28 July Current Affairs

28 July Current Affairs
28 July Current Affairs

जास्त ऊर्जेच्या वैश्विक किरणांचे स्रोत दीर्घिका समूहात शोधण्यात यश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुकातील संशोधकांची कामगिरी

विश्वातून पृथ्वीकडे येणाऱ्या अतिजास्त ऊर्जेच्या वैश्विक किरणांचे स्रोत शोधून काढण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुकाच्या संशोधकांनी केलेल्या या संशोधनातून दीर्घिका समूहांमध्ये तयार होणाऱ्या वैश्विक किरणांविषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकात अभ्यागत प्राध्यापक असलेल्या डॉ. सुरजित पॉल यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक चमूने ही कामगिरी केली. वैश्विक किरणांची निर्मिती दीर्घिका समूहांमध्ये कशा प्रकारे होते याची प्रक्रिया या संशोधनातून उलगडली आहे. आयुकाच्या उच्च क्षमता महासंगणन प्रणालीच्या मदतीने दीर्घिका समूहांच्या टकरींचा अभ्यास करण्यात आला असून, दीर्घिका समूहातील गॅमा किरण दिसत नाहीत, याचे दीर्घकाळ अनुत्तरित असलेले कोडे वैश्विक किरणांच्या टप्प्यांच्या अभ्यासातून उलगडले आहे. लंडनच्या ‘मंथली नोटिसेस ऑफ रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ या प्रतिष्ठित नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला.

जगात फर्मी लॅट, हेस, मॅजिक या संवेदनशील गॅमा रे दुर्बिणी उपलब्ध असतानाही दीर्घिका समूह हे गॅमा किरणांचे स्रोत आहेत याचे आतापर्यंत वैज्ञानिक निरीक्षण करता आले नव्हते. कणांच्या त्वरण प्रणालीचे कमी ज्ञान किंवा दुर्बिणींची कमी संवेदनशीलता ही आतापर्यंत स्रोत न सापडण्याची कारणे होती. प्रत्यक्षात, निरीक्षणासाठी चुकीच्या दीर्घिका निवडण्यात आल्याने या किरणांचे स्रोत आधी सापडू शकले नव्हते. दीर्घिका समूह हे विश्वातील सर्वांत मोठे घटक मानले जातात. त्यांचा आकार १० चा विसावा घात किलोमीटर आणि वस्तुमान १० चा ४५ वा घात किलो इतके असते. यात आपल्या आकाशगंगेसारख्या अनेक दीर्घिका असतात. या दीर्घिकासमूहांमध्ये अतिशय जास्त ऊर्जेच्या प्रक्रिया घडत असतात. समूहांचे विलीनीकरण होत असताना सर्वात जास्त ऊर्जा असलेली प्रक्रिया घडून येत असते. त्यात उच्च ऊर्जायुक्त क्ष किरण, गॅमा किरण यांची निर्मिती होते. थोडक्यात, गॉड पार्टिकल शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महाकाय लार्ज हायड्रॉन कोलायडर यंत्रासारखे अनेक नैसर्गिक प्रवेगक या दीर्घिका समूहात कार्यरत आहेत. याशिवाय ते समूह १० चा १९ वा घात इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी ऊर्जा असलेल्या वैश्विक किरणांचे भांडार आहेत. पॉल यांच्यासह पीएचडी स्नातक विद्यार्थी डॉ.रेजू सॅम जॉन संशोधनात सहभागी आहेत.

संशोधनाचे महत्त्व

दीर्घिका समूहांच्या टकरी होतात तेव्हा उच्च ऊर्जा वैश्विक किरण तयार होतात. दीर्घिका समूहांच्या टकरी आणि विलीनीकरणाच्या काळात कणांचे त्वरण खूप वाढून मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा निर्माण होत असते. यातील दीर्घिका समूहांचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो, त्यामुळे तो स्वनातीत होतो. यातील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे भारित कण या समूहांमध्ये मोठय़ा प्रमाणात असतात. ते सतत धक्क्य़ांना तोंड देत असल्याने त्यांचा प्रवेग वाढत जात, शेवटी तो इतका वाढतो,की ते या दीर्घिका समूहाच्या माध्यमातून बाहेर पडतात. या प्रक्रियेला ‘डिफ्यूजिव्ह शॉक अ‍ॅक्सिलरेशन’ म्हणतात. ही प्रक्रिया पहिल्यांदा नोबेल प्राप्त एनरिको फर्मी यांनी सांगितली होती. संशोधक चमूने अभ्यासासाठी संगणकाच्या मदतीने अचूक लक्ष्य दीर्घिका समूहांची निवड केल्याने त्यांना गॅमा किरणांच्या स्रोताचे कोडे सोडवता आले. दीर्घिका समूह निर्मिती प्रक्रिया ही वैश्विक काल परिमाणात घडत असते. तो काळ काही गिगा ( १० चा ९ वा घात) वर्षांचा असतो. त्यामुळे अशी उत्क्रांत प्रक्रिया अभ्यासणे माणसाला अशक्य आहे. यात काल परिमाण, या दीर्घिका समूहांचा आकार हे फार मोठे आहे. त्यामुळे प्रयोगशाळेत त्यांचा अभ्यास शक्य नसतो. त्यामुळे त्याचे सैद्धांतिक सादृश्यीकरण केले जाते. वैश्विक किरण निर्मिती प्रक्रियेचा अलगॉरिदम याच संशोधक चमूने तयार केला आहे. या संशोधनात तीन महिन्यात एकाच वेळी १००० सीपीयू (संगणकाचा मुख्य घटक) वापरण्यात आले. विश्वाच्या महाकाय आकाराचे संगणकीय सादृश्यीकरण एकाच केंद्रात मर्यादित संगणकांनी करायचे असल्यास या संशोधनाला २५० वर्षे लागू शकतात.

पृथ्वीवर उच्च ऊर्जायुक्त असलेले अनेक कण येत असतात. त्यांना वैश्विक किरण असे म्हणतात. ते पृथ्वीच्या वातावरणात सतत आदळत असतात. त्यांच्यातील जास्त ऊर्जायुक्त कण पृथ्वीवर येतात. गेल्या शतकापासून आपण वैश्विक किरणांचा अभ्यास करीत आहोत. हे वैश्विक किरण सूर्यापासून येत असतात असे मानले जाते, पण या वैश्विक किरणांचे स्रोत हे नेहमीच गूढ राहिले आहे. आमच्या संगणकांच्या मदतीने वैश्विक किरणांचे कोडे उलगडण्यात यश आले याचा आनंद आहे. या कणांच्या निर्मिती प्रक्रियांचे सादृश्यीकरण आयुकातील संगणकांच्या मदतीने करण्यात आले. 

लोकशाही पुरस्काराने एसपी देशमुख सन्मानित

राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा पहिला 'लोकशाही पुरस्कार' कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते.

मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते डॉ. देशमुख यांना 'लोकशाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी गडचिरोली येथे कार्यरत असताना मुक्त व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडल्याबद्दल त्यांचा हा गौरव झाला. त्यांनी या भागात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते. डॉ. देशमुख यांनी यापूर्वी ठाणे, भंडारा, सातारा, पुणे, गडचिरोली येथे काम पाहिले आहे. पोलिसांसाठी विविध उपक्रम राबविले असून, दरोडेखोरांच्या टोळ्या, संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. एप्रिल २०१८ ला गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादीविरोधी कारवाया त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. त्यांनी आजपर्यंत अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा येथील मटका बुकीचालकांची पाळेमुळे उखडली आहेत. कोल्हापुरातील ४० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारी टोळ्यांना त्यांनी मोक्का लावला आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सरकारने त्यांना यापूर्वी पोलिस महासंचालक यांचे पदक प्रदान केले आहे.

28 July Current Affairs
28 July Current Affairs

US वरुन ४ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर भारतात हवाई दलाची ताकद वाढणार

अमेरिकेच्या प्रसिद्ध बोइंग या लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपनीची ४ अपाचे हेलिकॉप्टर शनिवारी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाली. या लढाऊ हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. भारताने अमेरिकन कंपनीसोबत २२ अपाचे खेरेदी करण्याचा करार केला आहे. यातीलच ही ४ हेलिकॉप्टर आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील ४ हेलिकॉप्टर पुढील आठवड्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. कोटयवधींच्या खरेदी करारला अवघी ४ वर्षे उलटून गेल्यानंतर पहिल्या टप्प्यातील हेलिकॉफ्टर भारताला मिळाली आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, '' दुसऱ्या टप्प्यातील ४ हेलिकॉफ्टर भारताकडे सूपूर्द केल्यानंतर ८ हेलिकॉफ्टर सप्टेंबरमध्ये अधिकृतरित्या पठाणकोट येथील हवाई तळाच्या ताफ्यात दाखल होतील. 

मनासारखे मानसशास्त्रज्ञ न लाभल्याने कामगिरीवर परिणाम ऑलिम्पियन राही सरनोबतची खंत

नेमबाजी हा पूर्णत: मानसिकतेचा खेळ आहे, हे ऑलिम्पिकमधील अनुभवातून मला चांगले लक्षात आले. या खेळात यश मिळविण्यासाठी आवश्यक मानसशास्त्रज्ञांची देशात कमतरता नाही. परंतु, हवे तसे मानसशास्त्रज्ञ आपल्या नेमबाजांना मिळत नाही, यामुळे कामगिरीवर परिणाम होतो, अशी खंत आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने शुक्रवारी व्यक्त केली. 
आयएसएसएफ विश्वचषकातील २ सुवर्णपदकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला अनेक पदके जिंकून दिलेल्या राहीचा पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ऑलिम्पिक तयारीविषयी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. या वेळी राही म्हणाली, ‘‘नेमबाजीमध्ये प्रत्यक्ष नेम साधताना खेळाडूची मानसिकता कशी आहे, यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. खेळाडूंची मानसिकता कायम उच्च दर्जाची राहावीख यासाठी चांगला मानसशास्त्रज्ञ त्याच्यासोबत असणे अनिवार्य आहे. नेमबाजाला खेळाच्या प्रशिक्षणासोबतच मानसिकतेचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.’’
२०२०मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी २०१७ पासून सुरू केली आहे. यासाठी जर्मन प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेत आहे. कारकिर्दीतील हे दुसरे ऑलिम्पिक असल्याने अनुभवाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. ऑलिम्पिकचा दबाव पेलण्याचे प्रमुख आव्हान खेळाडूंसमोर असते, असेही राहीने नमूद केले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
‘राष्ट्रकुल’मधून नेमबाजी वगळल्याचा फटका भारताला बसणार 
राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी हा क्रीडाप्रकार वगळण्यात आला आहे. आजवरचा स्पर्धा इतिहास बघता भारताला सर्वाधिक पदके ही नेमबाजीतून मिळतात. त्यामुळे यापुढे राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याच्या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसणार आहे. यामुळे भारताची पदकसंख्या लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. ‘राष्ट्रकुल’मधील इतर देशांनी त्यांचे हित पाहून हा निर्णय घेतला आहे. भारताच्या दृष्टीने मात्र हा निर्णय नुकसानकारक आहे, असेही राहीने सांगितले.

28 July Current Affairs
28 July Current Affairs

क्रिकेटर मोहम्मद शामीचा अमेरिकेचा मार्ग मोकळा

बीसीसीआयने विनंती केल्याने क्रिकेटर मोहम्मद शामीला अमेरिकेचा व्हिसा मिळाला आहे. भारतीय गोलंदाज मोहम्मद शामीला अमेरिकेने व्हिसा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेत होणाऱ्या टी-२० सामन्याच्या मालिकेत मोहम्मद शामीला खेळता येणार आहे. बीसीसीआयने मध्यस्थी केल्यामुळे शामीचा अमेरिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिकेतील टी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळणार
क्रिकेटर मोहम्मद शामीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसेचे खटले सुरु असल्याचे कारण देत अमेरिकन दुतावासाने त्याला व्हिसा नाकारला होता. यावेळी बीसीसीआयने शामीला अमेरिकन व्हिसा मिळण्यासाठी विनंती केली. त्यामुळे अमेरिकेत होणाऱ्या आगामी टी२० मालिकेत मोहम्मद शमी खेळताना दिसेल.

बीसीसीआयकडून पत्राद्वारे शामीच्या कामाची माहिती
काही दिवसांपूर्वी क्रिकेटर मोहम्मद शामीने मुंबईतील अमेरिकेच्या दुतावासात व्हिसासाठी अर्ज केला होता. शामीची पत्नी हसीन जहाँ हिने त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसेचा खटला दाखल केला आहे. हेच कारण पुढे करत अमेरिकेन दुतावासाने शामीचा व्हिसासाठीचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी शामीच्या व्हिसासाठी अमेरिकन दुतावासाला पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी शामीच्या उत्कृष्ट कामगिरीची देत, त्याला व्हिसा मंजूर करण्याची मागणी केली. पत्राची दखल घेत तसेच बीसीसीआयच्या विनंतीमुळे अमेरिकेने शामीला व्हिसा मंजूर केला. सोमवारी २९ जुलै रोजी शामी अमेरिकेसाठी रवाना होणार आहे. अमेरिकेत भारत तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

गोष्ट छोटी हिमा लया एवढी

विश्वचषकातील भारतीय क्रिकेट संघाचे अपयश चाहत्यांना विसरायला लावणाऱ्या दोन घटना म्हणजे इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील चित्तथरारक पद्धतीने ‘टाय’ झालेला अंतिम सामना आणि हिमा दासची सुवर्णपदकांची लयलूट. विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना हिमाने सुवर्णपदकांचा धडाका लावला होता; पण प्रसारमाध्यमांनी हिमाची म्हणावी तशी दखल घेतली नाही. उपांत्य फेरीत गारद होणाऱ्या भारतीय संघावर टीकेचा भडिमार करणाऱ्या चाहत्यांनी हिमाला समाजमाध्यमांवर अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. १९ दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पाच सुवर्णपदके जिंकणे, ही किमया आतापर्यंत कुणाही भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटूला साधता आली नाही; पण हिमाचे हे यश खरोखरच अव्वल दर्जाचे आहे का? तर नक्कीच नाही.

देशात क्रीडासंस्कृती फारशी रुजली नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या ताऱ्यालाही क्षणार्धात ध्रुवतारा बनवले जाते. क्रिकेटवेडय़ा भारतात अन्य खेळांचे मूल्यमापनच केले जात नाही. हिमाचे यश गौरवास्पद असले तरी त्याकडे स्पर्धात्मक वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. हिमा ज्या पाच स्पर्धामध्ये सहभागी झाली, त्या स्पर्धाचे महत्त्व, दर्जा, सहभागी होणारे खेळाडू, त्या खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी हेसुद्धा तपासण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (आयएएएफ) आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा ‘ए’ ते ‘एफ’ या श्रेणीत मोडतात. हिमा सहभागी झालेल्या पाचपैकी फक्त तीन स्पर्धानाच ‘आयएएएफ’ची मान्यता होती. म्हणजेच ‘ई’ किंवा ‘एफ’ श्रेणीत मोडणाऱ्या या स्पर्धा म्हणजे आपल्याकडील राष्ट्रीय स्पर्धेपेक्षा थोडय़ा वरच्या दर्जाच्या.

युरोप आणि आफ्रिकन देशांमधील अव्वल धावपटू आपली कामगिरी सुधारण्यासाठी कडवी चुरस असणाऱ्या स्पर्धाना महत्त्व देतात. त्यामुळे अन्य देशांतील उरलेसुरलेले धावपटू तुलनेने कमी स्पर्धात्मक दर्जा असलेल्या स्पर्धाची निवड करतात. भारतीय धावपटूंच्या वाटय़ालाही अशाच प्रकारच्या दुय्यम दर्जाच्या स्पर्धा येतात. एप्रिल महिन्यात झालेल्या दोहा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत हिमा पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकली नव्हती. त्यामुळे तिचे स्पर्धात्मक पुनरागमन कसे करायचे, हा प्रश्न हिमाच्या प्रशिक्षकांना होता. म्हणूनच २०० मीटर शर्यतींमध्ये फारशी सहभागी न होणाऱ्या हिमावर अतिरिक्त जबाबदारी सोपवायची, याच उद्देशाने तिला याच गटाच्या पहिल्या चार स्पर्धासाठी उतरवण्यात आले. या चारही स्पर्धामध्ये हिमाची कामगिरी २३.६५ सेकंद, २३.९७ सेकंद, २३.४३ सेकंद आणि २३.२५ सेकंद अशी होती. जगाच्या धावपटूंमध्ये तुलना करायची झाल्यास, तिची २३.२५ ही सर्वोत्तम कामगिरी या वर्षांत १२८व्या क्रमांकावर जाते. या चारही स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या २० प्रतिस्पध्र्याची कामगिरी ही हिमाच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आसपासही नाही. अनेक प्रतिस्पध्र्याचा ‘आयएएफएफ’च्या संकेतस्थळावर नामोल्लेखही नाही.

४०० मीटर हा हिमाचा सर्वात आवडता प्रकार. चेक प्रजासत्ताकमधील नोव्ह मेस्टो स्पर्धेत ५२.०९ सेकंद अशी कामगिरी करत हिमाने पाचवे सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावणाऱ्या पहिल्या १० जणींमध्ये सात खेळाडू भारताच्या होत्या. त्यात हिमा वरचढ ठरली एवढेच. जर सर्व खेळाडू भारताच्याच होत्या तर भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ खेळाडूंच्या युरोपवारीवर एवढा खर्च करण्यापेक्षा त्यांच्यात भारतात स्पर्धा का भरवत नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. ‘साइ’ आणि राष्ट्रीय संघटनेने याचे उत्तर देण्याची गरज आहे.

पाचही सुवर्णपदकांनंतर हिमाला अद्याप दोहा येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र होता आले नाही. या स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता २०० मीटरसाठी २३.०२ सेकंद आणि ४०० मीटरसाठी ५१.८० सेकंद असे निकष आहेत; पण हिमाची सर्वोत्तम कामगिरी आणि पात्रता निकषांमध्ये बरेच अंतर आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत हिमाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. ऑलिम्पिकसाठी हे निकष अधिकच कठीण होणार आहेत.

या सुवर्णपदकांमुळे हिमाचा आत्मविश्वास उंचावला असून तिला चांगली कामगिरी करण्याचे बळ मिळाले आहे. पी. टी. उषा, मिल्खा सिंग यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी हिमाच्या रूपाने देशवासीयांना अ‍ॅथलेटिक्समध्ये पदकाची आशा दिसू लागली आहे. गरुडभरारी घेण्यासाठी हिमाला योग्य वेळी प्रोत्साहन मिळाले तरच तिच्याकडून जागतिक आणि ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहता येईल.

कोणत्याही स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू कसून तयारी करत असतात. त्यांच्यासमोर कोणता प्रतिस्पर्धी उभा राहणार, याची चिंता धावपटूंना नसते. त्याचबरोबर कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचे, याचा निर्णय खेळाडूंनी घेतलेला नसतो. तो मैदानात झोकून देण्यासाठी सज्ज झालेला असतो. त्यामुळे स्पर्धेच्या दर्जाने किती उंची गाठली आहे, हे खेळाडूंच्या ध्यानीमनी नसते. हिमाने खूपच चांगली कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. आगामी स्पर्धामध्ये तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. जर स्पर्धेचा दर्जा खालच्या स्तरावरचा असता आणि हिमाला सुवर्णपदक जिंकता आले नसते तरी तिच्यावर टीका झाली असती. वयाच्या २०व्या वर्षी हिमाने स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे या हिमाच्या या यशात तिला पाठिंबा देणे गरजेचे आहे.

28 July Current Affairs
28 July Current Affairs

आशीष कुमारला सुवर्ण

आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या आशीष कुमारने शनिवारी पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पध्रेत भारताने आठ पदकांची कमाई केली. जगातील ३७ देशांच्या बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या या स्पध्रेत भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. अखेरच्या दिवशी माजी कनिष्ठ विश्वविजेती निखात झरीन (५१ किलो), आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेता दीपक (४९ किलो), गीबी बॉक्सिंग स्पध्रेतील रौप्यपदक विजेता मोहम्मद हसमुद्दीन (५६ किलो) आणि इंडिया खुल्या स्पध्रेतील रौप्यपदक विजेता ब्रिजेश यादव (८१ किलो) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ७५ किलो वजनी गटात आशीषने कोरियाच्या किम जिनजाईचा ५-० असा पराभव केला. इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पध्रेत रौप्यपदक जिंकणाऱ्या आशीषने दोन महिन्यांत आणखी एका पदकाची कमाई केली. स्ट्रँडजा चषक स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या निखातचा आशियाई क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या चँग युआनपुढे निभाव लागला नाही. चँगने निखातला ५-० अशी धूळ चारली. ५६ किलो गटात थायलंडच्या चाटचाय डेशा बुटडीने हसमुद्दीनचा ५-० असा पराभव केला. ४९ किलो गटात दीपकने उझबेकिस्तानच्या मिर्झाखमेदोव्ह नॉदिजॉनला नमवले. ८१ किलो गटात थायलंडच्या अनावट थाँगक्रॅटॉव्हने ब्रिजेश यादवचा ४-१ असा पाडाव केला.

छत्तीसगडमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्हय़ातील जंगलामध्ये मंगळवारी पोलिसांनी एका चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा केला आहे. मडकम हिडमा असे या मृत नक्षलवाद्याचे नाव असून त्याच्या विरोधात 1 लाख रुपयांचे इनाम घोषित होते. पोलिसांचे पथक जंगलात शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला असता जवानांनी प्रत्युत्तर दिल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
28 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »