5 August Current Affairs

5 August Current Affairs
5 August Current Affairs

फ्लाइंग मॅन पहिल्यांदा थेट समुद्रात पडला पण दुसऱ्यांदा ब्रिटिश खाडी पार करुन इतिहास रचला

‘फ्लाइंग मॅन’नावाने प्रसिद्ध असलेले फ्रान्सचे फ्रँकी झपाटा यांनी पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर आपल्या दुसऱ्या प्रयत्नात जेट-पावर्ड ‘फ्लायबोर्ड’द्वारे ब्रिटिश खाडी पार केली आणि विक्रम रचला. विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्याच्या 10 दिवसांनंतर लगेचच त्यांनी इतिहास रचला. यासोबतच चहाच्या ट्रे एवढ्याच आकाराच्या असलेल्या जेट-पावर्ड ‘फ्लायबोर्ड’द्वारे ब्रिटिश खाडी पार करणारे फ्रँकी झपाटा हे जगातील पहिलेच व्यक्ती ठरल्याचं ‘द सन’ने म्हटलं आहे.
ब्रिटनच्या वेळेनुसार (दि.4) सकाळी 7.16 मिनिटांनी 5 टर्बाइन इंजिन असलेल्या हॉवरबोर्डवर उभं राहून माजी जेट-स्काइंग चँपियन 40 वर्षीय झपाटा यांनी फ्रांसच्या उत्तर भागातील संगते येथून उड्डाण घेतलं. यावेळी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी झपाटा यांच्या पत्नीसह अनेकांनी गर्दी केली होती. झपाटांनी उड्डाण घेतल्यानंतर पाठोपाठ हेलिकॉप्टर देखील होतं. झपाटा यांच्या बॅकपॅकमध्ये 10 मिनिट पुरेल इतकं जवळपास 42 लीटर इंधन होतं. म्हणजेच इंधन पुन्हा भरण्यासाठी त्यांना समुद्रात मध्यावर असलेल्या रिफ्युलिंग प्लॅटफॉर्मवर उतरणं आवश्यक होतं. गेल्या महिन्यात केलेल्या प्रयत्नात याच रिफ्युलिंग प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा त्यांचा अंदाज चुकला होता आणि ते थेट समुद्रात जाऊन पडले. पण यावेळेस त्यांनी कोणतीही चूक केली नाही आणि ते ठरलेल्या बोटीवरच उतरले. इंधन पुन्हा भरण्यासाठी त्यांच्याकडे केवळ 2 मिनिटांचा वेळ होता. यावेळी काहीही चूक न करता इंधन भरुन झपाटा यांनी पुन्हा उड्डाण घेतलं आणि ब्रिटिश खाडी यशस्वीपणे पार करत 7.39 वाजता सेंट मार्गारेट किनारपट्टीवर उतरले. या संपूर्ण प्रवासासाठी झपाटा यांना केवळ 23 मिनिटांचा वेळ लागला. ब्रिटिश खाडी यशस्वीपणे पार केल्यानंतर झपाटा यांनी जल्लोष केला. “यावेळी कीहीही अडचण आली नाही… मी खूप थकलोय, पण मला तितकाच आनंद देखील झालाय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच यासाठी त्यांच्यावर मेहनत घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं आणि पत्नीचे झपाटा यांनी विशेष आभार मानले.

गेल्या महिन्यातही झपाटा यांनी ब्रिटिश खाडी पार करण्याचा प्रयत्न केला होता. अशाप्रकारच्या कर्तबगारीमुळे जगभरात वेगळी ओळख निर्माण करणारे झपाटा त्यावेळी ब्रिटिश खाडी पार करण्यामध्ये अयशस्वी ठरले होते. एका बोटीवर रिफ्युलिंग प्लॅटफॉर्म(इंधन पुन्हा भरण्याची जागा) चुकवल्यामुळे ब्रिटिश खाडी पार करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि ते समुद्रात जाऊन पडले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावेळी शोधनौकांनी तातडीने त्यांचा शोध घेतला होता, झपाटा यांना कोणतीही जखम झाली नव्हती, पण खाडी पार न करता आल्यामुळे ते निराश झाले होते. मात्र, आता दुसऱ्या प्रयत्नात खाडी पार करण्याच आनंद ते आपल्या चेहऱ्यावरुन लपवू शकले नाहीत. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ अशी मराठीतील प्रचलित म्हण या ‘फ्लाइंग मॅन’ने सार्थ ठरवलीये.

भारताच्या क्यूआरएसएएम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भारताने रविवारी  सर्व हवामानांत व प्रदेशांत अनुकूल अशा अत्याधुनिक क्यूआरएसएएम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओदिशातील चंडीपूर येथे एकात्मिक चाचणी क्षेत्रात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली.

संकुल- ३ मधून मोबाइल ट्रकवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण संशोधन व विकास संस्थेने केली आहे.  जलद प्रतिसाद देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे हे सुरक्षा क्षेपणास्त्र चालत्या ट्रकमध्ये एका मोठय़ा कुपीत ठेवण्यात आले होते. त्यात घन इंधनाचा वापर केलेला असून त्याचा पल्ला २५-३० किलोमीटर आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी ४ जून २०१७ रोजी झाली होती.  २६ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याच्या दोन चाचण्या एकाच दिवशी घेण्यात आल्या व त्या यशस्वी झाल्या. रविवारी दोन क्षेपणास्त्रांची वेगवेगळ्या उंचीवर चाचणी घेण्यात आली. त्यात त्याची वायुगती, इंधन क्षमता, रचनात्मक स्थिती  हे घटक योग्य काम करीत असल्याचे दिसून आले आहे.
 

5 August Current Affairs
5 August Current Affairs

पांढरे झेंडे घेऊन या मृतदेह घेऊन जा भारतीय लष्कराची पाकिस्तानला ऑफर

जम्मू-काश्मीरमधील केरण भागात घुसखोरी करुन भारतीय सिमेवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या सीमा कृती दलाच्या काही जवानांना भारतीय लष्कराने ठार केले. या जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानने पांढरे झेंडे घेऊन यावे आणि मृतदेह घेऊन जावे अशी ऑफरच भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिली आहे.

भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने पांढरे निशाण फडकावत भारतीय लष्कराशी संपर्क साधून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत पडलेल्या पाकिस्तानी जवानांचे मृतदेह घेऊन जावेत असे पाकिस्तानला सांगितले आहे. लष्कराने पाकिस्तानच्या सीमा कृती दलाच्या केरण क्षेत्रातील हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडताना त्यांचे पाच ते सात घुसखोर जवान मारले होते. पाकिस्तानच्या लष्करातील सीमा कृती दलामध्ये दहशतवादी आणि जवान एकत्रित काम करतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमा कृती दलाने ३१ जुलै आणि १ ऑगस्टच्या मधल्या रात्री भारतीय सिमेत घुसून हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी विशेष सेवा दलाचे किंवा सीमा कृती दलाचे पाच ते सात कमांडो किंवा दहशतवादी ठार झाले.
पाकिस्तान म्हणते…
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी ‘भारताने पाच ते सात पाकिस्तानी जवानांना ठार मारल्याचा दावा हा केवळ प्रचाराचा भाग आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.
 

वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने ५८ नागरिकांना सुरक्षितस्थळी आणले

#inspirational

#disaster management

ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे पावसाच्या थैमानानंतर पूरग्रस्त भागात अडकलेल्या अनेक नागरिकांना वायुसेनेच्या एमआय-१७ या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितस्थळी आणल्या गेले. स्क्वाड्रन लीडर सुभाष यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५८ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणले गेले आहे. यामध्ये किमान १६ लहान मुलांचा समावेश आहे.
दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने खडवली गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील बहुतांश भाग हा पाण्याखाली गेल्याने नागरिकांना बाहेर पडणे अशक्य झाले होते. शिवाय अनेकांच्या घरातही पाणी गेल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलवणे अत्यंत आवश्यक होते.

यानंतर महाराष्ट्र शासनाच्या विनंतीवरून, वायुसेनेचे एमआय-१७  हेलिकॉप्टर या नागरिकांना सुरक्षितस्थळी आणण्यासाठी गेले होते. या हेलिकॉप्टरने पुरात अडकलेल्यांना ठाणे येथील वायुसेनेच्या स्थानकावर सुखरूप सोडले.

शनिवारपासून अवघ्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असल्याने, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबर एनडीआरफ व वायुसेनेचे जवानही कार्य करत आहेत. पोलिस प्रशासनाकडूनही पूरग्रस्त भागात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाटी प्रयत्न सुरू आहेत.
 

5 August Current Affairs
5 August Current Affairs

सामाजिक दायित्व आघाडीवर कंपन्यांच्या कामगिरीत सुधार

‘सरकारचा कठोर पवित्रा अनाठायी’

सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) आघाडीवर देशातील कंपन्या सतत चांगली कामगिरी करत असतानाही, ‘सीएसआर’चे अनुपालन न केल्यास तुरुंगवासासह कठोर शिक्षा करण्याची दुरुस्ती सरकारने कंपनी कायद्यात केली आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये, कंपन्यांनी ‘सीएसआर’वर केलेला एकूण खर्च ७० टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर गेल्याचे भांडवली बाजाराची आकडेवारी पुरवण्यात अग्रेसर असलेल्या प्राइम डेटाबेसकडून मिळालेल्या माहितीवरून दिसून येत आहे. २०१८-१९ या वर्षांसाठी २२४ कंपन्यांबाबतच्या आकडेवारीनुसार, ‘सीएसआर’करिता ४३६६.८ कोटी रुपये खर्च होणे आवश्यक असताना, या कंपन्यांनी ३९९४ कोटी किंवा आवश्यकतेच्या ९१.५ टक्के खर्च केला. हेच प्रमाण २०१६ या आर्थिक वर्षांसाठी ७९ टक्के, २०१७ साठी ८३.८ टक्के, तर २०१८ साठी ८३.२ टक्के इतके होते. अनिवार्य सीएसआर खर्चासाठी (मँडेटरी सीएसआर स्पेंडिंग) पात्र असलेल्या २२४ कंपन्यांची संख्या आणि त्यांनी केलेला एकूण खर्च यात उल्लेखनीय वाढ झाल्याचेही या आकडेवारीवरून दिसते. २०१५ या आर्थिक वर्षांमध्ये ८४९ कंपन्यांसाठी ही रक्कम ६४४६ कोटी रुपये होती, तर २०१८ साली १०७७ कंपन्यांच्या बाबतीत हीच रक्कम १०,११५ कोटी रुपये होती. २०१८-१९ या वर्षांसाठी आतापर्यंत फक्त २२४ कंपन्यांचीच आकडेवारी उपलब्ध असून, त्यांनी ४५२५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
‘सीएसआर’बाबत चुकारपणा केल्यास तुरुंगवासाची तरतूद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे वर्णन भारतातील उद्योगक्षेत्राने ‘प्रतिगामी’ असे केले असून, त्याच्या फेरविचाराची मागणी केली आहे. ‘सीएसआर’च्या अंमलबजावणीत सुधारणा झालेली असल्याचे लक्षात घेता ही गोष्ट विचित्र असल्याचेही उद्योगांचे म्हणणे आहे. ‘सीएसआर’साठीचा निधी पूर्णपणे त्याच उद्दिष्टासाठी खर्चिणाऱ्या कंपन्यांची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढलेली आढळली.
सुरुवातीला निश्चित माहिती आणि धोरणाअभावी ‘सीएसआर’कडे पुरेसा निधी वळवता आला नव्हता. पण, गेल्या दोन वर्षांत नफ्यात असलेल्या बहुतेक कंपन्यांनी ‘सीएसआर’साठी शेवटच्या तीन वर्षांतील सरासरी निव्वळ नफ्याच्या दोन टक्के तरतुदीची पूर्तता केलेली आहे.  

वीज लोकपाल लवकरच लोकाभिमुख

उपाययोजनांसाठी आयोगाकडून तज्ज्ञांची समिती
सामान्य वीज ग्राहकालाही विजेसंदर्भातील आपल्या तक्रारी किंवा प्रश्नांवर दाद मागता यावी म्हणून निर्माण करण्यात आलेली विद्युत लोकपाल व्यवस्थेची लोकांना पुरेशी माहितीच नसल्यामुळे किंवा पुरेशा प्रसिद्धीअभावी आजवर दुर्लक्षित राहिली आहे.

मात्र १३ वर्षांनंतर या व्यवस्थेच्या कामकाजाचे मूल्यमापन करतानाच ती अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा निर्णय राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) घेतला आहे. त्यानुसार वीज लोकपाल, विद्युत ग्राहक मंच यांच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करतानाच या व्यवस्थेचा अधिकाधिक लोकांना लाभ कसा होईल याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी माजी केंद्रीय सचिव यशवंत भावे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशांनुसार २००६ पासून राज्यात मुंबई व नागपूर या ठिकाणी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली विद्युत लोकपाल नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच २२ ठिकाणी विद्युत ग्राहक मंचही निर्माण करण्यात आले आहेत.

वीज ग्राहकांच्या दृष्टीने ही रचना उपयुक्त असली तरी अनेकांना अद्याप या रचनेची पुरेशी माहिती नाही. उद्योगांशी संबंधित लोकांना लोकपाल व्यवस्था माहीत असून लोकपालाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये अशाच तक्रारींचे प्रमाण अधिक असते. या पाश्र्वभूमीवर विद्युत लोकपालाची ही व्यवस्था लोकाभिमुख करण्याचा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेतल्याचे आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्यात गेल्या १३ वर्षांत वीज ग्राहकांची वाढलेली संख्या, वीज ग्राहकांना अनेकदा कंपन्यांकडून येणारी अवाच्या सवा वीज बिले, नवीन वीजजोडणी वेळेवर न मिळणे, त्यांच्या तक्रारींकडे कंपन्यांकडून होणारे दुर्लक्ष, विद्युत ग्राहक मंच आणि विद्युत लोकपाल यांच्या कामकाजाचे स्वरूप, त्यांच्यावर पडणारा ताण तसेच या व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांना खरोखरच न्याय मिळतो का याबाबींचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच सध्याच्या व्यवस्थेत काही त्रुटी आहेत का, त्या कशा दूर करता येतील आणि या व्यवस्थेचा लोकांना जास्तीत जास्त कसा लाभ मिळू शकेल याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी आयोगाने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे माजी सचिव यशवंत भावे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती देशातील प्रमुख राज्यांमधील विद्युत लोकपाल व्यवस्थेची पाहणी करणार असून ३१ मार्च २०२० पर्यंत अहवाल देईल.

वीज लोकपालच्या कार्यकक्षा

महावितरण, अदानी, टाटा, बेस्ट किंवा अन्य वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या अंतर्गत तक्रार निवारण कक्ष किंवा ग्राहक तक्रार निवारण मंच या ठिकाणी वीज ग्राहकाचे समाधान न झाल्यास त्याला विद्युत लोकपालाकडे दाद मागता येते.
त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. वीज ग्राहकाच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे वकिलाचे साहाय्य न घेता लोकपालाकडे आपले म्हणणे मांडता येते.
वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही स्वत: लोकपालासमोर हजर व्हावे लागते. लोकपालाने संबंधित प्रकरणांवर सुनावणी घेऊ न दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे किंवा लोकपालाचा निर्णय मान्य नसल्यास त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याची कंपनी आणि ग्राहकालाही या व्यवस्थेत मुभा आहे.

5 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »