21 Sep Curren tAffairs

21 Sep Curren tAffairs
21 Sep Curren tAffairs

पद्मश्री मधुकर ढवळीकर शिष्यवृत्ती योजना जाहीर

 • पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांनी भारतीय संग्रहालय क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीस अभिवादन म्हणून ‘पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव पुरस्कार’ आणि ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबर ऐतिहासिक पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननांचे मूल्यमापन या क्षेत्रात पद्मश्री मधुकर केशव ढवळीकर यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ‘पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृत्ती योजना’ जाहीर करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली. 
 • सन २०२० पासून एक वर्ष ज्येष्ठ संशोधकास ¨पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव पुरस्कार तर पुढील वर्षी पुरातत्व, संग्रहालय शास्त्र, संवर्धन, मुर्तिविज्ञान आदी विषयांमध्ये डॉक्टरेट करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांस ¨पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृत्ती याक्रमाने ही योजना राबविण्यात येईल. 
 • भारतीय संग्रहालय आणि ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करणारे अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक व गुणवंत विद्यार्थ्यांना या पुरस्कार व शिष्यवृत्तीच्या निमित्ताने अधिक प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा श्री. तावडे यांनी यावेळी व्यक्त केली.
 • सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीच्या शिफारसीनुसार संग्रहालय शास्त्र, पुरातत्व, वारसा संवर्धन, प्राचीन स्थापत्य व भारतीय मूर्तिविज्ञान शास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जेष्ठ संशोधकास ¨पद्मश्री सदाशिव गोरक्षकर पुरस्कार प्रदान केला जाईल.
 • या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम रु. ५ लाख असे आहे. तर संग्रहालय शास्त्र, पुरातत्व, वारसा संवर्धन, प्राचीन स्थापत्य व भारतीय मूर्तिविज्ञान शास्त्र या क्षेत्रात डॉक्टरेट सारखा प्रगत अभ्यासक्रम/संशोधन करणाऱ्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांना 'पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृत्ती' दिली जाईल, सदर शिष्यवृत्तीची रक्कम प्रत्येकी रुपये २.५० लक्ष इतकी असेल. 
   

ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना पं भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार

 • महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने सन २०१९ साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केली.
 • १९ ऑक्टोबर १९२७ रोजी जन्मलेल्या अरविंद पारिख यांनी वयाच्या १७ व्या वर्षी उस्ताद विलायत खान यांच्याकडे सतारीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर पुढची साठ वर्षे, उस्तादजींच्या अखेरपर्यंत त्यांचे हे शिक्षण अव्याहतपणे सुरु होते. या काळात त्यांनी इतर अनेक महान गायक-वादकांच्या शैलीचाही जवळून अभ्यास केला. 
 • त्यातील अनेक बारकावे त्यांच्या वादनात दिसून आले. पं. पारिख आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून त्यांनी देश-विदेशात सतार वादनाचे असंख्य कार्यक्रम केले. सितार गुरु व बंदिश परंपरा या ग्रंथांमध्ये बांधलेल्या त्यांनी बंदिशींचा समावेश करण्यात आला आहे. 
 • युनेस्कोच्या संगीतविषयक समितीच्या उपाध्यक्षपदी त्यांनी तीन वर्षै काम पाहिले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभले असून जगभरात त्यांचे शिष्य त्यांचे संगीत प्रसाराचे कार्य पुढे नेत आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अरविंद पारिख यांचे पुरस्काराबददल अभिनंदन केले आहे.
 • शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला सन २०१२-१३ पासून भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. श्रीमती किशोरी आमोणकर, पं. जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं. राम नारायण, श्रीमती परविन सुलताना, श्रीमती माणिक भिडे, पं केशव गिंडे, यांसारख्या अनेक मान्यवरांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
   
21 Sep Curren tAffairs
21 Sep Curren tAffairs

इंडोनेशिया लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यास शिक्षा नाही

 • समलैंगिक सेक्स आणि लग्नाअगोदर लैंगिक संबंध ठेवल्यास कायद्याचे उल्लंघन ठरणार नाही. या दोन्ही होऊ घातलेल्या कायद्याला जनतेतून विरोध झाल्याने इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी या कायद्याला मंजुरी न देण्याचा निर्णय घेतला आहे. 
 • या विधेयकाची समीक्षा करण्याची गरज असल्याचे मत नोंदवून विडोडो यांनी हे विधेयक मंजूर केले नाही.
 • जगातील सर्वाधिक मुस्लिम असलेल्या लाखो लोकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. समलैंगिक जोडपे किंवा लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यास केल्यास शिक्षा म्हणून जेलची हवा खाण्याची तरतूद या कायद्यात आहे. 
 • विविध समूहांकडून विरोध दर्शवण्यात आल्याने या विधेयकावर पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विडोडो यांनी दिली. कायदामंत्री यांना यासंबंधी सांगण्यात आले आहे. माझे मत मी कळवले असून या अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्यात येऊ नये, असे मी त्यांना सूचवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
 • इंडोनेशियात या विषयावर नवीन कायदा आणण्यासाठी दशकापासून चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी २०१८ मध्ये खूप प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, त्यावेळीही या विधेयकाला मंजुरी मिळाली नव्हती.

इंडोनेशिया:-

 • इंडोनेशिया हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे. संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे..
 • हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्याखाली होता. मात्र दुसर्‍या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.
 • जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे. हिच्याखेरीज बासा जावा, बासा बाली, बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावी भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.
 • इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वांत मोठी जैविक विविधता आहे. [तुम्हाला आठवतीये का ती न्यूज जी आपण मागच्या आठवड्यात कव्हर केली होती इंडोनेशियाच्या पर्जन्यवनात लागलेली आग नक्की वाचा] 
 • आसियान व जी-२० ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा सदस्य देश आहे.
   

ई पेमेंट फेल रिफंड येईपर्यंत बँक भरणार दंड

 • जर तुमचं ऑनलाइन ट्रान्झॅक्शन काही कारणास्तव अयशस्वी झाले आणि एक दिवसाच्या आत ते पैसै तुम्हाला परत मिळाले नाहीत तर दरदिवशी १०० रुपये मिळणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.
 • ज्या ग्राहकांना फेल झालेल्या डिजीटल व्यवहाराचे पैसै एक दिवसाच्या आत मिळणार नाही त्यांना यापुढे बँक आणि डिजीटल वॉलेट्स दंडापोटी दररोज १०० रुपये देणार आहेत. UPI, IMPS, NACH द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू आहे.
 • डिजीटल व्यवहारांव्यतिरिक्त RBI ने नॉन-डिजीटल ट्रान्झॅक्शन्ससाठीही वेळेची मर्यादा आखून दिली आहे. एटीएम आणि मायक्रो एटीएममध्ये अयशस्वी झालेल्या व्यवहारांसाठी खात्यात पैसै येण्यास पाच दिवसांपर्यंतची मर्यादा आखण्यात आली आहे. 
 • त्यानंतर दररोज १०० रुपये दंड बँकांना द्यावा लागेल. ही दंडाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात त्वरीत पोहोचायला हवी, ग्राहकांनी तक्रार करण्याची वाट बँकांना पाहू नये, असंही RBI ने परिपत्रकात नमूद केलं आहे.
   
21 Sep Curren tAffairs
21 Sep Curren tAffairs

हॉटेल उद्योगाला जीएसटीतून दिलासा केंद्राचा निर्णय

 • गोव्यात पार पडलेल्या ३७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आज काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. जीएसटी परिषदेने निर्यात आणि हॉटेल उद्योगांना जीएसटीमधून सूट दिली आहे. हॉटेलच्या भाड्यातील जीएसटीचे दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने पर्यटकांना आता अल्प भाड्यात हॉटेलचे रुम बुक करता येणार आहेत.
 • एक हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंतच्या भाडं असलेल्या हॉटेलच्या रुमना १२ टक्के जीएसटी लागणार आहे. त्याशिवाय हॉटेलच्या रुमचं भाडं ७५०० रुपयांपेक्षा अधिक असल्यास १८ टक्के जीएसटी लागणार आहे. त्याशिवाय एक हजारापेक्षा कमी भाडं असलेल्या हॉटेलातील रुमला आता जीएसटी लागणार नाही.
 • या बैठकीत अन्य काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गॅस असलेल्या पदार्थांवर १८ टक्केऐवजी आता २८ टक्के कर लागेल. त्याशिवाय त्यावर १२ टक्के कंपेन्सेटरी सेसही लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही संरक्षण साहित्यांना जीएसटी आणि आयजीएसटीतून सूट देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
 • त्याशिवाय १३ सीट असेलेल्या १२०० सीसी पेट्रोल वाहनांवर आणि १५०० सीसी इंजिनवाल्या डिझेल वाहनांवरील सेसचे दर कमी करून १२ टक्के करण्याची सूचना करण्यात आली आहे. सागरी नौका, इंधन, ग्राइंडर, चिंच, हिरे, रुबी, पन्ना आणि नीलम आदी जवाहिरे सोडून अन्य स्वस्त रत्नांवरील टॅक्स कमी करण्यात आला आहे.
 • ज्वेलरी निर्यातीवर जीएसटी द्यावा लागणार नाही.
 • रेल्वे वॅगन, कोचवर जीएसटी रेट ५ टक्क्यावरून १२ टक्के करण्यात आला आहे.
   

अमित पंघलने घडवला इतिहास

 • भारताच्या अमित पंघल याने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा तो भारताचा पहिला बॉक्सर ठरला आहे.
 • पुरुषांच्या ५२ किलो गटाच्या उपांत्य फेरीत अमितने शुक्रवारी कझाकिस्तानच्या साकेन बिबोसिनोव्हवर ३-२ अशी मात केली आणि अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्यपदक निश्चित केले. अमितने सावध सुरुवात केली; पण नंतर त्याने साकेन बिबोसिनोव्हचा अंदाज घेत जोखीम पत्करायला सुरुवात केली. त्याने ठोश्यांचा वेग वाढवत, लागोपाठ ठोसे लगावले. 
 • या आक्रमणामुळे भांबावून गेलेल्या साकेनला या दरम्यान पुरेसा प्रतिकारही करता आला नाही. अमितने आत्मविश्वासाने खेळ करणे पुढील फेरीतही सुरू ठेवले. 
 • प्रतिस्पर्धी साकेनचा खेळ बघण्यापेक्षा आपल्या खेळातील चमक कमी होणार नाही, याची खबरदारी अमितने पावलोपावली घेतली. साकेनने लढतीतील दुसऱ्या फेरीत खेळ उंचावत गुणांची कमाई केली, ज्यामुळे त्याला गुण मिळाले; पण अमितने याचा बागुलबुवा करून हकनाक दडपण ओढावून घेतले नाही. 
 • लढत बघताना अमितचे वर्चस्व दिसले असले, तरी अखेरच्या गुणांवरून लढत आव्हानात्मक झाल्याचे दिसले. खासकरून लढतीतील दोन परीक्षकांनी साकेनच्या बाजूने निकाल दिला होता.

मनीष कौशिकला ब्राँझ:-

 • अमितप्रमाणे सरस खेळ करणे मनीष कौशिकला (६३ किलो) जमले नाही. क्युबाच्या अँडी क्रूझने एकतर्फी झालेल्या उपांत्य फेरीत मनीषचा ५-० असा पराभव केला. या क्रूझने सुरुवातच दणक्यात केली अन् पुढे लढतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत मनीषला डोकेही वर काढता आले नाही. क्युबाच्या क्रूझला आता जगज्जेतेपद राखण्याची संधी आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या मनीषची ही पहिलीच जागतिक स्पर्धा होती.
 • माझ्यासाठी ही लढत चांगली राहिली. अर्थात, अपेक्षेपेक्षा मला जास्त मेहनत घ्यावी लागली. भारतीय बॉक्सिंगसाठी ही ऐतिहासिक कामगिरी आहे. यासाठी मला पाठिंबा देणाऱ्या साऱ्यांचा मी आभारी आहे. आता माझे लक्ष्य सुवर्णपदकावर असणार आहे. - अमित पंघल

दृष्टिक्षेप:-

 • शनिवारी रंगणाऱ्या फायनलमध्ये अमितचा मुकाबला होईल तो ऑलिम्पिकविजेत्या उझ्बेकिस्तानच्या शाखोबिदिन झोयरोव्हशी.
 • जागतिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत चार ब्राँझपदके पटकावली आहेत.
 • यात विजेंदरसिंग (२००९), विकास कृष्णन (२०११), शिवा थापा (२०१५) आणि गौरव बिधुरी (२०१७) यांचा समावेश आहे.
 • मात्र, अमित पंघलने फायनलमध्ये प्रवेश केल्याने आता त्याला रौप्य किंवा सुवर्ण कोणतेही पदक मिळाले तरी ते भारतासाठी ऐतिहासिकच ठरेल.
   
21 Sep Curren tAffairs
21 Sep Curren tAffairs

सुशीलकुमारचा पहिल्याच फेरीत पराभव

 • दोन वेळा ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या भारताच्या सुशीलकुमारने आठ वर्षांनंतर जागतिक कुस्ती स्पर्धेत पुनरागमन केले होते. मात्र, या स्पर्धेतील पहिल्याच फेरीत अवघ्या सहा मिनिटांत त्याला अझरबैजानच्या खादझ्हिमुराद गादझ्हियेवकडून पराभव पत्करावा लागला.
 • पुरुषांच्या ७४ किलो गटातील पात्रतेच्या पहिल्या फेरीत सुशीलकुमारने सुरुवातीला ९-४ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, यानंतर त्याने सलग सात गुण गमावले. त्यामुळे सुशीलकुमारला ९-११ असा पराभव स्वीकारावा लागला. पुढे खादझ्हिमुरादलाही उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागल्याने सुशीलकुमारला रिपिचेजमध्ये खेळण्याची संधीही मिळाली नाही.
 • सुशीलकुमार म्हणाला, 'खरे तर मॅटवर सारे काही सुरळीत सुरू होते. मी वेगवान खेळ केला. मात्र, तग धरण्याची क्षमता कमी पडली. त्याचबरोबर मला बचावावरही अधिक भर द्यावा लागणार आहे. मात्र, या पुनरागमनाने मी आनंदित आहे. एशियाड स्पर्धेपेक्षा मी चांगला खेळ केला. आगामी दिवसांत तुम्हाला माझ्याकडून अधिक चांगली कामगिरी बघायला मिळेल. आता कुठल्या स्पर्धेत मी सहभागी व्हायचे, त्याचा आराखडा माझे प्रशिक्षक आखतील. आता आशियाई स्पर्धेद्वारे ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न असेल.' सुमीत मलिक यालाही १२५ किलो गटात हंगेरीच्या डॅनिएल लिगेटीकडून ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला.

दृष्टिक्षेप:-

 • ३६ वर्षीय सुशीलकुमारने ऑलिंपिकमध्ये दोन वेळा पदक जिंकले आहे.
 • २०१०च्या मॉस्को वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले होते.
 • गेल्या वर्षीच्या एशियन गेम्समध्येही त्याला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता.
 • बेलारूसमधील मिन्स्क येथे झालेल्या स्पर्धेद्वारे त्याने पुनरागमन केले होते. त्या स्पर्धेत तो पाचव्या स्थानी राहिला होता.

  

QUESTION OF THE DAY

प्रश्न. खाली दिलेल्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा.
अ. ते पद्मश्री पुरस्कारविजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते.
ब. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी पाठवले होते.
क. इनामगावाचे उत्खनन प्रकल्प हे त्यांचे नावाजलेले प्रमुख कार्य होय.
ड. कोण होते सिंधू लोक?, आर्याच्या शोधात ही त्यांची काही नावाजलेली पुस्तके.

पर्याय:-

१. विनीत बाजपेयी 
२. ज्ञानेश्वर कुलकर्णी 
३. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे
४. वरीलपैकी एकही नाही 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »