20-21 Oct Current Affairs

20-21 Oct Current Affairs
20-21 Oct Current Affairs

कर्तारपूर कॉरिडोरचे ९ नोव्हेंबरला उद्घाटन

 • भारतातील शीख धर्मीयांसाठी महत्त्वाचा असलेला कर्तारपूर कॉरिडोर ९ नोव्हेंबरला खुला होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित राहणार आहेत.
 • या विशेष कॉरिडोरने कर्तारपूर येथील दरबार साहिब आणि पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील बाबा नानक गुरुद्वारा जोडले जाणार आहेत. त्याद्वारे भारतीय भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानातील कर्तारपूरला जाता येणार आहे.
 • त्यासाठी केवळ एक परमिट घ्यावे लागणार आहे. कर्तारपूर साहिब गुरुद्वाराची स्थापना शिखांचे धर्मगुरू गुरूनानक देव यांनी १५२२ मध्ये केली होती. शीख धर्मीयांचे हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. भारताच्या सीमेपासून कर्तारपूर येथील दरबार साहिब गुरुद्वारापर्यंतच्या कॉरिडोरची बांधणी पाकिस्तान करणार आहे, तर गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपर्यंतच्या कॉरिडोरचे काम भारताकडून केले जाणार आहे.
 • दरम्यान, या कॉरिडोरच्या उद्घाटन सोहळ्याला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सामान्य व्यक्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिंग यांनी आमंत्रण स्वीकारले आहे, विशेष अतिथी म्हणून नव्हे, तर सामान्य व्यक्ती म्हणून ते या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार आहेत, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली.
 • 'कर्तारपूर कॉरिडोर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून ९ नोव्हेंबरला हा प्रकल्प खुला करण्यात येईल. त्याद्वारे पाकिस्तान जगभरातील शीख भाविकांसाठी आपले दरवाजे खुले करत आहे,' असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फेसबुक पोस्टद्वारे नमूद केले.

जॉन्सन यांना दणका

 • 'ब्रेक्झिट'वर तीन महिन्यांच्या मुदतवाढीचे विधेयक मंजूर
 • ब्रेक्झिट'च्या अंतिम करारासाठी युरोपीय महासंघाकडून तीन महिन्यांची मुदतवाढ घ्यावी, असा करार ब्रिटनच्या संसदेने शनिवारी मंजूर केला. त्यामुळे तातडीने संसदेची मंजुरी घेऊन, ३१ ऑक्टोबरच्या मुदतीमध्ये 'ब्रेक्झिट' अंमलात आणण्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे मनसुबे उधळले आहेत. मात्र, ३१ ऑक्टोबरच्या मर्यादेमध्येच 'ब्रेक्झिट' रेटण्याची भूमिका जॉन्सन यांनी घेतली आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 • युरोपीय महासंघातून वेगळे होण्याच्या ब्रिटनच्या या करारासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत होती. त्यातील अटींवरून ब्रिटनचा सध्याच्या कराराला विरोध असून, त्या अटींवर मात्र ब्रिटनमध्ये एकमत होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, संसदेमध्ये करार मंजूर करून घेण्यासाठी जॉन्सन यांनी अधिवेशन बोलावले होते.
 • मात्र, पूर्वी हुजूर पक्षात असणारे खासदार ऑलिव्हर लेटविन यांनी नवे विधेयक मांडले. त्यामध्ये, सरकारने युरोपीय महासंघाकडे तीन महिन्यांची मुदत मागावी, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधेयकाला सर्वच पक्षांमधून पाठिंबा मिळाला आणि हे विधेयक ३२२-३०६ मतांनी मंजूर करण्यात आले. सरकारला पाठिंबा देणाऱ्या आयरिश डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पक्षाने लेटविन यांच्या विधेयकाला पाठिंबा दिला.
 • जॉन्सन यांना पुन्हा एकदा युरोपीय महासंघाकडे जावे लागणार आहे. मात्र, जॉन्सन यांनी त्याला नकार दिला आहे. ते म्हणाले, 'संसदेला शनिवारी ब्रेक्झिटवर अर्थपूर्ण मतदान करण्याची संधी होती, मात्र ती गमावली आहे. मात्र, मी मंगळवारी खासदारांच्या पुनर्विचारासाठी याविषयीचे विधेयक आणणार आहे. ब्रेक्झिट कराराला मुदतवाढ देण्याविषयी मी युरोपीय महासंघाबरोबर चर्चा करणार नाही आणि कायदा तसे बंधनही माझ्यावर लादू शकत नाही. पंतप्रधान झाल्यापासून गेले ८८ दिवस मी या कराराविषयी सर्वांना सागंत आहे. या कराराला विलंब झाला, तर ते देशासाठी, युरोपीय महासंघासाठी आणि एकूण लोकशाहीसाठी खूपच वाईट आहे.'
 • तत्पूर्वी, अधिवेशनाची सुरुवात करताना, सर्व सदस्यांनी 'ब्रेक्झिट' कराराच्या पाठीशी राहण्याची विनंती जॉन्सन यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केली. या वेळी त्यांनी २०१६मध्ये झालेल्या सार्वमतातील आकडेवारीचा उल्लेख केला. देशाला पुढे नेणारा हा करार असून, सर्व जण एकत्र येऊनच हा करार करू या, असेही त्यांनी नमूद केले.

ऐतिहासिक अधिवेशन:-

 • 'ब्रेक्झिट' करारावरील निर्णयासाठी शनिवारी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. गेल्या ३७ वर्षांमध्ये पहिल्यांदा शनिवारी संसदेचे अधिवेशन झाले. त्यामुळे या अधिवेशनाचा उल्लेख 'सुपर सॅटर्डे' असा करण्यात येत होता. या आधी १९८२मध्ये फॉकलंड युद्धावेळी शनिवारी अधिवेशन झाले होते.

युरोपीय महासंघ दक्ष:-

 • ब्रिटनच्या संसदेमध्ये शनिवारी झालेल्या मतदानाची आम्ही दखल गेतली आहे. याविषयी ब्रिटन सरकारशी संपर्क साधला असून, पुढे कोणती पावले उचलणार आहेत, याची माहितीही त्यांना विचारली आहे, असे युरोपीय आयोगाच्या प्रवक्त्या मिना अँड्रेवा यांनी सांगितले.

नागरिक लंडनच्या रस्त्यांवर:-

 • 'ब्रेक्झिट'वरून ब्रिटिश संसदेमध्ये घमासान होत असतानाच, लंडनच्या रस्त्यांवरही हजारो नागरिक उतरले होते. 'ब्रेक्झिट'वर नव्याने सार्वमत घेण्याची मागणी लंडनच्या 'पार्क लेन'वर जमा झालेल्या या आंदोलकांनी केली. या वेळी त्यांच्या हातामध्ये युरोपीय महासंघाचे झेंडे होते आणि संसदेपर्यंत मोर्चा काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 'ब्रेक्झिट करारातून काहीही साध्य होणार नाही. आम्ही ब्रिटिश आहोत, त्याचप्रमाणे युरोपीयही आहोत. युरोपीय महासंघातच राहावे, असे आमचे ठाम मत आहे,' अशी प्रतिक्रिया ब्रुस निकोल यांनी आंदोलनावेळी दिली.
20-21 Oct Current Affairs
20-21 Oct Current Affairs

आरेतील झाडांऐवजी इतर किती झाडे लावली याचे फोटो सादर करा सुप्रीम कोर्ट

 • आरेमधील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात किती झाडे लावली व त्यातील किती जगली याची तपशीलवार माहिती, फोटो सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने एमएमआरसीएलला दिले आहेत.
 • आरेतील वृक्षतोडीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने वृक्षतोडीवरील मनाई आदेश कायम ठेवताना 'जैसे थे' स्थिती १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली आहे.
 • आरे कॉलनीत कुठेही सध्या वृक्षतोड किंवा छाटणी होत नसल्याचे निवेदन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आजच्या सुनावणीत केले. त्यानंतर न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने सर्व याचिकांवरील पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला ठेवून तोपर्यंत आधीचा आदेश कायम ठेवला आहे.
 • त्यामुळे मेट्रो प्रशासनाला आणखी वृक्षतोड करता येणार नाही. आरेतील झाडे तोडण्यात येणार असल्यामुळे पर्यायी झाडे लावण्यात आली असल्याची माहिती एमएमआरसीएलने दिली. त्यावर कोर्टाने झाडांबाबतची माहिती मागितली आहे.
 •  त्याशिवाय आम्हाला संपूर्ण परिसर पाहायचा असल्याचे सुप्रीम कोर्टाने प्रशासनाला सांगितले. दरम्यान, आरेमध्ये मेट्रो कारशेडशिवाय इतरही कोणते प्रकल्प येणार आहेत ,का अशी विचारणादेखील कोर्टाने केली आहे. पुढील सुनावणी आता १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी एमएमआरसीएलची बाजू मांडली.

कारशेड बांधकामावर स्थगिती नाही:-

 • मेट्रो कारशेडच्या बांधकामावर स्थगिती नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मेट्रो कारशेडच्या बांधकामाचा मुद्दा कोर्टात मांडला. त्यावर मेट्रो कारशेडच्या बांधकामावर आम्ही पूर्वीच्या आदेशाने कोणतीही आडकाठी केली नव्हती, आताही ती नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. आम्ही केवळ आरेतील वृक्षतोडीविषयी अंतरिम आदेश दिला असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
 • ग्रेटर नॉएडा येथील लॉ कॉलेजचा विद्यार्थी रिषभ रंजन याने ६ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहून मुंबई आरे कॉलनीमधील विदारक परिस्थिती निदर्शनास आणत आणि तातडीने सुनावणी घेऊन झाडे तोडण्यावर स्थगिती आणण्याची विनंती केली होती.
 • त्याचबरोबर युवा आरे आंदोलकांना मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या वर्तणुकीकडेही लक्ष वेधले. त्याची दखल सरन्यायाधीशांनी घेतली आणि या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. या प्रकरणी सात ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती.

 

हाँगकाँगमध्ये पुन्हाआंदोलक रस्त्यावर

 • पोलिसांनी घातलेली बंदी झुगारून हाँगकाँगमधील लोकशाहीवादी आंदोलकांनी रविवारी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला.
 • गेल्या काही दिवसांत आंदोलकांवरील हल्ले आणि मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी हा मोर्चा काढला होता.
 • त्सिम शा त्सुई या भागात लक्झरी हॉटेल्स आणि बुटिक असून, येथे दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव येथे मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केली होती.
 • रॅलीचे आयोजन करण्याऱ्या गटाचा प्रमुख जिमी शॅम याच्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रधारी व्यक्तींनी हल्ला केला होता; तसेच शनिवारी रात्री एका लोकशाही समर्थकाला भोसकून त्याच्या मानेवर आणि पोटावर वार करण्यात आले. या घटनांमुळे तणाव आणखी वाढला होता.
 • 'हल्ल्यांमुळे, तसेच पोलिसांच्या बंदीमुळे आम्ही खचलेलो नाही, हे आम्हाला दाखवायचे आहे. आमच्यावर जितका दबाव टाकतील, तेवढा प्रतिरोध आम्ही करू,' अशी प्रतिक्रिया ६९ वर्षीय आंदोलक युंग यांनी दिली.
 • 'पोलिस आम्हा हजारो आंदोलकांना अटक करू शकते का,' असा संतप्त सवाल आंदोलक फिलिप त्सोई यांनी केला. 'आमच्या मुख्य कार्यकर्त्यांपैकी अनेक जण अटकेत किंवा जखमी आहेत. असे असतानाही अधिकाधिक नागरिकांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवणे आवश्यक होते,' असेही ते म्हणाले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.
20-21 Oct Current Affairs
20-21 Oct Current Affairs

म्हणून पीओकेमध्ये कारवाई करण्यात आली

 • जम्मू-काश्मीरमधून भारताने ३७० कलम हटविल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तणावाची स्थिती असल्याचं पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवायचं होतं.
 • त्यामुळेच त्यांनी भारतात अतिरेक्यांची घुसखोरी करून काश्मीरमधील वातावरण खराब करण्याचा डाव आखला होता, म्हणून आज लष्कराने अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला करून त्यांचा डाव उधळून लावल्याचं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितलं.
 • प्रसारमाध्यमांशी बोलताना लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सीमेपलिकडील अतिरेक्यांची तळं उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे ६ ते १० सैनिक मारले गेले आहेत.
 • त्याशिवाय अनेक अतिरेक्यांचाही खात्मा करण्यात आला आहे. अथमुकम, जुरा आणि कुंदलशाहीमधील अतिरेक्यांच्या तळांवर आम्ही हल्ला चढवला. अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही ही कारवाई केली.
 • ३७० कलम हटविल्यापासून पाकिस्तानचा थयथयाट सुरू असून हिमवर्षाव होण्याआधीच त्यांना काश्मीरमध्ये अतिरेक्यांची घुसखोरी करायची होती. मात्र त्यांचे मनसुबे आम्ही उधळून लावले आहेत, असं रावत म्हणाले.
 • काश्मीरमध्ये शातंतेचं वातावरण आहे. सफरचंदाच्या प्रमुख व्यवसायासह सर्व व्यवसाय सुरळीतपणे सुरू आहेत. मात्र काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण राहू नये यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांना काश्मीरमध्ये अतिरेक्यांची घुसखोरी करून हिंसा घडवून आणायची आहे.
 • ३७० कलम रद्द झाल्यापासून काश्मीरमध्ये तणावाची स्थिती असल्याचं त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवून द्यायचं आहे. त्यामुळेच आम्ही आर्टिलरी गन्सच्या सहाय्याने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना टार्गेट केलं, असंही ते म्हणाले. आम्ही आज तीन दहशतवादी तळांना पूर्णपणे नेस्तनाबूत केलं आहे.
 • चौथा तळही बऱ्यापैकी नेस्तानाबूत झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आज झालेल्या या ऑपरेशनसाठी केंद्र सरकारने आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं आहे, असं ते म्हणाले. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 • दरम्यान, नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने आज पहाटे पाकिस्तानच्या ११ सैनिकांचा आणि २२ अतिरेक्यांचा खात्मा केला. काश्मीरमधील तंगधारमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यानं सुरुवातीला गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिलं.
 • जवळपास ११ पाक सैनिकांना भारतीय जवानांनी ठार केलं. अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले आहेत. ही कारवाई सुरू असतानाच, लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे चार ते पाच अड्डे उद्ध्वस्त केले.
 • यात आतापर्यंत २२ दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यात भारतीय सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले.

पहिल्यांदा तेजस ला उशीर मिळणार नुकसान भरपाई

 • गुरुवारी रात्री लखनऊ जंक्शन येथे कृषक एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्यानंतर शुक्रवारी पहाटे गाड्या विस्कळीत झाल्या. यामुळे, प्रथमच नवी दिल्लीकडे जाणार्‍या ८२५०१ तेजस एक्स्प्रेसला तीन तास उशीर झाला.
 • अशा परिस्थितीत आयआरसीटीसीने प्रवाशांना दिलेल्या आश्वासनानुसार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषक एक्सप्रेस रुळावरून घसरल्यामुळे एक्स्प्रेसला १० तास उशीर झाला. याशिवाय लखनऊ मेल, पुष्पक एक्सप्रेस आणि चंदीगड एक्स्प्रेससह अनेक गाड्या उशिराने धावत होत्या.

देशात पहिल्यांदाच ट्रेनला उशीर झाल्याने मिळाली नुकसान भरपाई:-

 • एखादी एक्स्प्रेस गाडी लेट झाल्यामुळे देशात पहिल्यांदाच प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषक एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यामुळे लखनऊ जंक्शनवरून ही गाडी तीन तास उशिरा सुटली.
 • त्यानंतर परतीचा प्रवास करतानाही ही गाडी दिल्लीहून सुमारे दोन तास उशिरा सुटली. अशात आयआरसीटीसीने प्रवाशांना दिलेल्या हमीनुसार, विमा कंपनीने प्रवाशांना २५० रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • यासाठी आयआरसीटीसीने सर्वच प्रवाशांच्या मोबाइल नंबरवर लिंक पाठवली आहे. या लिंकवर प्रवाशी आपल्या क्लेमसाठी दावा करू शकतात. हा दावा प्राप्त झाल्यानंतरर विमा कंपनी ही नुकसान भरपाईची रक्कम देऊ करणार आहे.

कृषकच्या प्रवाशांनी रात्र जागून काढली:-

 • कृषक एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी शुक्रवारी संपूर्ण रात्र लखनऊ जंक्शनच्या फलाटावर रात्र जागून काढली. ही ट्रेन रात्री ११ वाजून १० मिनिटांनी सुटण्याऐवजी ती सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सुटली.
 • या वेळी मोठ्या संख्येने प्रवाशी शहरातील विविध ठिकाणी गाडीची वाट पाहच बसावे लागले. एनईआरच्या बेजबाबदारपणे प्रवाशांना योग्य ती माहिती मिळू शकली नाही. सुरुवातीला दोन तास, नंतर तीन तास आणि त्यानंतर मग गाडीच्या स्थितीचा माहिती मिळणेच बंद झाले. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

 

20-21 Oct Current Affairs
20-21 Oct Current Affairs

मराठीभाषकाचा ४१ वर्षांनंतर सन्मान

 • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद सात वर्षे पाच महिने भूषविणारे न्या. यशवंत विष्णु चंद्रचूड यांच्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी सरन्यायाधीशपदाचा मान मराठीभाषक न्या. शरद बोबडे यांना मिळणार आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात जन्मलेले न्या. सॅम पिरोज भरुचा आणि न्या. एस. एच. कपाडिया यांनीही सरन्यायाधीशपद भूषवले आहे.
 • न्या. बोबडे यांच्यानंतर न्या. रामण्णा सरन्यायाधीश होतील, अशी अपेक्षा असून, त्यानंतर न्या. उदय लळित आणि न्या. धनंजय चंद्रचूड या आणखी दोन मराठी भाषिक न्यायाधीशांना देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी मिळणार आहे.
 • वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी पूर्ण केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठात न्या. बोबडे यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राहिलेले न्या. बोबडे मुंबई आणि नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरूही आहेत.
 • न्यायप्रविष्ट प्रकरणे झटपट निकाली लागून लोकांना न्याय मिळावा म्हणून न्या. बोबडे मध्यस्थीचा पुरस्कार करतात. सन २०१७ ते मार्च, २०१८पर्यंत मध्यस्थीद्वारे १ लाख ७ हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा झाल्याचे न्या. बोबडे यांनी नमूद केले आहे.
 • आधार कार्ड नसल्यास भारतीय नागरिकांना मूळ सेवा आणि सरकारी अनुदानांपासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वाचा निकाल देत न्या. बोबडे यांनी आधार कार्डची अनिवार्यता संपुष्टात आणली होती. याशिवाय त्यांनी माजी सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्या. ए. के. सिक्री यांच्यासोबत सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री आणि साठा करण्यावर बंदी आणली होती.

 

सियाचीन पर्यटकांसाठी खुलं

 • जगातील सर्वांत उंचावरील युदधभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशरचा भाग हा पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी याची अधिकृत घोषणा केली. सियाचीन बेस कॅम्प ते कुमार पोस्टपर्यंतचा सर्व भाग हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 • लडाखमधील श्योक नदीवरील कर्नल चेवांग रिंचेन पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजनाथ म्हणाले, “लडाखमध्ये पर्यटनासाठी प्रचंड वाव आहे. लडाखमधील उत्तम कनेक्टिव्हीटी पर्यटकांना नक्कीच मोठ्या संख्येने इकडे खेचून घेऊन येईल.
 • हा नवा पूल सर्व प्रकारच्या वातावरणातील बदलतातही या भागाला जोडून ठेवेल. तसेच सीमाभागात एक मोक्याची जागा म्हणून तो नावारुपाला येईल.”
 • भारत-चीन संबंधांवर बोलताना राजनाथ म्हणाले, “भारताने चीनसोबत सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. येथे फक्त दोन्ही देशांच्या दृष्टीकोनात फरक आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवरुन वाद आहेत मात्र, हे वाद योग्य समज आणि जबाबदारीने हाताळले जात आहेत.”
 • काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे चीननेही मान्य केले आहे त्यामुळेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी काश्मीरचा विषय काढला नाही, असेही यावेळी राजनाथ सिंह म्हणाले.
20-21 Oct Current Affairs
20-21 Oct Current Affairs

SBI च्या कोट्यवधी खातेदारांना झटका एक नोव्हेंबरपासून हा महत्त्वाचा बदल

 • देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी SBI च्या कोट्यवधी खातेदारांना मोठा धक्का बसणार आहे.
 • व्याज दरातील कपात एक नोव्हेंबरपासून लागू होईल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. बँक 1 लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्यांनी कपात करणार आहे.
 • परिणामी, नव्या नियमानुसार बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. म्हणजेच व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
 • यापूर्वी याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली. त्यानंतर एसबीआयनेही आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

रोनाल्डोच्या ७०१ व्या गोलमुळे युव्हेंटस विजयासह गटात अव्वल

 • ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मिरालेम पॅनिक यांनी नोंदवलेल्या गोलच्या बळावर युव्हेंटसने बोलोग्नाचा २-१ असा पराभव करून सीरी ए चषक फुटबॉल स्पर्धेतील गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आहे.
 • या आठवडय़ात सप्तशतकी गोलची नोंद करणाऱ्या ३४ वर्षीय रोनाल्डोने १९व्या मिनिटाला ७०१वा गोल साकारला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात आठव्या मिनिटाला पॅनिकने युव्हेंटसच्या खात्यावर दुसऱ्या गोलची भर घातली.
 • पहिल्या सत्रात बचावपटू डॅनिलो लारांगेरियाने २६व्या मिनिटाला गोल करीत बोलोग्नाला बरोबरी साधून दिली होती.
20-21 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »