6-7 Oct Current Affairs

6-7 Oct Current Affairs
6-7 Oct Current Affairs

अभिनंदन वर्तमान यांचा होणार सन्मान

 • बालाकोट हवाई हल्ले करणारी मिराज-२००० लढाऊ विमानांची स्क्वाड्रन आणि विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान हवाई दल दिनी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस भदौरिया यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
 • आठ ऑक्टोबर रोजी गाझियाबाद येथे हा कार्यक्रम होणार आहे.
 • हवाई दल दिनानिमित्त एअर चीफ मार्शल भदौरिया दोन्ही ९ आणि ५१ या स्क्वाड्रनचा सन्मान करतील. याखेरीज पाकिस्तानने २७ फेब्रुवारी रोजी भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न ६०१ सिग्नल युनिटच्या प्रयत्नांनी हाणून पडला होता.
 • या युनिटचाही सन्मान हवाई दल दिनी होईल. ५१ स्क्वाड्रनला 'सोर्ड आर्म्स' किंवा 'फाल्कन स्लेयर्स' म्हणून संबोधले जाते. ही स्क्वाड्रन श्रीनगर हवाई तळावर स्थित आहे. या स्क्वाड्रनमध्ये मिग-२१ बायसन लढाऊ विमानांचा समावेश आहे.
 • विंग कमांडर अभिनंदन ५१ स्क्वाड्रनमध्ये आहेत. २७ फेब्रुवारी रोजी भारताच्या हद्दीत घुसलेले पाकिस्तानचे 'एफ-१६' लढाऊ विमान त्यांनी पाडले होते. या चकमकीत अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमानही पडले. त्यांना पाकिस्तानने युद्धकैदी बनवले होते.
 • मात्र, लगेचच त्यांना सोडून देण्यात आले. ९ स्क्वाड्रन 'वूल्फपॅक' नावाने ओळखली जाते. ही स्क्वाड्रन मिराज-२००० या लढाऊ विमानांनी सज्ज असून ग्वाल्हेर हवाई तळावर स्थित आहे.
 • या स्क्वाड्रनमधील पाच मिराज विमानांनी बालाकोट येथे हल्ला करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या वर्षी स्वातंत्र्यदिनी अभिनंदन यांचा 'वीर चक्र'ने सन्मान करण्यात आला. पाच वैमानिकांना 'वायू सेना मेडल' देण्यात आले. ६०१ सिग्नल युनिटचे स्क्वाड्रन लीडर मिंटी अगरवाल यांचा 'युद्ध सेवा मेडल'ने गौरव करण्यात आला.

आरे वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती

 • आरेतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. पर्यावरणप्रेमींना यामुळे दिलासा मिळाला आहे. आंदोलन करणाऱ्या ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्यांची सुटका करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले.
 • २१ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाने महाधिवक्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांनतर पुढील सुनावणीपर्यंत जैसै ते स्थिती ठेवण्याचे आदेश दिले. आतापर्यंत किती झाडे तोडली त्याचा तपशीलही देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
 • झाडे तोडण्याची कार्यवाही थांबवून यथा स्थिती ठेवावी आणि जी पर्यायी झाडे लावली आहेत त्यांच्या जगण्यावरही लक्ष ठेवावे, असेही निर्देश खंडपीठाने दिले.
 • दिल्ली, ग्रेटर नॉएडा येथील लॉ कॉलेजचा विद्यार्थी रिषभ रंजन याने काल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहून मुंबई आरे कॉलनीमधील विदारक परिस्थिती निदर्शनास आणली आणि तातडीने सुनावणी घेऊन झाडे तोडण्यावर स्थगिती आणण्याची विनंती केली.
 • त्याचबरोबर युवा आरे आंदोलकांना मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या वर्तणुकीकडेही लक्ष वेधले. त्याची दखल सरन्यायाधीशांनी घेतली आणि या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली. तसेच सध्या सुप्रीम कोर्टाला दसरा सणानिमित्त आठवड्याभराची सुटी असल्याने सरन्यायाधीशांनी न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती अशोक भूषण यांचे विशेष खंडपीठ स्थापन केले.
 • त्यांनतर आज सकाळी या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. कोणीही आंदोलक अद्याप अटकेत असतील तर त्यांना तात्काळ सोडण्यात येईल, अशी हमी त्यांनी दिली. खंडपीठाने प्रशासनाला वरीलप्रमाणे आदेश दिल्यानंतर या विषयावरील पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात पर्यावरणविषयक विषयांवर असलेल्या 'वन खंडपीठ'समोर २१ ऑक्टोबरला होईल, असे स्पष्ट केले.
 • सरकारच्या वतीने युक्तीवाद करणारे वकील तुषार मेहता यांनीच कोर्टाला विनंती केली की जोपर्यंत या प्रकरणी स्पष्ट निर्णय होत नाही तोपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती द्यावी. मेट्रो कारशेडसाठी जितकी वृक्षतोड आवश्यक होती, तितकी करण्यात आली आहे, असेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
 • आरेतील ज्या जमिनीवर वृक्षतोड होत आहे, ती जमीन वनक्षेत्राचा भाग आहे की नाही ते पाहिल्यावर, तसेच या प्रकरणी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालय निर्णयाप्रत येत नाही, तोपर्यंत या वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली आहे.
 • आरे हे जंगल नाही, असे नमूद करत मुंबई हायकोर्टाने तेथील वृक्षतोडीस स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लगेचच शुक्रवारी रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल सुरू करण्यात आली. स्थानिक नागरिक, आदिवासी बांधव तसेच पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केला. शनिवारी दिवसभरही आरे बचावसाठी नागरिक आक्रमक होते.
 • एकीकडे पोलीस आंदोलन चिरडून आरेतील झाडांवर कुऱ्हाड चालवत असताना आता सुप्रीम कोर्टानेच याची गंभीर दखल घेतल्याने 'आरे बचाव'ला तूर्त तरी दिलासा मिळाला आहे.
6-7 Oct Current Affairs
6-7 Oct Current Affairs

आरोग्यविम्याशिवाय अमेरिकेत प्रवेशबंदी

 • ट्रम्प प्रशासन हे आरोग्यविमा आणि वैद्यकीय खर्च करण्यास सक्षम नसलेल्यांना अमेरिकाप्रवेशावर बंदी घालणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. ३ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
 • ट्रम्प यांच्या घोषणेनुसार, जे अमेरिकी आरोग्यसेवेवर भार बनणार नसल्याची खात्री देऊ शकतील त्यांनाच व्हिसा वितरित करण्याच्या सूचना वकिलातीमधील अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
 • अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांनी येथील आरोग्यसेवेवर भार टाकून अमेरिकी करदात्यांना त्रास देता कामा नये, असे ट्रम्प प्रशासनाद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

एफएटीएफबरोबर सहकार्य वाढवावे भारताचे संयुक्त राष्ट्रांत आवाहन

 • दहशतवादी संघटना आणि संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांमधील संबंधांतून दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्यात येतो आणि आंतरदेशीय गुन्हेगारी कारवायांचे जाळे निर्माण करण्यात येते. त्यांना आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स'सारख्या (एफएटीएफ) संघटनांमधील सहकार्य वाढविण्याची गरज भारताने व्यक्त केली.
 • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील सामाजिक, मानवतावादी व्यवहार आणि मानवाधिकारांच्या मुद्द्यांवरील समितीसमोर भारताच्या संयुक्त राष्ट्रातील सचिव पौलमी त्रिपाठी यांनी ही भूमिका मांडली.
 • आंतरदेशीय संघटीत गुन्हेगारी टोळ्यांकडून आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला धोका असून, विकासाच्या कामांनाही लक्ष्य करण्यात येते, याकडे लक्ष वेधत त्या म्हणाल्या, 'या टोळ्यांकडून अवैध कारवायांपासून निधी गोळा करण्यापर्यंत त्यांचे नेटवर्क वापरण्यात येते.
 • या टोळ्यांचे दहशतवादी संघटनांबरोबरही संबंध असून, बनावट नोटा, हवाला व्यवहार, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक प्रकारांमध्ये त्यांची हातमिळवणी आहे. इस्लामिक स्टेट, अल शबाब, बोको हराम यांसारख्या संघटना खंडण्या, मानवी तस्करी, नैसर्गिक साधन संपत्ती व सांस्कृतिक वारशाची तस्करी, नियंत्रणाखालील प्रदेशांत अवैध करसंकलन करत आर्थिक स्रोत उभे केले जातात. दहशतवादी संघटनांकडून पैसे उभारण्याबरोबरच, तरुणांना चिथावण्यासाठीही अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याचे यातून समोर आले आहे.'
 • दहशतवाद्यांकडून ड्रोन, आभासी चलन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एनक्रिप्टेड संदेशवहन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच देशांच्या कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांना माहितीची नियमितपणे आणि अद्ययावतपणे आदानप्रदान करणे आवश्यक झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
6-7 Oct Current Affairs
6-7 Oct Current Affairs

HSBC तून १० हजार कर्मचाऱ्यांना काढणार

 • एचएसबीसी बँकेच्या दहा हजारा कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय एचएसबीसी होल्डिंग्ज पीएलसीने घेतला आहे. HSBC चे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्विन बँकिंग समुहाचा खर्च कमी करू इच्छित आहेत, त्यामुळे ते या नोकरकपातीची योजना आखत आहेत.
 • फायनान्शिअल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेर तिसऱ्या तिमाहीच्या परिणामांच्या अहवालाची घोषणा करताना या नोकरकपातीचीही घोषणा ते करू शकतात. जाणकारांचं म्हणणं आहे की ही कर्मचारी कपात विशेषत: उच्च-पगाराच्या पदांच्या बाबतीत होऊ शकते.
 • ५ ऑगस्टला एचएसबीसी समूहाचे सीईओ जॉन फ्लिन्ट पदावरून दूर झाले. त्यावेळी बँकिंग समूहाचे अध्यक्ष मार्क टकर म्हणाले होते की ज्या प्रकारच्या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीत बँक काम करत आहे, ते पाहता संचालक मंडळाचं असं म्हणणं पडलं आहे की या आव्हानांचा सामना करण्यासाठी बदलांची आवश्यकता आहे. चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापार युद्ध वाढल्यामुळेदेखील उद्योग क्षेत्रात मंदीचं वातावरण आहे. त्यामुळे ही कपात केली जात आहे.

HP च्या भारतातील 500 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर

 • खासगी संगणक व प्रिंटर उत्पादनातील अग्रगण्य कंपनी ‘एचपी’च्या भारतातील ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच कंपनी जगभरातील आपल्या जवळपास ९ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करु शकते.
 • गेल्या आठवड्यातच कंपनीने याबाबत माहिती देताना, वर्ष २०२० पर्यंत जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी कमी केले जातील अशी शक्यता वर्तवली होती. नफा वाढावा आणि उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी कार्यप्रणाली पुनर्रचनेअंतर्गत ही कपात केली जाणार आहे. जगभरात ‘एचपी’चे ५५ हजार कर्मचारी आहेत.
 • भारतातील तज्ज्ञांनुसार कंपनीच्या या योजनेचा परिणाम एचपी इंडियावर देखील होणार आहे. कंपनीच्या योजनेबाबत माहिती असणाऱ्या एका अधिकाऱ्याने इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, “कंपनीने काही मॉडेल्सचं उत्पादन थांबवलं असून खासगी संगणकांच्या मागणीत सातत्याने घट आहे.
 • भारतात कर्माचारी कपात होणं जवळपास निश्चित आहे”. तर, द हेड हंटर्स इंडियाचे सीईओ क्रिस लक्ष्मीकांत यांच्यानुसार, ” भारत हा एचपीसाठी मुख्य लक्ष्य असलेल्यांपैकी एक आहे, पण एचपी इंडियाकडून ५०० कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. एचपी इंडियावर परिणाम नक्कीच जाणवेल”.
 • ‘भारतातील किती कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. जागतिक स्तरावर ही कपात होत आहे, कुठे किती कपात होईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही’, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
 • एक महिन्यापूर्वीच कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात बदल झाला आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कपात करण्याबाबतचं वृत्त आलं आहे.
6-7 Oct Current Affairs
6-7 Oct Current Affairs

अविवाहित परदेशी जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी सौदी अरेबियाचा निर्णय

 • सर्वाधिक बंधनं असलेलं राष्ट्र अशी जगभरात सौदी अरेबियाची ओळख आहे. मात्र, येथील काही कठोर नियमांमध्ये आता शिथिलता देण्यास सरकारकडून सुरूवात झाली आहे. अविवाहित परदेशी जोडप्यांना आता हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहण्याची परवानगी येथील सरकारने दिली आहे.
 • यापूर्वी सौदी अरेबियातील नियमांनुसार परदेशातून आलेल्या जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यासाठी ते विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागायचा. म्हणजेच विवाह दाखवणं बंधनकारक होतं. मात्र आता यापुढे ही अट नसेल.
 • पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी पूर्वीचे नियम शिथिल करण्यात आल्याचं मानलं जात आहे. याशिवाय, सर्व एकट्या महिलांना (सौदीच्या महिलांनाही) हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परवानगी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.
 • “हॉटेल चेकिंगच्यावेळी नात्याचं प्रमाण सिद्ध करणारी कागदपत्र सौदी अरेबियाच्या नागरिकांना दाखवणं बंधनकारक असेल. पण, देशाबाहेरच्या जोडप्यांसाठी हे बंधनकारक नसेल. सर्व महिला ओळखपत्र दाखवून हॉटेलमध्ये रुम बुक करू शकतील. तसेच सौदीच्या महिलादेखील हॉटेलमध्ये रुम बुक करू शकतील” असं सौदी सरकारच्या पर्यटन आणि नॅशनल हेरिटेज मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
 • दोन वर्षांपूर्वी सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंगची परवानगीही देण्यात आली होती.

मास्क बंदी झुगारून हाँगकाँगमध्ये हिंसाचार

 • हाँगकाँगमध्ये शनिवारी शहरातील सर्व व्यवहार चीनविरोधी आंदोलनामुळे थंडावले असून  निदर्शकांना मास्क वापरण्यास बंदी केल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.
 • दुकाने व मॉल रात्रभर हिंसाचार सुरू राहिल्याने बंद ठेवण्यात आले.  शेकडो निदर्शकांनी पुन्हा मास्क घालून आंदोलन केले. मोर्चाला परवानगी नसताना कॉजवे बे या शॉपिंगसाठी प्रसिद्ध जिल्ह्य़ात हिंसाचार करण्यात आला. गेली पन्नास वर्षे न वापरलेल्या आपत्कालीन कायद्याचा वापर या वेळी पोलिसांना करावा लागला. निदर्शकांनी अनेक ठिकाणी दुकानांमध्ये लुटालूट केली. आगी लावल्या व रस्तेही रोखून धरले.
 • शनिवारी जमाव चाल करून जात असताना शहराच्या चीन समर्थित नेत्या कॅरी लॅम यांचे एक निवेदन चित्रफितीच्या रूपात जारी करण्यात आले, त्यात त्यांनी निदर्शकांनी हिंसाचार केल्याने काळी रात्र असल्याचे सांगून निषेध व्यक्त केला.
 • हाँगकाँगची आणखी हानी होऊ देणार नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, की नागरिकांनी कट्टर निदर्शकांपासून दूर रहावे. कॉजवे बे येथील मोर्चात निदर्शकांनी मास्क बंदीचा निर्बंध मोडीत काढला. गेले चार महिने हाँगकाँगमध्ये हिंसाचाराचा आगडोंब  सुरू  आहे.

इराकमधील निदर्शनांतील बळींची संख्या ९३:-

 • इराकची राजधानी बगदाद, तसेच दक्षिण इराकमधील विविध शहरांमध्ये पाचव्या दिवशीही असंतोष कायम असतानाच, तेथील सामूहिक निदर्शनांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या शंभराजवळ पोहचली असल्याचे पार्लमेंटच्या मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत ९३ लोक मृत्युमुखी पडले आहेत.

 

6-7 Oct Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »