24 Sep Current Affairs

24 Sep Current Affairs
24 Sep Current Affairs

एक कार्ड सर्वव्यापी

 • देशातील आठव्या जनगणनेच्या माध्यमातून डिजिटल क्रांती घडवून आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट हे सर्व दस्तावेज एकीकृत करून त्यांचे एकच कार्ड बनवण्याची संकल्पना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडली.
 • मार्च, २०२१ पासून देशभरात सुरू होणारी जनगणना मोबाइल अॅपच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आणि त्याच्या साह्याने भविष्यातील योजनांची रूपरेषा आखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
 • पेन आणि कागदापासून सुरू झालेली जनगणना डिजिटल जनगणनेत परिवर्तित व्हायला हवी.
 • देशात प्रथमच हाती घेण्यात येत असलेले राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि जनगणनेचे काम १ ऑक्टोबर, २०२०पासून जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडपासून सुरू होणार असून, उर्वरीत भारतात १ मार्च, २०२१पासून ते सुरू होईल.
 • १२ हजार कोटी रुपये खर्चून ३३ लाख लोकांच्या मदतीने देशातील १६ भाषांमध्ये हे काम हाती घेण्यात येईल.

निसर्गाचा आदर करा मोदी

 • जगात उपलब्ध स्रोतांचा काळजीपूर्वक वापर करण्याचे, आपल्या गरजा कमी करण्याचे, अंथरुण पाहून पाय पसरण्याचे तसेच निसर्गाचा आदर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान कृती परिषदेत सोमवारी केले.
 • हवामान बदलाचा सामना करण्यासाठी विविध देशांनी उपाययोजना केल्या आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे.
 • यामध्ये शिक्षणापासून जीवनशैलीच्या तत्त्वज्ञानापर्यंत सर्वांचा समावेश आहे. जगातील नागरिकांमध्ये वर्तनात्मक बदल घडण्यासाठी जागतिक नागरिक चळवळीची गरज आहे.'
 • या वेळी त्यांनी हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून तयार केलेल्या इंधनाचा वापर दुपटीहून अधिक करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्यूस्टन येथे दहशतवादावर एकत्र लढण्यास सज्ज असल्याचे सांगितले. मात्र, हवामान बदलासंदर्भात दोन्ही देशांच्या भूमिका वेगळ्या आहेत. पॅरिस हवामान बदल करारातून अमेरिका बाहेर पडली आहे. त्यासाठी भारत आणि चीनला अमेरिकेने जबाबदार धरले आहे.

आपत्तीरोधक सुविधानिर्मिती:-

 • आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्ससाठी पुढाकार घेतल्यानंतर आता भारताने सर्वांच्या साह्याने आपत्तीरोधक सुविधानिर्मितीची घोषणा केली. या गटामध्ये ३० विकसित आणि विकसनशील देशांचा समावेश असणार आहे. या सुविधानिर्मितीसाठी भारताने यूकेसारख्या विकसित देशाबरोबर तसेच फिजी व मालदीवसारख्या छोट्या बेट-देशांबरोबर काम सुरू केले
 • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हवामान बदल परिषदेला येणे पूर्वनियोजित नव्हते. तरीही ते अचानक या परिषदेला उपस्थित राहिले. त्यांनी मोदी यांचे भाषण आवर्जून ऐकले.

अजैविक इंधनाचा वापर वाढवणार:-

 • भारत अजैविक इंधनाचा वापर २०२२पर्यंत वाढवेल. अपारंपरिक ऊर्जानिर्मितीची क्षमता आम्ही १७५ गिगावॉटपेक्षाही अधिक वाढवू. ही क्षमता ४५० गिगावॉटपर्यंत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पॅरिस हवामात बदलामध्ये ठरलेल्या मुद्द्यांच्या अंमलबजावणीवर अधिक भर देण्याचे उद्दिष्ट या परिषदेमध्ये ठेवण्यात आले आहे.
24 Sep Current Affairs
24 Sep Current Affairs

कर्तारपूरमध्ये गुरुनानकांना श्रद्धांजली

 • शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या ४८०व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जगभरातील शीख धर्मीय पाकिस्तानातील कर्तारपूर य़ेथील दरबार साहिब गुरुद्वारा येथे एकत्र आले होते. तीन दिवसांच्या विशेष कार्यक्रमामध्ये गुरुनानक यांना आदरांजली वाहण्यात आली.
 • जगभरातील शीख भाविकांमध्ये कॅनडातील १४५ शीख भाविकांचा समावेश होता. त्याचप्रमाणे युरोपातील विविध देशांतील; तसेच पाकिस्तानातील विविध प्रांतांतील शीख बांधव कर्तारपूर येथे एकत्र आले होते.
 • कर्तारपूर येथील दरबार साहिब गुरुद्वारा आणि गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नाक गुरुद्वारा यांना जोडणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरची सफरही भाविकांना घडविण्यात आली.
 • कर्तारपूर कॉरिडॉरचे नोव्हेंबरमध्ये लोकार्पण करण्यात येणार आहे. गुरुनानक देव यांची ५५० जयंती नोव्हेंबर महिन्यात साजरी करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने हा मार्ग खुला करण्यात येणार आहे.

थॉमस कूकची अचानक दिवाळखोरी भारतात परिणाम ब्रेक्सिट इफेक्ट

 • जगातील सर्वांत जुनी म्हणजे १७८ वर्षांपासून पर्यटन व्यवसायात कार्यरत असणारी ब्रिटनची थॉमस कूक ही कंपनी निधीअभावी अखेर बंद पडली आहे. पर्यटनासोबत हॉटेल, रीसॉर्ट, विमानसेवा आदी अनेक क्षेत्रांत विस्तारलेली ही कंपनी काही वर्षांपासून तोट्यात असून विशेष सरकारी पॅकेज अथवा अंतर्गत आपत्कालीन निधी उभारण्यात अपयशी ठरल्याने कंपनीचे कामकाज पूर्णत: बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत या कंपनीला टाळे ठोकण्याचा निर्णय सोमवारी घोषित करण्यात आला. मात्र या कंपनीचे भारतातील केंद्र पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भारतीय ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

कर्जाचा डोंगर:-

 • या कंपनीवर कर्जाचा डोंगर झाल्याने दैनंदिन व्यवस्थापन खर्च भागवणे कठीण ठरले होते. कंपनीला वाचवण्यासाठी २५ कोटी अमेरिकी डॉलरचे तातडीचे पॅकेज आवश्यक होते. मात्र सरकारी वा अंतर्गत माध्यमातून हा निधी उभारण्यात कंपनीला अपयश आले. कंपनीला आता दिवाळखोरी प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.

२१ हजार कर्मचारी:-

 • या कंपनीचा १६ देशांत कार्यविस्तार असून कंपनीत एकूण २१ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यातील नऊ हजार ब्रिटिश आहेत. या सर्वांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.

पर्यटक अडकले:-

 • रविवारपर्यंत सुरळीत असणारी ही कंपनी अचानक बंद झाल्याने जगभरातील पर्यटकांना धक्का बसला. केवळ ब्रिटनचा विचार केला तर या कंपनीचे दीड लाख पर्यटक सद्यस्थितीत भ्रमंतीवर आहेत. हे पर्यटक विविध देशांत खोळंबले असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी ब्रिटन सरकारतर्फे विशेष मोहीम आखण्यात आली आहे. विदेशात अडकलेल्या स्वकियांना मायदेशी आणण्यासाठी ब्रिटनतर्फे हाती घेण्यात येणारी शांतताकाळातील ही सर्वात मोठी मोहीम ठरणार आहे.

भारतात परिणाम नाही:-

 • कॅनडातील फेअरफॅक्स कंपनीने ऑगस्ट २०१२मध्ये थॉमस कूकच्या भारतातील व्यवसायातील ७७ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. त्यामुळे मूळ कंपनी बंद पडल्यानंतरही आमच्या कंपनीच्या कामकाजावर परिणाम होणार नाही. आमचा व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरक्षित व निर्धोकपणे सुरू आहे.
24 Sep Current Affairs
24 Sep Current Affairs

फोर्ब्सची यादी जाहीर इन्फोसिस ठरली जगातील तिसऱ्या क्रमांकाची उत्कृष्ट कंपनी

 • फोर्ब्सने जगातील प्रतिष्ठीत कंपन्यांची वार्षिक यादी जाहीर केली असून यामध्ये गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच एका भारतीय कंपनीला पहिल्या पाच प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये येण्याचा मान मिळाला आहे.
 • ‘इन्फोसिस’ ही आयटी कंपनी असून जगातील प्रतिष्ठीत कंपन्यांच्या फोर्ब्सच्या यादीत या कंपनीने तिसरे स्थान पटकावले आहे.
 • यामध्ये पहिल्या स्थानी ‘व्हिसा’ ही बँकिंग क्षेत्रातील आणि दुसऱ्या स्थानी ‘फेरारी’ या ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.
 • भारतातील टॉपची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनंतर नेटफ्लिक्स, पेपल, मायक्रोसॉफ्ट, वॉल्ड डिस्ने, टोयोटा, मास्टर कार्ड आणि कॉस्ट्को या कंपन्या पहिल्या दहा प्रतिष्ठीत कंपन्यांमध्ये आहेत.
 • तर टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस) या भारतीय आयटी कंपनीने गेल्या वर्षी ३५वे स्थान पटकावले होते. यंदा या कंपनीने २२व्या स्थानी झेप घेतली आहे.
 • जर्मन स्टॅटिस्टिक कंपनी स्टाटिस्टासोबत फोर्ब्सने जगातील २००० मोठ्या कंपन्यांची वार्षिक यादी जाहीर केली आहे. यामध्ये टॉप २५० उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या प्रतिष्ठित कंपन्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

निकष:-

 • या कंपन्यांची निवड करताना वापरण्यात आलेल्या निकषांमध्ये कंपनीची विश्वासार्हता, सामाजीक आचरण, कंपन्यांची उत्पादने आणि सेवांची क्षमता आणि मालक म्हणून कंपनीची निष्पक्षता या बाबींचा विचार करण्यात आला आहे.
 • जगातील ५० पेक्षा अधिक देशांमधून १५,००० कंपन्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २०१८ मध्ये या यादीत पहिल्या २५० कंपन्यांमध्ये १२ भारतीय कंपन्यांचा समावेश होता.
 • यंदा २०१९च्या यादीत इन्फोसिस, टीसीएस या टॉपच्या कंपन्यांसह टाटा मोटर्स, टाटा स्टील, एल अँड टी या भारतीय कंपन्यांचा देखील फोर्ब्सच्या यादीत समावेश झाला आहे. २०१८ च्या यादीत बऱ्याच भारतीय कंपन्यांचा समावेश होता. यंदाच्या यादीतही त्या कंपन्यांचा समावेश झाला असून त्यांचा क्रमांकही वधारला आहे.

सियाचीन पर्यटनासाठी खुलं करण्याचा लष्कराचा विचार

 • जगातील सर्वांच उंचावरील युद्धभूमी असलेला लडाखमधील सियाचीन ग्लेशिअरचा भाग आता सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय लष्कराकडून यासाठी परवानगी देण्याबाबत विचार सुरु आहे. या ठिकाणी आपले जवान किती बिकट परिस्थितीत देशाच्या सीमेचे रक्षण करतात याची माहिती लोकांना व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचे लष्कराच्या सुत्रांकडून कळते.
 • लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडल्याचे लष्करातील सुत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. यात म्हटले की, सियाचीनची सफर करताना सामान्य जनतेला आपले जवान किती कठीण परिस्थितीत येथे तैनात आहेत. त्यांना दररोज किती आव्हानांचा समाना करावा लागतो. इथल्या अत्यंत बिकट वातावरणात त्यांना कशा प्रकारे डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेचे रक्षण करावे लागते हे जवळून पाहता येईल.
 • नुकत्याच झालेल्या एका परिषदेत बोलताना लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी याचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की, सैन्याने यापूर्वीच त्यांच्या प्रशिक्षण संस्था सर्वसामान्यांना भेटीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यानंतर आता सीमेवरील लष्काराच्या पोस्ट ज्यामध्ये अतिउंचावरील सियाचीन ग्लेशिअर सारख्या ठिकाणांचाही समावेश असेल.
 • भारतीय लष्कराकडून सर्वसामान्य नागरिकांना सियाचीन ग्लेशिअरजवळच्या भागात जाण्यास परवानगी नाही. सध्या केवळ येथून जवळ राहणारे स्थानिक नागरिक आणि लष्करासाठी हमाल म्हणून काम करणाऱ्या स्थानिकांनाच येथे जाण्याची परवानगी दिली जाते. दरम्यान, या प्रस्तावावर अद्याप लष्कराकडून कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही.
 • एएनआयने दिलेल्या एका वृत्तानुसार, लडाखमध्ये पर्यटनासाठी येणारे नागरिक लष्कराकडे कारगिल युद्धाची जागा तसेच ‘टायगर हिल’ हे ठिकाण जे भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याशी लढा देऊन पुन्हा मिळवले होते. या ठिकाणी भेट दण्याची परवनागी मागतात. दरम्यान, समुद्रसपाटीपासून ११,००० हजार फुटांवर असलेल्या सियाचीन ग्लेशिअरमधील सियाचीन बेस कँम्पपर्यंत जाण्यासाठी भारताने सन २००७ पासून ट्रेकर्सना परवानगी दिली आहे.
24 Sep Current Affairs
24 Sep Current Affairs

रॉबर्ट बॉयड यांचे निधन

 • पत्रकारितेत बातमीदारीचा जो एक थरार असतो, तो शोध पत्रकार अनुभवत असतात. पण आता शोध पत्रकारिता ही अभावानेच आढळून येते. अमेरिकी पत्रकार रॉबर्ट एस. बॉयड यांनी १९७२ मध्ये शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना असलेली एक बातमी दिली होती. त्याचा विषय होता, उपाध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या थॉमस एफ. इगलटन यांच्या मानसिक आरोग्याचा संशयास्पद इतिहास. त्यावेळी इगलटन यांना मानसिक उपचारांचा भाग म्हणून विजेचे धक्के दिले जात होते. अशी व्यक्ती देशाच्या उपाध्यक्षपदी असणे योग्य नाही, एवढेच दाखवून देण्याचा हेतू या बातमीत होता. या बातमीनंतर इगलटन यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली. पत्रकारितेतील या यशकथेचे मानकरी असलेल्या बॉयड यांचे नुकतेच निधन झाले.
 • १९२८ साली शिकागोत जन्मलेले बॉयड १९४५ साली पदवीधर झाले. पुढे सीआयए या गुप्तचर संस्थेत काम करून ते पत्रकारितेकडे वळले. म्हणजे आधीचे क्षेत्र गुपिते शोधण्याचे आणि नंतरचे ती फोडण्याचे. परंतु कुठल्याही पत्रकाराला हेवा वाटावा असे गुण त्यांच्यात होते. १९६७ मध्ये त्यांनी ‘नाइट न्यूजपेपर्स’ व नंतर ‘नाइट रीडर’ या वृत्तपत्रात वॉशिंग्टनविषयक वृत्तप्रमुख म्हणून काम केले.
 • मृदुभाषी व्यक्तिमत्त्वाच्या बॉयड यांना सहा भाषा अवगत होत्या. पण त्यांनी कधी पांडित्याचा आव आणला नाही. राजकीय वर्तुळातील त्यांच्या बातम्या परिणामकारक असत, कारण त्यांच्या बातम्यांचे स्रोत हे आतल्या गोटातले असत. त्यांच्या वार्ताकन कामगिरीत त्यांनी क्युबाचा केलेला दौरा आणि नंतर १९७० मध्ये व्हिएतनाम युद्धावेळी हनोई येथे दिलेली भेट महत्त्वाची होती. अध्यक्ष रीचर्ड निक्सन यांच्यासमवेत ते १९७२ च्या फेब्रुवारीत चीनलाही जाऊन आले.
 • थॉमस इगलटन यांच्या मानसिक आरोग्याबाबत खात्रीलायक बातमी देताना त्यांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून माहिती मिळवली होती. त्यामुळे बॉयड यांच्या वृत्तान्तानंतर इगलटन यांना त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू असल्याची कबुली जाहीरपणे द्यावी लागलीच; शिवाय नंतर उमेदवारीही मागे घ्यावी लागली. या बातमीसाठी बॉयड यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या निधनाने एक बुद्धिमान आणि शेवटपर्यंत आजूबाजूच्या घडामोडींबाबत कुतूहल असलेला हाडाचा पत्रकार काळाआड गेला आहे.

[पुलित्झर पुरस्कारा विषयी माहिती मिळावा]

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »