27 August Current Affairs

27 August Current Affairs
27 August Current Affairs

पाकिस्तानने सतलजमध्ये सोडले दूषित पाणी

 • पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणे सुरूच असून, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरील चर्मोद्योगातील विषारी आणि दूषित पाणी सतलज नदीत सोडले आहे. त्यामुळे, पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील तेंडिवाला गावाजवळ नदीवरील बांध फुटल्याने आसपासच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतीवर दुष्परिणामांसह आजाराचा धोकाही बळावला आहे.
 • पुरामुळे सतलज नदीतील पाणी भारतातील पंजाबच्या काही भागातून पाकिस्तानात प्रवेश करते व पुन्हा पंजाब आणि भारतात वाहते. फिरोजपूरचे उपायुक्त चंदर गईंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पाकिस्तानच्या गंधासिंहवाला गावात चर्मोद्योग असून, या चर्मोद्योगातील दूषित पाणी सतलज नदीत सोडण्यात आले आहे. तेंडिवाला गावात सतलज नदी पुन्हा भारतात प्रवेश करते. या दूषित पाण्यामुळे केवळ शेतीच नव्हे; तर आरोग्यावरही परिणाम होत आहे. 
 • नदीच्या पाणीपातळीत होत असलेली वाढ लक्षात घेत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी रविवारी लष्करासोबत मिळून बांध दुरुस्तीचे आदेश दिले होते. लष्कराच्या प्रयत्नाने तेंडिवाला गावातील फुटलेले बांध दुरूस्त करण्यात आले असले, तरी फिरोजपूरमधील गावांत विषारी पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.'
 • मुख्यमंत्र्यांनी रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्य सचिवांना परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. तसेच, फिरोजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'एनडीआरएफ'चे पथक तैनात ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 
 • 'पूरस्थिती लक्षात घेऊन माखू आणि हुसैनीवाला गावातील ५०० हून अधिक जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच, ६३० जणांना आरोग्यसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. भारतातून सतलज नदीत जितके पाणी पाकिस्तानकडे जात आहे, त्याच्या दुप्पट प्रदूषित पाणी भारतीय क्षेत्रात वाहात आहे,' अशी माहिती फिरोजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 
   

एटीएममधून दुसऱ्यांदा पैसे काढण्यासाठी ६ तास थांबावं लागणार

 • एटीएममध्ये स्कीमर, हँकिंग करून अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी 'स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी'ने शिफारसी सुचवल्या आहेत. या शिफारसी लागू झाल्यास ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेळ बंधनं येणार आहेत.
 • एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये ग्राहकांना ६ ते १२ तासांचे अंतर ठेवावे लागणार आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये दिल्लीमध्ये १७९ एटीएम फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, महाराष्ट्रात २३३ प्रकरणे उघडकीस आली होती. 
 • देशभरात एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या ९८० झाली होती. या घटनांना आळा घालण्यासाठी दिल्लीत १८ बँकांच्या प्रतिनिधींसोबत 'स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी'ने चर्चा केली. या बैठकीत एटीएम मशीनद्वारे होणारी फसवणूक, लूट रोखण्यासाठी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. 
 • या चर्चेतून एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये वेळेचे बंधन घालण्याचा मुद्दा समोर आला होता. एटीएमच्या दोन व्यवहारांमध्ये ६ ते १२ तासांचे अंतर ग्राहकांना ठेवावे लागणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. 
 • या कमिटीचे निमंत्रक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे एमडी आणि सीईओ मुकेश कुमार जैन यांनी सांगितले की, एटीएम मशीनद्वारे होणारी फसवणूक, लूट मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेत करण्यात येते. 
 • त्यामुळे एटीएम व्यवहारावर बंधने घालण्याचा पर्याय समोर आला. त्याशिवाय या बैठकीत अनधिकृतपणे पैसे काढण्याचा प्रयत्न झाल्यास ग्राहकांना ओटीपी पाठवून अलर्ट करावे असा मुद्दाही समोर आला असल्याचे जैन यांनी सांगितले.
   
27 August Current Affairs
27 August Current Affairs

शेअर बाजारात अपेक्षित तेजी

 • ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सादर केलेल्या आर्थिक उपाययोजनांचे शेअर बाजाराने सोमवारी अपेक्षेनुसार जोरदार स्वागत केले. 
 • एफपीआयवर (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) लागू करण्यात आलेला अतिरिक्त करभार मागे घेतल्याचे सकारात्मक पडसाद मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारात उमटले. या दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेत गेल्या तीन महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. 
 • सेन्सेक्सने ७९३ अंकांच्या वाढीसह ३७४९४चा टप्पा गाठला. तर, २२८ अंकांच्या वाढीसह निफ्टी दिवसअखेरीस ११०५७वर स्थिरावला. 
 • या वृद्धीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.४१ लाख कोटी रुपयांची भर पडली. सुरुवातच धडाक्यात सोमवारी सुरुवातीच्या सत्रापासून निर्देशांक वाढत गेला. 
 • ६६३ अंकांच्या वाढीसह उघडलेला निर्देशांक सत्रांतर्गत व्यवहारांमध्ये १०५२पर्यंत वधारला होता. मात्र दिवसअखेरीस त्यात काहीशी घसरण झाली. निर्मला सीतारामन यांनी जवळपास प्रत्येक क्षेत्रांसाठी आर्थिक उपाययोजना घोषित केल्याने ऑटो वगळता सर्व प्रकारच्या समभागांना मोठी मागणी होती. 
 • गुंतवणूकदारांच्या या उत्साहाला जोड मिळाली ती अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध निवळण्याच्या शक्यतेची. उभय देशांत पुन्हा एकदा चर्चा सुरू होईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने बाजारसत्राच्या उत्तरार्धात समभागखरेदीचा जोर आणखी वाढला. 
 • हे वधारले सेन्सेक्समध्ये २.१६ तर, निफ्टीमध्ये २.११ टक्के वृद्धी झाली. सेक्टरनिहाय विचार करता बँका, वित्त, रिअल्टी, कॅपिटल गुड्स, उद्योग, दैनंदिन गरजेच्या वस्तू (एफएमसीजी) आदी समभागांना मोठी मागणी होती. 
 • गेले काही दिवस गटांगळ्या खाणाऱ्या येस बँकेच्या समभागाने सर्वाधिक कमाई केली. एचडीएफसी, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, स्टेट बँक, अॅक्सिस बँक, कोटक बँक आदींचे समभाग ५.२४ टक्क्यांपर्यंत वधारले. 

२२ दोषी अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

 • भ्रष्टाचारासह अन्य गंभीर आरोप असणाऱ्या कर विभागातील २२ अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने सोमवारी सक्तीने निवृत्त केले. जीएसटी व आयात कराचे नियमन करणाऱ्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळातर्फे (सीबीआयसी) अधीक्षक पदापर्यंतच्या श्रेणीतील या अधिकाऱ्यांवर फंडामेंटल रुल ५६ (जे) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. 
 • या २२ अधिकाऱ्यांमध्ये नागपूर व भोपाळ विभागातील ११ अधिकाऱ्यांचा तर, मुंबई, जयपूर व बेंगळुरू विभागांतील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापूर्वी जूनमध्ये महसूल विभागातील २७ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त करण्यात आले होते. 
 • कर विभागातील काही अधिकारी अधिकारांचा गैरवापर करून अनावश्यक कारवाईद्वारे सर्वसामान्य करदात्यांना त्रास देतात. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना केले होते.
   
27 August Current Affairs
27 August Current Affairs

आरबीआय देणार केंद्राला १ लाख ७६ हजार कोटी

 • केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून लाभांश व अतिरिक्त राखीव निधीपोटी १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीपैकी किती निधी सरकारकडे वर्ग करता येईल यासाठी सरकारने नेमलेल्या बिमल जालन समितीने सोपवलेला अहवाल रिझर्व्ह बँकेने सोमवारी स्वीकारला. देशातील आर्थिक मंदीची चिंता व्यक्त होत असतानाच, सरकारला या निधीमुळे दिलासा मिळाला आहे.
 • जालन समितीने केलेल्या शिफारशी रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्याने केंद्र सरकारला हा निधी मिळणार असून, यामध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षातील १ लाख २३ हजार ४१४ कोटी रुपये अतिरिक्त निधीचा समावेश आहे. 
 • उर्वरीत रकमेत ५२ हजार ६३७ कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतुदींचा समावेश आहे. अतिरिक्त तरतुदींची ही रक्कम आर्थिक भांडवल आराखड्यानुसार (ईसीएफ) निश्चित करण्यात आली, असे रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटले आहे. 
 • रिझर्व्ह बँकेची आर्थिक लवचिकता, बँकेचे देशभरातील व्यवहार, कायदेशीर तरतुदी, रिझर्व्ह बँकेच्या सार्वजनिक धोरणाविषयीचे आदेश, बँकेचा ताळेबंद, संभाव्य धोके आदी सर्व गोष्टी लक्षात घेऊन जालन समितीने या शिफारशी केल्या आहेत, अशी माहितीही 'आरबीआय'ने दिली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपीच्या (एकूण राष्ट्रीय उत्पादन) तुलनेत वित्तीय तूट ३.३ टक्क्यांपर्यंत राखण्याचे उद्दिष्ट सरकारने आखले आहे. 
 • रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या या निधीमुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यात सरकारला मदत होईल. रिझर्व्ह बँकेतील निधीबाबत निर्णय घेण्यासाठी यापूर्वी व्ही. सुब्रमण्यम (१९९७), उषा थोरात (२००४) आणि वाय. एच. मालेगाम (२०१३) अशा तीन समित्या नेमण्यात आल्या होत्या. 
 • तातडीचा निधी म्हणून रिझर्व्ह बँकेच्या एकूण मालमत्तेच्या १८ टक्के निधी राखीव ठेवावा, अशी शिफारस थोरात समितीने केली होती. तर, हा निधी १२ टक्के असावा, असे सुब्रमण्यम समितीने सुचवले होते.

‘आरबीआय’कडे एकूण निधी ९.६० लाख कोटी:-

 • रिझर्व्ह बँकेकडे सध्या ९ लाख ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आहे. या निधीतील काही हिश्श्याची केंद्र सरकारने मागणी केल्याची वृत्ते प्रसिद्ध झाल्याने गेल्या वर्षी वाद निर्माण झाला होता. सरकारकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले होते. 
 • सहा सदस्यीय जालन समितीची २६ डिसेंबर, २०१८मध्ये स्थापना करण्यात आली. जालन अध्यक्ष असलेल्या समितीच्या उपाध्यक्षपदी माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन आहेत. अन्य सदस्यांमध्ये वित्तीय सचिव सुभाषचंद्र गर्ग, डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन आणि रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डाचे सदस्य असणाऱ्या भरत दोशी आणि सुधीर मांकड यांचा समावेश आहे. 
 • समितीच्या पहिल्या बैठकीनंतर ९० दिवसांच्या आत हा अहवाल सोपविण्याचे ठरविण्यात आले होते. या समितीची पहिली बैठक ८ जानेवारीला झाली. पहिल्या बैठकीनंतर ९० दिवसांच्या कालावधीत समितीने रिझर्व्ह बँकेला अहवाल देणे अपेक्षित होते. मात्र, समितीमधील सहा सदस्यांमध्ये एकमत होत नसल्याने एकूण तीन बैठका घ्याव्या लागल्या. यामधील गर्ग यांनी हा निधी देण्यास विरोध केला होता.

या कायद्याचा आधार:-

 • बुडीत व संशयित कर्जांसाठी केलेली तरतूद, मालमत्तांचा घसारा, कर्मचाऱ्यांच्या 'पीएफ'मधील अंशदान, कर्मचारी निवृत्ती वेतनासाठीची तरतूद व बँकेच्या कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व तरतुदी केल्यानंतर नफ्याचा उर्वरित हिस्सा हा रिझर्व्ह बँकेने सरकारला पूर्णपणे द्यावा, असे रिझर्व्ह बँक कायद्याच्या कलम ४७मध्ये म्हटले आहे. त्याचाच आधार घेत रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला निधी देण्याचे पाऊल उचलले आहे.

यूएस ओपन कडव्या झुंजीनंतर सुमितचा फेडररकडून पराभव

 • भारताच्या सुमित नागलला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत पुरुष एकेरीत महान खेळाडू रॉजर फेडररसमोर पराभव पत्करावा लागला. पण पहिलाच सेट मात्र सुमितने ६-४ असा जिंकला. कडवी झुंज देत ६-४, १-६, २-६, ४-६ ने नागल हरला. 
 • सुमितबरोबरच भारताचा प्रज्ञेशही अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत खेळतो आहे. भारताचे दोन खेळाडू एका ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीत खेळण्याची ही भारताची १९९८नंतरची पहिलीच वेळ आहे. 
 • ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळायला मिळणे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. पात्रता फेरी जिंकून सुमितने यूएस ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेशाचे स्वप्न पूर्ण केले. 
 • २० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या दिग्गज फेडररसमोर टिकाव लागणे ही सोपी गोष्ट नसतानाही सुमीतने या सामन्यात अखेरपर्यंत चिवट झुंज दिली. २२ वर्षीय सुमित हा मुळचा हरयाणाचा आहे.
   
27 August Current Affairs
27 August Current Affairs

चिदंबरम यांची १३ देशांत मालमत्ता ईडी चे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

 • आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात चौकशी सुरू असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची विदेशातही संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सहआरोपींसह चिदंबरम यांनी परदेशात संपत्ती विकणे आणि परदेशी बँक खाती बंद केल्याच्या पुराव्याशी छेडछाड केली आहे. चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना ईडीने सुप्रीम कोर्टात हा युक्तीवाद केला आहे. 
 • चिदंबरम यांची बँक खाती अनेक देशांमध्ये आहेत. अर्जेंटिना, ऑस्ट्रीया, ब्रिटीश वर्जिन, आइसलँड, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनाको, फिलीपाइन्स,सिंगापूर, द. आफ्रिका, स्पेन, श्रीलंका या देशांत त्यांनी मालमत्ता बनवून बँक खातीही उघडली आहे. 
 • बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या खात्यांमध्ये देण्या-घेण्याचे व्यवहार झाले आहेत, असं ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. 
 • चिदंबरम यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीने त्यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड करण्याचा तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप लावला आहे. ईडीच्या प्रतिज्ञापत्रावरून असे दिसत आहे की ईडीचा फास हळूहळू चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्यापर्यंतदेखील पोहोचणार आहे. कार्ती यांना तूर्त मद्रास हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
   

चंद्रपूरमध्ये दीड महिन्यात चार वाघांची शिकार

 • गेल्या दीड महिन्यात जिल्ह्य़ात चार वाघांची विषप्रयोगातून शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तीन वाघिणी आणि एका वाघाचा समावेश आहे. आठ महिन्यांत विदर्भात १२ वाघांचा मृत्यू झाला आहे.
 • महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमावर्ती भागात मध्य चांदा वन विभागाच्या पोडसा (जुना) शिवारात शनिवारी विषप्रयोगाद्वारे वाघिणीची शिकार करण्यात आल्याचे आढळले. विशेष म्हणजे, वाघिणीच्या मृतदेहापासून शंभर मीटर अंतरावर रानडुकराचा मृतदेह सापडला. 
 • रानडुकराच्या मृतदेहावर विष टाकून वाघिणीची शिकार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ जुलै रोजी चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावाजवळ वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्यावरही विषप्रयोग करण्यात आला होता. याप्रकरणी शेतकरी पांडुरंग चौधरी याला वन विभागाने अटक केली आहे. गेल्या ४७ दिवसांत विषप्रयोगाद्वारे चार वाघांचा मृत्यू झाला.
 • विषप्रयोगातून झालेल्या व्याघ्र मृत्यूंना मानव-वन्यजीव संघर्षांची किनार आहे. जिल्हय़ात जंगलालगत शेती आहे. त्यामुळे जंगलातून वाघ, बिबटय़ासह इतर वन्यप्राणी शेतात येतात. शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करतात. 
 • वाघ, बिबटय़ाची या भागात मोठी दहशत आहे. हल्ल्याच्या भीतीने ग्रामस्थ शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडतात. त्यात वाघांबरोबरच ग्रामस्थांचेही बळी जात आहेत. वीजप्रवाहाचा वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठीही वापर होत आहे.
   
27 August Current Affairs
27 August Current Affairs

प्रशिक्षक भावसार आणि दीपिकावर पाच वर्षांची बंदी

 • महाराष्ट्राच्या महिला संघाचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पाच जणांवर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली आहे. या समितीने प्रशिक्षक राजू भावसार आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपिका जोसेफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे, तर कर्णधार सायली केरिपाळे, स्नेहल शिंदे आणि व्यावस्थापिका मनीषा गावंड यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याचप्रमाणे संघातील अन्य नऊ खेळाडूंना ताकीद देण्यात आली आहे.
 • रविवारी राज्य कबड्डी संघटनेच्या शिवाजी पार्क येथील कार्यालयात शिस्तपालन समितीचे अध्यक्ष देवराम भोईर आणि सचिव मंगल पांडे यांनी महाराष्ट्राच्या महिला संघाची कसून चौकशी केली. यात खेळाडूंची लेखी कारणमीमांसा परीक्षासुद्धा घेण्यात आली. त्यानंतर उपलब्ध माहिती आणि सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे शिस्तपालन समितीने महाराष्ट्राच्या पराभवाबद्दल या पाच जणींवर प्रमुख ठपका ठेवला आहे.
 • भावसार आणि गावंड यांच्यासहित पुण्याच्या तीन वरिष्ठ खेळाडूंवर शिस्तपालन समितीने चौकशीअंती जवळपास १० आरोप ठेवलेले आहेत. भावसार यांना प्रशिक्षकाची जबाबदारी योग्य रीतीने निभावली नाही आणि संघाला पराभवासाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दीपिका, सायली आणि स्नेहल या खेळाडूंची वागणूक बेशिस्त होती. याचप्रमाणे गावंड यांच्याकडून व्यवस्थापिकेची भूमिका बजावताना निष्काळजीपणा आढळून आला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »