22 Sep Current Affairs

22 Sep Current Affairs
22 Sep Current Affairs

ह्यूस्टनमध्ये आज हाउडी मोद चा गजर

 • टेक्सास राज्याला बसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही, रविवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमासाठी आयोजकांनी कंबर कसली आहे. या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, हा कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
 • मोदींच्या सभेसाठी ५० हजारांपेक्षा जास्त अमेरिकन-भारतीय उपस्थित राहणार असून, पोप वगळता अन्य कोणत्याही परदेशी नेत्याचा अमेरिकेत होणारा सर्वांत मोठा कार्यक्रम असल्याचे मानले जात आहे. 
 • दरम्यान, भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री साडेदहा वाजता पंतप्रधान मोदी ह्यूस्टन येथे दाखल झाले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून 'हॅलो ह्यूस्टन' अशी साद घालत पंतप्रधानांच्या अमेरिकेतील भरगच्च कार्यक्रमांचाही उल्लेख केला आहे.
   

विक्रम लँडरशी अखेर संपर्क नाहीच

 • विक्रम लँडरशी संपर्क साधण्याच्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) गेल्या चौदा दिवसांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात शनिवारी रात्र सुरू झाली असून, तेथील अतिथंड तापमानात लँडरवरील यंत्रणांचा टिकाव लागणे शक्य नाही. दरम्यान, ऑर्बायटर आणि लँडर मिळून भारताची चांद्रयान २ मोहीम ९८ टक्के यशस्वी झाल्याचे इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी सांगितले.
 • चांद्रयान २ मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या भूमीवर पहिले भारतीय यान उतरवण्याचा प्रयोग इस्रोतर्फे सात सप्टेंबरच्या पहाटे पार पडला. चंद्राच्या जमिनीपासून दोन किलोमीटर उंचीवर असताना विक्रम लँडर आपल्या मार्गापासून भरकटले आणि सुमारे तीनशे मीटर उंचीवर असताना त्याचा जमिनीवरील केंद्राशी संपर्क तुटला. 
 • गेले चौदा दिवस इस्रोची जमिनीवरील केंद्रे, चंद्राभोवती फिरणारे ऑर्बायटर; तसेच नासाच्या अँटेनाच्या साह्याने लँडरशी संपर्क साधण्याचा विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशातील अतिथंड तापमानामुळे लँडरचे कार्य फक्त २१ सप्टेंबरच सुरु राहणार होते. मात्र, अखेरच्या दिवसापर्यंत विक्रम लँडरशी कोणताही संपर्क होऊ न शकल्यामुळे भारताचा चंद्रावतरणाचा पहिला प्रयोग अयशस्वी ठरला. 
 • मात्र, भुवनेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना इस्रोचे अध्यक्ष डॉ. सिवन यांनी दुसरी चांद्रमोहीम ९८ टक्के यशस्वी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'चंद्रावर यान उतरवण्याचा आपला पहिलाच प्रयत्न होता. पृथ्वीवरील प्रक्षेपणापासून चंद्रावर उतरण्यापासून अगदी काही अंतरापर्यंत मोहिमेने आपले काम चोख पार पाडले. लँडिंगच्या उद्देशाने भारतात नव्यानेच विकसित करण्यात आलेल्या अनेक यंत्रणा यशस्वीपणे लागू पडल्या. चंद्राभोवती फिरणारे यान आपल्या पूर्ण क्षमतेने कार्य करीत आहे. तांत्रिकदृष्ट्या लँडिंगची घटना वगळता बाकी सर्व मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.'
 • दरम्यान, इस्रोमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग न होता अखेरच्या टप्प्यात अनियंत्रित झालेले लँडर सुमारे ६० मीटर प्रतिसेकंद वेगाने चंद्राच्या जमिनीवर आदळले. लँडरवरील स्वयंचलित यंत्रणेतील त्रुटी त्याला कारणीभूत असावी. इस्रोच्या शास्त्रज्ञांना ऑर्बायटरने टिपलेल्या छायाचित्रात लँडरचे पाय वरच्या दिशेने असल्याचे दिसून आले. वेगाने आदळल्यामुळे लँडरवरील संपर्क यंत्रणा बंद झाली असावी. इस्रोकडून त्यासंबंधीची अधिकृत माहिती लवकरच मिळणे अपेक्षित आहे.

'आता लक्ष गगनयानाकडे':-

 • चांद्रयान २ मोहिमेतील महत्वाचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून, यापुढे गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात येईल अशी माहिती डॉ. सिवन यांनी दिली. ते म्हणाले, 'भारताच्या मानवी अवकाश मोहिमेसाठीची तयारी वेगाने सुरू असून, डिसेंबर २०२० पर्यंत मानवाचा समावेश नसलेल्या गगनयानाची चाचणी करण्याचे उद्दिष्ट्य आहे. अशा तीन चाचण्या झाल्यावर डिसेंबर २०२१ मध्ये पहिली भारतीय मानवी अवकाश मोहीम पार पाडली जाईल.'
22 Sep Current Affairs
22 Sep Current Affairs

हवामान बदलांवर निदर्शनांचा जागर

 • संयुक्त राष्ट्रांची युवा हवामान परिषद सुरू होत असून त्यानिमित्ताने हवामान बदलावर उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी येथे मोठय़ा प्रमाणात निदर्शने करण्यात आली. जगभरात ही निदर्शने झाली असून त्यात शाळकरी व महाविद्यालयीन मुलांनी सहभाग घेतला. ‘ही केवळ सुरुवात आहे’,  असे स्वीडनची युवा हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने म्हटले आहे, ती युवा परिषदेत सहभागी होत आहे.
 • जगभरात हवामान बदलाच्या मुद्दय़ावर ४० लाख लोक रस्त्यावर आले होते असे  सांगण्यात आले. हवामान बदल व वाढत्या तापमानाच्या मुद्दय़ावर इतक्या मोठय़ा प्रमाणात जनजागृती होऊन लोक रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ होती. युवक-युवतींनी आशिया, पॅसिफिक, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील देशांत मोठय़ा प्रमाणात निदर्शनात सहभाग घेतला. न्यूयॉर्क येथील हवामान बदलांविरोधातील निदर्शनात थनबर्ग ही सहभागी झाली होती. 
 • ‘हवामान बदलांबाबत  जनजागृती होत आहे’, असे सांगून थनबर्ग हिने या सगळ्या निदर्शनांबाबत शंका व्यक्त करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. न्यूयॉर्क येथे अडीच लाख लोक हवामान बदलविरोधी आंदोलनात सहभागी झाले होते असे तिने  म्हटले आहे. ३५० डॉट ओआरजी  या संस्थेने या निदर्शनांचे आयोजन केले  होते, त्यात १६८ देशात ५८०० निदर्शने करण्यात आली. 
 • बर्लिन, बोस्टन,कंपाला, किरीबाती, सोल, साव पावलो अशा अनेक ठिकाणी आंदोलन झाले त्यात ‘देअर इज नो प्लॅनेट बी, मेक द अर्थ ग्रेट अगेन’ अशा घोषणा देण्यात आल्या. न्यूयॉर्क येथील बॅटरी पार्क येथे हजारो आंदोलकांनी थनबर्ग हिचे  स्वागत केले. ‘जगातील नेत्यांनी हवामान बदलांवर आताच कृती करावी, नंतर वेळ निघून गेलेली असेल’,  असा आग्रह तिने यावेळी धरला. ‘आमचे भविष्यच आमच्यापासून हिरावून घेतले जात असताना आम्ही भविष्याचा अभ्यास कशाला करायचा’,  असे सांगून ती म्हणाली की, आम्हाला सुरक्षित भविष्यकाळ हवा आहे. हे आमचे मागणे फार मोठे आहे असे मला वाटत नाही.

भारत महत्त्वाचा भागीदार-गट्रेस:-

 • हवामान बदलाविरोधातील प्रयत्नात भारत हा महत्त्वाचा भागीदार असून अक्षय ऊर्जा क्षेत्रात  या देशाने चांगले प्रयत्न केले आहेत, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँतोनियो गट्रेस यांनी भारताची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार करून हवामान बदलाच्या क्षेत्रात मोठे काम केले.सौरऊर्जा क्षेत्रात भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. असे असले तरी अजून भारतात कोळशावरचे अवलंबित्व कमी झालेले नाही. त्यांच्या इतर योजनातूनही त्यांनी हवामान बदलांच्या समस्येवर मोठे काम केले आहे.

देशासाठी 'सुवर्ण' जिंकायचं होत पुनिया

 • जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीतून दीपक पुनियाची माघार
 • पायाला झालेल्या दुखापतीमुळं दीपक पुनियानं घेतली माघार
 • जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान
 • ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित, माझ्यासाठी गौरवाची बाब: पुनिया
 • भारतीय मल्ल दीपक पुनियाची जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील 'सुवर्ण' संधी हुकली आहे. पायाला झालेल्या दुखापतीतून न सावरल्यानं पुनियानं पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. माझ्या डाव्या पायाला अजूनही सूज आहे. मला देशासाठी सुवर्ण पदक जिंकायचं होतं. पण दुर्दैवानं हे घडणार नाही. दुखापतीतून सावरेन असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. 
 • नूर-सुलतान येथे पार पडलेल्या ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत दीपकनं स्टीफन रीजमुथवर ८-२ अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याचा सामना इराणच्या हसन याझदानीशी होणार होता. मात्र, पायाला झालेल्या दुखापतीतून तो सावरला नाही. त्यामुळं त्यानं माघार घेतली आणि त्याची सुवर्ण पदकाची संधी हुकली. 
 • आता त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागेल. 'स्पर्धेच्या सुरुवातीलाच दुखापतीला सामोरं जावं लागलं. माझ्या डाव्या पायाला अजूनही सूज आहे. मला देशासाठी सुवर्ण पदक जिंकायचं होतं, पण दुर्दैवानं तसं होणार नाही. 
 • अंतिम लढतीपर्यंत दुखापतीतून सावरेन असं मला वाटलं होतं. पण तसं झालं नाही, अशी खंत त्यानं बोलून दाखवली. अंतिम लढतीत खेळण्याची इच्छा होती. पण दुखापत ही क्रीडापटूच्या जीवनाचा भाग आहे, असंही तो म्हणाला. दीपकनं यापूर्वीच ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. 'ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे. टोकियोला जात असल्यानं मी खूपच उत्साहित आहे आणि देशाला मी निराश करणार नाही. 
   
22 Sep Current Affairs
22 Sep Current Affairs

झिम्बाब्वेचा कर्णधार मसाकाझाची निवृत्ती

 • झिम्बाब्वेचा कर्णधार हॅमिल्टन मसाकाझाने शुक्रवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. ४२ चेंडूंत ७१ धावांची खेळी करत मसाकाझाने झिम्बाब्वेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
 • मसाकाझाने पाच षटकार आणि चार चौकारांची आतषबाजी करत झिम्बाब्वेला अफगाणिस्तानवर पहिला ट्वेन्टी-२० विजय मिळवून आपल्या १८ वर्षांच्या कारकीर्दीची सांगता केली. ‘‘अखेरच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देणे हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे,’’ असे मसाकाझाने सांगितले.
 • २००१मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मसाकाझाने झिम्बाब्वेच्या यशात मोलाची भूमिका बजावली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडूचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केला होता. पण तीन महिन्यांतच त्याचा हा विक्रम बांगलादेशच्या मोहम्मद अश्रफुलने मोडीत काढला होता. मसाकाझाने ३८ कसोटी, २०९ एकदिवसीय तसेच ६६ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले आहे.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »