24-25 Oct Current Affairs

24-25 Oct Current Affairs
24-25 Oct Current Affairs

नासा च्या छायाचित्रातही विक्रम दिसलेच नाही

 • 'विक्रम लँडर ज्या भागात उतरविण्यात आले, तिथे ऑर्बिटरद्वारे घेण्यात आलेल्या ताज्या छायाचित्रामध्येही लँडरबाबत काहीही माहिती मिळाली नाही,' असे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) बुधवारी सांगितले; तसेच 'ज्या वेळी आमच्या ऑर्बिटरने छायाचित्रे घेतली, तेव्हा लँडर एखाद्या गडद सावलीत लपला असावा किंवा जिथे छायाचित्रे घेतली गेली तिथे लँडर नसावा,' अशी शक्यताही 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 'चांद्रयान-२' या भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत सात सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'विक्रम लँडर'चे सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु 'विक्रम'चे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नव्हते. 'विक्रम'शी संपर्क तुटल्यानंतर त्याबाबत अधिक माहितीही मिळाली नाही. त्या पार्श्वभूमीवर 'नासा'ने १४ ऑक्टोबर रोजी ऑर्बिटरद्वारे विक्रम लँडर उतरलेल्या भागातील छायाचित्रे घेतली आहेत; परंतु त्या छायाचित्रात लँडरचा कुठेही ठावठिकाणा दिसत नाही.
 • 'लँडिंगच्या प्रयत्नापूर्वीचे आणि १४ ऑक्टोबर रोजीच्या छायाचित्राचे सूक्ष्म तौलनिक अभ्यास करण्यात आले. तरीही लँडर आढळले नाही,' असे 'नासा'चे प्रकल्प शास्त्रज्ञ नोह एडवर्ड यांनी स्पष्ट केले, तर 'आमच्या ऑर्बिटरने छायाचित्रे घेतली, तेव्हा लँडर एखाद्या गडद सावलीत लपला असावा किंवा ज्या भागात छायाचित्रे घेतली तिथे लँडर नसेल, अशीही शक्यता आहे,' असे शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी सांगितले. त्यामुळे 'विक्रम'बाबतचे गूढ वाढतच चालले आहे.

अल कायदा चा गट काश्मिरातून संपला

 • काश्मीर खोऱ्यातील त्राल भागात मंगळवारी झालेल्या चकमकीत मारले गेलेल्या दहशतवाद्यांना 'अल कायदा'च्या भारतातील 'अन्सार गजवत उल हिंद' या गटाचा म्होरक्याचाही समावेश आहे. त्याच्या मृत्यूबरोबरच काश्मीर खोऱ्यातून या संघटनेचे अस्तित्व संपले आहे, असा विश्वास जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांनी बुधवारी व्यक्त केला.
 • 'अल कायदा'चा हा गट एक-दोन वर्षांपासून काश्मीर खोऱ्यामध्ये सक्रिय होता. त्यांचा म्होरक्या झाकीर मुसा मेमध्ये झालेल्या चकमकीत मारला गेला. त्यानंतर या संघटनेची सूत्रे हमीद लोन उर्फ हमीद लेलहारीकडे आली होती. त्रालमध्ये झालेल्या चकमकीत हमीदबरोबर नावीद अहमद टाक आणि जुनेद रशिद भट हे दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
 • 'स्थानिक पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. तिन्ही दहशतवादी मुसाच्या टोळीतील असून, पोलिस रेकॉर्डवर त्यांची नोंद आहे. दहशतवादी कारवाया, सुरक्षा दलांवर हल्ले आणि नागरिकांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. जैशे महंमद अन्सार गजवत उल हिंदसह अन्य दहशतवादी संघटनांची मदत घेत, मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. मात्र, अन्सार गजवत उल हिंदचे अस्तित्व संपले आहे,' असे त्यांनी सांगितले.
 • जैशे महंमद आणि लष्करे तैयबा दहशतवादी संघटनांशी समन्वय साधत आहेत. मात्र, कोणाला लक्ष्य करायचे आणि कोणत्या प्रकारचा हिंसाचार करायचा, याची सूचना त्यांना पाकिस्तानातूनच मिळत असते. जैशे महंमद आणि अन्सार गजवत उल हिंद यांच्यात संपर्क होता, असे संकेतही मिळत आहे. स्थानिक पातळीवर हा संपर्क किती दिसतो, हे सांगणे कठीण आहे, असे त्यांनी नमूद केले.
 • केंद्र सरकारने ३७०वे कलम रद्द केल्यानंतर, पाच ऑगस्टपासून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. उत्तर आणि दक्षिण काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचा हालचाली दिसत आहेत. मात्र, खूप चिंता करावी, एवढ्या प्रमाणात ही संख्या नाही, असेही त्यांनी नमूद केले. नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग करत, घुसखोरी घडवून आणण्याचा पाकिस्तानचा नेहमीचाच प्रयत्न असतो. मात्र, त्यातील अनेक दहशतवाद्यांना सुरुवातीच्या टप्प्यावरच मारलेले असते. नियंत्रण रेषेजवळ असणाऱ्या दहशतवाद्यांच्या तळाला पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांचा पूर्ण पाठिंबा असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तरुणांना कोठडीत ठेवल्याचा अपप्रचार:-

 • सुरक्षा दलांनी अनेक तरुणांना नजरकैदेत ठेवल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. त्याविषयी बोलताना दिलबागसिंग म्हणाले, 'काही जबाबदार माध्यमांनीही माहितीची सत्यता न पडताळता हे वृत्त दिले आहे. ताब्यात घेतलेल्या युवकांपैकी अनेकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
 • ताब्यात घेतलेल्यांपैकी ८० टक्के युवकांना सोडून देण्यात आलेले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करूनच उर्वरित तरुणांना कोठडीत ठेवण्यात आले आहे.' कोणत्याही तरुणाचा किंवा कुमारवयीन मुलांचा छळ करण्यात आलेला नाही, असे सांगून त्यांनी आरोप फेटाळले.
24-25 Oct Current Affairs
24-25 Oct Current Affairs

पूर्वसूचनेशिवाय बँक संपास मनाई

 • सरकारी बँकांच्या कर्मचारी संघटनांना यापुढे तडकाफडकी संप पुकारता येणार नाही.
 • बँकसेवा ही सार्वजनिक गरजेच्या प्रकारात येत असल्याने या संघटनांनी यापुढे मनमानीपणे संप करू नये, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
 • केंद्रीय अर्थ मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सरकारी बँकांच्या दोन संघटनांनी मंगळवारी देशव्यापी संपाची हाक दिली होती.
 • या पार्श्वभूमीवर सरकारने हे निर्देश दिले आहेत. कोणत्याही कारणास्तव संप करायचा असल्यास निर्धारित तारखेच्या किमान १४ दिवस आधी या संपाची नोटीस देणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

टर्कीवरील निर्बंध अमेरिकेकडून मागे

 • टर्कीवर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध अमेरिकेने मागे घेतले आहेत. अमेरिकेच्या फौजांनी सीरियातून माघार घेतल्यानंतर, टर्कीने तेथे कायमची शस्त्रसंधी केल्याने हा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आहे.
 • टर्कीने उत्तर सीरियात सुरू केलेली लष्करी कारवाई व तेथील नागरी वस्त्यांवरील हल्ले केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने गेल्या आठवड्यात निर्बंध घातले होते.
 • 'आम्ही आता या रक्ताने लाल झालेल्या संघर्षभूमीतून बाहेर पडत आहोत. गेली दहा वर्षे आम्ही तेथे होतो. आता दुसरे कुणीतरी येथे येऊ द्या,' अशा शब्दांत ट्रम्प यांनी सीरियातून माघारीबाबत भाष्य केले होते. रशिया आणि टर्कीवर त्यांचा रोख होता.
 • दरम्यान, रशियाच्या लष्कराने सीरियात गस्त घालणे सुरू केल्याचे 'वॉशिंग्टन पोस्ट'ने म्हटले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन आणि टर्कीचे अध्यक्ष रेसीप तईप एर्दोगन यांच्यात याबाबत करार झाला आहे.
24-25 Oct Current Affairs
24-25 Oct Current Affairs

कर्तारपूर कॉरिडॉर मार्गस्थ

 • व्हिसा नसतानाही भारतीयांना पाकमधील कर्तारपूर गुरुद्वाराला भेट देता येणार
 • भारत आणि पाकिस्तानमध्ये गुरुवारी ऐतिहासिक 'कर्तारपूर कॉरिडॉर'चा करार करण्यात आला. पाकिस्तानातील नारोवाल जिल्ह्यातील कर्तारपूर येथे असलेल्या गुरुद्वारा (दरबार साहिब) येथे भारतातील शीख बांधवांसह इतर भारतीयांनादेखील आता जाता येणार आहे.
 • कॉरिडॉर खुला झाल्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन तत्काळ सुरू करण्यात आले असून, प्रत्येक भाविकाला वीस डॉलर इतके शुल्क पाकिस्तानने आकारले आहे. शीख बांधवांची दीर्घ काळापासूनची मागणी हा करार झाल्यामुळे आता पूर्ण झाली आहे.
 • पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये नारोवाल जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेपासून चार किलोमीटर अंतरावर दरबार साहिब गुरुद्वारा आहे.
 • हा कॉरिडॉर भारतातील पंजाब प्रांतातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातील कर्तारपूरमधील गुरुद्वारा यांना जोडेल. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू नानक देव यांनी या ठिकाणी आयुष्यातील शेवटची अठरा वर्षे व्यतीत केली होती.
 • त्यामुळे शीख बांधवांसाठी हे ठिकाण अत्यंत पवित्र आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर 'कर्तारपूर झीरो पॉइंट' येथे हा करार करण्यात आला. भारताच्या वतीने गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव एस. सी. एल. दास आणि पाकिस्तानच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी करारावर सह्या केल्या. या करारानुसार भारतातीय शीख बांधव दरबार साहिब येथपर्यंत जाऊ शकणार असून, सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आल्याचे फैजल यांनी सांगितले; तसेच प्रत्येक भाविकामागे वीस डॉलर शुल्क आकारल्याचेही त्यांनी समर्थन केले.
 • फैजल म्हणाले, 'पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेला शब्द पाळला असून वर्षभरातच कॉरिडॉर पूर्ण केला आहे. दोन्ही देशांतील तणावाचे संबंध पाहता कर्तारपूर कॉरिडॉरचा करार प्रत्यक्षात आणणे सोपी बाब नव्हती. करारानुसार हा कॉरिडॉर कायम खुला राहील. भारतातून सुमारे पाच हजार शीख बांधव दररोज या ठिकाणी येतील आणि त्याच दिवशी परत जातील.
 • भारतीय भाविकांना केवळ त्यांचा पासपोर्ट जवळ ठेवावा लागेल. त्यावर कुठलाही शिक्का उमटवला जाणार नाही. दरबार साहिब येथे येणाऱ्या भाविकांची माहिती भारताकडून दहा दिवस आधी दिली जाईल. प्रत्येकाला वीस डॉलर इतके शुल्क आकारले जाईल. पाकिस्तानमध्ये दरबार साहिब येथे येणाऱ्या भाविकांना पाकिस्तानी पंजाब प्रांतातील इतर गुरुद्वारा येथे मात्र जाता येणार नाही.
 • इतर गुरुद्वारा पाहण्यासाठी त्यांना पाकिस्तानचा व्हिसा घ्यावा लागेल.' कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर दहशतवादी घटनांची शक्यता आणि भाविकांच्या जिवाला कितपत धोका असेल, असे विचारले असता फैजल म्हणाले, 'गुरुद्वाराभोवती अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.'

'कर्तारपूर कॉरिडॉर' करारानुसार:-

 • हा कॉरिडॉर आठवड्यातील सातही दिवस, दिवस-रात्र खुला राहील.
 • सुमारे पाच हजार शीख बांधव दररोज गुरुद्वारा येथे भेट देतील, अशी अपेक्षा
 • भाविकांना आपल्याजवळ पासपोर्ट ठेवावा लागणार
 • प्रत्येक भाविकाला २० डॉलर शुल्क
 • पाकिस्तानातील इतर गुरुद्वारांना भेट देता येणार नाही
 • भाविकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा तैनात

भाविकांसाठी नियम:-

 • जास्तीत जास्त ११ हजार रुपये आणि सात किलोग्रॅम वजन सोबत नेता येणार
 • गुरुद्वारा सोडून इतर कुठेही जाता येणार नाही
 • १३ वर्षांखालील मुले आणि ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना गटा-गटांतून जावे लागणार
 • भाविकांना सकाळी गुरुद्वारा येथे जावे लागेल आणि त्याच दिवशी सायंकाळी परत यावे लागेल.
 • ऑनलाइन रजिस्ट्रेशन बंधनकारक. \Rprakashpurb550.mha.gov.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करता येणार
 • रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच प्रवास करता येणार नाही. भाविकांना चार दिवस आधी गृह मंत्रालयाकडून त्या संदर्भात कळवले जाईल.
 • धूम्रपान, मद्यपान, तंबाखू वर्ज्य
 • प्रत्येक भाविकाला वीस डॉलर शुल्क

मोदींच्या हस्ते आठ नोव्हेंबरला उद्घाटन:-

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ नोव्हेंबर रोजी कॉरिडॉरचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. कर्तारपूर कॉरिडॉर आणि गुरुद्वाराला भेट देणाऱ्या भाविकांच्या नियोजनासाठी 'कर्तारपूर साहिब कॉरिडॉर कार्यकारी समिती'ची स्थापना करण्यात आली आहे.
 • 'डेरा बाबा नानक विकास प्राधिकरणा'चे उपायुक्त आणि मुख्य प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली समितीचे काम चालेल. अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल, प्रवाशांसाठी सुविधा केंद्र, पार्किंग आदी बाबी तयार करण्यात येणार आहेत.
 • इम्रानच्या हस्ते नऊ नोव्हेंबरला उद्घाटन:-
 • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या कॉरिडॉरचे औपचारिकरीत्या उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी करणार आहेत. या कॉरिडॉरच्या भारताकडील भागाला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात सुरुवात झाली होती.
 • त्यानंतर दोनच दिवसांनी इम्रान खान यांनी नारोवाल येथे या कॉरिडॉरच्या कामाचे उद्घाटन केले. सीमेपासून गुरुद्वारा दरबार साहिब इथपर्यंत पाकिस्तानने कॉरिडॉर तयार केला आहे. भारताचा राष्ट्रीय महामार्ग ३५४पासून 'कर्तारपूर झीरो पॉइंट'पर्यंत चौपदरी महामार्ग त्यासाठी तयार करण्यात आला आहे.

पाकला ३.६५ कोटी डॉलरचे उत्पन्न:-

 • कर्तारपूर कॉरिडॉरमुळे पाकिस्तानला वर्षाला ३ कोटी ६५ लाख अमेरिकी डॉलरचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. या कॉरिडॉरने दररोज सुमारे पाच हजार भाविक आणि महत्त्वाच्या दिवसांना त्यापेक्षाही अधिक भाविक येणे अपेक्षित आहे.
 • भाविकांना आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कातून वर्षाला २५९ कोटी भारतीय रुपये आणि पाकिस्तानचे ५५५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पाच हजार भाविकांनी गुरुद्वाराला रोज भेट दिली, तर प्रत्येक भाविकामागे वीस डॉलरनुसार दिवसाला एक लाख डॉलर (७१ लाख रुपये) पाकला मिळणार आहेत. पाकिस्तानी चलनानुसार एका अमेरिकी डॉलरला साधारण १५५ रुपये धरल्यास १.५५ कोटी रुपयांचे उत्पन्न पाकला मिळेल.

गुगल ची अतिजलद कम्प्युटर प्रणाली

 • जगातील सर्वात जलद कम्प्युटर प्रणाली संथ वाटावी, अशी प्रणाली विकसित करण्यात यश आल्याचा दावा 'गुगल' कंपनीने केला आहे. 'गुगल'च्या सिकामोर प्रोसेसरने एक अतिजटील गणित अतिशय कमी वेळात सोडवल्याचा दावा कंपनीच्या तज्ज्ञांनी केला आहे.
 • 'गुगल' कंपनीच्या तज्ज्ञांचा एक गट अतिजलद प्रणाली तयार करण्यासाठी संशोधन करीत आहे. या गटाने 'गुगल'च्या सिकामोर मशिनवर काम करीत एक अतिजटील गणित केवळ २०० सेकंदांत सोडवले आहे. सध्याच्या अतिजलद कम्प्युटर प्रणालीच्या सुपरकम्प्युटरला हेच गणित सोडवण्यासाठी किमान १० हजार वर्षे लागली असती, असा या तज्ज्ञांचा दावा आहे. 'गुगल'ची प्रतिस्पर्धी आयबीएम कंपनीने मात्र या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप ही प्रणाली प्रत्यक्षात येण्यापासून लांब आहे. ती चालवण्यासाठी अत्युच्च हार्डवेअर आणि अतिशय सुयोग्य देखरेख प्रणालीची आवश्यकता आहे.
 • सध्याच्या कम्प्युटर प्रणाली एक अथवा शून्य या अंकांचाच आधार घेत डेटा तयार करते. मात्र, 'गुगल'च्या या प्रणालीने शून्य व एक या दोन्ही अंकांमध्ये डेटाची विभागणी केली. याद्वारे गुंतागुंतीचे गणितही सोडवणे शक्य झाले. नेचर या नियतकालिकात याविषयीचा प्रबंध प्रसिद्ध झाला आहे. यानुसार सिकामोर प्रोसेसर वापरणाऱ्या कम्प्युटरचे यश नमूद करण्यात आले आहे. केवळ काही मिलिमीटर लांब असलेल्या या प्रोसेसरने एक अतिजटील गणितीय पाठ केवळ २०० सेकंदांत पूर्ण केला. सध्याच्या सुपरकम्प्युटरच्या तुलनेत तो कोट्यवधींच्या पटीने जलद ठरला आहे.

'कम्प्युटिंगमध्ये क्रांती':-

 • 'गुगल'चे सीईओ सुंदर पिचाई यांनी या घटनेचे क्रांतिकारी असे वर्णन केले आहे. आपल्या ब्लॉगमध्ये पिचाई म्हणतात, 'विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्यांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. याच अतिशय अर्थपूर्ण क्षणासाठी आम्ही आजवर प्रतीक्षेत होतो. क्वांटम कम्प्युटिंग हा प्रकार आता सत्य बनून समोर आले आहे.'

 

24-25 Oct Current Affairs
24-25 Oct Current Affairs

कोकण किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळ धडकणार

 • राज्यातील मान्सून जरी परतल्यात जमा असला तरी देखील कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला ‘क्यार’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.
 • त्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसत आहे.
 • आगामी दोन दिवसात ‘क्यार’ हे चक्रीवादळ कोकणासह गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. शिवाय या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांना व प्रशासनास सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
 • सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत गुरूवारपासून मुसळधार पाऊस आहे. दमदार पावसामुळे या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचले असल्याने येथील जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
 • समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने याचा फटका मच्छिमारांनाही बसला आहे. मध्यरात्रीपासून किनारपट्टीवर जोरादार वारा आणि पाऊस सुरू असून मालवण मधील देवबाग परिसरात समुद्राच्या उधाणाचं पाणी शिरलं आहे.
 • त्यात आता आगामी दोन दिवसात ‘क्यार’ चक्रीवादळ येऊन धडकणार असल्याने येथील सर्वांचाच जीव टांगणीला लागलेला आहे. तर, कोकण किनारपट्टीवरील ग्रामस्थांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मच्छिमारांना दोन दिवस समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
 • शिवाय, कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही काही दिवस कोकणात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

U19 विश्वचषकाची घोषणा भारताचा अ गटात समावेश

 • २०२० वर्षाच्या सुरुवातीलाच क्रिकेट प्रेमींना विश्वचषकाचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आयसीसीने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेची घोषणा केली असून, १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा रंगणार आहे. गतविजेत्या भारताचा अ गटात समावेश करण्यात आला आहे.

२०२० विश्वचषकासाठी अशी असेल गटवारी –

 1. अ गट – भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, जपान
 2. ब गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, नायजेरिया
 3. क गट – पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलंड
 4. ड गट – अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, युएई, कॅनडा
 • याचसोबत सर्व संघाना सरावासाठी आयसीसीने १२ ते १५ जानेवारीदरम्यान जोहान्सबर्ग आणि प्रिटोरीया येथे सरावसामने आयोजित केले आहेत.

    

 

 

24-25 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »