18 August Current Affairs

18 August Current Affairs
18 August Current Affairs

पद्मश्री दामोदर बापट यांचे निधन

 • कुष्ठरुग्णांच्या उद्धारासाठी आपले जीवन वेचणारे थोर समाजसेवक दामोदर गणेश बापट (८४) यांचे शुक्रवारी रात्री उशिरा येथे निधन झाले. 
 • त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 • बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. 
 • भारतीय कुष्ठ निवारक संघाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांनी आपल्या आयुष्याची ४२ वर्षे कुष्ठरुग्णांची सेवा केली. 
 • चांपापासून आठ किलोमीटर अंतरावरील सोठी या गावातील आश्रमात कुष्ठरुग्णासमवेत त्यांचे वास्तव्य होते. १९७२मध्ये बापट यांनी या आश्रमात येऊन कुष्ठरुग्णांच्या सामाजिक व आर्थिक पुनर्वसनासाठी अनेक प्रकल्पांची सुरुवात केली. 
 • कुष्ठरुग्णांप्रती समाजामध्ये जागृती करण्याचे कार्यही त्यांनी केले. 
 • ते मूळचे अमरावती येथील असून, त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण नागपूरमध्ये पूर्ण केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही ते प्रचारक होते.
   

पीएसएलव्ही निर्मिती खासगीकरणातून

 • ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यान (पीएसएलव्ही) निर्मितीसाठी इस्रोने भारतीय कंपन्यांकडून स्वारस्य प्रस्ताव मागवले आहेत. 
 • या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे.
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवन यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सिवन म्हणाले, 'सध्या आम्ही स्वारस्य प्रस्ताव मागवले आहेत. 
 • या योजनेत कोणत्याही परदेशी कंपनीला सहभागी करून घेतले जाणार नाही. इस्रो या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करीत आहे.' इस्रो यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. हा निर्णय इस्रोच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. 
 • विक्रम साराभाई अवकाश केंद्रातील (व्हीएसएससी) एका अधिकाऱ्याने सांगितले, की 'एक पीएसएलव्ही तयार करण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च येतो. याचा अर्थ इस्रो खासगी कंपन्यांकडून पाच याने बांधून घेणार असल्यास त्याचे कंत्राट किमान एक हजार कोटी रुपयांचे असेल.'
 • सिवन यांनी रकमेच्या मुद्द्यावर बोलण्याचे टाळले. इस्रोची नवी शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडवर (एनएसएलआय) खासगी कंपन्यांना प्रक्षेपक यान बांधणीचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 • ही उपकंपनी सहा मार्च २०१९ रोजी स्थापन करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांकडून 'पीएसएलव्ही' बांधून घेणे हीच या उपकंपनीची जबाबदारी आहे.
 • भारतीय कंपन्या हे आव्हान पेलण्यासाठी तयार आहेत का, याबाबत सिवन म्हणाले, 'त्या आहेत असे आम्हाला वाटते. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, लार्सन अँड टुब्रोसारख्या महाकाय कंपन्यांनी यापूर्वीच पीएसएलव्हीवर काम सुरू केले आहे. 
 • या कंपन्या समूह बनवून प्रक्रियेत सहभागी होतील आणि काम दाखवून देतील. किंबहुना, फक्त समूहांनाच स्वारस्य प्रस्ताव सादर करता येतील, अशी अटच 'एनएसएलआय'ने घातली आहे. स्वारस्य प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबरपर्यंत आहे. 'एचएएल' आणि 'एलअँडटी' यांनी समूहस्थापनेसाठी (कन्सॉर्शियम) करार केला आहे. ते लवकरच उत्पादन सुरू करतील. गोदरेज आणि इतर काही छोट्या कंपन्यांही यात सहभागी होतील,' असे सिवन म्हणाले.

१५० कंपन्यांचा सहभाग:-

 • एका उपग्रह प्रक्षेपक यानासाठी येणारा खर्च सुमारे २०० कोटी रुपये आहे. पीएसएलव्हीच्या एका प्रक्षेपणामध्ये सुमारे १५० कंपन्यांचा सहभाग असतो. एचएएल आणि एल अँड टी यांचे त्यात महत्त्वाचे योगदान असेल. 
 • पीएसएलव्ही असो वा भूस्थिर प्रक्षेपक यान (जीएसएलव्ही) एचएएल अनेक महत्त्वाचे भाग इस्रोला करून देते. स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यातही एचएएलने योगदान दिले आहे. 
 • पीएसएलव्ही बांधणीसाठी एचएएल गेल्या वर्षीपासूनच प्रयत्नशील आहे. किंबहुना सध्या एचएएलकडे पीएसएलव्हीच्या सांगाड्यांच्या २४ आणि जीएसएलव्हीच्या सांगाड्यांच्या दोन मागण्या नोंदवलेल्या आहेत.
18 August Current Affairs
18 August Current Affairs

काबूल लग्न समारंभात बॉम्बस्फोट ६३ जणांचा मृत्यू

 • अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी रात्री झालेल्या आत्मघाती स्फोटात ६३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. 
 • या स्‍फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की १००हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 • काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका हॉलमध्ये लग्न समारंभासाठी एक हजारहून अधिक लोक उपस्थित असताना हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती आहे. 
 • अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. 
 • काबूलमधील स्थानिक मीडियानं गृह मंत्रालयाच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजताच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार रात्री ११.४० वाजता) हा बॉम्बस्फोट झाला. 
 • मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे अशी माहिती अफगानिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 
 • घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही. या भागात अल्पसंख्याक शिया हजारा समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. 
   

हाँगकाँगमध्ये निदर्शने तीव्र

 • हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी शनिवारी निदर्शने तीव्र केली. आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र असलेल्या हाँगकाँगमध्ये दहा आठवड्यांपासून ही निदर्शने सुरू आहेत. 
 • निदर्शकांनी वीकेंड असल्याने शनिवारी मोर्चा काढला. रविवारीदेखील मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून, या मोर्चात मोठ्या संख्येने निदर्शक सहभागी होतील, अशी शक्यता आहे.
 • पोलिसांनी शनिवारच्या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, निदर्शकांनी मार्ग बदलून मोर्चा काढला. 
 • रविवारी मोर्चेकऱ्यांना उद्यानात जमा होण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, रस्त्यांवरून मोर्चा नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
 • वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाच्या विरोधात हाँगकाँगमध्ये हे आंदोलन सुरू आहे. या विधेयकानुसार हाँगकाँगमधील नागरिकांचे खटला चालवण्यासाठी चीनकडे प्रत्यार्पण केले जाईल.
 • हा कायदा झाला, तर विरोधक आणि टीकाकारांच्या विरोधात चीन त्याचा वापर करेल, असा निदर्शकांचे म्हणणे आहे. 
 • या विधेयकाच्या विरोधात निदर्शनांची मालिका सुरू आहे. निदर्शकांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडल्या, तेव्हा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही निदर्शकांनी केला आहे. 
 • पोलिसांनी काही ठिकाणी निदर्शकांवर बळाचा वापर केल्याच्या घटनाही घडल्या असून, पोलिसांच्या कारवाईच्या विरोधातही निदर्शने होत आहेत.
 • शहरात विमानमार्गे येणाऱ्या प्रवाशांना निदर्शकांनी मंगळवारी विमानतळावरच अडवून ठेवले होते. 
 • चिनी गुप्तहेर असल्याचा आरोप करून निदर्शकांनी या वेळी दोन नागरिकांवर हल्लाही केला होता.
 • दरम्यान, सरकारने निदर्शकांवर टीका केली आहे.
   

शेन्झेनच्या नागरिकांचा विरोध:-

 • हाँगकाँगमधील नागरिकांची निदर्शने सुरू असली, तरी हाँगकाँगच्या सीमेला लागून असलेल्या चीनमधील शेन्झेन शहरातील नागरिकांचा या आंदोलनाला विरोध आहे. शेन्झेन हे चीनमधील महानगर आहे. हाँगकाँगमध्ये जाण्यासाठी या नागरिकांना एंट्री-एग्झिट परमिटचे बंधन आहे. 
 • चिनी पोलिस शेन्झेन शहरात मोठ्या संख्येने जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे हाँगकाँग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे शहर चर्चेत आले आहे. त्यामुळे हाँगकाँगमध्ये चीन लष्करी हस्तक्षेप करण्याची शक्यताही व्यक्त होऊ लागली आहे.
   

शिक्षकांची निदर्शने:-

 • हाँगकाँगमधील शिक्षकांनी शनिवारी मोर्चा काढला होता. पुढच्या पिढ्यांच्या संरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलक शिक्षकांनी सांगितले.
 • हाँगकाँगमधील लोकशाहीवादी निदर्शकांना पाठिंबा देण्यासाठी हे शिक्षक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांकडून होणारा हिंसाचार सरकारने रोखावा, अशी मागणी या आंदोलकांनी केली.
   
18 August Current Affairs
18 August Current Affairs

आता पाकशी चर्चा पीओकेवरच होणार राजनाथ सिंह

 • आता पाकिस्तानशी जी पण चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच होईल असा खुलासा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. 
 • बालाकोट एअर स्ट्राइकहूनही मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो असा इशाराही सिंह यांनी यावेळी दिला आहे.
 • काश्मीरसंदर्भात पाकने भारताशीच चर्चा करावी अशी भूमिका अमेरिकेने मांडली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी जी चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीरवर होईल असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं आहे. 
 • ' पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला थारा देत राहील तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीच चर्चा होणार नाही. येत्या काळात चर्चा झालीच तर ती पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर होईल इतर कोणत्याही मुद्द्यावर होणार नाही'. 
 • तसंच कलम ३७०च्या मुद्द्यावरून पाकिस्तान जगभर जातं आहे. अनेक देशांची मदत मागतं आहे. पण कोणीच त्यांना मदत करत नाहीये अशी माहितीही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली आहे.
   

पाककडून सारवासारव

 • काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांचे दरवाजे ठोठावण्याच्या प्रयत्नांनाही अपयश आल्यानंतर, पाकिस्तानकडून आता झालेला मुखभंग लपवण्यासाठी सारवासारव केली जात आहे. यामुळे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये झालेल्या बैठकीचे ट्विटरवरून स्वागत केले. काश्मीरच्या वादावरील तोडगा ही संयुक्त राष्ट्रांची जबाबदारी आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
 • भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७०वे कलम रद्द केल्यापासून, पाकिस्तानकडून आकांडतांडव करण्यात येत आहे. असाच कांगावा करत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे दरवाजेही ठोठावले. 
 • त्यांना चीननेही पाठिंबा दिला होता. मात्र सुरक्षा परिषदेने एकांगी कारवाईस नकार दिला. तरीही, इम्रान खान यांनी या बैठकीचे ट्विटरवर स्वागत केले आहे. 'पाच दशकांमध्ये प्रथमच काश्मीर आणि तिथे सुरू असणाऱ्या गंभीर परिस्थितीचा मुद्दा जगातील सर्वोच्च व्यासपीठावर उपस्थित झाला. या बैठकीचे मी स्वागत करत आहे,' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
 • पाकिस्तानने मोठा कांगावा करत, संयुक्त राष्ट्रांपर्यंत हा मुद्दा नेला होता, तर गोपनीय बैठकीनंतर सुरक्षा परिषदेने निवेदन जाहीर करावे, यासाठी चीनने आग्रह केला होता. मात्र, बहुतांश सदस्यांनी निवेदन जारी करण्यास नकार दिला. या बैठकीतून काही साध्य झाले नसले, तरीही आता त्यात मोठे यश मिळाले, असा देखावा इम्रान खान यांच्याकडून करण्यात येत आहे.

'द्विपक्षीय चर्चेतून तणाव कमी करा':-

 • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव द्विपक्षीय चर्चेतूनच कमी करणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला.
 • सुरक्षा परिषदेमध्ये होणाऱ्या बैठकीविषयी इम्रान खान यांनी ट्रम्प यांना विश्वासात घेण्यासाठी ही चर्चा केल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले. 
 • काश्मीरमधील सध्याची परिस्थिती, त्यातून विभागीय शांततेला निर्माण झालेला धोका यांची माहिती इम्रान खान यांनी त्याला दिली. काश्मीरच्या मुद्द्यावर भविष्यातही चर्चा करण्यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली, असे कुरेशी यांनी सांगितले.
 • सुरक्षा परिषदेतील पाचपैकी चार कायम सदस्यांशी संपर्क साधला आहे. आमच्या देशाची भूमिका समजावून सांगण्यासाठी फ्रान्सच्या अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही कुरेशी यांनी नमूद केले.
   
18 August Current Affairs
18 August Current Affairs

सेऊल शांतता पुरस्कार रकमेवरील कर सवलत मागे

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या सेऊल शांतता पुरस्काराच्या रकमेवर दिलेली कर सवलत अर्थ मंत्रालयानं मागे घेतली आहे. 
 • परिणामी या १.३ कोटी रुपयांच्या पुरस्कार रकमेवर आता कर लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून या रकमेवर कर देण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती.
 • पंतप्रधान मोदींचा २०१८ सालचा सेऊल शांतता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 
 • यावर्षी फेब्रुवारीत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराची रक्कम १.३ कोटी रुपये आहे. केंद्रीय कर विभागाने (सीबीडीटी) या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम १० (१७A) (i) अंतर्गत सवलत देण्यात आली होती. 
 • मात्र मोदी यांनी ११ ऑगस्ट रोजी सीतारामन यांना पत्र लिहून सवलतीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. 
 • 'पुरस्काराच्या रकमेवर सवलत देण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी घेतला असल्याचे मला कळले. लोकसभा निवडणुका आणि अन्य कामांमध्ये व्यग्र असल्याने मला आधी याबाबत पत्रव्यवहार करता आला नाही. 
 • पुरस्काराच्या रकमेवर देशातील अन्य करदात्यांना लागू होतो त्याप्रमाणेच कर लागू करावा, अशी माझी इच्छा आहे. 
 • तेव्हा ही सवलत मागे घ्यावी, अशी माझी विनंती आहे,' असं पत्रात म्हटलं आहे. त्यानुसार १४ ऑगस्ट रोजी सीबीडीटीने ही सवलत मागे घेतली.
   

मारुती सुझुकीने केली ३००० कामगारांची कपात

 • ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीचा फटका मारुती सुझुकीसारख्या मोठ्या कंपनीलाही बसला आहे. परिणामी मारुती सुझुकीने ३,००० कंत्राटी कामगारांची कपात केली असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मात्र याचा धक्का बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. 
 • मारुती सुझुकी कार निर्माण क्षेत्रातील सगळ्यात मोठी कंपनी समजली जाते. आपल्या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी तत्वावर कामगार भर्ती मारुती सुझुकी करत असते. कंपनीचे संचालक आर सी भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात मागणी असते तेव्हा मोठ्या प्रमाणात कामगार भर्ती केली जाते. 
 • मंदीच्या काळात मात्र या कामगारांचे कंत्राट वाढवले जात नाही. कंत्राटाचा काळ संपला की त्यांना नोकरी सोडावी लागते. यामुळे ३००० कामगारांना आपल्या नोकरीला मुकावं लागलं आहे. या जुलैमध्ये मारुती सुझुकीच्या खूप कमी कार विकल्या गेल्या आहेत. ' या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीत विक्रीला थोडी गती येईल अशी अपेक्षा आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे. तेव्हा ग्रामीण भागात कारची विक्री वाढण्याची शक्यता आहे' अशी आशा भार्गव यांनी व्यक्त केली आहे. तसंच सरकारने सकारात्मक पावलं उचलल्यास कार व्यवसायातील सद्यस्थिती बदलू शकते असं मतही भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. 
 • मारुती सुझुकी प्रमाणे देशातील अनेक कार कंपन्या सध्या तोट्यात गेल्या आहेत. त्यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.
   
18 August Current Affairs
18 August Current Affairs

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्रींची निवड

 • टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 • ‘क्रिकेट सल्लागार समिती (CAC)’ ने रवी शास्त्री यांची नियुक्ती केली असून ते 2021 पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. माजी कर्णधार कपिल देव हे सीएसीचे प्रमुख आहे. 
 • या समितीत कपिल देव यांच्या व्यतिरिक्त माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. या त्रिसदस्यी समितीने रवी शास्त्री यांची निवड केली आहे.
 • टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी अंतिम सहा नावं शार्टलिस्ट करण्यात आली होती. या सहा जणांना शुक्रवारी मुंबईतील बीसीसीआयच्या हेडक्वॉटरमध्ये बोलवण्यात आले होते. 
 • त्यावेळी या सर्व उमेदवारांचे प्रेझेंटेशन आणि मुलाखती या समितीच्या समोर पार पडल्या. त्यानंतर सीएसी समितीने टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.
   

सपोर्ट स्टाफची निवड करणार राष्ट्रीय निवड समिती

 • घटनेत दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील समितीकडे भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफच्या निवडीचे काम सोपविण्यात येणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. 
 • रवी शास्त्री यांच्यासोबत असणाऱ्या सपोर्ट स्टाफची निवड सोमवारी होणार असून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांच्या मुलाखती एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीच करणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याहून सुनील सुब्रमण्यम यांना परत पाठविण्यात आले होते. ती प्रशासकीय व्यवस्थापकाची जागाही आता भरायची आहे. त्यासाठीही मुलाखती होतील. 
 • शुक्रवारी कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केल्याचे जाहीर केले. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना कपिल म्हणाले होते की, सपोर्ट स्टाफच्या निवडीतही आमच्या मताचा विचार व्हावा. जर आमच्याकडे ते काम सोपविण्यात आले नसेल तर ती चांगली गोष्ट नाही. 
 • पण बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, घटनात्मक दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ नाही. शनिवार आणि रविवारी कार्यालये बंद आहेत. सोमवारी १० वाजता मुलाखतींना सुरुवात होईल. 
 • जर कपिल यांच्या नेतृत्वाखालील सल्लागार समितीला या निवडीची जबाबदारी सोपवायची तर बीसीसीआयच्या कायदेसमितीला या सुधारणेबाबत विचार करावा लागेल. पण त्यासाठी पुरेसा वेळच शिल्लक नाही. 
 • फलंदाजी प्रशिक्षक असलेल्या संजय बांगर यांच्याकडेच ती जबाबदारी सोपविली जाणार का, की विक्रम राठोड, प्रवीण अमरे यांचा विचार होणार हे सोमवारीच स्पष्ट होईल. 
 • गोलंदाजी प्रशिक्षकासाठी भरत अरुण हे विद्यमान प्रशिक्षक आहेतच पण वेंकटेश प्रसाद, डॅरेन गॉघ, सुनील जोशी हेदेखील शर्यतीत आहेत. आर. श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षण म्हणून पुन्हा प्रयत्न करतील. दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी ऱ्होड्सचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.
18 August Current Affairs
18 August Current Affairs

माझा सन्मान हा सबका साथसबका विकास दीपा मलिक

 • पॅरा अॅथलिट दीपा मलिकनं राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार वडील बालकृष्णा नागपाल यांना समर्पित केला आहे. 
 • माझा हा सन्मान खऱ्या अर्थानं 'सबका साथ-सबका विकास'चं उत्तम उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया दीपा मलिकनं दिली आहे. 
 • मला मिळालेला हा सन्मान टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेआधी खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही तिनं व्यक्त केला.
 • दीपा मलिकला शनिवारी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला. खेल रत्न पुरस्कार मिळवणारी दीपा भारतातील दुसरी पॅरा अॅथलिट ठरली आहे. 
 • याआधी देवेंद्र झाझरियाला २०१७मध्ये खेल रत्न पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दीपानं तो आपल्या वडिलांना समर्पित केला. 'सबका साथ-सबका विकास' हा मोदी सरकारचा नारा देशभरात रुजू लागला आहे. 
 • ज्युरी सदस्य आणि क्रीडा जगताचे मी आभार मानते. त्यांनी पॅरा-अॅथलिटची मेहनत, त्यांनी जिंकलेल्या पदकांचा सन्मान केला आहे. सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्यास मदत होणार आहे. 
 • हा पुरस्कार आगामी टोकियो पॅरा ऑलिम्पिकआधी खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असा विश्वासही दीपानं व्यक्त केला. 
 • मी भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे आभार मानते. मी जे काही आहे ते समितीमुळेच आहे. माझे मित्र, सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षकांचेही मी आभार मानते, असंही ती म्हणाली. 
 • दरम्यान, दीपा पुढील वर्षी टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार नाही. २०२२मध्ये बर्मिगहॅममधील राष्ट्रकुल स्पर्धा आणि यावर्षी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेत देशाला पदक मिळवून देण्याचा तिचा निर्धार आहे.
   

लोकसंख्या नियंत्रण संकल्पनेला महाराष्ट्राची साथ

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून मांडलेल्या लोकसंख्या नियंत्रणाच्या भूमिकेला महाराष्ट्राने ४८ तास पूर्ण होण्याआधीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लोकसंख्या नियंत्रणासाठी आपली संकल्प रूपरेषाच ‘लोकसत्ता’कडे मांडली. मुख्यमंत्र्यांच्या या संकल्पनेनुसार आरोग्य विभागानेही लगोलग लोकसंख्या नियंत्रणासाठी कृती आराखडय़ाची मांडणी केली असून नियोजनबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांनी सांगितले.
 • चीननंतर जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात असून वाढती बेरोजगारी, आर्थिक प्रश्नासह अनेक मुद्दे वाढत्या लोकसंख्येशी निगडित आहेत. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा अधोरेखित केला होता.
 • महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडून लोकसंख्या नियंत्रण किंवा कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम योग्य प्रकारे राबविण्यात येत असल्यामुळे राष्ट्रीय धोरणानुसार निश्चित केलेल्या जन्मदरापेक्षा महाराष्ट्रात जन्मदराचे प्रमाण कमीच असले तरीही पंतप्रधानांची भूमिका लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण लोकसंख्या नियंत्रणाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील लोकसंख्यावाढ अधिक असलेले भौगोलिक भाग तसेच जमातींचा विचार लोकसंख्या नियंत्रण करताना विचारात घेतली जाईल.
 • महाराष्ट्रात कुटुंब नियोजनासाठी जनजागृतीबरोबरच, पाळणा लांबविण्यासाठी वेगवेगळ्या गर्भनिरोधकांचा वापर करण्यावरही आरोग्य विभागाकडून भर देण्यात येतो. अलीकडच्या काळात कुटुंब नियोजनासाठी नवीन इंजेक्टेबल पद्धतीचाही मोठय़ा प्रमाणात अवलंब करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. लोकसंख्या नियंत्रणाबाबत पंतप्रधानांनी मांडलेली भूमिका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने प्राथमिक आराखडा तयार केल्याचे डॉ. व्यास म्हणाले.
 • राज्यातील ज्या भागात कमी वयात अथवा निश्चित वयोमर्यादेपूर्वी लग्न केले जाते तेथे व्यापक जनजागृती मोहीम आणि दोन मुलांमधील अंतर वाढावे यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून लोकशिक्षण करण्याचे सरकारने ठरवले आहे. सध्या दोन मुलांमधील २ वर्षांचे अंतर असण्याचे प्रमाण हे १५ टक्के एवढे आहे ते २५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल. सध्या बाळंतपणाच्या वेळी अनेक महिला शस्त्रक्रिया करून घेतात. त्याचे प्रमाण सध्या २५ टक्के एवढे असून ते वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच घरोघरी सर्वेक्षण करून पाळणा लांबविण्यासाठी राबविण्याच्या वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती दिली जाणार असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

महाराष्ट्राचा जन्मदर १.७:-

 • प्रजनन क्षमतेच्या वयोगटाचा विचार करता सरासरी जन्मदर २.२ इतका असेल, तर लोकसंख्येचा समतोल शक्य असल्याचे मानले जाते. २०१७ च्या ‘नॅशनल हेल्थ रजिस्ट्री’नुसार महाराष्ट्राचा जन्मदर १.७ एवढा आहे. दक्षिणेतील बहुतेक राज्यातही जन्मदर हा २.२ पेक्षा कमी असून उत्तर प्रदेशमध्ये हेच प्रमाण ३ एवढे आहे तर बिहारमध्ये ३.२, मध्य प्रदेश २.७, राजस्थान २.६, झारखंड २.५, छत्तीसगड २.४ तर आसाममध्ये २.३ एवढा जन्मदर आहे.
 • अनेक आदिवासी भागात महिला विशीच्या वयातच चार-पाच मुलांना जन्म देतात. यासाठी जन्मदर अधिक असणारे भाग किंवा समाजघटक निश्चित करण्याची गरज आहे. हे केवळ एखाद्या समाजात अथवा धर्मातच आढळते असे नाही. कोणत्याही धर्माच्या अनेक समाजघटकांत असे आढळते. त्या घटकांमध्ये या समस्येची जाणीव निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केवळ लोकसंख्या नियंत्रण नाही तर माता-बालकांचे योग्य पोषण झाले पाहिजे. कोणीही कुपोषित राहणार नाही, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.
18 August Current Affairs
18 August Current Affairs

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांवरून वादंग

 • नेमबाज अभिनव बिंद्रा, बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉय यांचे निवड समितीवर टीकास्त्र
 • नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा याची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात न आल्याबद्दल भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने शनिवारी निवड समितीवर टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी डावलल्याबद्दल बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय यानेही निवड समितीवर ताशेरे ओढले.
 • आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक सुवर्ण पदके पटकावणारा माजी नेमबाज जसपाल राणा याने मनू भाकर, सौरभ चौधरी आणि अनीष भानवाला यांसारखे जागतिक दर्जाचे नेमबाज देशाला दिले. ‘‘जसपाल राणासारख्या अफाट गुणवत्ता असलेल्या प्रशिक्षकाला द्रोणाचार्य पुरस्कारासाठी डावलण्यात आले, हे निराशाजनक आहे. राणाबद्दल नितांत आदर असून त्यांचे शिष्य अधिक खडतर मेहनत घेऊन टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत निवड समितीला खोटे ठरवतील,’’ असे ट्विट नेमबाज अभिनव बिंद्राने केले आहे.
 • १२ जणांच्या निवड समितीने शनिवारी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी विमल कुमार (बॅडमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस) आणि मोहिंदर सिंग ढिल्लो (अ‍ॅथलेटिक्स) यांची निवड केली आहे. त्याचबरोबर द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी मर्झबान पटेल (हॉकी), रामबिर सिंग खोखार (कबड्डी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांची निवड केली आहे. पाच लाख रुपये असे द्रोणाचार्य पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • दरम्यान, बिंद्राने दिलेल्या पाठिंब्याबद्दल जसपाल राणाने त्याचे आभार मानले आहेत. ‘‘बिंद्राचे हे शब्द माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. मात्र कुणासमोरही स्वत:ला सिद्ध करण्याची गरज वाटत नाही,’’ असे ट्विट जसपाल राणा याने केले आहे.

अर्जुन पुरस्कारासाठीचे निकष काय आहेत?:-

 • भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने शनिवारी अर्जुन पुरस्कारासाठी निवडीचे निकष काय आहेत, असा सवाल विचारला आहे. मैदानावरील कामगिरीपेक्षा पुरस्कारासाठी कोण शिफारस करते, हे सर्वात महत्त्वाचे आहे, अशी टीका त्याने केली. निवड समितीने बी. साईप्रणीथची अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने दुहेरीतील मनू अत्री याची शिफारस करूनही त्याला पुरस्कारासाठी डावलण्यात आले आहे. मात्र गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली नसल्यामुळे प्रणॉयची अर्जुन पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस करण्यात आली नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
 • ‘‘पुरस्कारांच्या यादीत तुम्हाला तुमचे नाव हवे असेल तर यादीत नाव टाकणारी माणसे तुमच्याकडे हवीत. आपल्या देशात किमान कामगिरी ग्राह्य़ धरायला हवी. पण तसे होत नसल्याचे दुर्दैव आहे. जोपर्यंत पुरस्कार मिळत नाही, तोपर्यंत खेळावे लागणार आहे,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रणॉयने व्यक्त केली.
 • ‘‘असोसिएशनने साईप्रणीथ आणि मनू अत्री यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. प्रणॉयने आपला अर्ज पाठवला होता, पण गेल्या वर्षांतील कामगिरीनुसार त्याच्या अर्जाचा विचार करण्यात आला नाही,’’ असे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
   

जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा ऑक्टोबरमध्ये मुंबईत

 • ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या मुंबईतील जागतिक युवा बु्द्धिबळ स्पर्धेत जगातील दुसरा युवा ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आर. याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. 
 • १४ वर्षीय प्रज्ञानंद या चेन्नईच्या खेळाडूने विविध सहा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपली छाप पाडली. त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. ही स्पर्धा १ व ते १३ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. 
 • पत्रकार परिषदेत या स्पर्धेची घोषणा शनिवारी करण्यात आली.
 • मुलींमध्ये नागपूरची दिव्या देशमुख भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
 • १४, १६ व १८ वर्षांखालील गटात स्पर्धक सहभागी होतील. 
 • भारतासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे महाराष्ट्रचे सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास आणि वन खात्याचे राज्य मंत्री व आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके म्हणाले. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेने केले आहे. ६२ पेक्षा अधिक देशांनी या स्पर्धेत सहभाग निश्चित केला आहे. 
 • रशिया, अमेरिका, फ्रान्स, इटली आणि अझरबैजान यासारख्या देशातून ४०० युवा खेळाडू पवईच्या रेनीसन्स हॉटेलमध्ये होणाऱ्या स्पर्धेत खेळतील.
   
18 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »