31 August Current Affairs

31 August Current Affairs
31 August Current Affairs

एनआरसीच्या अंतिम यादीतून १९ लाख बाहेर

 • आसामच्या राष्ट्रीय नागिरक नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल १९.०६ लाख लोकांना या यादीत स्थान मिळालेले नाही. 
 • या यादीत एकूण ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या अंतिम यादीसंदर्भात काँग्रेसने दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. 
 • यात त्या लोकांचा समावेशही आहे, ज्यांनी आपल्या नागरिकत्वाचा दावा अद्याप दाखल केलेला नाही. पण अर्थात हा अंतिम निर्णय नाही. 
 • ज्या लोकांची नावे या यादीत आलेली नाहीत, त्यांना अपील करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. परदेशी लवादापासून हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत ते एनआरसीत जागा मिळण्यासाठी याचिका दाखल करू शकतात. 
 • केंद्रीय गृहमंत्रालयाने हे स्पष्ट केलंय की एनआरसी यादीत समाविष्ट न झालेल्या लोकांना परदेशी ठरवलंय असा याचा अर्थ होत नाही. अशा लोकांनी विदेशी लवादासमोर आपली याचिका दाखल करायची आहे. 
 • यादीत नसलेल्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेतले जाणार नाही असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. विदेश लवादाचा निर्णय येईपर्यंत त्यांना सवलत देण्यात येईल. लवादात हरल्यास ती व्यक्ती हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकते.

यादीत दुरुस्तीची मागणी का?:-

 • आसाममध्ये एनआरसी समुदा नव्याने तयार करण्याची मागणी १९८०च्या दशकात पुढे आली. 
 • बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात आसामध्ये येणाऱ्या घुसखोरांमुळे मूळच्या आसामी व्यक्तींची संख्या कमी होऊन मूळ आसामी संस्कृतीला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करत नागरिकांची नोंद नव्याने करण्याची मागणी होऊ लागली. 
 • या पार्श्वभूमीवर, १५ ऑगस्ट १९८५ रोजी आसाम करारही करण्यात आला.
 • दीर्घकाळ न्यायालयीन लढाईनंतर, सर्वोच्च न्यायालयाने आसाममध्ये कालबद्धरित्या एनआरसीमध्ये दुरुस्ती करून मसुदा प्रसिद्ध करण्याचा आदेश १७ डिसेंबर २०१४ रोजी दिला.

यूएस स्पेस कमांड स्थापन

 • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'यूएस स्पेस कमांड' स्थापन केली आहे. अमेरिकेच्या अवकाशातील प्रभावाला धोका पोहचू नये यासाठी हा विभाग सुरू करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 
 • रशिया आणि चीनने अ‌वकाश संशोधनात प्रगती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही स्पेस कमांड सुरू केली आहे.
 • रशिया आणि चीनसारख्या देशांकडून अमेरिकी उपग्रहकांना धोका पोहचू शकतो, अशी चिंता अमेरिकेला वाटत आहे. 
 • 'ज्यांना अमेरिकेला नुकसान पोहोचवायचे आहे. अवकाशातील सर्वांत उंचीवर ते आमचे आव्हान मागत आहेत. आता हा पूर्णपणे वेगळा खेळ असणार आहे,' असे ट्रम्प यांनी सांगितले. 'व्हाइट हाउस'मध्ये या स्पेस कमांडच्या स्थापनेची घोषणा करताना ते बोलत होते. 
 • अमेरिकेची ही ११वी लढाऊ कमांड स्थापन होणे हा महत्त्वाचा क्षण असल्याचे ट्रम्प म्हणाले. 'हा मोठा निर्णय आहे. नवीन लढाऊ कमांड, 'स्पेसकॉम' अमेरिकेच्या अवकाशातील हिताचे रक्षण करणार आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.
 • जनरल जॉन डब्ल्यू. रेमंड हे 'यूएस स्पेस कमांड'चे प्रमख असणार आहेत. अमेरिकी सशस्त्र दलांची ही ११वी कमांड असेल. या कमांडमध्ये सुरुवातीला २८७ कर्मचारी असणार आहेत. कमांडचे अंतिम ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
   
31 August Current Affairs
31 August Current Affairs

तर भारत पाकिस्तानदरम्यान अणुयुद्ध होईल

 • आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास आण्विक युद्ध होऊ शकते, अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. 
 • जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याचा निर्णय मागे घेतला तरच भारताशी चर्चा शक्य आहे, असंही इम्रान यांनी म्हटलं आहे. तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे इम्रान यांच्या मंत्रिमंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 
 • अमेरिकेतील 'न्यूयॉर्क टाइम्स'मधील एका लेखामध्ये इम्रान खान यांनी हा इशारा दिला आहे. काश्मीरबाबत भारताने घेतलेला निर्णय रोखण्यासाठी जगाने काहीही न केल्यास दोन्ही अण्वस्त्र संपन्न देश युद्धाच्या दिशेने जातील, असं इम्रान यांनी म्हटलं आहे. 
 • काश्मीरबाबत भारत आणि पाकिस्तान दरम्यान चर्चा व्हायला हवी, असं इम्रान यांनी म्हटलं आहे. मात्र हे सांगताना काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करण्यात यावं, काश्मीरमधून संचारबंदी उठवावी आणि काश्मीरमधून भारताने त्यांचं सैन्य मागे घ्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. काश्मीरवरील चर्चेत काश्मिरींसहित सर्व स्टेकहोल्डरचा समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 
 • तर कुरैशी यांनी भारतासोबत द्विपक्षीय चर्चा करण्यात काहीच अडचणी नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र भारत चर्चेला तयार आहे की नाही? यावरच सर्व काही अवलंबून असल्याचं कुरैशी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही भारत पाकिस्तानसोबत दहशत मुक्त आणि हिंसामुक्त वातावरणात द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.
   

दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण केंद्राचा मोठा निर्णय

 • अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. 
 • केंद्राच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता २७ वरून १२ वर येणार आहे. 
 • पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या चारही बँकांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात येणारी बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. कॅनरा बँक आणि सींडिकेट बँक यांचं विलीनीकरण होईल. त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असेल. 

असे होणार विलीनीकरण:-

 • विलीनीकरण- १ : पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. 
 • विलीनीकरण २ : कॅनरा बँक, सींडिकेट बँक 
 • विलीनीकरण ३: युनियन बँक, आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक (पाचवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल. 
 • विलीनीकरण ४ : इंडियन बँक, अलाहाबाद बँक (सातवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल)
   
31 August Current Affairs
31 August Current Affairs

अर्थव्यवस्थेला झटका आर्थिक वृद्धिदर घसरला

 • अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन बँकांसंबधी महत्त्वपूर्ण घोषणा केलेली असतानाच केंद्र सरकारला जोरदार झटका बसला आहे. 
 • चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाच्या आर्थिक विकास दरात घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. 
 • पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मध्ये विकासदर ५.८ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यावर घसरला आहे. देशाचा विकास दर घसरला असून गेल्या वर्षभरात यात जवळपास ३ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीच्या जीडीपी ५ टक्क्यांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षातल्या अखेरच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान जीडीपी ५.८ टक्के होता. 
 • मात्र आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीत हे आकडे समोर आले आहेत. मागील वर्षी हे प्रमाण ८ टक्क्यांच्या पुढे होते. देशात मागणी कमी झाल्याने तसेच गुंतवणुकीसाठी परिस्थिती चांगली नसल्याने जूनच्या तिमाहीत जीडीपीत घसरण पाहायला मिळेल, असा अंदाज आधीच बांधण्यात आला होता.

आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात जीडीपीचा दर घसरला 
जीडीपी घसरला:-

 • 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ रेट 5 टक्क्यांवर आला आहे. याआधी हा ग्रोथ रेट 5.8 टक्के होता. 
 • मागील वर्षी हे प्रमाण 8 टक्क्यांच्या वर होतं. 

शेअर बाजारावर परिणामाची शक्यता!:-

अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार जीडीपीने गेल्या सहा वर्षांतला नीचांक गाठला आहे. याचा परिणाम शेअर बाजारावरही होऊ शकतो, असंही मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.

 • गेल्या सहा वर्षातला हा सर्वात कमी जीडीपी 
 • 2012-13 मध्ये एप्रिल-जूनच्या तिमाहीत 4.9 टक्के होता. 
 • 2018-19 जानेवारी-मार्च तिमाहीत 5.8 टक्के होता.
 • कृषी विकास दर 5.8 वरुन 2 टक्क्यांवर आला आहे. 
 • मॅन्युफॅक्चरिंग, बांधकाम, सेवा, कृषी क्षेत्रातील मंदीचा परिणाम
   

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर कर्तारपूर मार्गिकेची पहिलीच बैठक

 • भारताने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरची कर्तारपूर मार्गिकेबाबत तांत्रिक सोपस्कार पूर्ण करण्यासाठीची पहिली बैठक आज झाली. 
 • दोन्ही देशात तणाव असतानाही कर्तारपूर मार्गिकेचा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे पाकिस्तानने आधीच स्पष्ट केले आहे.
 • शून्य बिंदूवर भारत व पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात दोन्ही बाजूचे प्रत्येकी पंधरा अधिकारी सहभागी होते. 
 • सुमारे दोन तास ही बैठक चालली, त्यात तांत्रिक मुद्दय़ांवर चर्चा झाली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. 
 • ज्या शून्य बिंदूच्या ठिकाणी बैठक झाली तेथे प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता. पाकिस्तानच्या बाजूने याबाबत अधिकृत काही सांगण्यात आलेले नाही.
 • पाकिस्तानातील कर्तारपूर येथे असलेल्या कर्तारपूरसाहिब व भारतातील गुरूदासपूर जिल्ह्य़ात असलेल्या डेरा बाबा नानक ही दोन ठिकाणे कर्तारपूर मार्गिकेने जोडली जाणार आहेत.

शीख मुलीच्या धर्मातराचा मुद्दा गंभीर- अमरिंदर:-

 • पाकिस्तानातील नानकाना साहिब येथे शीख मुलीचे अपहरण करून तिचे सक्तीने इस्लाममध्ये धर्मातर केल्याचा मुद्दा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानपुढे उपस्थित करावा, अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली आहे. 
 • शीख मुलीचे अपहरण करून तिचे मुस्लीम धर्मात सक्तीने धर्मातर केल्याचा प्रकार पाकिस्तानात झाला असून चित्रफितीत तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार या मुलीचे अपहरण करून तिचे इस्लाम धर्मात जबरदस्ती धर्मातर केल्याचे म्हटले आहे. त्यात पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्तक्षेपाची मागणीही करण्यात आली होती.
   
31 August Current Affairs
31 August Current Affairs

महिलांच्या बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुपटीहून अधिक

 • भारतात महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत त्यांची शैक्षणिक पात्रता बरोबरीची असूनही दुपटीहून अधिक आहे,असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
 • ‘जेंडर इनक्लुजन इन हायरिंग इन इंडिया’ या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे,की देशात ८.७ टक्के सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत; तुलनेने चार टक्के पुरुषांना नोक ऱ्या नाहीत. 
 • महिलांचा निर्णय व त्यांची नोकरी शोधण्याची क्षमता यावर परिणाम करणारे घटक वेगळे असतात. लिंगभेदामुळे उच्च शिक्षित स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नोक ऱ्या मिळण्यास कठीण जाते. 
 • भारतातील २०० प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली, त्यात २०१६-२०१७ दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भरतीचे स्वरूप त्यातून स्पष्ट झाले. २११०४ उमेदवारांनी वेगवेगळ्या कामांसाठी एकूण २८६९९१ अर्ज केले होते. 
 • कर्मचारी भरती व्यवस्थापक व कर्मचारी बाजारपेठ तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता असे दिसून आले की, अजूनही नोकरी देताना भारतात लिंगभेदाचा परिणाम होत आहे. पात्रता व अनुभव, पर्याय, अर्ज प्रक्रिया यात महिलांना अडचणी आल्याचे दिसून आले. 
 • जर भारतातील नोकऱ्यांत महिलांना योग्य स्थान मिळाले तर देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे २७ टक्के वाढू शकते.

बहुराष्ट्रीय कंपन्यांत भेदभाव कमी:-

 • अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महिलांना योग्य ते स्थान दिले असून भेदभाव कमी केला आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढवणे व त्यातून निवड करणे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. उमेदवारांमध्ये विविधता असणे हे लहान, मध्यम व मोठय़ा उद्योगांनाही फायद्याचे आहे,असे मत शॉर्टलिस्टचे सहसंस्थापक सिमॉन देसजार्डिन यांनी व्यक्त केले. 
 • कर्मचारी भरती करताना क्षमता मापन, कामाचे अचूक वर्णन, लिंगभाव टाळणारी प्रक्रिया यांचा समावेश करण्याची गरज आहे.
   

महाराष्ट्राच्या अविनाश साबळेला सुवर्णपदक

राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

 • पुरुष रिले शर्यतीत रौप्य, तर ११० मीटर अडथळा शर्यतीत पारस पाटीलला कांस्य
 • महाराष्ट्राचा स्टीपलचेसपटू अविनाश साबळे आणि लांब उडीपटू मुरली श्रीशंकर यांनी शुक्रवारी राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई करीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर इशारा दिला आहे.
 •  याशिवाय पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राने रौप्यपदक जिंकले, तर ११० मीटर अडथळा शर्यतीत पारस पाटीलने कांस्यपदक मिळवले.
 • पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेच्या अंतिम फेरीत मोहम्मद अनासने त्याच्या चमूतील खेळाडूऐवजी अन्य चमूतील खेळाडूची बॅटन घेऊन पुढे धावल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनासचा सहकारी अ‍ॅलेक्स अँथनीने दुखापतीमुळे माघार घेतली.
 • २४ वर्षीय साबळे हा आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर आहे. त्याने ८:३३.१९ मिनिटे अशी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. 
 • परंतु त्याला त्याचा ८:२८.९४ मिनिटांचा राष्ट्रीय विक्रम मात्र मोडता आला नाही. ही स्पर्धा सर्वात शेवटी खेळवण्यात आली. 
 • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये ८:२९ मिनिटे अशी पात्रता वेळ निश्चित करण्यात आली आहे आणि साबळे या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरला आहे.
 • ओदिशाची धावपटू द्युती चंदला महिलांच्या १०० मीटर शर्यतीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता गाठण्यात अपयश आले. तिने ११.३८ सेकंदांची वेळ नोंदवत शर्यत जिंकली. परंतु ०.१४ सेकंदांनी (११.२४ सेकंद) तिची संधी हुकली.
   
31 August Current Affairs
31 August Current Affairs

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा कोरी टेलर यांचा पराक्रम

 • नदाल, चिलिच, ओसाका यांचा तिसऱ्या फेरीत प्रवेश; हॅलेप, क्विटोव्हा यांचे आव्हान संपुष्टात
 • अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत शुक्रवारचा दिवस अमेरिकेच्याच दोन खेळाडूंनी गाजवला. १५ वर्षीय कोको गॉफने तिसरी फेरी गाठणारी सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान मिळवला. 
 • तर जागतिक क्रमवारीत ११६व्या स्थानी असलेल्या टेलर टाऊनसेंडने विम्बल्डन विजेत्या सिमोना हॅलेपला धूळ चारण्याचा पराक्रम केला. याव्यतिरिक्त राफेल नदाल, मरिन चिलिच, नाओमी ओसाका यांनी तिसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले. तर पेट्रो क्विटोव्हाचे आव्हान संपुष्टात आले.
 • लुइस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर २ तास आणि २२ मिनिटे रंगलेल्या महिला एकेरीच्या सामन्यात कोरीने हंगेरीच्या टिमेआ बॅबोसला ६-२, ४-६, ६-४ असे पराभूत केले. वयाच्या १५व्या वर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅमची तिसरी फेरी गाठणारी ती गेल्या २३ वर्षांतील सर्वाधिक युवा खेळाडू ठरली आहे. 
 • १९९६मध्ये अ‍ॅना कोर्निकोव्हा यांनीसुद्धा वयाच्या १५व्या वर्षीच अशी कामगिरी केली होती. कोरीचा पुढील फेरीत गतविजेती आणि जपानची अग्रमानांकित ओसाकाशी सामना होणार आहे. ओसाकाने मॅग्डा लिनेटचा ६-२, ६-४ असा सहज धुव्वा उडवला.
 • दुसरीकडे बिगरमानांकित टेलरने रोमानियाच्या चौथ्या मानांकित हॅलेपला २-६, ६-३, ७-६ (७-४) असे पिछाडीवरून पराभूत करून खळबळजनक विजयाची नोंद केली. 
 • सलग तिसऱ्या वर्षी हॅलेपला उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्यात अपयश आले. 
 • चेक प्रजासत्ताकच्या सहाव्या मानांकित क्विटोव्हाला जर्मनीच्या आंद्रे पेटकोव्हिचने ६-४, ६-४ असे नेस्तनाबूत केले.
 • पुरुष एकेरीत स्पेनच्या दुसऱ्या मानांकित नदालला पुढे चाल देण्यात आली. नदालचा ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी थानसी कोकिनकीसने दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतली. क्रोएशियाच्या २२व्या मानांकित चिलिचने सेड्रिक मार्सलवर ४-६, ६-३, ७-५, ६-३ असा विजय मिळवला. रशियाच्या पाचव्या मानांकित डॅनिल मेद्वेदेवने ह्य़ुगो डेलिनचा ६-३, ७-५, ५-७, ६-३ असा पराभव करून पुढील फेरी गाठली.

हॅलेपविरुद्ध सामना खेळताना तुम्हाला क्षुल्लक चूकही महागात पडू शकते. परंतु दुसऱ्या सेटमध्ये मला तिच्या कमकुवत बाजूंचा अधिक स्पष्टपमे अंदाज आला आणि त्यानुसार मी माझ्या खेळत बदल केला. कारकीर्दीत पहिल्यांदाच तिसरी फेरी गाठल्याने मी आनंदी असून यापुढील सामन्यांतही कामगिरीत सातत्य राखेन.
- टेलर टाऊनसेंड
प्रत्येक सामन्यात चाहत्यांना माझ्या कामगिरीचे आकर्षण असते. मात्र मी फक्त माझ्या खेळाकडेच लक्ष देते. ओसाकाविरुद्ध खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. परंतु यादरम्यान माझा दुहेरीतीलसुद्धा सामना असल्याने मला तंदुरुस्तीवर लक्ष द्यावे लागणार आहे.
- कोरी गॉफ

 

लिव्हरपूलचा व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी

यूईएफए २०१८-१९ चॅम्पियन्स लीगचे पुरस्कार जाहीर

 • लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला. गुरुवारी रात्री झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (२०१८-१९ या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.
 • लिव्हरपूलला २०१८-१९च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता. बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१२मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.
 • आंतरराष्ट्रीय पातळीवर नेदरलँड्स फुटबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या व्हॅन डिकला मे महिन्यात प्रीमियर फुटबॉल लीगचासुद्धा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते. 
 • २८ वर्षीय व्हॅन डिकने युव्हेंटसच्या रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा मेसी यांना मागे टाकले. गेल्या आठ वर्षांत मेसी अथवा रोनाल्डो यांच्यापैकीच एकाने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.
 • याव्यतिरिक्त, मेसीने सर्वोत्तम आक्रमक, तर लिव्हरपूलच्याच अ‍ॅलिसन बेकरने सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळवला.

पुरस्कार विजेते:-

 • सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू    व्हॅन डिक
 • गोलरक्षक               अ‍ॅलिसन बेकर
 • मध्यरक्षक              फ्रँक डी जाँग
 • आक्रमणपटू             लिओनेल मेसी
 • बचावपटू               व्हॅन डिक
31 August Current Affairs
31 August Current Affairs

टाइम्सच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019 यादीत स्टॅच्यू ऑफ युनिटी चा समावेश

 • गुजरातमधल्या 597 फूट उंची असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याला टाइम्स मॅगझीनने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेस 2019’ या यादीत स्थान दिले गेले आहे. त्याव्यतिरिक्त मुंबईचे ‘सोहो हाऊस’ या इमारतीनेही या यादीत स्थान मिळवले.

सन 2019 मध्ये सर्वाधिक भेट दिलेल्या जगातली प्रथम महान ठिकाणे -
1.    जियोसी जियोथर्मल सी बाथ्स - हुसविक, आइसलँड
2.    कॅम्प अ‍ॅडव्हेंचर - रॉनेडे, डेन्मार्क
3.    मोरी बिल्डिंग डिजिटल आर्ट म्युझियम - टोकियो, जपान
4.    स्टार वॉर्स: गॅलेक्सीज एज अॅट डिस्नेलँड- अॅनाहिम, कॅलिफोर्निया

 • गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर उंच आहे.
 • हा नर्मदा नदीच्या किनारी जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. त्याचे अनावरण गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. ही शिल्पाकृती विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी साकारले. विक्रमी 33 महिन्यांमध्ये याचे बांधकाम केले गेले.
 • मुंबईचे सोहो हाऊस हे 11 मजली इमारतीत असून ते अरबी समुद्राकाठी आहे. येथे 34 बैठकांचे सिनेमागृह, एक लायब्ररी आणि एक रूफटॉप बार आणि पूल आहे.
   

शीव ते स्वित्र्झलड बॅडमिंटनच्या मार्गाने यश

अपंगांच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या मानसी जोशीचा प्रेरणादायी प्रवास
पी. व्ही. सिंधूने जगज्जेतेपद जिंकत बॅडमिंटनमध्ये सत्ता प्रस्थापित केली, याचप्रमाणे बॅडमिंटनपटू मानसी जोशीने अपंगांच्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेवर सुवर्णमोहर उमटवत सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. 
वयाच्या २२व्या वर्षी आलेले अपंगत्व आणि खेळण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत यांसारख्या अनेक अडथळ्यांवर मात करून शीवच्या मानसीने स्वित्र्झलडमध्ये भारताचा झेंडा डौलाने फडकावला आहे.
अंतिम फेरीत भारताच्याच पारुल परमारचा २१-१२, २१-७ पराभव करून मिळवलेल्या विजेतेपदानंतरच्या अनुभवाविषयी मानसी म्हणाली, ‘‘अपंग खेळाडूंच्या स्पर्धामध्ये फक्त आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद या स्पर्धामध्येच सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे राष्ट्रगीत वाजवले जाते. त्यामुळे ज्या वेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा मला अश्रू अनावर झाले आणि मीसुद्धा मोठय़ाने राष्ट्रगीत गाऊ लागले. 
त्या दिवसापासून माझ्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. दररोज मला अनेक कार्यक्रमांसाठी आमंत्रणे येत असून समाजमाध्यमांवरसुद्धा माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव होत असल्याने मी या काळाचा फक्त आनंद लुटत आहे.’’

डिसेंबर २०११मध्ये चेंबूर येथील अणुशक्ती नगर येथून विक्रोळीच्या दिशेने प्रवास करताना मानसीचा अपघात झाला होता. यामध्ये तिला डावा पाय गमवावा लागला. परंतु मानसीने हार न मानता बॅडमिंटनचे वेड जपले. 
कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाविषयी विचारले असता मानसी म्हणाली, ‘‘माझ्या कुटुंबीयांसोबत फावल्या वेळेत बॅडमिंटन खेळतानाच मला या खेळाविषयी आवड निर्माण झाली. त्यामुळे माझे कुटुंबच माझे प्रेरणास्थान आहे. 
परंतु सुरुवातीला मला एका पायावर अतिरिक्त ताण जाणवू लागला. कित्येकदा मी खेळताना खालीसुद्धा कोसळली. मग हळूहळू सवय झाल्यावर २०१४ मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये कृत्रिम पाय लावून खेळण्यास सुरुवात केली. पुढच्याच वर्षी मी पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधित्व केले. तेव्हापासून सुरू झालेला माझा प्रवास आता खऱ्या अर्थाने भरारी घेत आहे.’’
व्यावसायिक पातळीवर भारत पेट्रोलियमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मानसीच्या कारकीर्दीत विलास दामले आणि लिमये यांचे मोलाचे योगदान आहे. त्याशिवाय देवनार येथील रोटरी क्लब, भाभा अणू संशोधन केंद्रातील क्रीडा विभाग, ऑटोमिक एनर्जी सेंटर शाळा आणि के. जे. सोमय्या महाविद्यालय येथील अनेकांचे मला फार साहाय्य लाभले असल्याचेही मानसीने सांगितले. 
आतापर्यंत मानसीने विविध पातळीवरच्या स्पर्धामध्ये सात सुवर्ण, सात रौप्य आणि १२ कांस्यपदके मिळवली आहेत. सध्या मानसी पुढील वर्षी होणाऱ्या अपंग खेळाडूंच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करीत आहेत.


 

31 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »