळाडूंमध्ये सुधारणा आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. कार्यप्रणालीत बदल करावा लागेल. चांगले निकाल पाहायचे असतील तर २-३ वर्षांचा अवधी लागेल. 
 • ग्रीको रोमन हा प्रकार भारतात फार लोकप्रिय नाही. या प्रकारात भारताला बरेच कुस्तीगीर तयार करावे लागतील. लहान मुलांमध्ये हा प्रकार लोकप्रिय करावा लागेल. अगदी शालेय स्तरापासून या प्रकाराला प्रोत्साहन द्यावे लागेल.
 • आता ऑलिम्पिकसाठी असलेल्या वजनी गटात भारताचे मनीष, सुनीलकुमार, रवी यांच्याकडून अपेक्षा आहेत. मनीष ६७ किलो वजनी गटात, तर सुनील ८७ किलो वजनी गटात खेळणार आहे. रवी ९७ किलो वजनी गटात तैपेईच्या खेळाडूला झुंज देणार आहे.
   

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन सौरभ वर्मा अंतिम फेरीत दाखल

 • भारताच्या सौरभ वर्माने व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या मिनोरू कोगावर मात केली.
 • पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित सौरभने बिगरमानांकित मिनोरूवर २२-२०, २१-१५ अशी मात केली. ही लढत ५१ मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत सौरभ ३८व्या स्थानावर असून, मिनोरू ११२व्या स्थानावर आहे. 
 • या वर्षी मे महिन्यात झालेल्या स्लोव्हेनिया इंटरनॅशनल स्पर्धेत सौरभने मिनोरूवर मात केली होती. मात्र, मागील लढतीपेक्षा मिनोरूच्या खेळात सफाई दिसली. त्याने सौरभला सहजासहजी गुण घेऊ दिले नाहीत. 
 • पहिल्या गेममध्ये मिनोरूने सलग चार गुण घेत आक्रमक सुरुवात केली. सौरभने पुढे त्याला ६-६ असे बरोबरीत गाठले. यानंतर दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस बघायला मिळाली. त्यामुळे ही गेम ९-९ अशी बरोबरीत सुरू होती. यानंतर सौरभने सलग पाच गुण घेतले. मात्र, मिनोरूने सहजासहजी हार मानली नाही. त्याने सौरभला १८-१८ असे बरोबरीत गाठले.
 • सौरभने पुढील गुण घेतला खरा; पण मिनोरूने सलग दोन गुण घेत गेम पॉइंट मिळवला. हा गेम पॉइंट वाचवून सौरभने बरोबरी साधली आणि पुढे सलग दोन गुण घेत पहिली गेम जिंकली. दुसऱ्या गेममध्ये मिनोरू ८-३ असा आघाडीवर होता. 
 • 'ब्रेक'ला त्याच्याकडे ११-८ अशी आघाडी होती. 'ब्रेक'नंतर सौरभने मिनोरूला १४-१४ असे यानंतर सौरभने 'टॉप गिअर' टाकला. त्याने मिनोरूला संधीच दिली नाही आणि बघता बघता ही गेम २१-१५ अशी जिंकली.
 • सौरभने गेल्या महिन्यात हैदराबाद ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याला आता आणखी एक स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला आता चीनच्या सन फेइ शिअँगचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत सन ६८व्या स्थानावर आहे. मागील दोन्ही लढतींत सौरभने त्याला पराभूत केले आहे.
15 Sep Current Affairs

कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे अश्या प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारल्यास शेवटच्या दोन बातम्या उपयोगी पडतात

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »