30 July Current Affairs

30 July Current Affairs
30 July Current Affairs

देशातील व्याघ्रसंख्येत चार वर्षांत ७४१ने वाढ

मृत्यूच्या प्रमाणातही वृद्धी; व्याघ्रगणना अहवाल जाहीर

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त दिल्लीत जाहीर केलेल्या अखिल भारतीय व्याघ्रगणना २०१८च्या अहवालानुसार चार वर्षांत देशभरातील वाघांची संख्या ७४१ ने, तर राज्यातील १२२ ने वाढली आहे. मात्र, याच काळात वाघांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे अहवालावरून दिसून येते. वाघांच्या वाढत्या मृत्यूबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

जाहीर केलेल्या व्याघ्रगणनेच्या आकडेवारीनुसार देशातील वाघांची संख्या चार वर्षांत २२२६ वरून २९६७ वर पोहोचली आहे. २०१४च्या तुलनेत वाघांची संख्या ७४१ने वाढली आहे. व्याघ्रगणना अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जाहीर केला.

सेंट पिट्सबर्ग येथे नऊ वर्षांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेत वाघांची संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय सर्व सहभागी देशांनी निश्चित केले होते. भारताने हे ध्येय चार वर्षे आधीच गाठले आहे. भारत हा वाघांसाठी सुरक्षित देश आहे. मात्र, देशातील वाघांची कमी होणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे ‘एक था टायगर’पासून ‘टायगर जिंदा है’पर्यंतचा प्रवास थांबता कामा नये, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

विकास विरुद्ध पर्यावरण संवर्धन हा संघर्ष जुनाच आहे. दोन्ही बाजूंनी मते मांडली जात असतात, पण या दोन्हींमध्ये समतोल साधणे शक्य आहे, असे सांगून मोदी म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांत आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर होता. वनाच्छादनातही वाढ झाली असून संरक्षित क्षेत्रेही वाढली आहेत. २०१४ मध्ये ६९२ संरक्षित क्षेत्रे होती ती २०१९ मध्ये ८६० झाली. सामुदायिक संरक्षण क्षेत्रे २०१४ मध्ये ४३ होती ती २०१९ मध्ये १०० झाली.’’ देशातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त घरे बांधली जातीलच; पण त्याचबरोबर प्राण्यांसाठी अधिवासही तयार केले जातील, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणातर्फे देशात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना करण्यात येते. २०१८चा अहवाल मेमध्येच जाहीर करण्यात येणार होता. मात्र, आकडेवारी विश्लेषणात वेळ गेल्याने तो उशिरा जाहीर करण्यात आला.

संवर्धनात महाराष्ट्राचा पुढाकार

महाराष्ट्रात गेल्या आठ वर्षांत ११ नवी संरक्षित क्षेत्रे घोषित करण्यात आली. तसेच १२ चौरस किलोमीटर क्षेत्र कायद्याने संरक्षित क्षेत्राखाली आणले गेले. हे नवीन क्षेत्र वाघांच्या प्रजनन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी आहे. वाघांना इतके अतिरिक्त क्षेत्र देण्यासाठी भारतातील अन्य कोणत्याही राज्यांनी पुढाकार घेतलेला नाही. याशिवाय महाराष्ट्राने वाघांच्या गाभा क्षेत्रातून ३० गावे इतर ठिकाणी पुनस्र्थापित केली आहेत. सुमारे तीन हजार हेक्टर गाभा क्षेत्र वाघांच्या प्रजननासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळेच वाघांची संख्या वाढली आहे.

महाराष्ट्रातील संख्येत १२२ने वाढ  

अहवालानुसार छत्तीसगड राज्यात वाघांची संख्या कमी झाली आहे. २०१४ मध्ये तेथे ४६ वाघ होते. ही संख्या आता १९ वर आली आहे. आंध्र प्रदेशातही वाघांची संख्या ६८ वरून ४८ वर आली आहे. मध्य प्रदेशात मात्र ही संख्या ३०८ वरून ५२६ वर गेली आहे. महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० वरून ३१२ इतकी झाली असून चार वर्षांत वाघ १२२ ने वाढले आहेत. मागील चार वर्षांत राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे.

भारत वाघांसाठी सुरक्षित देश आहे. मात्र, त्यांची घटणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे ‘एक था टायगर’पासून ‘टायगर जिंदा है’पर्यंतचा प्रवास थांबता कामा नये. व्याघ्रसंवर्धनाचे काम जोमाने करणे आवश्यक आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन झाले आहे. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्युमोनिया त्रास होऊ लागला होता. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते मात्र ते अयशस्वी ठरले. जयपाल रेड्डी यांचा जन्म १६ जानेवारी १९४२ रोजी तेलंगण येथील माडगूळ गावात झाला होता. एक धडाडीचे काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली. मात्र १९७५ मध्ये जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांनी काँग्रेस विरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि जनता दलात गेले. १९८५ ते १९८८ हा काळ ते जनता दलाचे सरचिटणीस होते. मात्र ९० च्या दशकात ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले.

माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. तर मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांच्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देऊन त्यांना १९९८ मध्ये सन्मानित करण्यात आले होते.

30 July Current Affairs
30 July Current Affairs

अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्या

युद्धग्रस्त अफगाणिस्तानात ‘शांतता येत आहे’, असे अध्यक्ष अश्रफ ग़नी यांनी भर देऊन सांगितल्यानंतरही, अफगाणिस्तानातील निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. गम्नी यांच्यासोबत निवडणूक लढवणारे अमरुल्ला सालेह यांच्या काबूलमधील कार्यालयाला लक्ष्य करून रविवारी झालेल्या हल्ल्यात किमान २० लोक ठार, तर ५० जण जखमी झाले.

अध्यक्षपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या हिंसाचारामुळे अफगाणिस्तानातील दयनीय सुरक्षाविषयक स्थितीच्या, तसेच यापूर्वीच्या निवडणुकांमधील रक्तपाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

रविवारचा हल्ला स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी ४.४० वाजता सुरू झाला. अमरुल्ला सालेह नेतृत्व करत असलेल्या ‘ग्रीन ट्रेंड’ या संघटनेच्या कार्यालयानजिक प्रचंड स्फोट झाला. सालेह या हल्ल्यात बचावले.

एका आत्मघातकी बॉम्बरने स्फोटकांनी भरलेल्या मोटारचा या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ स्फोट घडवल्यानंतर या हल्ल्याला सुरुवात झाली आणि नंतर तीन हल्लेखोर इमारतीच्या आत पळाले. त्यांनी सुमारे सहा तास या इमारतीला वेढा घातला होता. हे सर्व हल्लेखोर मारले गेल्यानंतर  इमारतीत अडकलेल्या सुमारे दीडशे लोकांची सुटका करण्यात आली, असे अंतर्गत मंत्रालयाने सांगितले. या हल्ल्यात २० जण ठार व ५० जण जखमी झाल्याची आकडेवारीही त्यांनी दिली.

अद्याप कुठल्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

यापूर्वी रविवारी उत्साही ग़नी यांनी सुमारे १८ वर्षांच्या संघर्षांनंतर देशात ‘शांतता येत आहे’, असल्याचे आणि तालिबानी दहशतवाद्यांशी शांततेची बोलणी केली जातील, असे सांगून आपल्या प्रचाराची सुरुवात केली.

ओडिशा सचिवालयाचे नाव बदलून लोकसेवा भवन

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य विधानसभेत घोषणा केली की भुवनेश्वरमधील सचिवालय किंवा सचिवालय इमारतीस आता 'लोकसेवा भवन' म्हटले जाईल.

ओडिशा भारत देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, उत्तरेला पश्चिम बंगाल व झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैर्ऋत्येला तेलंगण तर दक्षिणेला आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.

भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर आणि कटक ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

30 July Current Affairs
30 July Current Affairs

विखुरणारा प्रकाश

रामन यांनी आपल्या प्रयोगांसाठी प्रकाशाचा स्रोत म्हणून सूर्यप्रकाशाचा वापर केला.

सन १९२१ मधली गोष्ट. भारतीय संशोधक चंद्रशेखर वेंकट रामन हे लंडनला भेट देऊन परतताना भूमध्य सागरातून प्रवास करत होते. यावेळी समुद्राच्या निळ्या रंगाविषयी त्यांच्या मनात विचार आले-‘समुद्र निळा दिसण्याचे कारण, पाण्याच्या पृष्ठभागावरून झालेले आकाशाच्या निळ्या रंगाचे परावर्तन (रिफ्लेक्शन) हे नसून, पाण्याच्या रेणूंकडून होत असलेले या प्रकाशाचे विखुरणे (स्कॅटरिंग), हे असावे!’ या काळात प्रकाशाच्या विखुरण्यावरच त्यांचे संशोधन चालू असल्याने, प्रकाशाच्या विखुरण्यावर त्यांचे विचारचक्र चालू असायचे. कोलकात्याला परतल्यावर त्यांनी कृष्णन या त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर प्रकाशाच्या विखुरण्यावर आपले प्रयोग सुरू केले.

रामन यांनी आपल्या प्रयोगांसाठी प्रकाशाचा स्रोत म्हणून सूर्यप्रकाशाचा वापर केला. जांभळ्या रंगाच्या काचेचे फिल्टर वापरून, या सूर्यप्रकाशातील फक्त जांभळा प्रकाश त्यांनी पुढे जाऊ  दिला. हा प्रकाश बेंझिन भरलेल्या काचेच्या कुपीतून पार झाला. या कुपीतील बेंझिनच्या रेणूंमुळे वेगवेगळ्या दिशांना विखुरल्या गेलेल्या प्रकाशाचे त्यांनी निरीक्षण केले. प्रथम त्यांनी फक्त जांभळा प्रकाश जाऊ देणारे जांभळे फिल्टर वापरले. या फिल्टरमधून त्यांना विखुरलेला जांभळा प्रकाश दिसला. विखुरलेल्या प्रकाशाचा रंग किंवा तरंगलांबी ही मूळ प्रकाशाइतकीच असणे, हे लॉर्ड रेले या इंग्लिश शास्त्रज्ञाच्या सिद्धांतानुसार अपेक्षितच होते. बेंझिनने विखुरलेल्या प्रकाशाच्या पुढील निरीक्षणांसाठी त्यांनी इतर रंगांची फिल्टर वापरली. यातील हिरव्या रंगाच्या फिल्टरमधून त्यांना अतिशय अंधूक असा हिरवा प्रकाश दिसला. मूळचा प्रकाश जांभळा असताना विखुरलेल्या प्रकाशात हिरवा प्रकाश दिसणे, हे मात्र अनपेक्षित होते. विखुरल्यानंतर मूळ प्रकाशापेक्षा वेगळ्या तरंगलांबीचा प्रकाश निर्माण होणे, हाच तो रामन परिणाम!

सुरुवातीला डोळ्यांनी केलेल्या निरीक्षणांनंतर रामन यांनी विखुरलेल्या प्रकाशाच्या तरंगलांबीच्या अचूक मापनासाठी वर्णपटमापक वापरला, तसेच सूर्यप्रकाशाऐवजी प्रखर मक्र्युरी लॅम्पचा वापर केला. साठाहून अधिक अतिशुद्ध पदार्थासाठी हा परिणाम तपासून आपल्या निष्कर्षांची खात्री केल्यानंतर, रामन यांनी आपले निष्कर्ष १९२८च्या मार्च महिन्यातील ‘इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स’मध्ये प्रसिद्ध केले. विखुरलेल्या प्रकाशाची तरंगलांबी ही रेणूंनुसार वेगवेगळी असते. त्यामुळे अशा विखुरलेल्या प्रकाशाच्या मापनाद्वारे पदार्थातील रेणूंची ओळख पटू शकते. रसायनशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या या शोधासाठी रामन हे १९३० सालच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले.

नेत्यानाहू यांच्या प्रचारात मोदी

इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी स्टार प्रचारक?

बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासाठी इस्रायलची निवडणूक आव्हानात्मक

बेंजामिन नेत्यानाहू-नरेंद्र मोदी दोन्ही नेत्यांमध्ये सलोख्याचे संबंध नरेंद्र मोदींच्या विजयानंतर नेत्यानाहू यांनी केले होते पहिल्यांदा अभिनंदन

मोठ्या चढ-उतारांनंतर भारत-इस्रायल संबंधांमध्ये सुधारणा

भारतात भाजपने सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये धवल यश संपादन केलंय. देशात सलग दोन वेळा बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्थातच हा करिष्मा निव्वळ नरेंद्र मोदी यांचा आहे, हे त्यांचे विरोधकही नाकारत नाहीत. यंदाच्या निवडणुकीतही भाजपला निर्विवाद वर्चस्व मिळवून देण्यात नरेंद्र मोदींना यश आलंय. पण, हेच मोदी जर दुसऱ्या देशातील एखाद्या निवडणुकीत प्रचाराचं साधन झाले असतील तर? धक्का बसला ना? होय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या नव्हे तर, दुसऱ्या एका देशातील निवडणूक प्रचाराचा साधन बनले आहेत. इस्रायलमध्ये येत्या सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकाची प्रचार सुरू झाला असून, नेत्यानाहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक पोस्टर सध्या इस्रायलमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. त्या पोस्टरचा फोटो भारतातही व्हायरल होऊ लागला आहे.

लक्षवेधी पोस्टर
बेंजामिन नेत्यानाहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तांदोलनाचे पोस्टर इस्रायलमध्ये एका इमारतीवर लावण्यात आले आहे. एक पत्रकार अमिचाई स्टेईन याने रविवारी ते शेअर केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचेही असेच एक पोस्टर त्याच इमारतीवर यापूर्वी झळकले होते. स्टेईन याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नेत्यानाहू यांच्या निवडणूक प्रचाराची जाहिरात. पुतीन, ट्रम्प आणि मोदी. इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी १७ सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. या इमारतीवरील पोस्टर्सच्या माध्यमातून नेत्यानाहू यांचे जगभरातील बड्या नेत्यांशी कसे सलोख्याचे संबंध आहेत आणि त्या माध्यमातून ते इस्रायलला जागतिक पातळीवर कसे पुढे घेऊन जात आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोण आहेत नेत्यानाहू?
नेत्यानाहू हे इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान असून, आजवर सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवलेले नेते आहे. यापूर्वी इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरिऑन यांचा कार्यकाळ सर्वाधिक होता. पण, यावेळी त्यांच्यासाठी देशातील निवडणुकात आव्हानात्मक असल्याचं मानलं जात आहे. गेल्या काही वर्षांत नेत्यानाहू यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि इस्रायल यांच्यातील द्विपक्षीय संबंध खूप सुधारले आहेत. दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि लष्करी पातळीवर परस्पर सहकार्यात वाढ झाली आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर नेत्यानाहू हे पहिले आंतरराष्ट्रीय नेते होते. ज्यांनी पंतप्रधान मोदींची अभिनंदन केले होते. त्यांच्या विजयाचा उल्लेख नेत्यानाहू यांनी "impressive victory", असा केला होता.

भारत आणि इस्रायल
भारत आणि इस्रायल दोन्ही देशांना साधारण एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले होते. पण, दोन्ही देशांना परस्परांमध्ये राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी चार दशके लागली. इस्रायलमध्ये सध्या लष्करी सेवा सक्तीची आहे. सध्या तेथील तरुणांमध्ये लष्करी सेवा दिल्यानंतर भारताला भेट देण्याची मोठी क्रेझ आहे. याचा द्विपक्षीय संबंध सुधारण्यावरही परिणाम होत असल्याचे मानले जाते. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये खूप चढ-उतार पहायला मिळाले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पॅलेस्टाईनल भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. तेथे भेट दिल्यानंतर त्यांना पॅलेस्टाईनच्या लष्करावर कौतुकाचा वर्षाव केला होता. पण, आपल्या पहिल्या इस्रायल भेटीमध्ये त्यांनी पॅलेस्टाईनला भेट दिली नव्हती. तर, इस्रायलच्या राजधानीवरून झालेल्या वादाच्या वेळी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने अनुपस्थिती राखल्याने इस्रायलशी जवळीक वाढली होती. नेत्यानाहू यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भारताला भेट दिली होती. त्यावेळी कृषीसह अनेक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले होते.

30 July Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »