20 August Current Affairs

20 August Current Affairs
20 August Current Affairs

चिदंबरम यांचा जामीन फेटाळला अटकेची शक्यता

 • आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. यानंतर चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं सीबीआयकडून त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 • आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास ईडी आणि सीबीआयनं विरोध दर्शवला होता. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसून, त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे अशी बाजू ईडी आणि सीबीआयने न्यायालयात मांडली होती.
 • आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण २००७मधील असून, त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते.
 • या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत.
   

सीआरपीएफच्या हेल्पलाइनवर सहा दिवसात ७ हजार फोन

 • सीआरपीएफने काश्मीरी जनतेच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. पण काश्मीरींच्या मदतीपेक्षा या 'मददगार' हेल्पलाइनमुळे पाकिस्तानी नागरिकांना आपला रोष व्यक्त करण्यासाठी एक जागा झाली आहे. 
 • हेल्पलाइनवर ११ ते १६ ऑगस्टदरम्यान ७,०७१ दूरध्वनी आले, त्यापैकी १७१ भारताबाहेरून आले होते. 
 • काही लोक हेल्पलाइनवर फोन करून आपल्या कुटुंबीयांची चौकशी करत होते. पाकिस्तानमधून आलेल्या दूरध्वनींवर सुरक्षा दलालाच लोक अपशब्द बोलत होते. 
 • या हेल्पलाइनवर २,७०० दूरध्वनी सुरक्षा दलाच्या कुटुंबीयांकडून, २,४४८ दूरध्वनी काश्मीरबाहेर राहणाऱ्या लोकांकडून आपल्या आप्तजनांची खुशाली विचारण्यासाठी आले होते. १,७५२ दूरध्वनी बिगर काश्मीरी लोकांनी काश्मीरी लोकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आले होते. 
 • १४४११ असा या टोल फ्री हेल्प लाइनचा नंबर आहे. सौदी अरबमधून एकूण ४५ फोन आले. एकूण २२ देशांमधून काश्मिरींची परिस्थिती जाणून घेण्यासाठी फोन आले. 
 • यापैकी ३९ युएई, १२ कुवेत, ८ इस्रायल आणि मलेशियातून तर ७ युके, सिंगापूर आणि बांगलादेशमधून फोन आले. काही फोन पाकिस्तानातूनही आले. काही नातेवाईकांची ख्यालीखुशाली विचारणारे आले तर काहींनी आपला भारतावरचा राग व्यक्त केला. 
   
20 August Current Affairs
20 August Current Affairs

मोदींचा मॅन व्हर्सेस वाइल्ड शो टॉप ट्रेंडिंगमध्ये

 • १२ ऑगस्ट या दिवशी डिस्कव्हरी वाहिनीवर 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होस्ट बेअर ग्रिल्ससोबत दिसले होते. जिम कॉर्बेट पार्कमध्ये चित्रिकरण करण्यात आलेला हा विशेष भाग केवळ देशातच नव्हे, तर इतर अनेक देशांमधील नागरिकांनी पाहिला. 
 • सध्या हा शो टीव्ही जगतात टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. स्वत: बेअर ग्रिल्स यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चित्रित करण्यात आलेल्या या विशेष भागाला ३ अब्ज ६ कोटी लोकांचे सोशल मीडियावर लाइक्स मिळाले आहेत.
 •  या भागाने टीव्ही जगतातील एक मोठा शो सुपर बाउल ५३ ला देखील ट्रेंडिंगमध्ये मागे टाकले आहे. या भाग ज्यांनी पाहिला त्या सर्व दर्शकांचे ग्रिल्स यांनी आभार मानले आहेत.
   

सशस्त्र पोलिस बलाचे निवृत्तीवय ६० वर्षे

 • केंद्रीय सश्स्त्र पोलिस बलामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी सरकारने निवृत्तीवय ६० वर्षे निश्चित केले आहे. सरकारी आदेशात सोमवारी ही माहिती देण्यात आली. 
 •  या सरकारी आदेशामुळे कॉन्स्टेबल ते कमांडन्ट या उतरंडीच्या प्रत्येक पायरीवरील जवानाचे निवृत्तीवय आता सरसकट ६० वर्षे झाले आहे.
 • याचा थेट फायदा केंद्रीय सशस्त्र पोलिस बलामध्ये समाविष्ट असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस बल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा बल (बीएसएफ), इंडो-तिबेट सीमा पोलिस बल व सहस्र सीमा बल या चार दलांना होणार आहे. 
 • या चार दलांमधील उप महानिरीक्षक या पदापासून ते महासंचालक या पदापर्यंतच्या व्यक्ती साठाव्या वर्षी निवृत्त झाल्या आहेत. याशिवाय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व आसाम रायफल्स यातील जवान साठाव्या वर्षी निवृत्त होत आहेत. हा विरोधाभास दूर करावा, यासाठी काही अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
   
20 August Current Affairs
20 August Current Affairs

झाकीर नाईकला मलेशियाचा दणका भाषणांवर बंदी

 • वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात फरार असलेल्या झाकीर नाईकला मलेशियानं मोठा झटका दिला आहे. त्याच्या सार्वजनिक भाषणांवर देशभरात बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 
 • झाकीर नाईक हा बऱ्याच काळापासून मलेशियात आहे. भारत सरकारनं त्याच्या प्रत्यार्पणाची मागणीही मलेशियाकडे केली होती. मात्र, पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी त्याच्या प्रत्यार्पणास नकार दिला होता. 
 • त्याला भारतात न्याय मिळण्याची शक्यता नाही, असं म्हणत त्यांनी झाकीरची पाठराखण केली होती. पण आता तोच झाकीर नाईक मलेशियासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणामुळं झाकीर नाईकच्या जाहीर भाषणांवर देशात बंदी घालण्यात आली आहे. सरकारने तसे आदेश दिले आहेत. मलेशियाच्या पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
 • झाकीरने कोटा बारूमध्ये ३ ऑगस्टला मलेशियात वास्तव्य करणाऱ्या चिनी आणि हिंदू नागरिकांसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर झाकीरला भारतात पाठवण्याची मागणी तेथील मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत केली होती. चिनी वंशाच्या नागरिकांनी त्यांच्या देशात परत गेले पाहिजे, कारण ते येथील जुने पाहुणे आहेत.
 • तसंच भारतात जेवढे अधिकार मुस्लिमांना मिळाले नाहीत, त्याच्या शंभरहून अधिक पट अधिकार मलेशियात हिंदूंना देण्यात आले आहेत, असं झाकीर म्हणाला होता. त्यामुळं शांतता भंग केल्याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी त्याला बुकित अमान पोलीस मुख्यालयात बोलावलं होतं. याआधी १६ ऑगस्ट रोजी झाकीरचा या प्रकरणी जबाब नोंदवून घेतला होता.
   

हाँगकाँगवरून अमेरिकेने चीनला ठणकावले

 • हाँगकाँगमधील नागरिकांचे आंदोलन बळाचा वापर करून चिरडण्याची सज्जता केलेल्या चीनला अमेरिकेने थेट इशारा दिला आहे. चीनने दुसरा 'तिआनमेन चौक' घडवण्याचा प्रयत्न केल्यास उभय देशांतील व्यापार चर्चेला बाधा येईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. 
 • हाँगकाँगमधील तरुणांनी आपल्या अधिकारांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यांवर उतरून आंदोलन सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात हाँगकाँग विमानतळावरच हजारो आंदोलकांनी निदर्शने सुरू केल्याने विमान सेवाही बंद पडली होती. 
 • त्यानंतर चीनने आपली सशस्त्र दले हाँगकाँगमध्ये उतरवली आहेत. आंदोलकांना गंभीर परिणामांचा इशारा देण्यात आल्याने चीन तिआनमेन चौकातील आंदोलनाप्रमाणेच हा लढाही चिरडणार अशी भीती व्यक्त होत आहे. त्यावरूनच ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. 'हाँगकाँगमध्ये हिंसा झाल्यास परिस्थिती खूप कठीण बनेल. दुसरा 'तिआनमेन' करण्याचा चीनचा प्रयत्न असेल, तर द्विराष्ट्रीय व्यापार चर्चा होणे अशक्य आहे', असे ट्रम्प यांनी चीनला सुनावले आहे. 
 • अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्धाचा सर्वाधिक फटका चीनला बसत आहे. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील करात मोठी वाढ केल्याने चीनची आर्थिक स्थिती बिघडली आहे. गेल्या वर्षीच्या व्यापार चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने दोन्ही देशांमध्ये आता नव्याने बैठक होणार आहे. येत्या १० दिवसांत दोन्ही देशांचे उपाध्यक्ष दूरध्वनीवरून चर्चा करून या बैठकीचा मुहूर्त निश्चित करणार आहेत. या बैठकीसाठी आशावादी असलेला चीन ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर कोणती भूमिका घेतो, याकडे हाँगकाँगवासींचेही लक्ष लागले आहे.  
   
20 August Current Affairs
20 August Current Affairs

अफगाणिस्तानचा काश्मीरशी संबंध नाही

 • काश्मीर प्रश्नावर विनाकारण अफगाणिस्तानला ओढत, आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचे लक्ष वेधण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना अफगाणिस्ताननेच सणसणीत चपराक लगावली आहे. अफगाणिस्तानचा संबंध काश्मीरशी जोडण्याचा प्रयत्न चुकीचा, बेजबाबदारपणाचा आणि निष्कारण आहे, अशी टीकाही अमेरिकेतील अफगाणिस्तानच्या राजदूत रोया रेहमानी यांनी केली. अफगाणिस्तान प्रश्नावर अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये शांतता चर्चा सुरू आहे. त्याचाच धागा पकडून पाकिस्तान तालिबान व अफगाणिस्तानला काश्मीर प्रश्नामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला आहे. 
 • तालिबाननेही पाकिस्तानच्या दाव्यानंतर हात झटकल्यामुळे पाकिस्तान सरकार या आधीच तोंडावर आपटले आहे. आता पुन्हा पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असद माजीद खान यांनी एका मुलाखतीमध्ये हा मुद्दा उकरून काढला. काश्मीरमधील परिस्थितीचा परिणाम अमेरिका आणि तालिबान यांच्यातील चर्चेवर होण्याची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावर पाकिस्तान दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असे स्पष्ट करताना रोया रेहमानी म्हणाल्या, 'काश्मीरमधील
 • परिस्थितीचा संबंध अफगाणिस्तानातील शांतता चर्चेशी जोडणे, हे बेजबाबदार आणि बेपर्वाईचे आहे. काश्मीरचा मुद्दा चर्चेत 
 • आणण्याचा पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होत असून, अफगाणिस्तानतील हिंसाचार दीर्घ काळ सुरू ठेवण्याचा त्यामागील पाकिस्तानचा हेतू आहे. तालिबानविरोधातील निष्क्रियतेला पाकिस्तानने दिलेले कारणही दुबळे असून, दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करणे त्यांनी टाळले आहे.
 • अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला कोणताही धोका नसताना अफगाण सीमेवर लष्कर तैनात करावे लागण्याची निष्कारण शक्यता पाकिस्तानने वर्तवली आहे. आमच्या स्थैर्यालाच पाकिस्तानात आश्रयाला असणाऱ्या, त्यांच्याकडून सुरक्षित आश्रय मिळालेल्या व मदत घेणाऱ्या दहशतवादी संघटनांकडून सातत्याने धोका आहे. या संघटना पाकिस्तानच्या भूभागामध्ये खुलेआम कारवाया करत आहेत.' 
   

वर्षभरात मोठी मंदी

 • आगामी वर्षभरात आठ वर्षांतील सर्वांत मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. जगभरातील एक तृतीयांश फंड मॅनेजरनी या शक्यतेला दुजोरा दिल्याचे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने म्हटले आहे. मेरिल लिंचच्या मते ३४ टक्के फंड मॅनेजरनी वर्षभरात मोठ्या प्रमाणात मंदी येण्याचे भाकित वर्तवले आहे. तसे झाल्यास हा ऑक्टोबर २०११नंतरचा सर्वांत कठीण काळ ठरणार आहे. बँकेतर्फे २ ते ८ ऑगस्टदरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
 • जगभर ५५३ अब्ज डॉलरच्या निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या २२४ फंड मॅनेजरना या सर्वेत सामावून घेण्यात आले होते. सर्वेमध्ये सहभाग घेतलेल्या व्यवस्थापकांपैकी निम्म्याहून अधिक जणांनी कॉर्पोरेट्समध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर दबाव असल्याचे नमूद केले आहे. 
 • अमेरिका-चीन या देशांदरम्यान सध्या सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा उल्लेख करत जगातल्या एका आघाडीच्या आंतरराष्ट्रीय बँकेने ही मंदी म्हणजे जागतिक स्तरावर अनेकांसाठी जोखीम असेल, असे नमूद केले आहे. दरम्यान, अमेरिकेत पुढीन दोन वर्षांत मंदीसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका 'नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिस्ट' च्या पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे.
   
20 August Current Affairs
20 August Current Affairs

आर्थिक वृद्धीचे आव्हान

 • देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या चर्चेबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवताना संभाव्य मंदीची अप्रत्यक्ष कबुली दिली. सद्यस्थितीत आर्थिक वृद्धी हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून धोरणांची निश्चिती करणारे सर्वजण याविषयी चिंताग्रस्त आहेत. आपल्यासमोर देशांतर्गत तसेच, आंतरराष्ट्रीय आव्हाने आहेत, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. 
 • फिक्कीतर्फे (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज) येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक बँकिंग परिषदेत ते बोलत होते. 'भारतीय तसेच, जागतिक अर्थव्यवस्थेत मरगळ आली आहे. याशिवाय अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक वृद्धी हा सर्व देशांपुढील यक्षप्रश्न आहे. 
 • आर्थिक वृद्धी अपेक्षेनुसार साधली जात नसल्याने आर्थिक आघाडीवर अस्थिरता आहे. मात्र आर्थिक वृद्धीला चालना देणे हे आपल्या सर्वाचे प्राथमिक कर्तव्य आहे,' असे ते म्हणाले. 
 • लघु व मध्यम उद्योजकांच्या व्यवसायात सुलभता येण्यासाठी तसेच, सर्वसामान्य गृहकर्जदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग चौथ्यांदा कपात केली आहे. प्रत्येक बँकेने आपापल्या कर्जाचे व्याजदर हे रेपो दराशी सुसंगत राखावेत, अशी सूचनाही रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच केली आहे. मात्र काही बँकांचा अपवाद वगळल्यास या सूचनेची अद्याप पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे रेपो दराशी सुसंगत व्याजदर अंमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. याशिवाय रेपो दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले. 
 • रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो दरात .३५ टक्क्यांनी कपात केली होती. यामुळे आरबीआयचा रेपो दर ५.४ टक्क्यांपर्यंत खालावला आहे. आरबीआयच्या दरकपातीला अनुसरून आतापर्यंत स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कॅनरा बँक आदींनीच दरकपात केली आहे. 

संधी शोधा, निराशा झटका :-

 • उद्योजक व व्यावसायिकांनी निराशेचा सूर सोडून संधी साधण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांत दास यांनी उद्योजकांना इशारा दिला. केंद्रीय अर्थसंकल्पातील काही निर्णय उद्योजकांना तसेच, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अप्रिय वाटले होते.
 • यानंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण होत आहे. तसेच, उद्योजकांमध्येही निराशेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले. वर्तमानपत्र वाचताना अथवा टीव्हीवरील बिझनेस वृत्तवाहिनी पाहताना लोकांमध्ये आवश्यक तो उत्साह नाही असे मला जाणवते. 
 • अर्थव्यवस्थेपुढे निश्चितच आव्हाने आहेत. मात्र ही आव्हाने केवळ देशांतर्गत नसून आंतरराष्ट्रीयही आहेत, हे सर्वांनी समजण्याची गरज आहे. त्यामुळे दृष्टिकोन बदलून संधी साधण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा दास यांनी व्यक्त केली. 
   

राजन यांची सूचना:-

 • आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आर्थिक क्षेत्राला आलेली मरगळ ही चिंताजनक असून सरकारने तातडीने आर्थिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. 

 

फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी रस्सीखेच

 • मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत उतरलेल्या लालचंद राजपूत यांना ती संधी मिळाली नसली तरी त्यांनी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून शर्यतीत उडी घेतल्याने त्यात रंगत निर्माण झाली आहे. 
 • रवी शास्त्री यांची प्रमुख प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर आता सोमवारपासून सपोर्ट स्टाफच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समिती या मदतनीसांची निवड करेल. 
 • फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड यांनी उडी घेतली आहे. त्यात प्रवीण अमरे, अमोल मुझुमदार, सौराष्ट्रचा सितांशू कोटक यांचाही समावेश आहे. संजय बांगर हे विद्यमान फलंदाजी प्रशिक्षक आहेत, पण त्यांना पुन्हा ही जबाबदारी सोपविली जाईल का, हे लवकरच स्पष्ट होईल. हृषिकेश कानिटकर आणि मिथुन मन्हास हेदेखील मुलाखतीसाठी हजर राहिले होते. 
 • रवी शास्त्री यांनी आधीचाच सपोर्ट स्टाफ कायम करण्याची शिफारस केल्याचे कळते. तसे झाल्यास त्यात बदल होण्याची शक्यता नाही. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांनाच कायम करण्यात येईल.  ही मुलाखतींची प्रक्रिया गुरुवारपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.  गोलंदाजी प्रशिक्षकासाठी वेंकटेश प्रसाद, पारस म्हांब्रे, अमित भंडारी यांनी जोर लावला आहे.  फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून उमेदवाराने १० कसोटी किंवा २५ वनडे खेळणे अनिवार्य असेल तसेच त्याचे वय ६० पेक्षा अधिक असता कामा नये. मागणी केली आहे. या शिवाय वाहन उद्योगासाठी स्वतंत्र पॅकेजच्या निर्मितीचे आदेश देण्यात आले आहेत.
   
20 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »