23 July Current Affairs

23 July Current Affairs
23 July Current Affairs

ब्रह्मोस चा मारा ७५० किमीपर्यंत

-'एमटीसीआर' समूहाचे सदस्यत्व मिळाल्याने क्षमतावाढ शक्य

- सखोल संशोधन सुरू

- एवढा पल्ला गाठणारे पहिले क्रूझ क्षेपणास्त्र

आवाजापेक्षा अधिक वेगाने मारा करता येणारे 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र आता लवकरच ७५० किमीपर्यंत डागता येणार आहे. त्यावर सखोल संशोधन सुरू आहे. भारताला क्षेपणास्त्राशी संबंधित जागतिक समूहाचे सदस्यत्व मिळाल्याने हे शक्य होत आहे.

क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या देशांचा 'मिसाइल टेक्नॉलॉजी कन्ट्रोल रिजीम' (एमटीसीआर) हा समूह आहे. जे देश या समूहाचे सदस्य नाहीत, त्यांना क्रुझ श्रेणीतील (लक्ष्यभेदी मारा करणारे) क्षेपणास्त्राची मारक मर्यादा ३०० किमीहून अधिक ठेवण्यावर बंधने आहेत. भारतावरही आधी अशी बंधने होती. त्यामुळेच सुरुवातीच्या काळातील ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता फक्त २९० किमी होती. भारताला सन २०१६ मध्ये एमटीसीआरचे सदस्यत्व मिळाले. यामुळे जगातील अन्य ३४ देशांप्रमाणे भारतानेही आता क्षेपणास्त्राची मारक क्षमता वाढविण्याचा कार्यक्रम जोमाने हाती घेतला आहे.

ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेडचे महाव्यवस्थापक मेजर जनरल (निवृत्त) अच्युत देव यांनी सांगितले की, '३०० किमीच्या बंधनातून भारत मुक्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मारक क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत सर्वात आधी ४५० किमी मारक क्षमतेचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. यश समाधानकारक आहे. याच श्रेणीत संशोधकांनी ७५० किमीपर्यंत मारा करू शकणारे क्षेपणास्त्र विकसित करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच त्याचीही चाचणी होणार आहे.'

'ब्रह्मोस' हे क्षेपणास्त्र जमीन, आकाश व समुद्र या तीन श्रेणीत आहे. सुरुवातीला तयार झालेली या तिन्ही श्रेणीतील क्षेपणास्त्रे २९० किमी मारक क्षमतेची होती. त्यानंतर आता ४५० किमी व ७५० किमी, या दोन्ही श्रेणीतील मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या एकाचवेळी सुरू होत आहेत. ७५० किमीचा पल्ला लवकरात लवकर गाठण्याचा प्रयत्न ब्रह्मोस एअरोस्पेसकडून सुरू आहे. क्रुझ श्रेणीतील क्षेपणास्त्रात एवढा मोठा पल्ला गाठणारे ब्रह्मोस हे जगातील एकमेव क्षेपणास्त्र असेल.

-------------

सुखोईसाठी महत्त्वाचे

सुखोई या लढाऊ विमानावरून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र, हा ब्रह्मोसच्या विकासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. मारक क्षमता ४५० किमी केल्यानंतर फक्त आकाशातून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणीच आजवर झाली आहे. ही चाचणी सुखोईवरून घेण्यात आली. ताशी २२०० किमी वेगाने उडणाऱ्या विमानाने ताशी ३४०० किमी वेगाने २५०० किलो वजनी क्षेपणास्त्राचा ४५० किमीपर्यंत मारा करणे, ही फार मोठी बाब ठरली. याच सुखोईला आता ७५० किमीचे क्षेपणास्त्र बसविण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू आहे. ही सामरिक सज्जतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असेल.

इतिहास संशोधक प्रा. ज. वि. नाईक यांचे निधन

महाराष्ट्राच्या प्रबोधन काळाचे विविध पैलू संशोधन, लेखनातून उलगडणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक प्रा. ज. वि. नाईक यांचे सोमवारी पहाटे ५ वाजता वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे.

प्रा. नाईक हे इतिहास संशोधन क्षेत्रातील अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्त्व होते. सुरुवातीला एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि इस्माईल युसूफ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९७३ ते १९९४ या काळात ते मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख होते. शास्त्री इण्डो-कॅनेडियन इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन कॅनडा यांच्या वतीने नाईक यांना फेलोशिप देण्यात आली होती. याअंतर्गत त्यांनी कॅनडातल्या काही विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली. तसेच देशविदेशातील परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. भारतीय इतिहास परिषदेचे सर्वसाधारण अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे व्हिजिटिंग फेलो म्हणून नाईक यांनी कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि बडोद्याचे एम. एस. विद्यापीठ येथे व्याख्याने दिली होती. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालयाचे ते सदस्य होते. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांविषयी नाईक यांना विशेष आपुलकी होती. ते प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकाच्या अभ्यासासाठी ओळखले जातात.

नाईक यांचे विविध संशोधनपर लेखन १९७० ते १९९० या काळात प्रसिद्ध झाले. त्यापैकी २० निबंधांचा संग्रह ‘कलेक्टेड वर्क्‍स ऑफ जे. व्ही. नाईक’ या नावाने एशियाटिक सोसायटीने प्रकाशित के ला आहे. महाराष्ट्रातील शाळांसाठी पाठय़पुस्तकनिर्मिती करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जार्विस बंधूंविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.

23 July Current Affairs
23 July Current Affairs

पुन्हा चांद्रमोहीम कशासाठी

चांद्रयान-१ मोहिमेत इस्रोच्या यानाला पाण्याचे अस्तित्व सापडले होते, त्याचा आणखी पाठपुरावा यात केला जाणार आहे.

साधारण दहा वर्षांनी पुन्हा एकदा भारताने चांद्रमोहीम हाती घेतली, यात अवकाशाचा अधिक सखोल वेध, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनातील जागतिक आघाडय़ा अशी अनेक वैशिष्टय़े आहेत. चांद्रयान-१ मोहिमेत इस्रोच्या यानाला पाण्याचे अस्तित्व सापडले होते, त्याचा आणखी पाठपुरावा यात केला जाणार आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या अपोलो मोहिमातून १२ जण चंद्रावर जाऊन आले आहेत. त्यानंतर अनेक अवकाश यानांनी त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. एकतर चंद्र हा पृथ्वीला जवळ असलेला वैश्विक घटक आहे. दूरच्या अवकाश मोहिमांसाठीच्या तंत्रज्ञानाची चाचणी या चांद्रमोहिमांत आपोआपच होत असते. त्यामुळे त्याचे वेगळे महत्त्व आहे, शिवाय तेथे पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यताही वर्तवली जाते.

चंद्रावरील पाण्याच्या शक्यतेत गांभीर्य कि

पृथ्वी व तिचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र यांच्यात सामायिक असे बरेच काही आहे. त्यांच्यातील खनिज रचनाही साधम्र्य सांगणारी आहे. चंद्र व पृथ्वी यांचे नाते पाण्यामुळेच आहे असे मानले जाते. चांद्रयान १ मोहिमेत पाण्याचे थेंब सापडले होते त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांना वाटते. चंद्राच्या पृष्ठभूमीवर दहा मीटरच्या खाली पाणी आहे असा अंदाज आहे.

संपूर्ण चंद्रावर पाणी आहे का?

सगळ्या चंद्रावर पाणी नाही. सध्यातरी तेथे पाण्याचा काही प्रमाणात अंश आहे. चंद्राच्या ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच नेहमी अंधारात राहिलेला चंद्राचा दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवापेक्षा महत्त्वाचा आहे. सतत अंधारात असलेल्या भागातच म्हणजे दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता आहे. चांद्रयान २ हे अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे जिथे अजून कुठल्याही देशाचे यान उतरलेले नाही. दक्षिण ध्रुवावर जी विवरे आहेत त्यातील खोल भागात थंड पट्टे आहेत तेथे आधीच्या सौरमालेचे अवशेष जीवाश्माच्या रूपात असू शकतात. दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश नसल्याने तेथे बर्फाच्या रूपात पाणी आहे. चांद्रयान २ वर अतिशय संवेदनशील उपकरणे असून त्यातून पाण्याचा शोध  घेतला जाईल.

यापुढे काय?

चंद्रावरील पाणी आणून ते भारतातील दुष्काळग्रस्त शहरांना पुरवण्याचे स्वप्न तूर्त तरी अशक्य आहे, पण अवकाश संशोधनात या मोहिमेमुळे  मोठी प्रगती साधली जाईल. चंद्रावरील पाण्याचा उगम नेमका काय आहे व सौरमालेतील पाण्याचे गूढही यातून उलगडणार आहे. मंगळसारख्या दूरच्या अवकाश मोहिमांसाठी एक मुक्कामाचे केंद्र म्हणून चंद्राचा थांबा म्हणून उपयोग होणार आहे.

हेलियम- ३ चा साठा महत्त्वाचा

चांद्रयान २ मोहिमेला एक महिना विलंब झालेला असून ही इस्रोची दुसरी चांद्रमोहीम आहे त्यासाठी १००० कोटी रुपये खर्च आला आहे. हेलियम ३ चा चंद्रावर शोध घेण्याचा प्रयत्न करणे हा त्यातील सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. हेलियम ३ चा साठा चंद्रावर असण्याची शक्यता आहे.  हे समस्थानिक चंद्रावर भरपूर असून ते कचरामुक्त अणुऊर्जेसाठी उपयोगी असते. हेलियम ३ या समस्थानिकाची किंमत एक टनाला पाच अब्ज डॉलर्स असते. चंद्रावर किमान १ दशलक्ष मेट्रिक टन हेलियम साठा आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यातील केवळ एकचतुर्थाश हेलियम ३ पृथ्वीवर आणता येऊ  शकते.

चांद्रयान- २ खर्च

९६०

कोटी रुपये, चांद्रयान २

३८०कोटी रुपये

चांद्रयान-२ मोहिमेतील भाग

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक : चांद्रयान २ मोहिमेत जीएसएलव्ही एमके ३ हा प्रक्षेपक वापरण्यात आला. तो बाहुबली म्हणून ओळखला जातो. त्यात एस २०० सॉलिड रॉकेट  बूस्टर्स, एल ११० स्टेज, सी २५ अप्पर स्टेज हे भाग आहेत.

ऑर्बिटर : उड्डाणाच्या वेळी चांद्रयानने २ ऑर्बिटर  हे सतत इस्रोच्या ब्यालूलू येथील डीप स्पेस नेटवर्कला संदेश पाठवत राहील. शिवाय विक्रम लँडरशीही त्याचा संपर्क आहे. ऑर्बिटर एक वर्ष चंद्राच्या कक्षेत फिरत राहील. त्याची कक्षा १०० बाय १०० कि.मी. चांद्र ध्रुवीय कक्षा आहे.

* वजन-२३७९ किलो,  ’वीज निर्मितीची क्षमता-१००० वॉट

लँडर- विक्रम  : चांद्रयान २ च्या लँडरचे नाव विक्रम असे ठेवण्यात आले असून भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव त्याला देण्यात आले आहे. एका चांद्र दिवसात काम करण्यानुरूप त्याची रचना केली आहे. एक चांद्र दिवस हा पृथ्वीवरील चौदा दिवसांच्या बरोबरीचा असतो. विक्रमच्या मदतीने बंगळुरू येथील आयडीएसएन केंद्राशी संपर्क साधला जाईल. तसे ऑर्बिटर व रोव्हर यांच्याशीही त्याचा संपर्क राहील. लँडरच्या मदतीने अलगद अवतरण केले जाईल.

* वजन- १४७१ किलो ’वीज क्षमता- ६५० वॉट

रोव्हर-प्रग्यान : चांद्रयान २ वर सहा चाकांची ही बग्गीसारखी गाडी आहे. तिचे नाव प्रग्यान असे ठेवण्यातआले आहे. त्याचा संस्कृतमधील अर्थ प्रज्ञा असा आहे. ही गाडी ५०० मीटर प्रवास करू शकते व सौर ऊर्जेवर चालू शकते. त्याचा संपर्क केवळ लँडरशी असेल.

* वजन- २७ किलो विद्युत निर्मिती ’क्षमता ५० वॉट

 

* चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद अवतरण करणारी पहिली अवकाश मोहीम.

* स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्रावर अवतरण. चंद्रावर अलगद अवतरण करणारा भारत चौथा देश ठरणार.

* चांद्रयान २ मोहिमेतील पेलोड (वैज्ञानिक उपकरणे)

* लार्ज एरिया सॉफ्ट एक्सरे स्पेक्ट्रोमीटर- चंद्राच्या मूलभूत रचनेची माहिती गोळा करणे.

* इमेजिंग आयआर स्पेक्ट्रोमीटर- खनिजशास्त्रीय नकाशे व बर्फ व पाण्याची निश्चिती करणे.

* सिंथेटिक अपरचर रडार एलअँड एस बँड- ध्रुवीय भागाचे नकाशे व आतल्या भागातील बर्फाची निश्चिती करणे.

* ऑर्बिटर बाय रेझोल्यूशन कॅमेरा- उच्च विवर्तन स्थानशास्त्रीय नकाशे.

* चंद्रा सरफेस थर्मो फिजिकल एक्सपिरिमेंट- औष्णिक वहन व तापमान यांचे नकाशे.

* अल्फा पाट्रिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर अँड लेसर इनडय़ूसड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मूलद्रव्यांचा अभ्यास करणे.

ओडिशातील संस्थेत रोव्हरच्या भागांची निर्मिती

चांद्रयान २ मोहिमेत देशाच्या अनेक  भागातील किमान ६०० संस्थांनी काम केले आहे. या मोहिमेतील रोव्हरचे सुटे भाग भुवनेश्वरमध्ये दी सेंट्रल टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर येथे तयार झाले आहेत. यात इंधन टाक्यांचे २२ प्रकारचे व्हॉल्व्ह  तयार करण्यात आले असून क्रायोजेनिक इंजिनाचे महत्त्वाचे भाग तयार करण्यात आले होते. जीएसएलव्ही मार्क ३ हा बाहुबली प्रक्षेपक तयार करण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. हा उपग्रह प्रक्षेपक चार टन वजनाचे उपग्रह वाहून नेऊ शकतो. चंद्रावर जी रोव्हर गाडी धावणार आहे तिचे भागही येथेच तयार झाले आहेत. भुवनेश्वर येथील सीटीटीसी संस्थेने या मोहिमेचे काम करण्यासाठी इस्रोशी २०१६ मध्ये करार केला होता. चांद्रयान १ मोहिमेतही महत्त्वाचे भाग याच संस्थेने पुरवले होते, असे व्यवस्थापकीय संचालक सिबाशीश मैती यांनी सांगितले. या वेळी जे भाग संस्थेने तयार केले त्यात, सोलर अ‍ॅरे ड्राइव्ह असेंब्ली, मोमेंटम व्हील असेम्ब्ली, रिअ‍ॅक्सन व्हील असेम्ब्ली, डायनॅमिकली टयुनड गायरोस्कोप, इस्रो लेसर गायरोस्कोप, मिनी अ‍ॅडव्हान्सड इनर्शियल सिस्टीम, रेट गायरो इलेक्ट्रॉनिक पॅकेज डिव्हाइस यांचा समावेश आहे. प्रज्ञान गाडीचे अवयव, चाके येथेच तयार क रण्यात आली आहेत. सहा चाकांची ही गाडी आहे.  ती सौरशक्तीवर पाचशे मीटर चालेल.

93 वे साहित्य संमेलन उस्मानाबादला

मराठवाड्यात सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जणाऱ्या आणि दुष्काळाने होरपळत असणाऱ्या उस्मानाबाद शहरात जानेवारी महिन्यात यंदाचे साहित्य संमेलन रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी-२०२० मध्ये होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी औरंगाबादेत  केली. संमेलनाच्या नेमक्‍या तारखा संयोजकांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या सात-आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा हे संमेलन मिळावे म्हणून प्रयत्नशील होती. दरवेळी त्याकडे काही ना काही कारणांनी दुर्लक्ष होत होते. उस्मानाबादेत एकही संमेलन झालेले नसताना मोठ्या शहरांचाच विचार होत होता. या वर्षी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने नाशिक व उस्मानाबाद येथील दोन संस्थांची निमंत्रणे पाहणीसाठी निवडली व त्या ठिकाणी पाहणी केली. या समितीने अहवाल महामंडळाला दिला होता. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मोठा वेळ जाईल म्हणून घटनेतील तरतुदीनुसार सर्व सदस्यांना अहवालासह परिपत्रक पाठवून सदस्यांची मते जाणून घेतली. विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह एकोणीस सदस्यांनी मते नोंदविली. साहित्य महामंडळाने एकमताने उस्मानाबादचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. जानेवारीत हे संमेलन उस्मानाबादेत होईल. संयोजकांशी चर्चा करून तारखांचा निर्णय होईल. संमेलनात होणाऱ्या वादांबद्दल विचारले असता वाद उद्‌भवून आणले जातात. मात्र, उस्मानाबादचे संमेलन हे चांगले होईल. वाद होणार नाहीत. तर, संमेलनाध्यक्षही समितीच्या एकमताने निवडला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

93 व्या  साहित्य संमेलनासाठी बुलडाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद याठिकाणांना विचार सुरु होता. साहित्य संमेलन महामंडळाच्या अध्याक्षा अरुणा ढेरे यांच्यासह 19 जणांनी एकमताने सहमती दिल्याने अखेर उस्मानाबाद येथे आता साहित्य संमेलन पार पडणार आहे.
उस्मानाबाद मध्ये साहित्य संमेलन व्हावं यासाठी मागील पाच वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर यावर्षी या प्रयत्नांना यश मिळालं आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांना पुढच्या वर्षीच्या सुरुवातील साहित्याची मेजवानी मिळणार आहे.

 

 

23 July Current Affairs
23 July Current Affairs

दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा

महाराष्ट्राच्या दिनेश कांबळेला रौप्य; भारताला १२ पदकांसह तिसरे स्थान

नेपाळमधील काठमांडू येथे रविवारी झालेल्या १२व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सेनादलाच्या रवींद्र कुमाल मलिक याने सर्वसाधारण वैयक्तिक विजेतेपदाचा मान पटकावला. भारताने या स्पर्धेत ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि १ कांस्यपदक अशी एकूण १२ पदकांची कमाई करत तिसरे स्थान मिळवले. महाराष्ट्राच्या दिनेश कांबळेला ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळाले.

आसामच्या दिपू दत्ता याने ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत भारताचे खाते उघडल्यानंतर ६५ किलो वजनी गटात दिनेश दुसरा आला. ७० किलो वजनी गटात भारताच्या सॅव्हियो हेन्रिक्स याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ७५ किलो गटात धर्मेद्र कुमार याने दुसरा क्रमांक पटकावत भारताच्या खात्यात दुसऱ्या रौप्यपदकाची भर घातली. त्यानंतर ८० किलो वजनी गटातून रवींद्र मलिकने अफगाणिस्तानच्या मोहम्मद साखी आणि नेपाळच्या मिलन सिजापती यांचे कडवे आव्हान मोडीत काढत सुवर्णपदक जिंकले. ८५ किलो गटात मणिपूरचा ऋषिकांत सिंग सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. ९० किलो वजनी गटात ऋषी अत्रेय याने रौप्यपदक प्राप्त केले.

सर्वाधिक सुवर्णपदकांवर वर्चस्व मिळवणाऱ्या अफगाणिस्तानने  ५३५ गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले. यजमान नेपाळ (४४५ गुण) दुसरा तर भारत (३८० गुण) तिसरा आला. वैयक्तिक विजेतेपदासाठी झालेल्या लढतीत पंचांनी एकमताने रवींद्र मलिकला विजयी घोषित केले. महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात निशरीन पारीख तिसरी आली तर अ‍ॅथलेटिक फिजिक प्रकारात निशा भोयर हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »