अमेरिकेच्या संसदेने भारताला नाटो देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक मंजुर केले आहे. त्यामुळे आता संरक्षण क्षेत्राशी निगडीत व्यवहारांमध्ये अमेरिका भारताबरोबर आपले नाटोचे सहकारी देश इस्त्रायल आणि दक्षिण कोरिया यांच्याप्रमाणे व्यवहार करेल.
आर्थिक वर्ष 2020 साठी नॅशनल ‘डिफेन्स ऑथरायझेशन अॅक्ट’ला अमेरिकेच्या सिनेटने गेल्या आठवड्यातच मंजुरी दिली होती. त्यानंतर आता या विधेयकातील संशोधनाच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. सिनेटर जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांनी अमेरिकेच्या संसदेत हे विधेयक सादर केले होते. भारताबरोबर परस्पर सहकार्य, दहशतवादाविरोधात लढा, काऊंटर पायरसी आणि समुद्री सुरक्षेवर भारताबरोबर काम करण्याची आवश्यकता असल्याचे यात नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, हे विधेयक मंजुर झाल्यानंतर हिंदू अमेरिकन फौडेशनने सेनेटर कॉर्निन आणि वॉर्नर यांचे अभिनंदन केले. नाटो देशांच्या यादीत भारताला समावून घेणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. तसेच भारत आणि अमेरिका या देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत ‘हिंदू अमेरिकन फौडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कालरा यांनी व्यक्त केले. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशातीव संबंधांना असलेले महत्त्व समजले हे मोठी बाब असल्याचे मत शेरमॅन यांनी बोलताना व्यक्त केले.
भारत अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील मोठा भागीदार असल्याचे अमेरिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. तसेच भारताला आता नाटो देशाचा दर्जा मिळाल्यामुळे भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशी संरक्षण सामग्री खरेदी करू शकणार आहे.
नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन):-
रशिया व त्याची अंकित राष्ट्रे यांविरुद्ध काही पाश्चात्त्य राष्ट्रांनी स्थापन केलेली एक संघटना. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या इंग्रजी नावातील आद्याक्षरांवरून ही संज्ञा रूढ झाली.
प्रथम ग्रेट ब्रिटन, फ्रांस, नेदर्लंड्स, बेल्जियम आणि लक्सेंबर्ग या राष्ट्रांनी संरक्षणासाठी १९४८ मध्ये हा करार केला. तो ब्रुसेल्स या नावाने प्रथम प्रसिद्ध होता.
पुढे नॉर्वे, डेन्मार्क, आइसलँड, इटली, पोर्तुगाल, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा हे देश या करारात सामील झाले आणि ४ एप्रिल १९४९ रोजी वॉशिंग्टनमध्ये नाटो संघटनेच्या करारावर संबंधित राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या सह्या झाल्या. कराराच्या पाचव्या अनुच्छेदात त्याचा हेतू स्पष्ट केला असून त्यानुसार उत्तर अटलांटिक प्रदेशातील राष्ट्रांमध्ये राजकीय स्वातंत्र्य, समान संस्कृती व आर्थिक स्थैर्य निर्माण करून सहकार्याचे तत्त्व फैलाविणे व त्यासाठी आक्रमकांचा सामुदायिक प्रतिकार करणे व सभासद राष्ट्रांना संरक्षण देणे, या गोष्टी सर्व सभासद राष्ट्रांवर बंधकारक आहेत.
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली यूरोपमध्ये नाटोच्या संरक्षण फौजा ठेवण्यात आल्या. हा करार मुख्यतः रशियाविरोधी असून शीतयुद्धाचाच एक भाग होता, हे त्याच्या घटनेवरून स्पष्ट दिसते. या करारामुळे सामुदायिक सुरक्षिततेचे तत्त्व जन्मास आले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक मंत्री परिषद स्थापन करण्यात आली. तीथे प्रत्येक सदस्य राष्ट्राचा एक प्रतिनिधी घेण्यात आला आणि कार्यालय ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे ठेवण्यात आले.
याशिवाय लष्करी कारवाईसाठी एक समिती स्थापण्यात आली. तीवर सदस्य राष्ट्रांतील सेनाप्रमुख घेण्यात आले. ती मंत्री परिषदेस लष्करी प्रश्नांसंबंधी सल्ला देई. लष्करी समितीची प्रमुख सूत्रे अमेरिकेच्या सेनाप्रमुखाच्या हाती देण्यात आली.
या संघटनेचे प्राथमिक कार्य १९४९ ते १९५५ यांदरम्यान पूर्ण झाले. १९५२ मध्ये ग्रीस व तुर्कस्तान आणि १९५५ मध्ये प. जर्मनी हे देश हीत सामील झाले. १९५५ ते १९६७ च्या दरम्यान नाटोची लष्करी संघटना पूर्ण झाली आणि आण्विक शक्तींच्या बळावर तिने यूरोपात सत्तासमतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शीतयुद्धाचा तणाव कमी झाला. १९७० नंतर नाटोची लष्करी शक्ती कमी न करता नाटो राष्ट्रांनी ती वाढविली आहे.
प्रश्न:- सध्या नाटो मध्ये किती देश सदस्य आहेत?
उत्तर:- 29 सदस्य राष्ट्रे
राज्यसभा टिव्ही वर यावर अजून माहिती उपलब्ध आहे.
watch this article
भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी भारतात संशोधनात्मक संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) स्किम फॉर ट्रान्स-डिसिप्लीनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी (STRIDE) नावाचा एक नवीन उपक्रम मंजूर केला आहे.
सामाजिकदृष्ट्या संबंधित, स्थानिक गरजांवर आधारित, राष्ट्रीय महत्त्वपूर्ण आणि जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. अर्ज प्राप्त करण्यासाठी योजनेचे संकेतस्थळ दि. 31 जुलै 2019 पासून सुरू करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या मुख्य मिरवणुकीमध्ये (परेड) यंदा भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रातील सण परंपरांचेही दर्शन होणार आहे. मिशिगनमधील अॅन आर्बर मराठी मंडळ यंदा मुख्य परेडमध्ये सहभागी होणार असून भारताच्या तिरंग्याच्या जोडीने भगवा ध्वज या परेडमध्ये फडकणार आहे.
अमेरिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त मिशिगनमध्ये अॅन आर्बर येथे ४ जुलैला ‘ॲन आर्बर जेसीज फोर्थ ऑफ जुलै’ ही विशेष परेड आयोजित करण्यात आली आहे. परेडमध्ये भारतीय असोसिएशनला पहिल्यांदाच सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. पारंपरिक वेशभूषा परिधान करून भारतीय नागरिक परेडमध्ये सहभागी होणार आहेत. शिव शार्दूल पथकातर्फे ढोल, ताशा, लेझीम वादन करण्यात येणार आहे. अमेरिका आणि भारत यांची मैत्री दृढ करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ॲन आर्बर मराठी मंडळ (ए२एमएम) ही संस्था २००६ मध्ये स्थापन झाली. दोन देशांच्या संस्कृतींचा सुरेख संगम पाहण्याची ही सुवर्ण संधी आहे, अशी माहिती ए २ एमएमचे संस्थापक सदस्य भूषण कुलकर्णी यांनी दिली.
अमेरिका दिनासारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताचे आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही आमच्या दृष्टीने अभिमानाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट आहे. या रॅलीसाठी शंभर भारतीय नागरिकांनी सराव केला आहे. भारतापासून दूर असूनही चालीरिती, सण, उत्सव, भाषा यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, मनोरंजनाबरोबरच त्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांचे व नातलगांची स्वागत व्हावे, सर्वांच्या सुप्त गुणांना देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. ए२एमएमने २०१४ मध्ये मराठी शाळा सुद्धा सुरु केली असून मिशिगन शिक्षण विभागाकडून 'सील ऑफ बायलीटरसी' मिळाले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अमित मांढरे यांनी दिली.
बांगलादेशविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. ९२ चेंडूच्या आपल्या खेळीमध्ये रोहितने ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. या खेळीमध्ये रोहितने मालिकेतील चौथे शतक ठोकले. एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये चार शतके ठोकणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. तर एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच्या विक्रमाची बरोबर केली आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावे आहे.
रोहितने या विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध खेळताना शतकी खेळी केली होती. आजही त्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना १०४ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने सहा विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
१) चार शतके ठोकणारा दुसरा खेळाडू
२) १०४ धावांच्या या खेळीमध्ये रोहितने ५ षटकार लगावले. या षटकारांसहीत सलग सहा वर्ष एका वर्षात ३० हून अधिक षटकार मारणारा रोहित पाहिला खेळाडू ठरला आहे.
३) विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या मानाच्या यादीत रोहितने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक वेगाने पाच शतके करणारा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने विश्वचषक स्पर्धेमध्ये १५ सामन्यांमध्ये पाच शतके ठोकली आहेत. रोहितच्या आधी हा विक्रम तीनच खेळाडूंनी केला आहे. सचिन तेंडुलकर विश्वचषक स्पर्धेत ४४ सामने खेळता त्यात त्याने सहा शतके ठोकली. त्या खालोखाल संगाकार (३५ सामने), रिकी पॉटिंग (४२ सामने) या दोघांनी प्रत्येकी पाच शतके ठोकली आहेत.
४) २०१९ च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
५) आयसीसीच्या स्पर्धांमध्ये रोहितचे हे बांगलादेशविरुद्धचे सलग तिसरे शतक आहे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितने मेलबर्नमधील सामन्यात १३७ धावांची खेळी केली होती तर बांगलादेशविरुद्ध बर्मिंगहममध्ये झालेल्या उपांत्य सामन्यातही त्याने शतक ठोकत १२३ धावांची खेळी केली होती.
६) एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरने दोन वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये केला आहे.
इराणबरोबरच्या २०१५ मधील अणुकरारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर आता त्या करारात घालून दिलेली युरेनियम शुद्धीकरणाची कमाल मर्यादा इराणने ओलांडली आहे. हे घातक लक्षण असून इराण आगीशी खेळत आहे असा इशारा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी याआधी असे म्हटले होते, की इराणने युरेनियम शुद्धीकरणाची प्रक्रिया थांबवावी.
सोमवारी इराणने पहिल्यांदा करारात घालून दिलेली युरेनियम शुद्धीकरणाची मर्यादा ओलांडली होती. युरेनियम शुद्धीकरणाची मर्यादा ओलांडल्याच्या या वृत्तास आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दुजोरा दिला आहे. ट्रम्प यांनी वार्ताहरांना सांगितले,की युरेनियम शुद्धीकरणाची करारातील मर्यादा ओलांडून इराण आगीशी खेळत आहे.
परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांनी म्हटले आहे,की इराणने युरेनियमचे शुद्धीकरण थांबवावे. इराणकडे अण्वस्त्रे असणे हे जगाच्या दृष्टीने घातक असून अमेरिका इराणशी नवा करार करण्यास तयार आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेस असलेला धोका टाळता येईल. इराण जितक्या प्रमाणात राजनयाच्या मार्गापासून दूर जाईल व अण्वस्त्र कार्यक्रमाचा विस्तार करील तितके त्याच्यावर आर्थिक दडपण वाढत जाईल, तसेच तो देश इतरांपासून वेगळा पडत जाईल. आण्विक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी इराणने आणखी काही पावले पुढे टाकली आहेत. कुठल्याही अणुकरारात इराणला युरेनियम शुद्धीकरणाची परवानगीच द्यायला नको. २००६ पासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने सहा ठराव संमत केले असून त्यात इराणला युरेनियम शुद्धीकरण व त्याची फेरप्रक्रिया करण्यास प्रतिबंधित केले आहे. तेव्हाची ती अट योग्यच होती व आताही योग्य आहे.
ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये सांगितले,की माझा इराणला कुठलाही संदेश नाही, ते काय करीत आहेत हे त्यांना ठाऊक आहे. ते कशाशी खेळत आहेत हे त्यांना माहिती आहे. माझ्या मते ते आगीशी खेळत आहेत. त्यामुळे त्यांना कुठलाही संदेश नाही.
लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱया कंपन्यांना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार या वर्षी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. ला देण्यात आला आहे.
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालाच्या वतीने जागतिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते पितांबरीचे उपाध्यक्ष आणि मार्केटिंग डायरेक्टर परीक्षित प्रभुदेसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जगभरातील 44 देशांचे 175 मान्यवर प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
या पुरस्कारासाठी देशातून सुमारे 34 हजार कंपन्यांनी माहिती सादर केली होती. त्यामधून केवळ 100 कंपन्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पितांबरीसह महाराष्ट्रातील 23 कंपन्यांचा समावेश आहे. यावेळी पॅनल डिस्कशनमध्ये परीक्षित प्रभुदेसाई यांनी सहभाग घेत आपले विचार व्यक्त केले.
आयएनएस विराट हे विमानवाहू जहाज भंगार म्हणून विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या हे जहाज नौदलाच्या सेवेत नाही. या निर्णयामुळे लष्कराचा इतिहास आणि वारसा जतन करण्याच्या सरकारच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटले आहे.
आयएनएस विक्रांतच्या वाटेने विराटला जाऊ देऊ नये, अशी मागणी यापूर्वीपासूनच होत होती; परंतु संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात आयएनएस विराट विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती दिली. विराट कोणत्याही राज्य सरकारकडे देण्यात येणार नाही. सुरक्षेचा मुद्दा विचारात घेता नौदलाशी झालेल्या चर्चेनंतर विराट भंगारात काढण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला, असी माहिती नाईक यांनी दिली.