19 Sep Current Affairs

19 Sep Current Affairs
19 Sep Current Affairs

समुद्री आघाडीत सौदी सहभागी

 • तेलसाठ्यांवर झालेले हल्ले; तसेच इराणकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील जलमार्गांचे संरक्षण करण्यासाठी सौदी अरेबिया बुधवारी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील समुद्री आघाडीत सहभागी झाला.
 • अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या आधीच सौदी अरेबियाने 'इंटरनॅशनल मेरिटाइम सिक्युरिटी कन्स्ट्रक्ट'मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियातील तेलसाठ्यांवरील हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रांची माहिती जाहीर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येमेनमधील इराणचा पाठिंबा असलेल्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या तेलसाठ्यावर हल्ला केला होता. 
 • मात्र, इराणनेच हा हल्ला केल्याचा संशय सौदी अरेबिया आणि अमेरिकेने व्यक्त केला आहे. इराणने हा आरोप फेटाळून लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया 'इंटरनॅशनल मेरिटाइम सिक्युरिटी कन्स्ट्रक्ट'मध्ये सहभागी झाला आहे. या आघाडीमध्ये यापूर्वी ऑस्ट्रेलिया, बहारीन आणि ब्रिटन सहभागी झालेले आहेत.

इराणने आरोप फेटाळले:-

 • सौदी अरेबियाच्या तेलसाठ्यांवरील हल्ले इराणने घडवले असल्याचा आरोप अमेरिका आणि सौदी अरेबियाने केला होता. मात्र, इराणने हा आरोप फेटाळून लावला आहे. यासंदर्भात इराणने अमेरिकेला 'डिप्लोमॅटिक नोट' पाठवली आहे. इराणमध्ये अमेरिकेसंदर्भात काम पाहणाऱ्या स्विस दूतावासाच्या माध्यातून सोमवारी ही प्रतिक्रिया पाठवण्यात आली आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

'सौदीतील हल्ला येमेनींकडून':-

 • सौदीच्या तेलसाठ्यांवर येमेनींनी हल्ला केला आहे, असे इराणचे अध्यक्ष हसन रूहानी यांनी सांगितले. येमेनमध्ये अमेरिकेच्या पाठिंब्याने सौदीने हस्तक्षेप केला असून, त्याविरोधात इशारा म्हणून येमेनींनी हा हल्ला केल्याचे रोहानी यांनी म्हटले आहे. 'येमेनींनी रुग्णालय लक्ष्य केले नाही. शाळा लक्ष्य केली नाही, तसेच सना बाजार लक्ष्य केले नाही. त्यांनी केवळ औद्योगिक केंद्र लक्ष्य केले आहे. 

जागतिक बॉक्सिंगमध्ये दोन पदके निश्चित

 • भारताच्या अमित पंघल (५२ किलो) आणि मनीष कौशिक (६३ किलो) यांनी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून किमान ब्राँझपदक निश्चित केले आहे. दोन्ही बॉक्सरचे हे जागतिक स्पर्धेतील पहिलेच पदक ठरेल. 
 • एशियाड आणि आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या दुसऱ्या सीडेड अमितने ५२ किलो गटात फिलिपिन्सच्या कार्लो पालमवर ४-१ अशी मात केली. गेल्यावर्षी एशियाडच्या उपांत्य फेरीत अमितने पालमला पराभूत केले होते. त्यामुळे या लढतीत अमितचेच पारडे जड मानले जात होते.
 • पहिल्या फेरीत अमितला मनासारखी सुरुवात करता आली नाही. मात्र, पालम आघाडी घेणार नाही, याची काळजी त्याने घेतली. रोहतकच्या अमितने पुढील दोन फेऱ्यांमध्ये मात्र आपले कौशल्य दाखविले. लढतीनंतर अमित म्हणाला, 'माझी सुरुवात संथ झाली. मात्र, मी दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत वर्चस्व राखले. 
 • पहिल्या फेरीनंतर प्रशिक्षकांनी मला आक्रमक खेळ करायला सांगितले. त्यानुसारच मी खेळ केला. यापूर्वी मी पालमचा सामना केला होता. त्यामुळे मला त्याच्याविरुद्ध खेळताना चांगल्या योजना आखता आल्या.' अमितची आता उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या साकेन बिबोसिनोवविरुद्ध लढत होईल. साकेनने दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत अर्मेनियाच्या अर्तुर होव्हान्निसायनवर मात केली. अर्तुर हा युरोपियन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॉक्सर होता. त्यामुळे अमितची साकेनविरुद्ध कसोटी लागणार आहे. त्याची उंचीही चांगली असल्याने नव्या योजनांसह रिंगमध्ये उतरावे लागेल, असे २३ वर्षीय अमितने सांगितले. दुसरीकडे, राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या कौशिकने ब्राझीलच्या व्हँडरसन डी ओलिव्हेरावर ५-०ने विजय मिळवला. कौशिकने पहिल्याच जागतिक स्पर्धेत आपली छाप पाडली आहे. कौशिकच्या आक्रमक खेळासमोर व्हँडरसनचा बचाव कमकुवत वाटला.

दृष्टिक्षेप:-

 • भारताच्या संजितला (९१ किलो) इक्वेडोरच्या सातव्या मानांकित ज्युलिओ कॅस्टिलो टोरेसकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला.
 • भारताला जागतिक स्पर्धेत यापूर्वी एका ब्राँझपदकापेक्षा अधिक पदके कधीच मिळवता आलेली नाहीत.
 • यापूर्वी भारताकडून विजेंदरसिंग (२००९), विकास कृष्णन (२०११), शिवा थापा (२०१५), गौरव बिधुरी (२०१७) यांनी ब्राँझपदक मिळवले आहे.
 • गेल्या जागतिक स्पर्धेत अमित पंघल ४९ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला होता.
 • कौशिकची ही पदार्पणाची जागतिक स्पर्धा आहे. कौशिकची पुढील फेरीत अग्रमानांकित अँडी गोमेझ क्रूझविरुद्ध लढत होईल.
   
19 Sep Current Affairs
19 Sep Current Affairs

साईना नेहवाल पराभूत सिंधूची विजयी सलामी

 • भारताच्या साईना नेहवालला चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला, तर वर्ल्ड चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफनने साईना नेहवालला २१-१०, २१-१७ असे सहज नमवले.
 • सिंधूने एके काळी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनच्या ली शूरुईवर २१-१८, २१-१२ अशी मात करून विजयी सलामी दिली. पुढील फेरीत सिंधूला सामना करायचा आहे तो थायलंडच्या पोर्नोपावी चोचूवांगचा. जागतिक स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई करणाऱ्या बी. साईप्रणीतने पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. 
 • २७ वर्षांच्या साईप्रणीतने थायलंडच्या सुपान्यू अविहिंगसॅननची झुंज २१-१९, २१-२३, २१-१४ अशी मोडून काढली. यानंतर पारुपल्ली कश्यपने फ्रान्सच्या ब्रिस लेव्हेरडेझवर २१-१२, २१-१५ अशी मात करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीतील अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी या जोडीनेही दुसरी फेरी गाठली. 
 • सलामीच्या लढतीत तैपईच्या चेंग-ली यांनी १३-२१, ८-११ अशा पिछाडीनंतर माघार घेतली. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डी यांनी गेम पॉइंट वाया घालवत पराभव ओढवून घेतला. जर्मनीच्या मार्क लॅम्सफस-हेरट्रिच यांनी प्रणव-सिक्कीवर २१-१२, २३-२१ अशी मात केली. पुरुष दुहेरीत सुमीत रेड्डी-मनू अत्री यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. महंमद आहसन-हेंद्रा सेतियावन यांनी मनू-सुमीतवर २१-१२, २१-१५ असा विजय मिळवला.
   

तिहेरी तलाकचा नवा कायदा अभ्यासक्रमात

 • तिहेरी तलाकबाबत नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्याचा एलएलबी आणि एलएलएमच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय येथील जोतिबा फुले रोहिलखंड विद्यापीठाने घेतला आहे. नवा कायदा अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे बहुदा देशातील हे पहिलेच विद्यापीठ आहे.
 • 'एलएलबी'च्या तिसऱ्या वर्षात कुटुंब कायद्यांतर्गत हा 'मुस्लिम महिला (विवाहाबाबत हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९' शिकवला जाणार आहे. नवे कायदे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. 
 • त्याशिवाय, तिहेरी तलाकवर डॉक्टरेट करण्याची विनंती एका विद्यार्थ्याने केली असून, त्यास परवानगी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तिहेरी तलाकबाबतचे विधेयक गेल्याच महिन्यात संसदेत मंजूर करण्यात आले आहे.
   
19 Sep Current Affairs
19 Sep Current Affairs

इंधन दरवाढीमुळे निर्देशांक कोसळला

 • रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण व्हावेत व निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शनिवारी घोषित केलेल्या उपाययोजना शेअर बाजाराच्या निर्देशांकासाठी उत्साहवर्धक ठरल्या नाहीत. 
 • या घोषणांमुळे शेअर बाजारात सोमवारी उत्साह परतेल, अशी आशा असतानाच कच्च्या इंधनाच्या किमतीत झालेली दरवाढ निर्देशांकासाठी मारक ठरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६१ अंकांच्या घसरणीसह ३७१२३वर स्थिरावला. तर, ७२ अंकांनी घसरलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ११००३चा स्तर गाठला.
 • सौदी अरेबियाच्या 'अरामको' या सर्वांत मोठ्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे सोमवारी जगभरातील बाजारांत तीव्र पडसाद उमटले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या किमतीत जबर वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी समभागविक्रीचा पवित्रा घेतला. 
 • प्रामुख्याने ऑटो व बँकांचे समभाग मोठ्या प्रमाणावर विकले गेल्याने निर्देशांकाला फटका बसला. प्रमुख कंपन्यांपैकी २४ कंपन्यांच्या समभागाचे मूल्य घसरले. तर, केवळ सहा कंपन्यांच्या समभागमूल्यात तेजी आली. महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, सन फार्मा, एचयूएल, टीसीएस, भारती एअरटेल हे समभाग १.४४
 • टक्क्यांपर्यंत घसरले. रुपयाच्या गटांगळ्या सलग सात सत्रांमध्ये वधारलेल्या रुपयालाही कच्च्या इंधनातील दरवाढीचा मोठा फटका बसला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची सोमवारी ६७ पैशांनी घसरण झाली व त्याने ७१.६०चा तळ गाठला.
   

ई सिगारेटवर बंदी

 • १ लाख रुपये दंड आणि १ वर्ष तुरुंगवासाची तरतूद
 • ई-सिगारेटवर केंद्र सरकारने बुधवारी देशभर बंदी लागू केली. तरुणाईला या ई-सिगारेटने व्यसनाच्या विळख्यात ओढल्याचा दावा करीत ही बंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यांत याआधीच बंदी लागू आहे.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता देशात ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री, साठवणूक, जाहिरात तसेच आयात-निर्यात हा गुन्हा मानला जाणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा नियमभंग केल्यास एक लाख रुपये दंड आणि एक वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. एकापेक्षा जास्त वेळा नियमभंग केल्यास पाच लाखांचा दंड आणि तीन वर्षांंचा तुरुंगवास होऊ  शकतो.
 • ई-सिगारेट आरोग्यासाठी घातक असून तरुणांमध्ये ती ओढण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ई-सिगारेटवर बंदी घालण्यासंदर्भात सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट नेमण्यात आला होता. मंत्रीगटाच्या शिफारशीनंतर मंत्रिमंडळाने पूर्ण बंदीचा हा निर्णय घेतला.
 • या संदर्भात काढलेल्या अध्यादेशाचा मंत्रीगटाने फेरआढावा घेतला आहे. हिवाळी अधिवेशनात अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर केले जाईल. संसदेच्या पुढील अधिवेशनातच संबंधित कायदा संमत करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहील.
 • ई-सिगारेटचे ४०० ब्रॅण्ड उपलब्ध असून दीडशेहून अधिक स्वाद आहेत. हे सर्व ब्रॅण्ड आयात केले जातात. त्यामुळे आयातीवरही बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

वाढती बाजारपेठ:-

 • ई-सिगारेटची जगातील लोकप्रियता अबाधित आहे. २०१३मध्ये ई-सिगारेटची जागतिक बाजारपेठ तीन अब्ज डॉलरची होती. २०१४मध्ये या सिगारेटचे ४६६ ब्रॅण्ड उपलब्ध होते. २०३०पर्यंत ई-सिगारेटची बाजारपेठ १७ पटींनी वाढणार असल्याचा अंदाज ‘युरोमॉनिटर इंटरनॅशनल’ या बाजारपेठीय संशोधन संस्थेने व्यक्त केला आहे.
 • चीन, अमेरिकेतून आयात:-
 • १० जुलै २०१९ रोजी सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार १ लाख ९१ हजार ७८१ डॉलरच्या ई-सिगारेटची आयात झाली होती. चीन, अमेरिका, हाँगकाँग आणि जर्मनीतून ही आयात झाली होती. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या २०१८मधील आकडेवारीनुसार सुमारे ३० लाख शालेय विद्यार्थी ई-सिगारेटचा वापर करीत होते.
   
19 Sep Current Affairs
19 Sep Current Affairs

मतपत्रिका इतिहासजमा निवडणुका मतदानयंत्रांवरच

 • मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत, आगामी विधानसभा निवडणुका मतदानयंत्रांवरच (ईव्हीएमवर) घेतल्या जातील, अशी ठाम भूमिका मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मांडली. कोणत्याही परिस्थितीत मतदानयंत्रांमध्ये फेरफार करत येत नाही, असा दावा करीत, मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची विरोधी पक्षांची मागणी त्यांनी सपशेल फेटाळून लावली.
 • दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या जातील, असे सांगून त्यांनी निवडणुका कधी जाहीर होणार, याबाबतची उत्सुकता कायम ठेवली. दिवाळीचा सण, शाळांच्या सुट्टय़ा, परीक्षा तसेच एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पोलीस दल स्थलांतरित करणे, या सर्व गोष्टीचा विचार करून निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. 
 • मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा, तसेच आयुक्त अशोक लवासा, सुशीलचंद्र यांच्याबरोबरच निवडणूक आयोगाचे इतर वरिष्ठ अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवस मुंबईत तळ ठोकून आहेत. सह्य़ाद्री अतिथिगृहावर बुधवारी सकाळपासून विविध राजकीय पक्ष, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्याचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि शेवटी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याबरोबर बैठका झाल्याचे अरोरा यांनी सांगितले. 
 • त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या संदर्भात केलेल्या मागण्या, निवडणूक यंत्रणेची तयारी याबाबतची माहिती देण्यात आली. या वेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 • सांगली, कोल्हापूर, सातारा व अन्य काही जिल्ह्य़ांमध्ये पुरामुळे लोकांचे नुकसान झाले आहे. राज्य यंत्रणेमार्फत पूरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू आहे, आचारसंहितेची त्याला बाधा येणार नाही. मात्र खास अशी काही मदत करायची असेल, तर त्याची किती गरज आहे, ते तपासून त्याबाबत विचार केला जाईल, असे अरोरा यांनी सांगितले.

बोगस मतदारांबाबत चौकशी:- 

 • राजकीय पक्षांनी काही सूचना केल्या. दिवाळीनंतर मतदानाची मागणी काही पक्षांनी केली.ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत, अशी मागणी केली. त्याची आयोगाने दखल घेतली असून, ५,३०० मतदान केंद्रे तळमजल्यावर हलविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नोंद असल्याची तक्रार केली. मतदार नोंदणी ही कायम चालणारी प्रक्रिया आहे, बोगस मतदारांबाबतच्या तक्रारीची चौकशी केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

खर्चाची मर्यादा २८ लाख रुपयेच:-

 • राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी केली होती. मात्र कोणत्याही पक्षाचे नाव न घेता, त्यांनी ती मागणी फेटाळून लावली. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराकरिता २८ लाख रुपये ही खर्चाची मर्यादा आहे, ती कायम राहील, त्यात बदल केला जाणार नाही. 
 • काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विधानसभा निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणी केली. त्याचा संदर्भ देत मतपत्रिका हा आता इतिहास झाला, निवडणुका मतदानयंत्रांवरच होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
   

राज्य एटीएसला आंध्र सरकारचे आठ लाखांचे पारितोषिक

 • आंध्र प्रदेश पोलिसांना गेल्या दहा वर्षांपासून हव्या असलेल्या कट्टर माओवाद्याला अटक केल्यामुळे राज्याचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आठ लाख रुपयांच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे. ‘एटीएस’चे तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी आणि उपायुक्त डॉ. मोहनकुमार दहिकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली होती.
 • कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या दहशतवादी संघटनेचे काही सदस्य नक्षलवादी चळवळीचा प्रसार करणे आणि आर्थिक पाठबळ मिळविण्याकरिता मुंबईत असल्याची गोपनीय माहिती राज्याच्या एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने पूर्व उपनगरातून सात माओवाद्यांना अटक केली. या माओवाद्यांच्या चौकशीतून त्यांचा नेता कृष्णा लिंगय्या घोक्ष ऊर्फ वेणूगोपालन असल्याची माहिती मिळाली होती. त्यालाही एटीएस पथकाने शिताफीने अटक केली. त्यावेळी चौकशीत तोच नव्हे तर अटक केलेले सातही जण माओवाद्यांच्या ‘गोल्डन कॉरिडॉर समिती’चे कट्टर सदस्य असल्याचे स्पष्ट झाले. सुरत ते मुंबईपर्यंतच्या औद्योगिक परिसरात नक्षलवादी चळवळीचा प्रसार करणे आणि या चळवळीसाठी निधी उभारण्याची महत्त्वाची जबाबदारी वेणूगोपालन याच्यावर होती. तो दहा वर्षांपासून भूमिगत होता. त्याच्या अटकेसाठी आंध्र प्रदेश सरकारने आठ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले होते. या सर्वाना ‘विघातक कारवाया प्रतिबंधक कारवाया’नुसार अटक करण्यात आली आहे.
 • राज्याच्या एटीएसने ही कारवाई केल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने प्रशस्तीपत्रक आणि आठ लाखांचा पारितोषिकाचा धनादेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठविला आहे. त्यानुसार आता उपायुक्त डॉ. मोहनकुमार दहिकर व साहाय्यक आयुक्त सुनील वाडके, साहाय्यक निरीक्षक दशरथ विटकर, उपनिरीक्षक विक्रम पाटील (प्रत्येकी ७५ हजार रुपये), निरीक्षक संजय मराठे, भास्कर कदम आणि संतोष सावंत (एक लाख रुपये) आणि अरुण देशमुख, अरविंद मोरे, शहाजी सोनावणे आणि राजेंद्र खरात (प्रत्येकी ५० हजार रुपये) या पोलिसांना रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
   
19 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »