22 August Current Affairs

22 August Current Affairs
22 August Current Affairs

लष्कराच्या मुख्यालयाची पुनर्रचना

 • अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या लष्करातील सुधारणांच्या पहिल्या टप्प्याला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी मंजुरी दिली. यामध्ये लष्कराच्या मुख्यालयाच्या पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामध्ये मुख्यालयातील २०६ वरिष्ठ अधिकाऱ्यांची अन्यत्र नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, स्वतंत्र दक्षता विभाग स्थापन करतानाच मानवाधिकारांसारख्या मुद्द्यांचा विचार करण्यासाठी एकात्मिक विभाग स्थापन करण्यात येणार आहे. 
 • लष्कराच्या सुधारणांविषयी अनेक वर्षांपासून विचार करण्यात येत होती. याच अनुषंगाने गेल्या वर्षी १२ विविध अभ्यासांच्या आधारावर सुधारणांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यातून लष्कराची लढाऊ क्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच मुख्यालयाच्या पुनर्रचनेच्या आधारावर काही निर्णयांना संरक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिली, असे संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये मुख्यालयातील २०६ अधिकाऱ्यांची अन्यत्र नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी आता वेगवेगळ्या भाग किंवा विशेष विभागांमध्ये नियुक्त करता येणार आहेत. यामध्ये ३ मेजर जनरल, ८ ब्रिगेडियर, ९ कर्नल आणि १८६ लेफ्टनंट कर्नल किंवा मेजर यांचा समावेश आहे. 
 • याशिवाय, लष्कर उपप्रमुखांच्या अखत्यारिमध्ये मानवाधिकाराच्या विषयांवर संस्था स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये मानवाधिकाराच्या परिषदा व मूल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या विभागाचा प्रमुख हा मेजर जनरल स्तरावरील अतिरिक्त महासंचालक असेल. ही संस्था मानवाधिकाराच्या भंगांच्या सर्व तक्रारींचा विचार करेल. याशिवाय, अशा प्रकरणांच्या तपासामध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी पोलिस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. 

दक्षता विभागाची स्थापना:-

 • लष्करप्रमुखांच्या अखत्यारित तिन्ही संरक्षण दलांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या स्वतंत्र दक्षता विभागाची स्थापना करण्यासही राजनाथसिंह यांनी मंजुरी दिली. सध्या विविध संस्थांच्या माध्यमातून दक्षता विषयक काम करण्यात येते. मात्र, त्यांच्यामध्ये एकसंवादाचा अभाव दिसून येत होता.
 • हा विभाग लष्करप्रमुखांच्या अखत्यारित असून, अतिरिक्त महासंचालक (दक्षता) त्यांच्या अखत्यारित कार्यरत असतील. या विभागात कर्नल स्तरावरील लष्कर, हवाई दल आणि नौदलातील तीन अधिकारी त्यात असतील,' असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. 

विश्वासघाताची ५९ वर्षे

 • गिलगीट-बाल्टीस्तानबाबतचा 'कराची करार' ठेवला गुप्त
 • गुप्त कराराने पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नागरिकांना सहा दशकांपासून फसवल्याचे उघड झाले आहे. गिलगीट-बाल्टीस्तानसह 'पीओके'चे या परिसराचे भवितव्य ठरवणाऱ्या या कराराबाबत कोणालाही माहिती नाही. केवळ इतकेच नव्हे, तर त्यावरील सह्याही बनावट असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
 • गिलगीट-बाल्टीस्तानसह पाकव्याप्त काश्मीरच्या भूभागाचे प्रशासन आणि राजकीय सीमांबाबत स्थानिकांना ५९ वर्षे अंधारात ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने आमचा विश्वासघात करून सक्तीने ताबा घेतला आहे. याबाबत करण्यात आलेला 'कराची करार'ही गुप्त ठेवण्यात आला होता, असे युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे (यूकेपीएनपी) महत्त्वाचे नेते आणि प्रमुख प्रवक्ते नसीर अझिज यांनी स्पष्ट केले आहे. नसीर यांनी सध्या स्वित्झर्लंडमधील बर्नमध्ये आश्रय घेतलेला आहे. 'यूकेपीएनपी' हा गिलगीट बाल्टीस्तानमधील महत्त्वाचा पक्ष आहे.
 • काय आहे कराची करार?
 • पाकव्याप्त काश्मीरचे माजी अध्यक्ष सरदार इब्राहिम खान, जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्सचे प्रमुख चौधरी गुलाम अब्बास आणि पाकिस्तान सरकारचे प्रतिनिधी मुश्ताक गुरमानी या तिघांच्या स्वाक्षऱ्या केलेला करार 'कराची करार' म्हणून ओळखला जातो. तीन पक्षकारांनी १९४९मध्ये तो केला. त्या कराराच्या आधारे कपटनीतीचा वापर करून गिलगीट बाल्टीस्तानही पाकिस्तानने जोडून घेतले. करारावरील सह्यांबाबतही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

आयएसआयचा ससेमिरा:-

 • पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या 'आयएसआय'ने प्रभावशाली असलेल्या 'यूकेपीएनपी'च्या अनेक नेत्यांना पाकव्याप्त काश्मीरमधून हाकलले आहे. त्यासाठी त्यांच्यामागे ससेमिरा लावण्यात आला. त्यामुळे नसिर अझिझ यांच्याबरोबरच पक्षाचे अध्यक्ष शौकत काश्मिरी बर्नमध्येच राहतात.
 • दहशतवाद प्रतिबंधक कायद्याच्या चौथ्या कलमाचा आधार घेऊन नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. हा भाग जोडताना दिलेल्या आश्वासनांना पाकिस्तानने हरताळ फासला आहे.
 • उपखंडातील ताज्या घडामोडीनंतर पाकिस्तानी फौज, वायव्य सरहद्द प्रांताच्या पश्चिम सीमांवरून पूर्व सीमांकडे हलवण्यात आल्या आहेत. आता या भूभागावर पुन्हा युद्धाचे ढग दाटण्याची भीती स्थानिकांना वाटत आहे. आयएसआय पुन्हा स्थानिकांवर दडपशाही करण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

बाल्टिस्तानची स्थिती दयनीय:-

 • पाकिस्तान सरकारने गिलगीट बाल्टिस्तानच्या संपन्न खनिजांवर डल्ला मारत केवळ शोषण सुरू ठेवले आहे. स्थानिक नागरिकांची स्थिती मात्र अत्यंत दयनीय असल्याचे नसीर यांनी म्हटले आहे. सोन्याच्या खाणीसह अन्य नैसर्गिक साधनसंपत्तीची चीनच्या कंपन्याही लूट करीत आहेत. त्या विरोधात आवाज उठवणाऱ्या यासाठी स्थानिकांचा छळ आणि अपहरणाच्या अनेक घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक पक्षांनी केला आहे.
 • पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आधार असलेल्या कराची करारावर सही केली नसल्याचे सरदार इब्राहिम यांनी सांगितल्याचे नसिर यांनी म्हटले आहे. त्यांच्याऐवजी पंजाब प्रांताचा माजी गव्हर्नर सलमान तसीर यांचे वडील महम्मद्दीन तासिर यांनी सही केल्याची माहितीही काही नेते देतात.
 • अनेक दशके कराची करार कुणालाही माहीत नव्हता. पाकिस्तानने विश्वासघाताने आमचा भाग बळकावला असल्याचे स्थानिक नागरिकांना समजण्यासाठीही ५९ वर्षे लागली. नव्याने प्रकाशात आलेल्या कागदपत्रांतून हा करार २८ एप्रिल १९४९ रोजी झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यासाठी बनावट सही झाली आहे. हा करार १९९०पर्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. तोपर्यंत तो कोणत्याही माध्यमात प्रसिद्ध झाला नव्हता. उच्च न्यायालयात गिलगीट-बाल्टिस्तानच्या खटल्यावेळी तो प्रथम उजेडात आला.
   
22 August Current Affairs
22 August Current Affairs

आंबेडकर हाऊस साठी भारताचे प्रयत्न

 • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थीदशेत वास्तव्य असलेले लंडनमधील 'आंबेडकर हाऊस' हे स्मारक बंद करण्याच्या इंग्लंडमधील स्थानिक पालिकेच्या निर्णयाविरोधात अर्ज करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र नियोजन समितीसमोर अर्ज करण्यासाठी भारताच्या उच्चायुक्तांनी 'सिंघानिया अँड कंपनी सॉलिसिटर' यांना नियुक्त केले आहे. 'या प्रकरणी अर्ज करण्यास पुरेसा आधार आहे,' असे या फर्मचे वकील रवींद्र कुमार यांनी म्हटले असून पुढील सुनावणी २४ सप्टेंबरला आहे.
 • डॉ. आंबेडकर हे १९२१-२२मध्ये 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये उच्च शिक्षण घेत असताना या इमारतीत राहत होते. भारताच्या उच्चायुक्तांनी २०१५मध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने ३.१ दशलक्ष पौंडांचा व्यवहार करून ही मालमत्ता ताब्यात घेतली होती. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इंग्लंड दौऱ्यात या स्मारकाचे उद्घाटन केले होते.
 • लंडनच्या उत्तर भागात १०, किंग हेन्री रोड येथील या चारमजली निवासी इमारतीचे अधिकृत स्मारकात रूपांतर करावे, यासाठी भारताने केलेला अर्ज केमडन नगराच्या पालिकेने नुकताच फेटाळला होता. 'या चारमजली इमारतीचा वास्तुसंग्रहालय म्हणून वापर करण्याची परवानगी नाही. तेवढी निवासी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकत नाही,' असे या पालिकेने आपल्या अहवालात म्हटले होते.

तर सहमतीनं शारीरिक संबंध हा बलात्कार नव्हे सुप्रीम कोर्ट

 • परस्पर सहमतीनं शारीरिक संबंधांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. लग्नात असंख्य अडचणी येणार आहेत, किंवा काही कारणांमुळं लग्न होऊ शकत नाही हे महिलेला माहीत असूनही दोघांनीही परस्पर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कार म्हणू शकत नाही. अशा परिस्थितीत शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं.
 • न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी विक्रीकर विभागात सहायक आयुक्त पदावर असलेल्या महिलेची याचिका फेटाळून लावली. संबंधित महिलेनं सीआरपीएफ अधिकाऱ्यावर केलेले बलात्काराचे आरोपही फेटाळून लावले. 'दोघांचेही आठ वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध होते. या काळात दोघांमध्येही परस्पर संमतीनं नातं निर्माण झालं,' असं कोर्टानं निकाल देताना म्हटलं. 
 • तक्रारदार महिला सीआरपीएफ अधिकाऱ्याला १९९८पासून ओळखत होती. त्याने २००८मध्ये लग्नाचं आश्वासन देत बळजबरीनं संबंध प्रस्थापित केले असा आरोप या महिलेनं केला आहे. २०१६ पर्यंत दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात दोघेही एकमेकांच्या घरीही थांबत असत. '२०१४मध्ये अधिकाऱ्यानं जातीचं कारण देत लग्नास नकार दिला. त्यानंतरही २०१६पर्यंत दोघांमध्ये शारीरिक संबंध होते,' असं तक्रारदार महिलेनं सांगितलं. त्यावर सुप्रीम कोर्टानं निकाल देताना सांगितलं की, '२००८मध्ये दिलेलं लग्नाचं वचन २०१६मध्ये पूर्ण करू शकला नाही. या एका आधारावर लग्नाचं आश्वासन केवळ शारीरिक संबंधांसाठी दिलं होते असं म्हणता येणार नाही. लग्नात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात हे महिलेला माहीत होतं.'
22 August Current Affairs
22 August Current Affairs

अजित डोवल यांनी घेतली रशियाच्या NSCची भेट

 • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवल यांनी आज रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव (NSCs) निकोलाई पेत्रुशेव यांची भेट घेतली. निकोलाई पेत्रुशेवर यांनी डोवल यांना भेटीचे निमंत्रण दिले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोवल यांनी भेट घेतली असून मोदींच्या दौऱ्याविषयी चर्चा केली आहे. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात ४ ते ६ सप्टेंबरला रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. रशियातील आयोजित ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे अजित डोवल यांच्या आजच्या या भेटीला महत्त आहे. अजित डोवल आणि निकोलाई पेत्रुशेव यांच्यात आंतरराष्ट्रीय प्रश्वावर चर्चा झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे. दहशतवादाविरोधात दोन्ही देशांनी सहकार्य करण्यासंबंधीही चर्चा झाली आहे. काश्मीर प्रश्नावर रशियाचा भारताला पाठिंबा आहे. अजित डोवल यांनी अंतराळ क्षेत्र आणि गगनयान कार्यक्रमात सुरू असलेल्या सहकार्याची समिक्षा करण्यासाठी ROSCOSMOS चे संचालक दिमित्री रोगोजिन यांचीही भेट घेतली. रोगोजिन यांनी चंद्रयान कार्यक्रमाच्या प्रगतीबद्दल भारताचे कौतुक केले. तसेच भारताच्या चंद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. 
   

काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

 • भारताने काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू असला तरी, हा प्रश्न दोन्ही देशांनी आपापसात चर्चेने सोडवावा, असेच मत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त होत आहे. 
 • ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात स्पष्ट केले आहे. फ्रान्समध्ये होऊ घातलेल्या जी ७ गटांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. उभय नेत्यांनी काश्मीरमधील सद्यस्थितीवरही चर्चा केली. 
 • ब्रिटनसह फ्रान्सनेही काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यानचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांनी आक्रमकता टाळून राजकीय संवादामधून हा प्रश्न सोडवावा, असे फ्रान्सकडून स्पष्ट करण्यात आले. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन व्येस ली द्रिअॅन यांच्याशी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी काश्मीरबाबत मंगळवारी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी फ्रान्सची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही देशांनी हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, अशी फ्रान्सची नेहमीच भूमिका राहिल्याचे ते म्हणाले. 
 • बांगलादेशनेही या तणावाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली असून काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे. प्रादेशिक शांतता कायम ठेवणे आणि स्थैर्य राखणे, यालाच सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे, असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच बांगलादेशला भेट दिली त्यावेळी झालेल्या चर्चेत ही भूमिका स्पष्ट करण्यात आली..
22 August Current Affairs
22 August Current Affairs

हिरे कारागिरांनी गमावले रोजगार

 • अमेरिका व चीनमधील व्यापारसंघर्षाची भारतीय हिरे व्यापारक्षेत्रास मोठी झळ बसली आहे. चीन आणि पश्चिम आशियाई देशांमधील हिऱ्यांची मागणी घटल्याने गुजरातमधील हिरे व्यवसायातील १० ते १५ टक्के कारागिरांना रोजगार गमवावे लागले आहेत. 
 • हिऱ्यांना पैलू पाडणे व त्यांना पॉलिश करण्याच्या व्यवसायात गुजरात आघाडीवर आहे. अमेरिका-चीन व्यापारसंघर्षामुळे सूरत, अमरेली, भावनगर येथील हा व्यवसाय थंडावला आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत या व्यवसायातील १० ते १५ टक्के कारागिरांनी रोजगार गमावले आहेत. अमेरिका व युरोपमधील हिरेमागणी स्थिर आहे. परंतु आखाती देशांतील बाजारांनी हात आखडता घेतला आहे.
 • तसेच, मोठी बाजारपेठ असणाऱ्या चीनच्या मागणीत १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे, अशी माहिती जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट कौन्सिलचे उपाध्यक्ष कॉलिन शहा यांनी दिली. गेल्या चार महिन्यांत पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या किमती सहा ते दहा टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.
   

निर्देशांकांची पडझड कायम

 • अर्थव्यवस्थेतील मरगळीमुळे गुंतवणूकदारांचे खच्चीकरण झाल्याचे दिसत आहे. मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात याचे पडसाद उमटत असून सेन्सेक्स व निफ्टीमध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली. 
 • २६७ अंकांनी कोसळलेला सेन्सेक्स दिवसअखेरीस ३७०६०वर स्थिरावला. तर, निफ्टीने ११ हजारांचा आधारस्तर सोडल्याचे दिसून आले. ९८ अंकांच्या घसरणीसह निफ्टीने १०९१८चा तळ गाठला. 
 • टाटा मोटर्सच्या समभागांना बुधवारी सर्वाधिक फटका बसला. 
 • या कंपनीचे समभाग तब्बल ९.२९ टक्क्यांनी घसरले. काही महिन्यांपासून सतत मार खात असलेला येस बँकेचा समभागही ८.२१ टक्क्यांनी गडगडला. टाटा स्टील, ओएनजीसी, इंडसइंड बँक, स्टेट बँक, एल अँड टी, आयटीसी, वेदांता, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आदींचे समभाग ४.२६ टक्क्यांपर्यंत घसरले. 
 • हीरो मोटोकॉर्प, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचयूएल, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँकेचे समभाग मात्र १.७८ टक्क्यांपर्यंत वधारले.
   
22 August Current Affairs
22 August Current Affairs

राज्य सहकारी आता कागदोपत्रीही शिखर बँक

 • दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आता कागदोपत्रीही शिखर बँक म्हणून ओळखली जाणार आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा नामविस्तार करण्यात आला. या बँकेने सभासदांना १० टक्के लाभांश घोषित केला आहे. बँकेची एकशे आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. २०१८-१९ या आर्थिक वर्षात बँकेने लेखा परिक्षणात अ वर्ग प्राप्त केला असून बँकेने प्रथमच ३५,४४० कोटी रुपयांची उच्चांकी उलाढाल केली आहे, अशी माहिती प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. 
 • बँकेचा स्वनिधी ४,०३१ कोटी रुपयांवर पोहोचला असून अहवाल वर्षात बँकेला २५१ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. राज्य सहकारी बँकेकडे राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे पालकत्व असल्याने उपविधीमध्ये बदल सुचवून बँकेचे नाव `दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह अॅपेक्स बँक लि. म्हणजेच, दि महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँक लि. करण्याच्या प्रस्तावास सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. 
 • या सभेला समिती सदस्य अविनाश महागांवकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, वैधानिक लेखापरिक्षक डी. ए. चौगुले अॅण्ड असोसिएट्स, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
   

बुलडाण्याच्या मोनालीचा चीनमध्ये सुवर्णवेध

 • राज्य स्तरावर बॉल बॅडमिंटन, क्रिकेट, खो खो आणि अॅथलेटिक्ससारख्या खेळांसाठी प्रसिद्ध असेलल्या बुलडाणा जिल्ह्याचे नाव आता आंतरराष्ट्रीय क्रीडा पटलावरही कोरले गेले आहे. बुलडाणा पोलिस दलात कार्यरत असलेल्या मोनाली जाधवने चीनमधील चेंगडू शहरात झालेल्या जागतिक ‘पोलिस आणि फायर गेम्स’ स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 
 • मोनालीने तिरंदाजी स्पर्धेतील ‘टार्गेट आर्चरी’ प्रकारात ७२० पैकी ७१६ गुण मिळवित दोन सुवर्ण पदके तर ‘थ्रीडी आर्चरी’ प्रकारात एक कांस्य पदक मिळविले. 
 • ऑलिम्पिक स्पर्धांच्या अर्धसैनिक दलांमधील खेळाडूंसाठी जागतिक स्तरावर दरवर्षी ही स्पर्धा आयोजित जाते. चेंगडू येथे झालेल्या या स्पर्धेत ७० देशांमधील अग्नीशमन, सीमा सुरक्षा, पोलिस, गुप्तवार्ता अशा विविध विभागातील दहा हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. 
 • मोनाली सध्या बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना मोनालीने नववे स्थान मिळविले होते. मोनाली बुलडाण्यातील मोनाली आनंद नगर येथील रहिवासी आहे. 
 • ती बुलडाण्यातील जिजामाता क्रीडा संकुलात चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मोनालीच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तिचे अभिनंदन केले आहे . 
   

नोकरीनंतर खेळाला सुरुवात:-

 • मोनाली बाराव्या वर्गात असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे मोनालीची आई व मोठ्या भावाने मजुरी करुन प्रपंच चालवण्यास सुरुवात केली. कुटुंबाला हातभार लावावा यासाठी मोनालीचीही धडपड सुरू होती. 
 • याच काळात महाराष्ट्र पोलिस दलाची भरती प्रक्रिया सुरू झाली. लहानपणापासून खेळाची आवड असल्याने मोनालीला पोलिस दलात भरती होण्यात कुठलीही अडचण आली नाही. पोलिस दलात तिची ओळख लष्करातून पोलिस दलात रुजू झालेल्या चंद्रकांत इलग यांनी तिला तिरंदाजीबद्दल मार्गदर्शन केले. मोनालीलाही तिरंदाजीची आवड निर्माण झाली. इलग यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तिरंदाजीचा सराव सुरू केला आणि त्यात नैपुण्यही प्राप्त केले. 
   
22 August Current Affairs
22 August Current Affairs

सिंधूची तिसऱ्या फेरीत धडक

 • भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीतून तिसरी फेरी गाठली. पाचव्या मानांकित सिंधूने चायनीज तैपईच्या पाइ यू पो हिच्यावर २१-१४, २१-१५ अशी मात केली. 
 • जागतिक क्रमवारीत २४ वर्षीय सिंधू पाचव्या, तर पाइ ४५व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, या दोघी दोनदा आमनेसामने आल्या होत्या. त्यात सिंधूनेच बाजी मारली होती. या वेळीही गतउपविजेत्या सिंधूचेच पारडे जड होते. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला दोघींत चुरस पाहायला मिळाली. ५-५ बरोबरी असताना सिंधूने सलग चार पॉइंट घेत आघाडी मिळविली.
 • त्यानंतर पाइने झुंज दिली. मात्र, सिंधूने आघाडी कायम राखत पहिल्या गेममध्ये बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीला ६-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर पाइने कडवी झुंज दिली. ब्रेक झाला तेव्हा पाइकडे ११-१० अशी निसटती आघाडी होती. ब्रेकनंतर सिंधूने सलग तीन पॉइंट घेत आघाडी मिळविली. त्यानंतर अखेरपर्यंत आघाडी कायम राखत सिंधूने विजयावर शिक्कामोर्तब केले. ही लढत ४३ मिनिटे चालली.
   

जगभरात १९ वर्षांत दोन हजार वाघांची शिकार

 • गेल्या १९ वर्षांत जगातील ३२ देशांमध्ये १,९७७ वाघांची शिकार करण्यात आली आहे. तर ३८२ वाघांना जीवंत पकडण्यात आले आहे. एकट्या भारतातच या १९ वर्षांत ६२६ वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
 • केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हे अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. २००० ते २०१८ पर्यंत हा सर्व्हे करण्यात आला आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक २,९६७ वाघ आहेत.
 • जगातील वाघांची संख्या ३,९५१ असून त्या तुलनेत भारतात ७५.०९ टक्के वाघ आहेत. मात्र गेल्या १९ वर्षांत भारतात ६२६ वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीची ४६३ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.
 • भारतानंतर वाघांच्या शिकारीत थायलंडचा नंबर लागतो. थायलंडमध्ये वाघांच्या शिकारीच्या ४९ घटनांमध्ये ३६९ वाघांची शिकार करण्यात आली आहे. जप्तींच्या घटनांमध्ये एकूण ११४२ वाघांचा मृत्यू झाला आहे.

म्हणून होते वाघांची शिकार:-

 1. वाघांना आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी. 
 2. चीनची छुपी बाजारपेठ ही वाघांची मोठी ग्राहक. 
 3. वाघांच्या अवयवांपासून तिथे औषधांची निर्मिती. 
 4. शौर्याचे प्रतिक म्हणून वाघांचे रक्त आणि मांस भक्षण. 
 5. वाघांच्या कातड्याला लाखो रुपये किंमत. 
 6. वाघ नखांचा दागिन्यांमध्ये वापर. 
 7. त्याच्या हाडांची पूड करून औषधात मिसळतात.
   
22 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »