30 Sep Current Affairs

30 Sep Current Affairs
30 Sep Current Affairs

हॉँगकॉँगच्या आंदोलनाचे जगभरात पडसाद

 • हॉँगकॉँगमध्ये सुरू असलेल्या लोकशाहीवादी कार्यकर्त्याच्या आंदोलनाला रविवारी पुन्हा एकदा हिंसक वळण मिळाले. रविवारी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते.
 • आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व रबरी बुलेटचा मारादेखील केला.
 • रविवारच्या आंदोलनाचे परिणाम जगात विविध ठिकाणी आढळून आले. रविवारचा दिवस आंदोलकांनी वैश्विक कृतीचा पाळला. या वेळी झालेल्या आंदोलनाला 'हुकुशाहीचा विरोध,' असे नाव देण्यात आले होते.
 • हॉँगकॉँगमधील लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियासह विविध माध्यमातून केलेल्या आवाहनाला ऑस्ट्रेलिया आणि तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तैवानमध्ये सुमारे २००० लोक मुसळधार पावसाची पर्वा न करता संसदेच्या परिसरात जमले होते.
 • ऑस्ट्रेलियामध्ये निघालेल्या मोर्च्यात लोकांनी हातात 'अत्याचार थांबवा, हॉँगकॉँग वाचवा,' असे संदेश लिहिलेले फलक धरले होते.
 • रविवारी जगभरातील सुमारे ४० हून शहरांत मोर्चे काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचा चीनच्या ७० व्या स्थापना दिवसानिमित्त मंगळवारी होणाऱ्या सोहळ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी या दिवसाला 'दु:खाचा दिवस' असे म्हटले आहे.

सौदी अरेबिया करणार १०० अब्ज डॉलर गुंतवणूक

 • भारतामध्ये विकासास पुरेशी संधी असल्यामुळे सोदी अरेबियाने मोठी गुंतवणूक करायचे ठरवले आहे. तेलसाठ्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी अलिकडेच हादरलेल्या सौदी अरेबियाने भारतामध्ये ऊर्जा, तेल शुद्धीकरण, पेट्रोरसायन, कृषी, पायाभूत सुविधा आणि खाणकाम उद्योगांमध्ये ही गुंतवणूक करायचा मानस व्यक्त केला आहे.
 • सौदी अरेबियासाठी भारत हा गुंतवणुकीसाठी आकर्षक देश असल्याचे सोदी अरेबियाचे राजदूत डॉ. सौद बिन महम्मद अली सती यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, या गुंतवणुकीद्वारे तेल, वायू आणि खनिकर्म या क्षेत्रांत दीर्घकालीन भागीदारी करण्यात सौदी अरेबियाला रस आहे.
 • संयुक्त प्रकल्प आणि गुंतवणूक यासाठी ४०हून अधिक संधी भारत आणि सौदी अरेबिया यांमध्ये आहेत. यामुळे दोन देशांमध्ये सध्या होत असलेला ३४ अब्ज डॉलरचा व्यापार आणखी वाढणार आहे.
 • सौदी अरेबियाकडून येऊ घातलेल्या १०० अब्ज डॉलर गुंतवणुकीमध्ये सौदी अराम्को ही कंपनी महाराष्ट्रातील तेल शुद्धीकरण व पेट्रोरसायन प्रकल्पात गुंतवणार असलेल्या ४४ अब्ज डॉलरचाही समावेश आहे.
 • सौदीचे युवराज महम्मद बिन सलमान यांनी सौदी अरेबियाच्या विकासासाठी २०३० है लक्ष्य ठेवले आहे. यासाठी त्यांनी लावलेल्या सुधारणांच्या धडाक्यामुळे जागतिक बँकेने सोदी अरेबियाला जी २० गटातील चौथ्या क्रमांकाचा मोठ्या सुधारणा करणारा देश असे म्हटले आहे. यानुसार जगभरात गुंतवणूक करणे आणि जगभरातील गुंतवणूक आपल्या देशात आणणे याला सौदी अरेबिया प्राधान्य देत आहे.

अराम्कोचे बेत:-

 • सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अराम्कोने रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर भागीदारी करण्याचे ठरवले आहे.
 • भारतात तेल पुरवठा, विपणन, शुद्धीकरण येथपासून पेट्रोरसायने व वंगणे या उद्योगांमध्ये गुंतवणूक करणे हा अराम्कोच्या धोरणाचा एक भाग असल्याचे डॉ. सौद म्हणाले.
30 Sep Current Affairs
30 Sep Current Affairs

गेल्या १०२ वर्षांतला सप्टेंबरचा सर्वाधिक पाऊस यंदा

 • ज्या महिन्यात मान्सूनने माघारी फिरायचे त्या महिन्यात तो यंदा सर्वात जास्त कोसळला आहे. इतका कोसळला की त्याने विक्रम केला. गेल्या १०२ वर्षांत सर्वाधिक पावसाचा सप्टेंबर महिना होण्याचा विक्रम यंदा पावसाने केला आहे.
 • जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीहून ९ टक्के पाऊस अधिक झाला. देशभरात सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊस २४७.१ मि.मी. झाला. हा पाऊस सामान्य पावसापेक्षा ४८ टक्के अधिक आणि १९०१ नंतर तिसऱ्या सर्वाधिक पावसाचा विक्रम झाला आहे.
 • सोमवारपर्यंत मान्सून १९८३ च्या पावसाचा विक्रमही मोडेल. गुजरात आणि बिहारमध्ये रेड अलर्ट जारी केलेल्या ठिकाणी सोमवारी पुन्हा पाऊस पडला तर सप्टेंबर १९१७ च्या विक्रमापर्यंत हा पाऊस पोहोचेल. १९१७ मध्ये १९०१ नंतर चा सप्टेंबरचा सर्वाधिक पाऊस झाला होता.
 • चार महिन्यांचा मान्सूनचा मोसम सोमवारी अधिकृतपणे संपत आहे पण पुढील आठवड्यापर्यंत मान्सून संपण्याची चिन्हे नाहीत. राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही भागात मान्सून अद्यापही सक्रीय आहे.

देशभरात ९ टक्क्यांहून अधिक:-

 • यावर्षी मान्सून विलंबाने आला आणि जूनमध्ये पावसाची ३३ टक्के तूट होती. पण आता गेल्या २५ वर्षात चार महिन्यातला सर्वाधिक पाऊस याच वर्षी झाला आहे. देशभरातली आकडेवारी पाहता यावर्षी ९५६.१ मिमी म्हणजेच ९ टक्के अधिक पाऊस झाला.

पाकिस्तान मनमोहनसिंगांना आमंत्रण देणार

 • कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तान सरकारकडून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आमंत्रण देण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये हा कार्यक्रम होईल, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली. कर्तारपूर येथे १५५२ मध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांनी कर्तारपूर साहिब हे धर्मस्थळ उभे केले होते.
 • कर्तारपूरमधील दरबार साहिब आणि पंजाबमधील गुरुदासपूरमधील डेरा बाबा नानक यांना जोडणाऱ्या या मार्गावर भारतीय भाविकांना व्हिसाविना प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांना केवळ परवाना आवश्यक असेल.
 • 'कर्तारपूर कॉरिडॉर पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा असून, सविस्तर चर्चा केल्यानंतर आम्ही भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना उद्घाटनासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला,' अशी माहिती कुरेशी यांनी दिली.
 • डॉ. मनमोहन सिंग यांना याबाबत औपचारिक निमंत्रण पाठवण्यात येईल, असे कुरेशी यांनी सांगितले. सिंग यांच्याबद्दल पाकिस्तानात खूप आदर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, असे कुरेशी म्हणाले. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरचे ९ नोव्हेंबरला उद्घाटन होणार आहे.
 • डॉ. मनमोहन सिंग यांना पाकिस्तानकडून आमंत्रण दिले झाणार असले, तरी त्याविषयी आतापर्यंत काहीच कल्पना नसल्याचे सिंग यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या आमंत्रणाचा स्वीकार करून डॉ. मनमोहन सिंग हे कर्तारपूर कॉरिडॉरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे सूतोवाचही सिंग यांच्या कार्यालयाने केले आहे.
30 Sep Current Affairs
30 Sep Current Affairs

६५०० कोटींच्या गैरव्यवहाराची कबुली

 • रिझर्व्ह बँकेने 'पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँके'वर (पीएमसी) सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, आता या बँकेत ६ हजार ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे. पीएमसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी यासंदर्भातील कबुली दिल्याचे वृत्त आहे.
 • दिवाळखोरीत असलेल्या 'एचडीआयएल' कंपनीला पीएमसी बँकेने ६,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कर्ज दिल्याचे जॉय थॉमस यांनी रिझर्व्ह बँकेसमोर कथितरित्या मान्य केले आहे. बँकेच्या कर्ज वितरण नियमापेक्षा ही रक्कम चौपट असून, बँकेच्या एकूण कर्ज वितरणाच्या ७३ टक्के असल्याची माहिती समोर आली आहे. बँकेच्या संचालक मंडळातील एका सदस्याने बँकेच्या ताळेबंदाची प्रत रिझर्व्ह बँकेला दिली आहे. यामध्ये एचडीआयएल कंपनीला दिलेल्या कर्जाच्या सद्य स्थितीबद्दल सविस्तर माहिती आहे, असे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका सूत्राकडून सांगण्यात आले.

आता पीएमसीतून सहा महिन्यात दहा हजार काढता येणार:-

 • थॉमस यांनी रिझर्व्ह बँकेला साडेचार पानी पत्र लिहिले आहे. यामध्ये वरयाम सिंह आणि संचालक मंडळाच्या काही सदस्यांसह अन्य सहा जणांच्या साथीने एचडीआयएल समूहाला कर्ज वाटप करण्याची मंजुरी दिली. संचालक मंडळातील बहुतांश सदस्यांना या कर्ज वाटपाबाबत माहिती नसल्याचे थॉमस यांनी या पत्रात नमूद केले आहे, असेही सूत्राने सांगितले. एचडीआयएल समूहाला १९ सप्टेंबर २०१९ रोजी ६ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे थॉमस यांनी रिझर्व्ह बँकेसमोर कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदस्याकडून सादर करण्यात आलेला ताळेबंद रिझर्व्ह बँकेकडून तपासला जात आहे.

आम्ही कोणाच्या भरवशावर राहायचे?; PMC च्या खातेदारांचा सवाल:-

 • दरम्यान, सहा महिन्यातून एकदाच एक हजार रुपये काढण्याचे लादलेले आर्थिक निर्बंध पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने (पीएमसी) अखेर अंशत: मागे घेतले आहेत. सहा महिन्यातून एकदा एक हजाराऐवजी दहा हजार रुपये काढण्याची मुभा पीएमसी बँकेने ग्राहकांना दिली आहे. आरबीआयच्या आदेशानंतर पीएमसीने ग्राहकांची त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली. नव्या नियमानुसार ग्राहक आता पीएमसी बँकेतून सहा महिन्यातून फक्त दहा हजार रुपये काढू शकणार आहेत.
 • केवळ एका कर्जामुळे पीएमसीचा घात:-
 • तत्पूर्वी, आरबीआयने बँकेवर निर्बंध लादल्यानंतर मुंबईसह देशभरातील बँकेच्या शाखांसमोर खातेदार आणि ठेवीदारांची गर्दी झाली. सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठेवीदार आणि व्यापारी अडचणीत आले आहेत. ठेवीदार, खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत, असे बँकेकडून सांगण्यात आले.

विदेशी गुंतवणूकदारांची ७७१४ कोटींची गुंतवणूक

 • गेल्या दोन महिन्यांपासून शेअर बाजारांत मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री करणाऱ्या विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) सप्टेंबरमध्ये देशांतर्गत शेअर बाजारात ७,७१४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
 • केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर केलेल्या आर्थिक सुधारणा आणि केंद्रीय अर्थसंकल्पात 'एफपीआय'वर लावण्यात आलेल्या अधिभाराची घोषणा मागे घेतल्यानंतर विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली आहे.
 • गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने कॉर्पोरेट करामध्ये जवळपास १० टक्क्यांची कपात केली. या शिवाय 'एफपीआय'वर लावण्यात आलेले कर, डेरिव्हेटिव्हजच्या विक्रीवर मिळणाऱ्या लाभांवरीवर करही संपुष्टात आणले आहेत.
 • या शिवाय 'सेबी'ने 'एफपीआय'साठी 'केवायसी'चे नियमही सुलभ केले आहेत. या शिवाय त्यांनी विनिमय बाजारात खरेदी-विक्री करण्याची परवानगीही दिली आहे.

समभागविक्रीचा सपाटा थांबला:-

 • डिपॉझिटरीच्या ताज्या आकडेवारीनुसार 'एफपीआय'ने ३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत शेअर बाजारात ७,८४९.८९ कोटी रुपयांची, तर बॉँड बाजारामध्ये १३५.५९ कोटी रुपये काढून घेतले. या शिवाय त्यांनी देशांतर्गत शेअर बाजारांत एकूण ७,७१४.३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
 • देशांतर्गत बाजारांत शेअर बाजार, बाँड बाजार आणि डेरिव्हेटिव्जचा समावेश करण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये 'एफपीआय'ने बाजारांतून ५,९२०.०२ कोटी रुपये आणि जुलैमध्ये २,९८५.८८ कोटी रुपये काढून घेतले.

 

30 Sep Current Affairs
30 Sep Current Affairs

सुमीतने पटकावले विजेतेपद

 • भारताच्या सुमीत नागलने स्थानिक खेलाडू फाकुन्डो बोग्निसला सरळ सेटमध्ये नमवून एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. सुमीतचे हे चॅलेंजर स्तरावरील कारकिर्दीतील दुसरे जेतेपद आहे. त्याने २०१७ मध्ये बेंगळुरू चॅलेजर स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
 • पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत सातव्या सीडेड सुमीतने आठव्या सीडेड अर्जेंटिनाच्या बोग्निसला ६-४, ६-२ असे पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले. ही लढत एक तास अन् ३७ मिनिटे चालली. या विजयाने सुमीतला एटीपी क्रमवारीत २६ स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम १३५ वे स्थान पटकावले आहे.

पाठिंबा नसल्याने निराश:-

 • 'मी अर्जेंटिनामध्ये एकटाच आहे. माझ्या मदतीसाठी कोणीही आले नाही. एकाअर्थाने हे चांगलेच झाले. जेणेकरून मी चांगले टेनिस खेळू शकलो. पण, खर सांगू तर माझ्यासाठी हा काळ फार कठीण आहे,' असे सुमीत म्हणाला. सुमीतने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सलामीच्या लढतीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला चांगला लढा दिला होता. फेडररसह अनेकांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले होते.
 • मात्र, त्यानंतरही त्याची स्थिती बदललेली नाही. त्याला आर्थिक चणचण जाणवत असल्याने त्याचेकडे स्वत:चे प्रशिक्षक आणि फिजिओदेखील नाहीत. तो म्हणाला, 'अमेरिकन ओपन स्पर्धेत चांगला खेळ केल्यानंतरही मी एकट्यानेच मार्गक्रमण करीत आहे. वयाच्या २२व्या वर्षीच मी अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरलो. फेडररविरुद्ध एक सेटही जिंकलो. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नाही.
 • टेनिसच्या पाठीशी उभे राहायला कोणीही तयार नाही, याचे वाइट वाटते.' सुमीतला 'टॉप्स'च्या योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, नंतर त्याला यातून वगळण्यात आले. त्या वेळी त्याला महिन्याला ५० हजार रुपये तरी मिळत होते. आता 'टॉप्स'मध्ये केवळ रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांचाच समावेश आहे. एकेरीच्या एकाही टेनिसपटूचा यात समावेश नाही.

सुमीतला विराट कोहली फाउंडेशनकडून मदत मिळते. मात्र, एका टेनिसपटूसाठी प्रशिक्षक, फिटनेस ट्रेनर, फिजिओ यासह अनेक गोष्टींची गरज असते. यासाठी सुमीतला वर्षाला दीड कोटी रुपये खर्च येतो. सुमीतमध्ये गुणवत्ता आहे. त्याने ती दाखवूनही दिली आहे. अशा वेळी ऑलिम्पिकच्या तयारीसाठी त्याला मदत करायला हवी. खरे तर हे आपल्या व्यवस्थेचे अपयश आहे.
- महेश भूपती, माजी टेनिसपटू
जेव्हा मी क्रमवारीत ३५०व्या स्थानावर होतो, तेव्हाही माझा खर्च तेवढाच होता, जेवढा आता आहे. पण, यापेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी मला अधिक मदतीची गरज आहे. दौऱ्यावर असताना तुमच्या काय चुका होत आहेत, हे सांगायला प्रशिक्षक हवा. पण, जास्तीत जास्त स्पर्धेत मी एकटाच असतो. मात्र, लोक माझ्यासमोरून मदत न करता निघूत जात आहेत. ते मला फोन करून सांगतात, काही मदत हवी असेल, तर सांग आणि जेव्हा मदत मागितली तेव्हा ते दुर्लक्ष करतात.
- सुमीत नागल

 

१० महिन्याच्या बाळाच्या आईने मोडला उसेन बोल्टचा विक्रम

 • अमेरिकेच्या एलिसन फेलिक्स हिने सोमवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उसेन बोल्टला मागे टाकत नवा इतिहास रचला.
 • फेलिक्सने दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ४ गुणिले ४०० मीटर मिश्र रिले प्रकारात आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकवून दिले आणि स्टार धावपटू उसेन बोल्टचा विक्रम मोडीत काढला.
 • महत्वाची बाब म्हणजे केवळ १० महिन्यांचे बाळ असलेल्या मातेने हा दमदार पराक्रम करून दाखवला आहे. १० महिन्यांपूर्वी फेलिक्सने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सहा वेळा ऑलिम्पिक विजेत्या फेलिक्सने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर प्रथमच मैदानावर उतरली. त्यामुळे तिचा हा विक्रम अधिकच खास मानला जातो आहे.
 • फेलिक्सने ४ गुणिले ४०० मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचसोबत तिचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हे १२ वे सुवर्णपदक ठरले.
 • एखाद्या जागतिक स्पर्धेत एवढी सुवर्णपदके जिंकणारी फेलिक्स पहिलीचं धावपटू खेळाडू ठरली. यापूर्वी हा विक्रम उसेन बोल्ट याच्या नावावर होता. त्याच्या नावावर आतापर्यंत ११ सुवर्णपदके आहेत. तो २०१७ मध्ये अखेरचा स्पर्धेत उतरला होता. पण त्याचा हा विक्रम फेलिक्सने मोडला.
 • अमेरिकेच्या मिश्र रिले संघाने तीन मिनिटे आणि नऊ पूर्णांक ३४ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली आणि विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले.
 • ३३ वर्षीय फेलिक्सने जागतिक स्पर्धेत पाचव्यांदा सहभाग घेतला होता. तिने २०० मीटर, ४०० मीटर, ४ गुणिले १०० मीटर, ४ गुणिले ४०० मीटर आणि ४ गुणिले ४०० मीटर मिश्र रिले अशा विविध स्पर्धांमध्ये एकूण १२ सुवर्णपदके जिंकली आहेत.
30 Sep Current Affairs
30 Sep Current Affairs

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा महाराष्ट्राच्या रोहन रंडे याला रौप्यपदक

 • सेनादलाला सांघिक विजेतेपद; दिल्ली दुसऱ्या स्थानी
 • गेले काही दिवस हरयाणाच्या मल्लांनी राष्ट्रीय (२३ वर्षांखालील) कुस्ती स्पर्धेवर हुकूमत गाजवल्यानंतर रविवारी अखेरच्या दिवशी सेनादलाच्या कुस्तीगीरांनी ग्रीको-रोमन प्रकारात आपला ठसा उमटवत सांघिक विजेतेपद मिळवून दिले.
 • ग्रीको-रोमन प्रकाराच्या ८७ किलो वजनी गटात रोहन रंगराव रंडे याने महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले. अंतिम फेरीत रोहनला हरयाणाच्या सुनीलकडून ४-१० अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.
 • अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करताना रोहनने दमदार विजयाची नोंद केली होती, पण अंतिम फेरीत सुनीलसमोर त्याची डाळ शिजली नाही. अन्य लढतींमध्ये महाराष्ट्राच्या मल्लांनी तुल्यबळ लढती दिल्या, पण त्यांच्या पदरी निराशाच आली.
 • १० प्रकारात सेनादलाने चार, हरयाणाने तीन, दिल्लीने दोन तर चंडीगडने एक सुवर्णपदकाची कमाई केली. सेनादलाने ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्यपदके मिळवत १९५ गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले. दिल्लीने २ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्यपदकांसह १७० गुणांनिशी दुसरे स्थान प्राप्त केले. हरयाणाला ३ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदकांसह १३६ गुणांनिशी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • सुवर्णपदक विजेत्यांना बुडापेस्ट (हंगेरी) येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.
 • सेनादलाकडून रविवारी अर्जुन (५५ किलो), रजित (६३ किलो), राहुल (७२ किलो) आणि दीपक (१३० किलो) यांनी सुवर्णपदक मिळवले होते.

भारताला सॅफ चषकाचे जेतेपद

 • सॅफ चषक फुटबॉल स्पर्धा
 • भारतीय फुटबॉल संघाने रविवारी काठमांडू येथे रंगलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा २-१ असा पराभव करत सॅफ चषक १८ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताने पहिल्यांदाच या चषकावर नाव कोरण्याची करामत केली.
 • विक्रम प्रताप सिंग याने दुसऱ्याच मिनिटाला भारताला आघाडीवर आणले होते. पण बांगलादेशने यीसिन अराफत याच्या गोलमुळे ४०व्या मिनिटाला सामन्यात बरोबरी साधली होती. अखेरच्या क्षणापर्यंत १-१ अशी बरोबरी असताना रवी बहादूर राणा याने अतिरिक्त वेळेत गोल करत भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारताचा निंठोइंगानबा मीटेई या स्पर्धेतील सर्वोत्तम मौल्यवान खेळाडू ठरला.
 • दोन्ही संघाला २२व्या मिनिटापासूनच १० जणांसह खेळावे लागले. गुरकिरत सिंग आणि मोहम्मद फहीम यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार यीसिन याला दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आल्यामुळे त्यांना ४०व्या मिनिटापासून नऊ जणांसह खेळावे लागले. भारताच्या या यशाची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही दखल घेत खेळाडूंचे कौतुक केले आहे.

या स्पर्धेत भारत हा सर्वोत्तम संघ नव्हे तर सर्वोत्तम प्रभावी संघ ठरला आहे. युवा खेळाडूंच्या कामगिरीवर मी बेहद खूश आहे. त्यांचा त्याग आणि बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे. अंतिम फेरीत छाप पाडण्याची हीच संधी आहे, असे मी खेळाडूंना सांगितले होते, रवी राणा याने अखेरच्या क्षणी गोल करत आपले कर्तृत्व दाखवून दिले.
– फ्लॉइड पिंटो, भारताचे मुख्य प्रशिक्षक

 

30 Sep Current Affairs
30 Sep Current Affairs

मालदीव बॅडमिंटन स्पर्धा मुंबईकर कौशल अजिंक्य

 • भारताचा प्रतिभावान बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेरने रविवारी मालदीव आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
 • मुंबईच्या २३ वर्षीय कौशलने सिरिल वर्माला अवघ्या ३५ मिनिटांत २१-१३, २१-१८ अशी धूळ चारली. कौशलव्यतिरिक्त भारताच्या तीन जोडय़ांना अंतिम फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
 • महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांना जपानच्या सायाक होबारा आणि नात्सुकी सोनी यांच्याकडून १०-२१, २१-१७, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत थायलंडच्या चॅलेम्पोन किटामॉन आणि चायनीज कोरेपॅप यांनी भारताच्या साईप्रतीक कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट्ट यांचा २१-११, २१-१५ असा धुव्वा उडवला.
 • पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज आणि सनम शुक्ला यांना जपानच्या अग्रमानांकित केचिरो मत्सुई आणि योशिनोरी ताकेहुची यांनी २१-९, २२-२० असे नमवले.

भारत राफेल मुळे पाकिस्तान व चीनवर भारी पडणार भदौरिया

 • हवाईदल प्रमुखपदाची आरकेएस भदौरिया यांनी जबाबदारी स्वीकारली, बीएस धनोआ सेवानिवृत्त
 • एअर मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सोमवारी भारतीय हवाई दल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर, बीएस धनोआ हे सेवानिवृत्त झाले आहेत. एअर चीफ मार्शल पदाची जबाबदारी स्वीकरताच भदौरिया यांनी पाकिस्तान आणि चीनला इशारा देखील दिला आहे. ‘राफेल’मुळे भारत चीन व पाकिस्तानवर भारी पडेल, असे भदौरिया यांनी म्हटले आहे.
 • भदौरिया यांनी  हवाई दल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आता पुढील आठवड्यात  हवाई दलाच्या ताफ्यात अद्यावत अशा लढाऊ विमानांचा देखील समावेश होणार आहे. भदौरिया  या अगोदर राफेल लढाऊ विमान खरेदी समितीचे चेअरमन देखील राहिलेले आहेत. याशिवाय त्यांनी स्वतः आतापर्यंत २६ प्रकारची लढाऊ व प्रवासी विमानं उडवलेली आहेत.
 • राफेल खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका निभावलेल्या भदौरिया यांनी सोमवारी  हवाई दल प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर सांगितले की, ‘राफेल’ लढाऊ विमानांचा हवाई दलाच्या ताफ्यात समावेश होणे हे देश व  हवाई दलासाठी महत्वपूर्ण आहे. राफेलचे तंत्रज्ञान आमच्यासाठी गेमचेंजर असेल.
 • सद्यस्थिती पाहता भविष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी हवाई दल पुर्णपणे सज्ज आहे. विशेष म्हणजे बालाकोट सारखी एअस स्ट्राइक करण्यासाठी हवाई दल अधिक सज्ज असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
30 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »