20 July Current Affairs

20 July Current Affairs
20 July Current Affairs

देशातील बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला ५० वर्षे पूर्ण

देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरणाला ५० वर्षे पूर्ण होत असताना, या निर्णयाचे भलेबुरे परिणाम आणि त्याची फलश्रुती तपासणे योग्य ठरते. त्याचबरोबर हा निर्णय आर्थिक होता की राजकीय याकडेही विविध दृष्टिकोनातून पाहिले जाणे साहजिक आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारकडून घेतलेला एकमात्र महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय म्हणून बँकाच्या राष्ट्रीयीकरणाकडे बोट दाखवले जाते. नऊ जुलै १९६९ रोजी बंगळुरू येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आर्थिक धोरणाच्या संदर्भात मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण व इतर मूलगामी फेरबदल याचा विचार व्हावा असे सुचवले आणि देशातील या महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयाकडे वेगवान घटनाक्रमांना सुरूवात झाली. कार्यकारिणीतील या विषयावरील प्रखर मतभेद, दरम्यान राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी 'सिंडिकेट' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवार म्हणून केलेली निवड, त्याला विरोध करताना, 'पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय बदलला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील' असा इंदिराजींनी दिलेला कथित इशारा, उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडून अर्थखाते काढल्यावर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये निर्माण झालेला पेच, अर्थखाते मिळाल्याखेरीज राजीनामा मागे घेणार नसल्याची लेखी भूमिका, या पार्श्वभूमीवर १९ जुलैला १४ प्रमुख शेड्यूल्ड बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्याचा वटहुकूम निघाला. श्रीमती गांधी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, राष्ट्रीय अग्रक्रम आणि उद्दिष्टे यांच्याशी सुसंगत अशा आर्थिक विकासाच्या गरजा अधिक चांगल्या भागविता याव्यात, म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे जाहीर केले. सर्व दडपणे झिडकारून श्रीमती गांधी यांनी दुपारी मोरारजींचा राजीनामा स्वीकारला. परंतु त्याचवेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून मोरारजींच्या समर्थकांकडूनही शाबासकी मिळवली. त्यामुळे या निर्णयाला राजकीय स्पर्श होता. या निर्णयामागे राजकीय घटनांच्या व्यतिरिक्त युद्धे आणि या दशकातील भीषण दोन दुष्काळ हीदेखील कारणे होती. यामुळे तेव्हाचा जीडीपी वाढीचे दर उणे बनले होते आणि महागाई गगनाला भिडली होती. त्याच्या चार-पाच वर्षांआधी परकीय चलन कमी झाले. डॉलरचे अवमूल्यन करावे लागले होते. स्वातंत्र्यानंतर सरकारने अवलंबलेल्या सामाजवादी उद्दिष्टांशी बँकिंग क्षेत्रालाही जोडून घेण्याचा विचार खूप आधी सुरू होता. १९४८च्या प्रारंभीच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अहवालात बँका आणि विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा विचार होता. त्यानुसार, १९५६ मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या स्थापनेद्वारे विमा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण झाले. या निर्णयाचे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तेव्हा संमिश्र स्वागत झाले. आजही या निर्णयाच्या बाबतीत अशाच प्रकारे संमिश्र भावना असल्याचे दिसते. याबाबत एक मुख्य आक्षेप घेतला जातो तो असा की बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची आवश्यकता नव्हती, कारण बँकिंग उद्योग त्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी ठरत होता आणि रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सरकारचे व्यापारी बँकांवर व्यापक आणि प्रभावी नियंत्रण होते. आता गेल्या ५० वर्षांचा इतिहास पाहता सरकारी बँका बुडित कर्ज आणि वाढता राजकीय हस्तक्षेप या समस्यांच्या ओझ्याखाली दबत चालल्या आहेत. त्याच्या प्रशासकीय समस्या त्याला देशाचे उद्दिष्ट साध्य करण्यापासून रोखत असून भ्रष्टाचार आणि बाबूगिरीनी कुजवलेली अजून एक सरकारी व्यवस्था अशी त्याची आजची दशा आहे. राष्ट्रीयीकरण झालेली सर्वांत मोठी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया होती. तिच्याकडे तेव्हा जवळपास ४८३ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. म्हणजे, तेव्हाच्या बँकिंग व्यवस्थेतील एकूण ठेवींपैकी १० टक्के. ती स्टेट बँक ऑफ इंडियाशी स्पर्धा करत होती. नफ्यातही ती सर्वांत पुढे होती. आज त्याची स्थिती पाहिल्यास हजारो कोटींची बुडित कर्जे ही तिची ओळख आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या या निर्णयाचे उद्दिष्ट पहिल्या दशक, दोन दशकांमध्ये काही प्रमाणात साध्य झाले, असे दिसते. परंतु बँक एक आर्थिक व्यवस्था आहे आणि त्याची पहिली निष्ठा त्याच्या ग्राहकाप्रती म्हणजे ठेवीदारांप्रती हा विश्वास निर्माण करण्यात ते आजही यशस्वी झाले नाही. म्हणजे अपेक्षित सामाजिक दृष्टिकोनातून न्याय्य अद्याप बाकी आहे. आणि त्याच्या व्यावसायिक कार्यक्षमतेच्या प्रश्नावरही मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. राष्ट्रीयीकरण झालेल्या दिवशी, त्या १४ बँकांचा एकत्रित नफा ५.७ कोटी रुपये होता. आज याच बँकांचे एकत्रित नुकसान पन्नास हजार कोटींच्या आसपास आहे. यावरून, अर्धशतकाच्या प्रवासाचा योग्य तो ताळा मांडता येईल आणि फलश्रुतीही जोखता येईल. 

अमेरिकेने पाडले इराणचे ड्रोन

खाडी क्षेत्रामध्ये अमेरिकेच्या नौसेनेने इराणचे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. काही आठवड्यांपूर्वीच इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडले होते. यावरून अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणवर हल्ल्याचा आदेशही दिला होता. मात्र, लगेगच हा आदेश मागे घेण्यात आला होता. तर अमेरिकेने ड्रोन पाडल्याच्या आरोपाचे इराणने खंडन केले आहे. 
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, हॉर्मूज खाडीमध्ये प्रवेश करणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकेला धोका निर्माण झाला होता. यामुळे इराणचे ड्रोन पाडण्यात आले आहे. यामुळे गेल्या आठवड्यात शांत झालेल्या खाडी क्षेत्रामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

असॉल्ट युद्धनौका USS बॉक्सरने इराणी ड्रोनविरोधात संरक्षणात्मक भूमिका घेतली. कारण हे ड्रोन विमान युद्धनौका आणि त्यावरील सैनिकांना आव्हान देत होते. 1000 यार्डसच्या आत येताच हे ड्रोन पाडण्य़ात आले. ट्रम्प यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय हद्दीत जहाजांविरोधात इराणने अनेकदा शत्रुत्वपूर्ण कारवाई केली आहे. ही घटना त्यातील ताजी आहे. अमेरिकेकडे आपले लोक आणि हितांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. 

तर अमेरिकेच्या या आरोपांवर इराणने उत्तर देताना, आपल्याकडे अद्याप ड्रोन पाडल्याची माहिती आलेली नाही. इराणचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी मोहम्मद जरीफ यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते युएनच्या मुख्यालयामध्ये महासचिवांशी चर्चा करण्यासाठी आले आहेत.

20 July Current Affairs
20 July Current Affairs

अपोलोला 50 वर्षे

चंद्र... निळ्याभोर आकाशात आपल्याला तो एकच दिसत असला तरी प्रत्येकाचा चंद्र निराळा. लहानग्यांच्या विश्वातला चंद्र वेगळा. मिथकथांमधील चंद्राचे रूप वेगळे. कवीमंडळींच्या कवितांमध्ये शीतल चांदण्याची पखरण करणारा चंद्र वेगळा. कुंडली मांडणाऱ्यांच्या दृष्टीने त्याचे ‘बळ’ महत्त्वाचे! आणि अवकाश संशोधन करणाऱ्यांसाठी तर तो अगदीच वेगळा. अवकाशीच्या या अशा बहुरूपी चंद्रावर मानवी पाऊल ठेवण्याचे स्वप्न प्रथम पाहिले आणि सत्यात आणले ते अमेरिकेने. त्या ऐतिहासिक चंद्रस्पर्शास आज, २० जुलै २०१९ रोजी ५० वर्षे होत आहेत. मानवाची अतिउत्तुंग अशी झेप ठरलेल्या त्या मोहिमेच्या पन्नाशीचे हे स्मरण... 
 

अमेरिकेच्या फ्लोरिडातील केप कॅन्व्हेरल येथील हवाई दलाच्या तळावरून १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या तीन अंतराळवीरांनी 'अपोलो-११' यानातून चंद्राकडे झेप घेतली. तीन दिवसांनंतर, १९ जुलै रोजी चंद्राभोवतीच्या १०० कि.मी.च्या कक्षेत ठरल्याप्रमाणे यान भ्रमण करू लागले. आता पुढचे आव्हान होते ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचे. 

२० जुलै रोजी (भारतीय वेळेनुसार २१ जुलै) नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन 'ईगल'मध्ये (चंद्रावर उतरणाऱ्या वाहनाचे नाव) बसले आणि 'ईगल' हे कोलंबिया या यानापासून वेगळे झाले. तिसरा अंतराळवीर कॉलिन्स हा कोलंबियामध्येच थांबून पृथ्वीप्रदक्षिणा करीत राहिला. दोन तास नऊ मिनिटांनी 'ईगल'चंद्रावरील 'सी ऑफ ट्रँक्विलिटी'या पूर्वनियोजित जागेवर अलगद उतरले तेव्हा अवघे २५ सेकंदांचे इंधन त्यात शिल्लक राहिले होते. म्हणजे चंद्रावर उतरायला त्यांना अर्ध्या मिनिटाचा उशीर झाला असता, तरी 'ईगल' चंद्रावर आदळून अंतराळवीरांचा अंत झाला असता. 

त्यानंतर सुमारे सहा तासांनी तो ऐतिहासिक क्षण आला, ज्या क्षणाची सारे जग श्वास रोखून वाट पाहत होते. 'ईगल'चा दरवाजा उघडून शिडीच्या नऊ पायऱ्या उतरून नील आर्मस्ट्राँग या पृथ्वीवासीयाचे पहिले पाऊल चंद्राच्या भूमीवर पडले. त्यावेळी 'ह्यूस्टन, ट्रँक्विलिटी बेस हिअर, ईगल हॅज लॅन्डेड' हा चंद्रावरून आलेला संदेश जगभर दूरचित्रवाणी आणि रेडिओवरून दिला गेला आणि इतिहास घडला. 

यानंतर संवाद साधताना आर्मस्ट्राँग यांचे उद्गार होते : 'माणसाचे एक छोटे पाऊल.. पण मानवजातीची एक प्रचंड झेप!' हे त्यांचे उद्गार अवकाश इतिहासात अजरामर झाले आहेत. आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे, आणि आल्ड्रिन हे दोन तास १७ मिनिटे चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. या काळात त्यांनी माती अन्य घटकांची चाचपणी केली. पृथ्वीवरील वाळवंटाप्रमाणे तेथे माती आणि दगड होते. 


वेगे वेगे धाऊ... चंद्रावर जाऊ! 
सन १९५७ मध्ये तेव्हाच्या सोव्हिएत युनियने स्पुटनिक उपग्रह सोडला. त्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात अंतराळात जाण्याची स्पर्धा सुरू झाली. सन १९६१मध्ये जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि अनेक अमेरिकन नागरिकांना असे वाटू लागले की, शीतयुद्धातील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यासमोर, म्हणजेच रशियासमोर या तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत अमेरिका मागे पडणार. त्याच वर्षी सोव्हिएत युनियनने पहिल्यांदा मानवाला अंतराळात पाठवले. म्हणून मग अमेरिकेनेही कंबर कसली आणि चंद्रावर पहिल्यांदा मानवाला पाठवायचा निश्चय केला. सन १९६२मध्ये केनेडी यांनी याची घोषणा केली, जी नंतर खूप प्रसिद्ध झाली. ते म्हणाले, "वी चूज टू गो टू द मून!" ही अंतराळातली चढाओढ अशीच सुरू राहिली आणि १९६५मध्ये सोव्हिएत युनियनने एक मानवरहित अवकाशयान चंद्रावर उतरवण्यात यश मिळवले. यानंतर अमेरिकेने अपोलो ११चे यश मिळवले. या मोहिमेला आंतरराष्ट्रीय शांतता मोहीम असे संबोधण्यात आले. त्यामुळे आर्मस्ट्राँग जेथे उतरले त्या जागेला 'शांतीसागर' असे नाव देण्यात आले. 


चंद्रस्पर्शाआधी... 

- अपोलो ११ अंतराळ मोहिमेमध्ये नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांची मोहिमेच्या सहा वर्षे आधी निवड करण्यात आली. 

- १६ जुलै १९६९ रोजी अमेरिकी वेळेनुसार ९ वाजून ३१ मिनिटांनी अपोलो ११ने केनेडी स्पेस सेंटर येथून भरारी घेतली. 

- १८ जुलै १९६९ रोजी आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांनी 'इगल'मधून चंद्रावर उतरण्यासाठी आवश्यक पोषाख केला आणि सराव केला. 

- सुमारे २,४०,००० मैलांचा प्रवास ७६ तास केल्यानंतर अपोलो ११ हे यान १९ जुलै दिवशी चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचले. 

- २० जुलै १९६९ रोजी 'इगल'चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. 

- २४ जुलै १९६९ रोजी अपालो ११ हे पॅसिफिक महासागरात उतरले. चांद्रवीर पृथ्वीवर परतले. 


चंद्रस्पर्शाने काय साधले?
अपोलोच्या एकूण अवकाश मोहिमेसाठी जवळजवळ ३० अब्ज डॉलर खर्च आला. चंद्राची वारी केलेल्या अंतराळवीरांनी सुमारे ३६५ किलो वजनाचे चंद्रावरील मातीचे आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले. अनेक देशांच्या वस्तुसंग्रहालयांना तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळांना अभ्यासासाठी आणि लोकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी त्यातले काही तुकडे भेट म्हणून देण्यात आले. अमेरिकेच्या 'अपोलो'नंतरच्या अवकाश मोहिमेसाठी - म्हणजे 'स्कायलॅब'या अवकाशस्थानकासाठी (स्पेस स्टेशन) अपोलो यानाकरिता विकसित केलेल्या घटकांचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. 

... 

चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला पृथ्वीनिवासी... 
नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिलेच पृथ्वीनिवासी. त्यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी झाला. ते एरोस्पेस इंजिनीअर होते. वयाच्या २०व्या वर्षी त्यांची नियुक्ती नौदलातील विमान सेवेत करण्यात आली. कोरिया युद्धात त्यांनी ७८ मोहिमांमध्ये सहभाग घेतला. यातील पहिल्या २० मोहिमांसाठी त्यांनी 'एअर मेडल', तर नंतरच्या २० मोहिमांसाठी 'गोल्ड स्टार'सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. 

नौदलात सेवा करताना अपोलो ११ या मोहिमेसाठी त्यांची अंतराळवीर म्हणून निवड झाली. आर्मस्ट्राँग हे अत्यंत सुस्वभावी आणि विनम्र होते, असे दाखले दिले जातात. त्यांनी या मोहिमेचे यश स्वत:कडे कधीच घेतले नाही. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अमेरिकेच्या अपोलोच्या १७ मोहिमांमध्ये काम करणारे चार लाख शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांची मेहनत असल्याचे ते नेहमी सांगत. मोहिमेनंतर दिलेली पहिली मुलाखत आणि आयुष्यातील शेवटची मुलाखत या सर्व मुलाखतींमध्ये त्यांनी हेच सातत्याने सांगितले. जास्तीत जास्त तरुणांनी या क्षेत्रात संशोधन करावे अशी त्यांची इच्छा होती. यासाठी मोहिमेनंतर ते जगभर फिरले. 

'इंदिराजी... मला क्षमा करा' 
अंतराळक्षेत्राबाबतच्या जागृतीसाठी आर्मस्ट्राँग जगभर फिरत होते. या फिरस्तीदरम्यान त्यांनी भारतात येऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती. गांधी यांनी जागून, पहाटे साडेचार वाजता रेडिओवरून या मोहिमेचे वार्तांकन ऐकले हे त्यांना समजले तेव्हा त्यांनी प्रथमत: एका देशाच्या पंतप्रधानांना इतक्या पहाटे जागे राहावे लागले याबद्दल क्षमा मागितली. हा त्यांचा किस्सा खूप चर्चेत राहीला. 


आठवणी भारतातल्या

अपोलो ११मधून माणूस चंद्रावर उतरणार, याबाबतची उत्सुकता साऱ्या जगाला होती. भारतातही त्याकाळी अनेकांनी रात्रभर जागून हा कार्यक्रम रेडिओवर ऐकला. 'व्हॉइस ऑफ अमेरिका'द्वारे त्याचे थेट समालोचन सुरू होते. त्याचा अनुवाद भारतातील समालोचक जसदेव सिंग करत होते आणि ते ऑल इंडिया रेडिओवरून प्रसारित करण्यता आले होते. 

चांद्रमोहिमेची माहिती ऐकण्यासाठी आम्ही खुपच उत्सुक होतो. यामुळे रात्री जागून हे समालोचन ऐकले, असे नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले. यानंतरच मला खगोलशास्त्रात अभ्यास करण्याची दिशा मिळाल्याचेही ते सांगतात. त्यावेळेस मी पोस्टाची तिकिटे जमवायचो. आपल्या टपाल खात्याने जेव्हा आर्मस्ट्राँग यांचे टपाल तिकीट काढले तेव्हा ते मला माझ्या बाबांनी आणून दिले होते, अशी आठवणही परांजपे यांनी सांगितली. 

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याही या संदर्भातील आठवणी आहेत. आजही जगात पृथ्वी अंडाकृती नाही तर सपाट पृष्ठभाग आहे असे मानणारे लोक आहेत. त्यांची फ्लॅट अर्थ नावाची संस्था आहे. जेव्हा या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीचा फोटो काढला व तो या संस्थेतील लोकांना दाखवला तरीही त्यांचा यावर विश्वास बसला नाही. आजही ही मंडळी हे मानण्यास तयार नाहीत, असे डॉ. नारळीकर सांगतात. 

ज्येष्ठ विज्ञान पत्रकार श्रीनिवास लक्ष्मण यांनी महालक्ष्मी येथे रस्त्यावर उभे राहून राजा रामण्णा यांच्यासोबत या मोहिमेविषयी ऐकल्याची आठवण सांगितली. यानंतर १९९५मध्ये जेव्हा आर्मस्ट्राँग भारतात आले तेव्हा ते त्यांना भेटले होते. तेव्हा, तुम्ही पुन्हा चंद्रावर जाणार का? या श्रीनिवास यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आर्मस्ट्राँग यांनी, तुम्ही माझ्यासोबत येणार असाल तर नक्की जाईन, असे दिलखुलास उत्तर दिले. त्यावर श्रीनिवास यांनी मग शिडीवरून पहिले कोण उतरणार असे विचारल्यावर दोघेही एकत्र उतरू असेही ते म्हणाले होते, अशी आठवण श्रीनिवास यांनी सांगितली. 

महात्मा गांधींवर टपाल तिकीट

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी आणि सेवाग्राम आश्रमाचे नाते अधोरेखित करणारे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली.

स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते महात्मा गांधी यांचे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात दीर्घाकाळ वास्तव्य होते. हा आश्रम महात्मा गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असून, येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचला गेला. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रम आणि गांधीजींचे नाते अधोरेखित करणारे टपाल तिकीट प्रकाशित करणे औचित्यपूर्ण ठरेल अशी भूमिका आपण केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे मांडली होती, असे मुनगंटीवार म्हणाले.

याप्रमाणेच राज्याने हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन तीन वर्षांत ५० कोटी रोपलागवडीचा संकल्प केला. लोकसहभागातून या वर्षी या संकल्पातील शेवटचा ३३ कोटी रोपलागवडीचा टप्पा पार पडत आहे. आता हा केवळ सरकारचा उपक्रम न राहता ती लोकचळवळ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यापक जनजागृतीसाठी ३३ कोटी रोपलागवडीवर आधारित टपाल तिकीट प्रकाशित करण्याची विनंती आपण केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांना केल्याचेही ते म्हणाले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे यंदाचे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे. वंचित समाजाच्या विकासासाठी शब्दांच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या या ज्येष्ठ साहित्यिकाच्या स्मृतिप्रित्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित झाल्यास ती त्यांना खरीखुरी आदरांजली ठरेल ही भावनादेखील आपण व्यक्त केली होती. त्यावर ही तिन्ही टपाल तिकीट प्रकाशित करण्याबाबत विभागाला त्वरित आदेश देण्यात येतील व लवकरच हे तीन ही टपाल तिकिटे प्रकाशित होतील, असे आश्वासन धोत्रे यांनी दिल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

20 July Current Affairs
20 July Current Affairs

देशात तारापूर सर्वाधिक प्रदूषणकारी

देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये (क्लस्टर) तारापूर अग्रक्रमावर असून राज्यातील इतर औद्योगिक परिसरांची पर्यावरण रक्षणाची कामगिरी तुलनात्मक समाधानकारक आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण करणाऱ्या १०० प्रमुख औद्योगिक शहरांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये राज्यातील चंद्रपूर, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, चेंबूर व इतर ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

२०१८ मध्ये दाखल केलेल्या एका याचिकेची सुनावणी करताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील औद्योगिक क्षेत्रांना त्यांच्या प्रदूषण करण्याच्या पातळीवर क्रमांकवारी जाहीर केली आहे. (कॉम्प्रेहेन्सिव एन्व्हायर्न्मेंट पॉल्युशन इंडेक्स) सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाच्या आधारित ही क्रमवारी ठरवण्यात आली असून तारापूरमधील प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९ इतका सर्वाधिक नोंदवण्यात आला आहे.

प्रदूषणकर्त्यां औद्योगिक क्षेत्रांसाठी कृती योजना तयार करण्यासोबत या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर रोख लावण्यासाठी हरित लवादाने संबंधित शासकीय विभागांना सक्त सूचना दिल्या आहेत. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करून त्यांच्यामार्फत झालेल्या पर्यावरणाच्या नुकसानीचा आर्थिक मोबदला अशा उद्योगांकडून वसूल करण्याच्या निर्देश देण्यात आले आहेत.

हरित लवादाने अनेक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना त्यांचे उत्पादन बंद करण्याचे वेळोवेळी आदेश दिले आहेत. सांडपाण्यावर असमाधानकारक प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच क्षेत्रातील उद्योगांवर बंदीची कारवाईही केली आहे. जलप्रदूषण करणाऱ्या सर्व उद्योगांची सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडणी असावी तसेच वायू, जल प्रदूषण नियंत्रण तसेच घातक घनकचरा संदर्भातील सर्व कायद्यांचे पालन काटेकोरपणे व्हावे असे १० जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिलेल्या हरित लवादाच्या निर्णयात म्हटले आहे.

हरित लवादाने केंद्रीय वन व पर्यावरण विभागाला या शंभर औद्योगिक क्षेत्रांमधील प्रदूषणाची स्थिती सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.

प्रदूषण निर्देशांक

केंद्रीय व राज्य स्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय परीक्षण समिती यांच्या माध्यमातून औद्योगिक परिसरांमध्ये असलेल्या प्रदूषणकारी घटकांचे गुणधर्म, प्रदूषणामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांची संख्या तसेच उच्च धोका घटकांचा समावेश यांच्या धर्तीवर प्रदूषण निर्देशांक ठरवण्यात येतो.

हा निर्देशांक ७० हून अधिक असल्यास त्या औद्योगिक क्षेत्राला ‘गंभीर प्रदूषित क्षेत्र’, ६० ते ७० निर्देशांक असलेल्या क्षेत्रांना ‘तीव्र प्रदूषित क्षेत्र’ असे संबोधले जाते. प्रदूषणकारी क्षेत्रांमध्ये गुजरात राज्यातील अंकलेश्वर १६व्या क्रमांकांवर, वापी १८ आणि सुरत २६ व्या क्रमांकावर आहे.

* तारापूरमधील प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९

* पहिल्या पाच औद्योगिक क्षेत्रांत दिल्ली येथील नाजाफसग्रह खोरे, मथुरा, कानपूर, वडोदरा शहरांचा समावेश

* ३८ औद्योगिक क्षेत्रांचा ‘गंभीर प्रदूषित क्षेत्रात’ समावेश. ३० औद्योगिक क्षेत्र हे तीव्र प्रदूषित क्षेत्र

* राज्यातील चंद्रपूर क्षेत्र २७ व्या क्रमांकावर आहे. औरंगाबाद (३९), डोंबिवली (४०), नाशिक (४१), नवी मुंबई (५१), चेंबूर औद्योगिक क्षेत्र (८०), पिंपरी-चिंचवड (८६), तर महाड ९२ क्रमांकावर आहे.

भारताची लांबपल्ल्याची धावपटू संजीवनीवर दोन वर्षांची बंदी

भारताची लांबपल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिच्यावर उत्तेजक द्रव्य सेवन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

नाशिक येथील २३ वर्षीय संजीवनीने २०१९ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक, तर २०१७च्या याच स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. संजीवनीने पहिल्यांदाच उत्तेजकविरोधी नियमांचा भंग केल्यामुळे आयएएएफच्या अ‍ॅथलेटिक्स एकात्मता विभागाने तिच्यावर दोन वर्षांची बंदी लादली आहे. त्याचबरोबर २९ जून २०१८पासून तिच्या बंदीचा कालावधी सुरू होणार असून त्यानंतर तिने केलेली कामगिरी, पदके, बक्षिसाची रक्कम रद्द ठरवण्यात येणार आहे.

‘‘उत्तेजकविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संजीवनीने आपली चूक मान्य केली आहे. शिस्तपालन लवादासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान आपल्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तिने केली होती. उत्तेजकविरोधी नियमानुसार संजीवनीची ही पहिली चूक असल्यामुळे तिला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली,’’ असे एकात्मता विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.

भारताच्या राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेला (नाडा) या निर्णयाविरोधात लुसाने येथील क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात संजीवनी जाधव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे तिच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१८मध्ये घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत तिच्या रक्ताच्या नमुन्यात तिने प्रोबेनेसिड हे प्रतिबंधित औषध घेतल्याचे समोर आले होते. तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईदरम्यानही तिला यावर्षी झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. या स्पर्धेत १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर नाडाची परवानगी मिळाल्यानंतर एप्रिल महिन्यात झालेल्या दोहा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत संजीवनीने ३२.४४.९६ सेकंद अशी वेळ देत कांस्यपदक पटकावले होते.

20 July Current Affairs
20 July Current Affairs

हॉल ऑफ फेम मध्ये सचिनचा समावेश

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (आयसीसी) 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासह दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू कॅथरिन फित्झपॅट्रिक्स यांनाही हा सन्मान मिळाला आहे. 

गुरुवारी रात्री रंगलेल्या सोहळ्यात तेंडुलकरला गौरविण्यात आले. या वेळी तेंडुलकर म्हणाला, 'आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये माझा समावेश करण्यात आला, हा मी माझा सन्मान समजतो. याद्वारे आयसीसी अनेक पिढ्यांपासून क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान करते. हे सर्वच क्रिकेटच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी आपले योगदान देत असतात. यात मीही योगदान देऊ शकलो, याचा आनंद आहे.' या वेळी सचिनने आपले कुटुंबीय आणि प्रशिक्षकांचेही आभार मानले. तो म्हणाला, 'या प्रसंगी माझ्या दीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या साऱ्यांचे मी आभार मानू इच्छितो. माझे पालक, भाऊ अजित आणि पत्नी अंजली, हे सर्व माझी ताकद आहेत. त्याचबरोबर रमाकांत आचरेकरसारखे गुरू मला लाभले, यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो.' ५२ वर्षीय डोनाल्डलाही क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने एक वेगळा दर्जा मिळवून दिला होता. दुसरीकडे, कॅथरिन ही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या महिला गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. निवृत्तीनंतर प्रशिक्षक असताना तिच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने तीन वेळा वर्ल्ड कप उंचावला आहे. हा सन्मान मिळवणारी कॅथरिन ही सहावी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 

दृष्टिक्षेप:-

- हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यासाठी खेळाडूने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना किमान पाच वर्षांआधी खेळलेला हवा. 

- सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर २०१३मध्ये निवृत्ती घेतली होती. 

- हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला सचिन हा भारताचा सहावा खेळाडू ठरला. 

- सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी, कपिलदेव, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना यापूर्वी हा सन्मान मिळाला आहे. 

सचिन तेंडुलकरची कामगिरी:-

२०० कसोटी १५९२१ धावा 

४६३ वन-डे १८४२६ धावा 

मी माझ्या सर्व कर्णधारांचा, सहकारी खेळाडूंचा, बीसीसीआयचा आणि एमसीए प्रशासकांचा आभारी आहे. या सर्वांनी मला पाठिंबा दिला. म्हणूनच मी या खेळाचा आनंद लुटू शकलो. 

- सचिन तेंडुलकर 

अॅलन डोनाल्डची कामगिरी:-

७२ कसोटी ३३० विकेट 

१६४ वन-डे २७२ विकेट 

माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे. आयसीसीचा मला मेल आला. त्याला माझ्या सन्मानाबद्दल वाचून मोठा धक्काच बसला. कारण, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. जो सहजासहजी मिळत नाही. आयसीसीचा मी आभारी आहे. 

- अॅलन डोनाल्ड 

कॅथरिनची कामगिरी:- 

१३ कसोटी ६० विकेट 

१०९ वन-डे १८० विकेट 

मागे पाहताना मला आता अनेक आठवणी आठवत आहेत. जसे की १९९७ आणि २००५चा वर्ल्ड कप विजयाचा क्षण. पण, १९९८मध्ये इंग्लंडचा दौरा अधिक संस्मरणीय ठरला. 

- कॅथरिन 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »