16-17 Oct Current Affairs

16-17 Oct Current Affairs
16-17 Oct Current Affairs

पठाणकोटमध्ये एनएसजी हब

 • दहशतवादविरोधी युद्धासाठी पठाणकोट येथे राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) मुख्य केंद्र (हब) करण्यात येणार असून पाचशे कमांडो त्या ठिकाणी कायमस्वरूपी तैनात करण्यात येणार आहेत.
 • पंजाबमधील हवाई दल, लष्कराचे तळ आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षेला त्यामुळे मजबुती येणार आहे. या संबंधी केंद्र सरकार पंजाब सरकारशी चर्चा करीत असल्याची माहिती आहे.
 • केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या 'एनएसजी'च्या ३५व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एनएसजीचे महासंचालक एस. एस. देसवाल यांनी पठाणकोटला एनएसजीचे हब तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
 • देसवाल म्हणाले, 'अमृतसर आणि पठाणकोटजवळ एनएसजीचे नवे क्रियात्मक हबची स्थापना करण्यात येईल. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. गेल्या एका वर्षापासून श्रीनगर येथे एक क्रियात्मक हब कार्यान्वित आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आणीबाणीची परिस्थिती तयार झाली, तर कायदा-सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी एनएसजी जलद गतीने तेथे जाऊ शकेल. एनएसजीची सर्व केंद्रे पूर्णपणे सुसज्ज आहेत.
 • दहशतवादी घटना घडते, त्या ठिकाणापासून एनएसजीच्या कमांडोंचे अंतर कमी करण्याचा हेतू आहे. काश्मीरमध्ये बर्फाच्छादित क्षेत्रातही कारवाईचे प्रशिक्षण कमांडोंना देण्यात आले आहे.'

पंजाब अस्थिर करण्याचा डाव:-

 • एनएसजीचे मुंबईवरील २००८मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाच हब तयार करण्यात आले आहेत. गांधीनगर (गुजरात), चेन्नई (तमिळनाडू), कोलकाता (पश्चिम बंगाल), मुंबई (महाराषट्र) आणि हैदराबाद (तेलंगण) या पाच ठिकाणी हे हब आहेत. गेल्या एका वर्षापासून श्रीनगर येथे एक क्रियात्मक हब कार्यान्वित आहे.
 • 'एनएसजी'चाच एक भाग असणारे विशेष कृती दल (५१ एसएजी) पठाणकोट येथे कायमस्वरूपी तैनात करण्यात येणार आहे. अपहरण किंवा दहशतवादी घटना, घातपात अशा प्रसंगांना जलद गतीने तोंड देणे सुरक्षा दलांना त्यामुळे शक्य होणार आहे.
 • गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले, की पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी घुसवण्याचा पाकिस्तानचा मनसुबा आहे. ताबारेषेवर लष्कर आणि इतर सुरक्षा दलांची सज्जता आणि सातत्याने घुसखोरांचा केला जाणारा खात्मा यांमुळे दहशतवाद्यांनी आपला मोर्चा पंजाब सीमेवर वळवला आहे. शस्त्र आणि दारुगोळ्यांसह त्यांना पंजाबमार्गे भारतात घुसवून अस्थिरता तयार करण्याचा डाव पाकिस्तानचा आहे.

'एनएसजी'ची पाहणी:-

 • 'बब्बर खालसा खालिस्तान फोर्स'सारख्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान लष्कर ड्रोन आणि मानवरहित विमानांच्या साह्याने पंजाब सीमेवर शस्त्रे टाकत आहेत. याचा वापर करून भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याचा त्यांचा मनसुबा आहे.
 • काही ड्रोन आणि शस्त्रे आढळल्यानंतर एनएसजीच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली.

NSG बद्दल वाचून ठेवा

 

१७ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक फैसला

 • अयोध्यामधील रामजन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला असून तो येत्या १७ नोव्हेंबरला ऐतिहासिक फैसला सुनावण्यात येणार आहे.
 • आज तासभर आधीच सुप्रीम कोर्टात या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आल्यानंतर १७ नोव्हेंबरला फैसला सुणावण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे.
 • सुप्रीम कोर्टात आज बुधवारी अयोध्याप्रकरणी सुनावणी पूर्ण करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने यासंबंधीचा निकाल राखून ठेवला असून यावर फैसला सुनावला जाणार आहे.
 • आज सुमारे चारच्या सुमारास म्हणजेच तासभर आधीच या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आली. सुप्रीम कोर्टात बुधवारी राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर लागोपाठ ४० दिवस सुनावणी पूर्ण करण्यात आली.
 • पाच सदस्यीय संविधानिक खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी पूर्ण केली. आज सुनावणी सुरू होताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले की, आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु, आजची सुनावणी वेळेच्या तासभर आधीच पूर्ण करण्यात आली, हे विशेष.
 • आजच्या सुनावणीत मुस्लीम आणि हिंदू पक्षकाराने आपापली बाजू सुप्रीम कोर्टासमोर मांडली. आज सुनावणीदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा सुद्धा पाहायला मिळाला. मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी हिंदू महासभेच्या वकिलाकडून सादर करण्यात आलेला नकाशा सरन्यायाधीश यांच्यासमोर फाडून टाकला.
 • वकिलाच्या या कृतीवर सरन्यायाधीस यांनी नाराजी व्यक्त केली. याआधी मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्व पक्षकारांना १६ ऑक्टोबर पर्यंत यासंबंधीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश यांनी दिले होते. या प्रकरणावर फैसला सुनावण्यासाठी चार आठवड्याचा कालावधी लागणार असल्याने पक्षकारांनी बुधवारी आपापले पुरावे सादर करावे, असे सरन्यायाधीश यांनी आधीच नमूद केले होते.
 • मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वकिलाच्या युक्तीवादावर नाराजी व्यक्ती केली. जर याप्रकरणी असाच युक्तीवाद सुरू राहिल्यास आम्ही उठून जाऊ, असे त्यांनी म्हटले.
 • मुख्य न्यायाधीशांच्या नाराजीनंतर हिंदू महासभेच्या वकिलाने दिलगिरी व्यक्त करीत मी कोर्टाचा सन्मान करतो.
 • मी न्यायालयाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन केले नाही, असे कोर्टात म्हटले. त्यानंतर ऑक्सफोर्डमधील एका पुस्तकाचा संदर्भ दिला. यावर आक्षेप घेत मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी हा नकाशा फाडून टाकला. वकिलाच्या या कृतीवर मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
16-17 Oct Current Affairs
16-17 Oct Current Affairs

पुणेकरांच्या प्रकल्पाला आयबीएम पुरस्कार

 • भारतीय उपखंडातील पुराच्या समस्येवर उपाय शोधणारा 'पूर्व-सूचक' या भारतीय सॉफ्टवेअर तज्ज्ञांच्या प्रकल्पाला 'आयबीएम'कडून पाच हजार डॉलरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 • 'आयबीएम'; तसेच 'डेव्हिड क्लार्क कॉझ फाउंडेशन कॉल फॉर कोड २०१९' च्या वतीने आशिया पॅसिफिक प्रदेशासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
 • या पथकामध्ये पुण्यातील कॉग्निझंट कंपनीतील सिद्दमा तिगडी, गणेश कदम, संगीता नायर आणि श्रेयस कुलकर्णी यांचा समावेश आहे.
 • या प्रकल्पामध्ये जलसाठे, धरणे, जलस्रोत यांचे सातत्यपूर्ण निरीक्षण करून त्या माहितीची सांगड हवामान अंदाजासोबत घालण्यात आली आहे. यामुळे पूरस्थितीची पूर्वसूचना देणारी माहिती संकलित होणार असून ती सरकारी यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा; तसेच अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे.
 • अद्ययावत उपलब्ध माहितीमुळे पूरस्थितीला अटकाव करणे आणि जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होणार आहे. 'भारतीय उपखंडावर सर्वांत अधिक प्रभाव असणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा आम्ही आधी अभ्यास केला.
 • त्यातून पूर ही सर्वाधिक परिणामकारक आपत्ती असल्याचे लक्षात आले. प्रभावी पूर व्यवस्थापनाचा अभाव, अचूक अंदाज देण्याची तसेच पुराची तीव्रता कमी करण्याची गरज समोर आली,' अशी माहिती पूर्व-सूचक प्रकल्पाच्या संघातील सदस्य तिगडी यांनी दिली.

'स्पॅरो'ला दुसरा क्रमांक:-

 • या स्पर्धेमध्ये १५ देशांनी सहभाग घेतला होता. 'कॉल फॉर कोड २०१९ ग्लोबल चॅलेंज' स्पर्धेत स्पेनमधील 'प्रोमीटीओ' या संस्थेच्या आग नियंत्रण तंत्रज्ञानाला पहिले बक्षीस मिळाले.
 • या तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आगनियंत्रक उपकरणांचे संरक्षण केले जाते. या प्रकल्पाला २ लाख डॉलरचे बक्षीस मिळाले.
 • या विभागात 'स्पॅरो' प्रकल्पाला दुसरा क्रमांक मिळाला. या प्रकल्पाच्या पथकामध्ये भारतीय, चीनी आणि अमेरिकी सदस्य होते.
 • आपत्ती आल्यावर आणि त्यानंतरच्या काळात नागरिकांना वैद्यकीय आणि मानसिक मदत मिळवून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे हे तंत्रज्ञान आहे. गरजूंना तातडीच्या सेवांशी या माध्यमातून जोडले जाऊ शकते.
 • आशिया पॅसिफिक विभागातून ग्लोबल चॅलेंज विभागासाठी पात्र ठरणारा 'स्पॅरो' हा एकमेव प्रकल्प होता.

 

पाकवर एफएटीएफ चा दबाव

 • 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स'ची (एफएटीएफ) पॅरिसमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. दहशतवादी संघटनांना आपल्या जमिनीतून हुसकावून लावण्यासाठी पाकिस्तानवर प्रचंड दबाव आहे,' असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी सोमवारी स्पष्ट केले.
 •  त्याच वेळी पाकिस्तान दहशतवाद्यांना कसा पोसत आहे आणि आर्थिक मदत करत आहे, याचे ठोस पुरावे मिळाले, तर ते संकलित करून आंतरराष्ट्रीय व्यासपीठासमोर ठेवता येतील, असे सांगत त्यांनी तपास यंत्रणांच्या प्रमुखांना पुरावे संकलित करण्याची सूचनाही केली.
 • 'एफएटीएफ'ची पॅरिसमध्ये बैठक होत असून, दहशतवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखण्याचे काम ही संघटना करते. दहशतवादी संघटनांना मोकळे रान दिल्यामुळे, या संघटनेने पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट'मध्ये टाकले आहे.
 • त्यानंतरही पाकिस्तानने या संघटनेच्या ४० निकषांपैकी एकाच निकषाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
 • या पार्श्वभूमीवर, देशभरातील दहशतवादविरोधी पथकांच्या (एटीएस) प्रमुखांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये डोवल बोलत होते. ते म्हणाले, 'पाकिस्तानवर सध्या 'एफएटीएफ'चा सर्वांत जास्त दबाव असून, अन्य कोणत्याही संस्था-संघटनेपेक्षा हा दबाव सर्वांत जास्त आहे.'
 • 'पाकिस्तान दहशतवाद्यांना कशा पद्धतीने पोसत आहे आणि त्यांना कसा आर्थिक पुरवठा करत आहे, याचे ठोस पुरावे तपास यंत्रणांनी संकलित केले, तर ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठासमोर मांडत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणता येईल,' असेही त्यांनी नमूद केले.
 • आर्थिक बोजाचा विचार करताना, राजकीय व सामरिक ध्येय गाठण्यासाठी युद्ध हा पर्याय मागे पडला आहे, असे सांगताना डोवल म्हणाले, 'युद्धातील विजयाचीही खात्री देऊ शकत नाही. अगदी अमेरिका आणि सोव्हियत महासंघासारख्या महासत्तांनाही ते शक्य झालेले नाही.
 • त्यामुळेच काही देशांकडून दहशतवादाला पोसण्याचे आणि खतपाणी घालण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. भारतासह जगाच्या अनेक भागातील दहशतवाद हा कोणत्या तरी देशाने पुरस्कृत केलेलाच आहे. पाकिस्तानने दहशतवादाला त्यांच्या देशाच्या धोरणाचाच एक भाग केले आहे. त्यामुळेच भारतीय सुरक्षा यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान आहे.'
16-17 Oct Current Affairs
16-17 Oct Current Affairs

२००० रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेनं थांबवली

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवल्याची माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एक नोटही छापली नाही. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयनं ही माहिती दिली.
 • केंद्र सरकारनं २०१६मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर पहिल्यांदाच २००० रुपयांची नोट चलनात आणली. काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली.
 • त्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. यावरून केंद्र सरकार आणि आरबीआयवर टीकाही झाली. जाणकारांच्या मतांनुसार, जास्त मूल्याच्या या नोटेमुळं पुन्हा काळा पैसा वाढेल. याशिवाय २००० रुपयांच्या नोटेमुळं सुट्ट्या पैशांची समस्याही वाढेल, असंही त्यांनी सांगितलं होतं.
 • 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'ने आरबीआयकडे माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्याला उत्तर देताना आरबीआयने चालू आर्थिक वर्षात २००० रुपयांची एकही नोट छापली नाही, अशी माहिती दिली आहे.
 • आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये २००० रुपयांच्या ३५४.२९ कोटी नोटा छापण्यात आल्या. तर २०१७-१८ मध्ये ११.१५ कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. २०१८-१९मध्ये ४.६६ कोटी नोटांची छपाई करण्यात आली. तर चालू आर्थिक वर्षात एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

२००० रुपयांच्या नोटा झाल्या कमी:-

 • गेल्या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या नोटा चलनात कमी प्रमाणात आल्या. २०१८-१९मध्ये चलनातील २०००च्या नोटा ७.२ कोटींनी कमी झाल्या.

बनावट नोटांचा बाजार तेजीत:-

 • रिझर्व्ह बँकेकडील आकडेवारीनुसार, बनावट नोटांची संख्या तेजीनं वाढत आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये नोटाबंदीनंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. तर २०१७मध्ये पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या.
 • आर्थिक वर्ष २०१७-१८च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात बनावट नोटांमध्ये १२१ टक्क्यांनी वाढ झाली.
 • तर २००० रुपयांच्या बनावट नोटांची आकडेवारी २१.९ टक्के आहे. सरकारने २०० रुपयांची नोट २०१७मध्ये चलनात आणली. २०० रुपयांच्या १२, ७२८ बनावट नोटा सापडल्या. तर गेल्या वर्षी केवळ ७९ बनावट नोटा सापडल्या.

 

यशस्वी भव: क्रिकेटच्या मैदानात द्विशतक झळकावलं

 • यशस्वी ठरला द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज
 • सध्या सुरू असलेल्या विजय हजारे चषक एकदिवसीय स्पर्धेत बुधवारी मुंबईच्या यशस्वी जैस्वाल याने ऐतिहासिक कामगिरी केली.
 • यशस्वीने दमदार द्विशतक झळकावत झारखंडविरुद्ध मुंबईला ३ बाद ३५८ धावांचा डोंगर उभा करून दिला.
 • यशस्वी आणि आदित्य तरे यांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. त्यात तरेने १०२ चेंडूत ६ चौकार व १ षटकार लगावत ७८ धावा ठोकल्या. सिद्धेश लाड (३२) आणि श्रेयस अय्यर (नाबाद ३१) यांनीही फटकेबाज खेळी केली. पण यशस्वीने मात्र प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडलेय. त्याने १५४ चेंडूंत १७ चौकार व १२ षटकार ठोकत २०३ धावा कुटल्या.
 • यशस्वीने त्याच्या या द्विशतकी खेळीच्या जोरावर विविध विक्रमांना गवसणी घातली. मुंबईकडून खेळताना त्याने २१२ धावा केल्या. अ श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूने झळकावलेले हे नववे द्विशतक ठरले.
 • तसेच तो द्विशतक ठोकणारा सातवा फलंदाज ठरला. याशिवाय १७ वर्षांचा यशस्वी अ श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम यशस्वीने केला.
 • तसेच यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेतील हे दुसरे द्विशतक ठरले. केरळच्या संजू सॅमसनने काही दिवसांपूर्वीच गोवा संघाविरुद्ध २१२ धावा केल्या होत्या.
 • अ श्रेणी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक ३ द्विशतके झळकावली आहेत. तर विरेंद्र सेहवाग, शिखर धवन, सचिन तेंडुलकर, कर्ण वीर आणि संजू सॅमसन यांनी १-१ द्विशतक ठोकली आहेत. त्यांच्या पंगतीत त्याने स्थान मिळवले.
16-17 Oct Current Affairs
16-17 Oct Current Affairs

सचिन लारा पुन्हा मैदान गाजवणार टी २० खेळणार

 • जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे दोघे दिग्गज पुन्हा मैदानात उतरणार आहेत. सचिनसह भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग, तिलकरत्ने दिलशान आणि जॉन्टी रोड्स यांसारखे दिग्गज फलंदाज मैदानात उतरून धावांची बरसात करतील.
 • सचिन आणि लारा आदींसह माजी दिग्गज खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड टी-२० स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज संघ सहभागी होणार आहेत.
 • या स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी २ ते १६ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. ही स्पर्धा दरवर्षी होणार आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले ११० खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. या सर्व खेळाडूंनी रोड सेफ्टी वर्ल्ड स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवली आहे.
 • या टी-२० स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयने मंजुरीही दिली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतात टी-२० क्रिकेटची लोकप्रियता वाढण्यास आणखी मदत होईल, असं बीसीसीआयला वाटतं.
 • सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं सर्वाधिक धावा केल्या आहेत. २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं अनेक विक्रम केले आहेत.
 • क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांत मिळून त्यानं १०० शतके ठोकली आहेत. विक्रमवीर सचिन पुन्हा मैदानात उतरणार आहे. त्याची फलंदाजी पुन्हा पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे.

दारिद्रय़ाचा दर कमी करण्यात भारताला लक्षणीय यश WB

 • दारिद्राचा दर १९९०  पासून  निम्म्यावर आणण्यात भारत  यशस्वी झाला असून आर्थिक वाढीचा दरही गेल्या पंधरा वर्षांत सात टक्कय़ांपेक्षा अधिक राखण्यात यश आले आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
 • जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या संयुक्त वार्षिक बैठकीत असे सांगण्यात आले,की  भारताने जागतिक पातळीवर हवामान बदला विरोधातील लढय़ात पुढाकार घेतानाच  दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवून मोठी कामगिरी केली आहे.
 • गेल्या पंधरा वर्षांत  भारताने सात  टक्क्य़ांहून अधिक विकास दर कायम राखला होता, त्याच बरोबर  १९९०  पासून दारिद्रय़ाचा दरही निम्म्यावर आणला आहे, त्यामुळे मानवी विकासाच्या पातळीवर भारताने चांगली प्रगती केली आहे.
 • भारताचा हा विकास असाच सुरू राहण्याची अपेक्षा असून दशकभरात देशातील टोकाचे दारिद्रय़  कायमचे मिटवण्यात यश येण्याची शक्यता आहे. असे असले तरी यात अनेक आव्हाने असून साधनांची कमतरता हा मोठा अडथळा ठरू शकतो.
 • जमिनीचा वापर शहरात अतिशय परिणामकारकरीत्या करण्याची गरज आहे. त्याचबरोबर पाण्याचे व्यवस्थापन हा भारतासाठी पुढील काळात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे,  त्यासाठी पाणीवाटपाच्या धोरणात बदल करावे लागतील.
 • वीज निर्मिती हा  महत्त्वाचा मुद्दा असून अजूनही २३ कोटी लोक वीज संजालाशी व्यवस्थितपणे जोडले गेलेले नाहीत. भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून तेथे पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीची गरज आहे. २०३० पर्यंत भारताला सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ८.८ टक्के किंवा ३४३ अब्ज डॉलर्स गुंतवणूक पायाभूत क्षेत्रात करावी लागेल.
 • दरवर्षी १.३० कोटी लोकांची भर रोजगारक्षम मनुष्यबळात पडत असून वर्षांला ३० लाख रोजगार निर्माण होत आहेत.
 • महिलांचा मनुष्यबळातील सहभाग भारतात कमी असून जगातील आकडेवारी पाहता खूप कमी म्हणजे केवळ २७ टक्के आहे. मध्यमवर्गीयांच्या आशाआकांक्षा पूर्ण करणाऱ्या सेवा देण्यासाठी सार्वजनिक संस्थांना आधुनिक स्वरूप द्यावे लागेल. सरकारलाही सेवेचा दर्जा सुधारावा लागेल.
16-17 Oct Current Affairs
16-17 Oct Current Affairs

दिल्ली राजधानी परिसरातील हवेचा दर्जा आणखी खालावलेला

 • दिल्ली राजधानी परिसरातील अनेक भागात हवेचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे बुधवारच्या निरीक्षण नोंदीतून दिसून आले आहे. १० मायक्रोमीटर व्यासाच्या कणांचे प्रमाण हवेत जास्त प्रमाणात होते असा याचा अर्थ आहे.
 • दिल्लीचा हवा दर्जा निर्देशांक २९९ होता तो खराब दर्जाकडे झुकणारा आहे. मंगळवारी हा निर्देशांक सायंकाळी चार वाजता २७० होता.  
 • एकूण ३७ हवा निरीक्षण केंद्रांच्या माहितीनुसार दिल्ली राजधानी परिसरात हवेची स्थिती खूप खराब दर्जाची होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले की, मुंडका, द्वारका सेक्टर ८, दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ, आनंद विहार, वझीरपूर, रोहिणी, बवाना, अशोक विहार, नेहरू नगर व जहाँगीरपुरी भागात हवा निर्देशांक हा अनुक्रमे ३६८, ३६२, ३५५, ३२८, ३२३, ३२३, ३२०, ३१९, ३१९, ३१८ होता. अलिपूर (३१४), नरेला (३१२), विवेक विहार (३११), सिरीफोर्ट (३०९), सीआरआरआय मथुरा रोड ( ३०४), ओखला फेज २  (३०३), आयटीओ (३०२) याप्रमाणे निर्देशांकाची नोंद झाली.
 • गाझियाबाद (३३७), लोणी देहात (३३५), नोईडा (३१८), बृह नोईडा ( ३१८), या प्रमाणे इतर ठिकाणीही प्रदूषण गंभीर स्वरूपात होते. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रीसर्च म्हणजे सफर या संस्थेने म्हटले आहे की, भाताच्या काढणीनंतर पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले  आहे. बुधवारी यामुळेच पीएम २.५ कणांचे प्रमाण वाढण्यात पिकांचे अवशेष जाळण्याचा सहा टक्के वाटा होता. नासाने दिलेल्या छायाचित्रातही पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटना दिसून आल्या आहेत.

नागपुरात सापडल्या २०० वर्ष जुन्या तोफा इंग्रज मराठा युद्धकाळातील असल्याचा अंदाज

 • नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर खोदकाम सुरु असताना चार भल्या मोठ्या तोफा सापडल्या आहेत.
 • या तोफा १८१७ दरम्यान झालेल्या इंग्रज-मराठा युद्धकाळातील असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे. याठिकाणी अजून दारुगोळा सापडतील असा अंदाज आहे.
 • नागपुरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कस्तुरचंद पार्क मैदानावर सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. त्याचेच खोदकाम सुरु असताना काल रात्री या तोफा जमिनीत चार फूट अंतरावर आढळल्या.
 • सापडलेल्या चारही तोफा १० फूट लांबीच्या असून त्यांचा व्यास दोन ते तीन फुटांचा आहे. जाणकारांच्या मते या तोफा लांब पल्ल्याच्या असून त्या इंग्रज सैन्याच्या असाव्यात.
 • विशेष म्हणजे याच कस्तुरचंद पार्क मैदानाजवळ मराठ्यांचा म्हणजेच भोसले घराण्याचा सीताबर्डी किल्ला होता. १८१७ आणि १८१८ मध्ये इंग्रज आणि मराठा युद्धाच्या वेळी घडामोडींचा प्रमुख केंद्र हाच सीताबर्डी किल्ला ठरला होता, आणि त्याच्याच पायथ्याशी असलेल्या कस्तुरचंद पार्क मैदानावर नंतरच्या काळात इंग्रजांचा बँड स्टॅन्ड म्हणजेच कवायतीचा तळही होता.
 • त्यामुळे या तोफा त्याच काळातील असाव्यात असा अंदाज बांधला जात आहे. जमिनीतून ऐतिहासिक तोफा आढळल्याची बातमी पसरताच प्रशासकीय अधिकारी, पोलीस, सैन्य दलातील अधिकारी यांच्यासह बघ्यांची गर्दी परिसरात वाढली आहे

[इंग्रज-मराठा युद्धे करून ठेवा]

16-17 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »