5 Nov Current Affairs

5 Nov Current Affairs
5 Nov Current Affairs

सर्वाधिक डेंग्यूबळी महाराष्ट्रात

 • पायाभूत सुविधांविनाच वाढते शहरीकरण, अनियमित पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव देशात गेल्या पाच वर्षांत जवळपास तिपटीने वाढल्याचे राष्ट्रीय आरोग्य अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
 • २०१७ पाठोपाठ २०१८ मध्येही देशभरात सर्वाधिक डेंग्यूबळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. चिकनगुनियाच्या रुग्णांमध्येही पाच वर्षांत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
 • दोन्ही आजारांवर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारला फारसे यश आलेले नसल्याचे अहवालावरून दिसते.
 • या अहवालानुसार, देशात डेंग्यूचा प्रादुर्भाव १९५० पासून आहे. परंतु, गेल्या दोन दशकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले. देशात २०१४ मध्ये जवळपास ४० हजार डेंग्यूचे रुग्ण आढळले होते.
 • २०१८ मध्ये हा आकडा एक लाखाच्याही वर पोहोचला.
 • राज्यात २०१४ पासून डेंग्यूचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला. देशातील डेंग्यूच्या एकूण बळींपैकी जवळपास २० टक्के बळींची नोंद राज्यात झाली. त्यापाठोपाठ तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, गोवा या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये डेंग्यूच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. कर्नाटकला यंदा डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले आहे.
 • २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये या राज्यात डेंग्यूचे रुग्ण आणि मृत्यू यामध्ये अनुक्रमे ७५ टक्के आणि ६० टक्क्यांनी घट झाली. चिकनगुनियाचे प्रमाणही राज्यात २०१४ पासून २०३ वरून २०१८ पर्यंत १ हजारावर पोहचले आहे.
 • २०१५ पासून डेंग्यूची अधिसूचित आजार अशी नोंद केल्याने खासगी रुग्णांच्याही नोंदणीस सुरुवात झाली. त्यामुळेही रुग्णसंख्येत भर पडली आहे. अनियमित पाऊस, सातत्याने वातावरण बदल हे घटक यासाठी कारणीभूत आहेत. डेंग्यूचा फैलाव वाढल्यानंतर चिकनगुनियाही वाढण्याची शक्यता असते. आतापर्यंत चिकनगुनिया प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळत होता.
 • परंतु, हा आजार शहरी भागांतही दिसून येतो. शहरे विस्तारताना आरोग्याच्या पायाभूत सुविधा मात्र अपुऱ्या पडतात. विकासकामांचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास अजूनही केला जात नाही.

डेंग्यूच्या रुग्णांत यंदा दुपटीने वाढ:-

 • सतत बदलते वातावरण आणि अनियमित पाऊस यामुळे मागील तीन महिन्यांत राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव जवळपास दुपटीने वाढल्याचे समोर आले आहे. विशेषत: सप्टेंबर महिन्यामध्ये डेंग्यूचा प्रसार झपाटय़ाने वाढला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ३४ टक्क्यांहून अधिक रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली आहे.
 • वर्षां ऋतूत प्रामुख्याने आढळणाऱ्या डेंग्यूचा प्रभाव यंदा लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबर उजाडला तरी कायम आहे.
 • सर्वसाधारणपणे जून ते ऑक्टोबपर्यंत डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची पैदास होत असते. त्यात सप्टेंबर महिन्यात अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे या महिन्यात तुलनेने अधिक डेंग्यूचा प्रसार होत असतो.
 • यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली. सप्टेंबरमध्ये तर हे प्रमाण दुपटीने वाढत २,७५५ वर पोहोचले. गेल्या वर्षी याच महिन्यांमध्ये २,०४७ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली होती.
 • या आकडेवारीनुसार यावर्षी सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा फैलाव चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात जवळपास ७००हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले. यंदा २१ ऑक्टोबपर्यंत २,१८३ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली. या वर्षभरात डेंग्यूने मृत झालेल्या रुग्णांची संख्या सात आहे. गेल्या वर्षभरात ७० जणांचा मृत्यू डेंग्यूने झाला होता. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे यावरून स्पष्ट होते.
 • यंदा अनियमित पावसाचे प्रमाण अधिक काळ राहिले आहे. त्यात सातत्याने वातावरण बदलते. हे दोन्ही घटक डेंग्यूच्या वाढीसाठी पोषक असल्याने गेल्या वर्षांच्या तुलनेत मागील तीन महिन्यांत डेंग्यूचे प्रमाण अधिक आढळले असल्याची माहिती राज्य साथरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

डेंग्यू बद्दल सर्व महत्त्वाची माहिती VISION STUDY वर उपलब्ध आहे.
FALLOW करा DOWNLOAD>SCIENCE>DENGUE

 

आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकातामध्ये

 • इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे, असे मंगळवारी गव्हर्निग कौन्सिलच्या बैठकीत ठरवण्यात आले.
 • एप्रिल-मे महिन्यात रंगणाऱ्या आयपीएलच्या १३व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव पहिल्यांदाच कोलकाता येथे होत आहे. ‘‘साधारणपणे बेंगळूरु येथे आयपीएलचा लिलाव होत असतो.
 • पण यंदा आम्ही कोलकाताची निवड केली आहे,’’ असे गव्हर्निग कौन्सिलच्या सदस्याने सांगितले.
 • २०१९च्या मोसमासाठी फ्रँचायझींना खेळाडू विकत घेण्यासाठी ८२ कोटी रुपयांची रक्कम खर्च करण्याची परवानगी देण्यात आली होती.
 • २०२०च्या मोसमासाठी ही मर्यादा आता ८५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.
 • फ्रँचायझींना गेल्या मोसमातील शिल्लक रक्कम या मोसमात खर्च करता येणार आहे.
 • दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक ८.२ कोटी रुपयांची,
 • राजस्थान रॉयल्सकडे ७.१५ कोटी रुपयांची तर कोलकाता नाइट रायडर्सकडे ६.०५ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे.
 • चेन्नई सुपर किंग्ज (३.२ कोटी रुपये),
 • किंग्स इलेव्हन पंजाब (३.७ कोटी रुपये),
 • मुंबई इंडियन्स (३.५५ कोटी रुपये),
 • रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (१.८० कोटी रुपये) आणि सनरायजर्स हैदराबाद (५.३० कोटी रुपये) यांनाही उर्वरित रक्कम खर्च करता येणार आहे.
5 Nov Current Affairs
5 Nov Current Affairs

राज्यातील शिक्षण संस्था ईडी च्या रडारवर

 • राज्यातील खासगी शिक्षण संस्था, विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी २०१० ते २०१७ दरम्यान केलेल्या शिष्यवृत्ती वितरणामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या संशयामुळे राज्यातील शिक्षण संस्था अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आल्या आहेत.
 • राज्यातील शिक्षण संस्थांकडून आर्थिक व्यवहाराचा तपशील मागण्यात आला असून त्यासाठी १४ नोव्हेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिक्षण संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी ‘ईडी’कडून होणार असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
 • विशेष तपास पथकाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘ईडी’कडून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाला शिक्षण संस्थांकडून आर्थिक व्यवहाराची माहिती मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण संस्थांकडून माहिती मागवण्यात आली आहे.
 • माहिती मागवण्यात आलेल्या संस्थांमध्ये नामांकित संस्थांचाही समावेश आहे. या शिक्षण संस्थांना १ ऑक्टोबर २०१० ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत विद्यार्थ्यांना दिलेल्या शिष्यवृत्ती रकमेचा तपशील सादर करावा लागणार आहे.
 • त्यात संस्थेचे नाव, शैक्षणिक वर्ष, अभ्यासक्रमाचे नाव, शिष्यवृत्तीची वाटप करण्यात आलेली रक्कम, शिष्यवृत्तीची शासनाकडून देण्यात आलेली रक्कम याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. ही माहिती न दिल्यास होणाऱ्या परिणामांना संबंधित संस्थेच्या प्राचार्याना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून देण्यात आला आहे.
 • शिक्षण संस्थांनी आर्थिक व्यवहाराचा तपशील सादर करण्यासाठी वेळापत्रकच तयार करण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षण संस्थांकडून माहिती सादर करण्यात येत आहे.
 • विशेष तपास पथकाने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने ईडीकडून राज्यभरातील संस्थांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षण संस्थांना माहिती सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. शिक्षण संस्था त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती सादर करतील. त्यानंतर त्याची छाननी करून ती माहिती अंमलबजावणी संचालनालयाला देण्यात येईल.

हॅमिल्टन सहाव्यांदा जगज्जेता

 • मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनला रविवारी रंगलेल्या अमेरिकन ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तरी त्याने सहाव्यांदा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले.
 • यासह हॅमिल्टनने मायकेल शूमाकरच्या सात जगज्जेतेपदांच्या विक्रमाच्या दिशेने कूच केली आहे.
 • मर्सिडिझच्या वाल्टेरी बोट्टासने सुरुवातीपासूनच शर्यतीवर नियंत्रण मिळवत विजेतेपद पटकावले. त्याचे हे या मोसमातील चौथे तर कारकीर्दीतील सातवे जेतेपद पटकावले. ब्रिटनच्या हॅमिल्टनने पाचव्या क्रमांकापासून शर्यतीला सुरुवात केली.
 • पण फिनलँडच्या बोट्टासचा झंझावात तो रोखू शकला नाही. हॅमिल्टनने दोन वेळा आघाडी घेतली होती.
 • पण तीन फेऱ्या शिल्लक असताना बोट्टासने पुन्हा एकदा आघाडी घेत विजेतेपद संपादन केले.
 • रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेन याने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
 • हॅमिल्टनने या शर्यतीतून १८ गुणांची कमाई करत एकूण ३८१ गुणांसह जगज्जेतेपद पटकावले.
 • २०१९ मोसमाच्या अद्याप दोन शर्यती (ब्राझील आणि अबूधाबी ग्रां. प्रि.) शिल्लक असल्या तरी दुसऱ्या क्रमांकावरील बोट्टासला (३१४ गुण) हॅमिल्टनशी बरोबरी करता येणार नाही.
 • फेरारीच्या चार्लस लेकलेर्क याने २४९ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे.
 • हॅमिल्टनने याआधी २००८, २०१४, २०१५, २०१७ आणि २०१८ मध्ये जगज्जेतेपदाची कमाई केली आहे.
 • ‘‘माझा विश्वासच बसत नाहीये. मला पाठिंबा देणाऱ्या सर्वाचा मी आभारी आहे. माझ्यासाठी हे अभूतपूर्व यश आहे. रविवारी झालेल्या खडतर शर्यतीत वाल्टेरी बोट्टासने शानदार कामगिरी केली.
 • विजेतेपद मिळवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. आता उर्वरित मोसमातही अशीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल,’’ असे हॅमिल्टनने सांगितले.
 • हॅमिल्टनकडून निकी लॉडा यांचे आभार
 • तीन वेळा जगज्जेते ठरलेले ७० वर्षीय निकी लॉडा यांचे मे महिन्यात निधन झाले असले तरी २०१९ मोसमात त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच मला जगज्जेतेपद मिळवता आले, असे सांगत लुइस हॅमिल्टन याने निकी यांचे आभार मानले आहेत.
 • ‘‘मला सर्वात जास्त उणीव निकी यांची जाणवत आहे. ते हयात असते तर माझ्या जगज्जेतेपदाने त्यांनाही आनंद झाला असता. पडद्यामागे आम्ही बरीच मेहनत घेत होतो, हा मोसम आमच्यासाठी आव्हानात्मक होता,’’ असेही हॅमिल्टन म्हणाला.
 • मी सहा किंवा सात वर्षांचा असतानाच वडिलांनी मला कधीही हार न मानण्याचा सल्ला दिला होता. - हॅमिल्टन
 • कारकीर्दीतील सहावे जगज्जेतेपद पटकावल्यानंतर मी खूप आनंदी आहे. हे अशक्य होते, असे मला वाटत नाही. माझा संघ, सहकारी आणि माझे पालक तसेच चाहत्यांच्या साक्षीने सहाव्यांदा जगज्जेतेपद स्वीकारताना अभिमान वाटत आहे.
5 Nov Current Affairs
5 Nov Current Affairs

दिल्लीत बांधकामे पाडकामांवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी

 • राजधानी दिल्लीच्या परिक्षेत्रातील प्रदूषण ‘राक्षसी’ असल्याची टिप्पणी करीत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्व प्रकारची बांधकामे, बेकायदा बांधकामांवरील कारवाई आणि कचरा जाळण्यावर बंदी घातली.
 • आणीबाणीपेक्षा वाईट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती आणीबाणी या आणीबाणीपेक्षा बरी होती. या आणीबाणीत लोकांना वाऱ्यावर सोडून मरू देता येत नाही. नागरिकांना जगण्याचा घटनादत्त अधिकार देणाऱ्या अनुच्छेद २१चे उघडपणे उल्लंघन होत आहे. त्यामुळे न्यायालयाचे आदेश धुडकावून बांधकाम करणारे आणि बांधकामांची पाडकामे करणाऱ्यांना एक लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. कोणी कचरा जाळताना आढळले तर त्याला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.
 • हवा प्रदूषणामुळे लोक त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे गमावत आहेत, अशी उद्विग्नता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित यंत्रणांना धारेवर धरले.
 • अशा प्रदूषित वातावरणात आपण जगू शकतो का, असा प्रश्न मूलभूत प्रश्न उपस्थित करत सरकारी यंत्रणा लोकांना मरू देत आहेत, असा संतापही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केला.
 • प्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यात अधिकारी कुचराई करीत आहेत. त्यांनी लोकांच्या मृत्यूलाच निमंत्रण दिले आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही आणि यास राज्य सरकारांना जबाबदार ठरवू, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला.
 • राजधानी दिल्ली आणि शेजारच्या राज्यांतील हवा प्रदूषणाची समस्या उग्र होत असल्याने आयआयटीसह इतर पर्यावरणतज्ज्ञांना ३० मिनिटांत न्यायालयात हजर करा, असे आदेश न्या. अरुण मिश्रा आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने दिले.
 • दिल्ली आणि राजधानी परिसरातील प्रदूषण भीषण आहे. लोक घराच्या चार भिंतीआडही सुरक्षित नाहीत. लोकांना प्रदूषणामुळे दिल्लीत येऊ नका, असे सांगितले जात आहे. याला राज्य सरकारे जबाबदार आहेत. तुम्हीच लोकांना मरण्यास सांगत आहात. तुमची राज्ये (पंजाब आणि हरयाणा) प्रदूषणाने ग्रस्त आहेत. पंजाब आणि हरयाणात प्रशासन नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का? दरवर्षी हेच चालत आले आहे. त्याची जबाबदारी आम्ही राज्य सरकारे आणि ग्रामपंचायतींवरसुद्धा टाकणार आहोत, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
 • वरिष्ठ वकील अपराजिता सिंह यांनी न्यायमित्र म्हणून, केंद्राच्या प्रतिज्ञापत्रानुसार पंजाबमध्ये पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण सात टक्के वाढले असून हरयाणात ते १७ टक्के कमी झाले आहे, अशी माहिती न्यायालयाला दिली.
 • न्यायालयाची उद्विग्नता..

प्रदूषण परिस्थिती धक्कादायक:-

 • प्रदूषित वातावरणात आपण जगू शकतो का? सरकारी यंत्रणाच लोकांना मरू देत आहेत. अधिकारी ढिम्म आहेत.
 • दिल्ली दरवर्षी प्रदूषणाला तोंड देते, ही समस्या दरवर्षीची आहे तरीही त्यावर काहीच केले जात नाही, हे चालणार नाही.
 • उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणा या राज्यांत पिकांचे अवशेष जाळले जातात. त्यावर प्रतिबंध असताना हे घडत आहे.
 • दरवर्षी चर्चा होते, आरडाओरडा होतो, राज्य सरकारांना हे माहीत असताना या प्रश्नावर काहीही केले जात नाही.

आकांक्षा विकास यांना विजेतेपद

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

 • रत्नागिरीची १४ वर्षीय आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम आणि मुंबईचा विकास धारिया यांनी सावंतवाडी येथील राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरी गटाच्या विजेतेपदावर नाव कोरले.
 • सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटना आणि नारायण शांताराम गोसावी स्मृती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आकांक्षाने मुंबईच्या नीलम घोडकेला १२-१५, २५-२१, २२-१३ असे पिछाडीवरून नमवून धक्कादायक विजयाची नोंद केली. त्यापूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात आकांक्षाने पुण्याच्या पुष्कर्णी भट्टडवर ६-१९, २५-१६, १७-१६ असे पराभूत केले होते. तर नीलमने मुंबईच्याच मिताली पिंपळेला २१-३, २५-१० अशी धूळ चारली होती.
 • पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात विकासने मुंबईच्याच संदीप दिवेवर २५-१२, ७-२४, २५-२० अशी मात करून विजेतेपदाला गवसणी घातली. विकासचे हे दुसरे राज्यस्तरीय विजेतेपद आहे.
 • महिला गटातील उपविजेती नीलम घोडके (डावीकडून), विजेती आकांक्षा कदम, पुरुष एकेरीतील विजेता विकास धारिया आणि उपविजेता संदीप दिवे.
5 Nov Current Affairs
5 Nov Current Affairs

युवा शुभमन गिलने मोडला विराटचा विक्रम

देवधर चषक स्पर्धा

 • देवधर चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत ब आणि भारत क या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला. या सामन्याच्या माध्यमातून देवधर चषक स्पर्धेला इतिहासातील सर्वात तरूण कर्णधार मिळाला. या सामन्यात खेळताना भारत क संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे होते.
 • देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधारपद भुषवणाऱ्या तरूण कर्णधारांच्या यादीत शुभमनने विराटला मागे टाकले.
 • शुभमन अंतिम फेरीसाठी मैदानावर उतरला तेव्हा त्याचे वय २० वर्षे आणि ५७ दिवस इतके होते. तर २००९ - १० साली विराट जेव्हा अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यासाठी उतरला होता, तेव्हा त्याचे वय २१ वर्षे आणि १२४ दिवस एवढे होते.
 • या यादीत तिसऱ्या स्थानी उन्मुक्त चंद (२२), चौथ्या स्थानी श्रेयस अय्यर (२३ वर्षे ९२ दिवस), पाचव्या स्थानी मनोज तिवारी (२३ वर्षे १२४ दिवस) तर सहाव्या स्थाना महान क्रिकेटपटू कपिल देव (२३ वर्षे ३०५ दिवस) यांचा समावेश आहे.
 • दरम्यान, भारत ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्याकडून यशस्वी जैस्वालने ५४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर अनुभवी केदार जाधवने धमाकेदार खेळी केली. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार खेचत ८६ धावांची खेळी केली.
 • विजय शंकरने ४५ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. तर शेवटच्या टप्प्यात कृष्णप्पा गौतमने १० चेंडूत ३५ धावा ठोकल्या. या साऱ्यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारत ब संघाने ७ बाद २८३ धावांपर्यंत मजल मारली. इशान पोरेलने त्यांचा अर्धा संघ माघारी धाडला. या आव्हानाचा पाठलाग करणे भारत क संघाला शक्य झाले नाही. त्यामुळे भारत ब संघाने देवधर चषक ५१ धावांनी जिंकला.

महाराष्ट्राच्या दहा जिल्ह्यांतील भूजलामध्ये फ्लोराइडचे प्रमाण अधिक

 • विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात फ्लोराइडयुक्त पाण्यामुळे दातांचे विकार बळावले आहेत, हाडे ठिसूळ होऊन एका पिढीचे भवितव्य संकटात आले आहे
 • महाराष्ट्राच्या दहा जिल्ह्यांतील भूजलामध्ये फ्लोराइडचे प्रमाण अधिक असल्याने तेथील जनतेस दातांच्या, हाडांच्या आणि किडनीच्या विकारांनी विळखा घातला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या राष्ट्रीय आरोग्य अहवालातून पुन्हा एकदा समोर आली.
 • यात नवीन काहीच नाही. भूगर्भातील उरलेसुरले पाणी पिळून काढण्याचा हव्यास असल्यावर यापेक्षा वेगळे काहीच निष्पन्न होणार नाही, हे स्पष्ट आहे.
 • सुमारे दोन-अडीच दशकांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत तेव्हाच्या विरोधी पक्षात व आक्रमकही असलेले भाजपचे आमदार एकनाथ खडसे व अन्य काही आमदारांनी प्रश्नोत्तरांच्या तासात या गंभीर मुद्दय़ाला वाचा फोडली होती.
 • विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात फ्लोराइडयुक्त पाण्यामुळे दातांचे विकार बळावले आहेत, हाडे ठिसूळ होऊन एका पिढीचे भवितव्य संकटात आले आहे, असा थेट मुद्दा या प्रश्नाद्वारे जनतेसमोर आल्याने, तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांसह सर्वानीच याबद्दल चिंता व्यक्त केली होती.
 • भूगर्भातील पाण्याच्या शोधात किती खोलवर विहिरींची खोदाई करावी यासाठी कागदोपत्री काही नियम असले, तरी पाण्याचा सुगावा लागेपर्यंत खोल खणतच राहणे अपरिहार्य होऊ लागले, तेव्हापासून भूगर्भातील प्रदूषित व विषारी घटकयुक्त पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला.
 • पिण्याच्या पाण्यातून पोटात जाणारे व अकाली वृद्धत्वाकडे घेऊन जाणारे अपायकारी घटक हे आरोग्यासमोरील गंभीर संकट असल्याची जाणीव सरकारला झाली, त्याला आता काही दशके लोटली आहेत. त्यानंतर वेळोवेळी भूगर्भातील पाण्याचे नमुने तपासले जातात, अहवाल तयार होतात, आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील भूजल पिण्यायोग्य नाही, अशा शिफारशी सरकारला सादरही होतात.
 • प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाची मोठी यंत्रणा त्यासाठी कार्यरत असते. भूजल, नद्या-नाले, तलाव आणि समुद्र-खाडय़ांच्या पाण्याचा दर्जा या मंडळाने जेव्हा जेव्हा तपासला, तेव्हा तेव्हा, राज्यातील पाण्याचा दर्जा पहिल्यापेक्षा खालावत चालला आहे, हाच निष्कर्ष प्रत्येक नव्या अहवालातून काढला जात होता.
 • याचा अर्थ, भूजलच नव्हे, तर पेयजल म्हणून ज्या पाण्याचा वापर केला जातो, ते आरोग्यदायी राहिलेले नाही, हे पुरते स्पष्ट झाले आहे. असे असतानाही, प्रत्येक नवा अहवाल तोच निष्कर्ष काढतो आणि प्रत्येक निष्कर्षांसोबत जनतेच्या मनातील धसका वाढीला लागतो.
 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालाने त्यात भर घातली आहे. पेयजलाचा दर्जा खालावत चालल्याचा निष्कर्ष वर्षांगणिक काढला जात असेल, तर सुरक्षित पेयजलाचे पर्याय निर्माण करण्याबाबत सरकारची काही जबाबदारी असते का, असा भाबडा प्रश्न जनतेच्या मनात येऊ शकतो. त्यावर, सरकारकडे उत्तर असते.
 • ते म्हणजे, भूगर्भातील पाणी ज्या ज्या ठिकाणी प्रदूषित, विषारी घटकांचे प्रमाण अधिक असलेले, किंवा आरोग्यास अपायकारक असते, त्या ठिकाणी असलेल्या हातपंपांना धोक्याचा इशारा देणारा लाल रंग फासलेला दिसतो. क्वचित काही ठिकाणी, हे पाणी पिण्यास अपायकारक आहे अशी सूचना देणारे फलकही लावले जातात.
 • ग्रामीण महाराष्ट्रात, विशेषत विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील काही जिल्ह्य़ांच्या खेडोपाडी असे अनेक हातपंप पूर्वी कधी कोणा मोहिमांद्वारे लाल रंगाने रंगविले गेले आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा अन्य पर्यायच नसल्याने तेच पाणी पिऊन, त्याचे दुष्परिणाम अंगावर घेत पुढच्या पिढय़ा वाढू लागल्या.. आता तर, त्या हातपंपांवरील लाल रंगदेखील जुना व फिका पडला आहे आणि तेच पाणी पिऊन आरोग्याच्या समस्यांशी झुंजणारी नवी पिढी तयार होऊ लागली आहे.
 • आणखी काही वर्षांनी हाच निष्कर्ष काढणारा असाच एखादा नवा अहवाल येईल.. पण अशा अहवालांचा धक्का बसण्याचे दिवस मात्र केव्हाच संपले आहेत.
5 Nov Current Affairs
5 Nov Current Affairs

ISROची अंतरीक्स कॉर्पोरेशन कंपनी भारताच्या NavIC या स्वदेशी GPSला व्यवसायिक स्वरूप देणार

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारतासाठी ‘NavIC’ नावाने स्वदेशी सुचालन प्रणाली तयार करीत आहे.
 • NavIC म्हणजे नॅव्हिगेशन वीथ इंडियन कॉन्स्टीलेशन (NAVigation with Indian Constellation - NavIC) होय.
 • या प्रणालीच्या उपग्रहांची शृंखला भारताने यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केलेली आहे. आता या सेवेला व्यवसायिक स्वरूप देण्यासाठी त्यादृष्टीने, अंतरीक्स कॉर्पोरेशन (Antrix Corporation) लिमिटेड ही ISROच्या व्यवसायिक शाखा योजना तयार करीत आहे.

‘NavIC’ प्रणाली:-

 • ‘NavIC’ प्रणाली ही ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) सेवेप्रमाणेच आहे. भारताकडून ‘NavIC’ या नावाने ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली (रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम - IRNSS)’ उभारण्यासाठी एकूण सात उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. दोन उपग्रह तांत्रिकदृष्ट्या अकार्यक्षम ठरल्यामुळे ते पाठवण्यात आले नाहीत त्यामुळे एकूण नऊ उपग्रह तयार केले गेलेत.
 • IRNSS उपग्रहांना पृथ्वीच्या उप-भौगोलिक समांतर कक्षेत (sub-GTO) प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यातला आठवा IRNSS-1H हा खासगी कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आणि सक्रियपणे पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेला भारताचा पहिला उपग्रह आहे.
 • IRNSS दोन प्रकारच्या सेवा प्रदान करणार - सर्व वापरकर्त्यांसाठी स्टँडर्ड पोजिशनिंग सर्व्हिस (SPS) आणि केवळ अधिकृत वापरकर्त्यांसाठी रेस्ट्रीक्टेड सर्व्हिस (RS).
 • ही प्रणाली भारताच्या सर्व बाजूंनी सुमारे 1500 किलोमीटरच्या सीमेच्या आत कार्य करणार. ही प्रणाली वापरकर्त्या संस्थेला रस्त्यावर आणि समुद्रात त्यांचे वाहन चालविण्यासाठी योजनेची आखणी करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार.
 • आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडनार्या मच्छीमारांना याद्वारे सावध केले जाऊ शकते आणि लोकांना त्यांना आवश्यक असलेला पत्ता शोधण्यास मदत होऊ शकणार. शिवाय दूरसंचार आणि पॉवर ग्रीड कार्यामध्येही याची मदत होऊ शकते. एकूणच भारताच्या दळणवळण क्षेत्रात हा अमुलाग्र टप्पा असणार आहे.

ISRO विषयी:-

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.
 • ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रायान-1’ मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
 • अंतरीक्स कॉर्पोरेशन (Antrix Corporation) लिमिटेड, बेंगळुरू ही अंतराळ विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली भारत सरकारच्या संपूर्णपणे मालकीची कंपनी आहे. ही ISROने विकसित केलेल्या अंतराळ उत्पादने, तांत्रिक व सल्लागार सेवा आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण अश्या सुविधांचे व्यवसायिकीकरण करण्यासाठी ISROची विपणन शाखा आहे. त्याची स्थापना 28 सप्टेंबर 1992 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय बेंगळुरू या शहरात आहे.

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »