7 July Current Affairs

7 July Current Affairs
7 July Current Affairs

#विमानतळावर महाराष्ट्र

ज्या शिवछत्रपतींचं नाव मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आले आहे, त्यांच्याबद्दल परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना असलेली उत्सुकता लक्षात घेऊनच मराठी माती आणि मराठी संस्कृतीची ओळख जगाला करून देणारा 'पाऊलखुणा महाराष्ट्राच्या' हा उपक्रम सध्या सुरू आहे
विमानतळ म्हटले की का कुणास ठाऊक, काहीतरी 'आधुनिक' वाटते. त्यातून मुंबईच्या छत्रपती शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्रवाशांची कायम गर्दी असल्याने ही भावना अधिकच गडद होते. तसेही नव्याने बांधलेल्या मुंबईच्या अत्याधुनिक आणि सुसज्ज विमानतळाच्या रचनेत जागोजाग नव्या तंत्राचा, पद्धतींचा चपखल आणि अधिकाधिक उपयोग करण्यात आला आहे.
विमानतळाचे 'टर्मिनल २' हे तर जगातील सर्वात आलिशान टर्मिनलपैकी एक आहे. आधुनिकतेची कास धरलेले हे विमानतळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे रोज स्मरण करते. केवळ विमानतळाला नाव छत्रपतींचे आहे म्हणून नव्हे, तर विमानतळाच्या प्रवेशाद्वाराशी छत्रपतींचा मोठा पुतळाही आहे.
टर्मिनलच्या अंतर्गत भागात छत्रपतींचे तैलचित्र आहे. तेथे त्यांच्याबाबतची माहिती आहे. हे तैलचित्र अनेकदा विमानतळावर येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या नजरेस पडते. हजारो परदेशी प्रवाशी त्याबाबत कुतूहलाने विचारपूस करतात. छत्रपती नेमके कोण? त्यांचे कार्य व एकूणच मराठी भूमी म्हणजे काय? अशी चौकशी ते विमानतळ प्रशासनाकडे कायमच करीत असतात. याच चौकशीतून उभी झाली 'जय हे' या कार्निव्हलची संकल्पना. त्यातूनच मराठी मातीची संस्कृती या परदेशी पाहुण्यांसमोर मांडण्याचे निश्चित झाले.
'जय हे' हा कार्निव्हल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (मिआल) सुरू केला आहे. परदेशी प्रवाशांकडून वारंवार झालेल्या चौकशीचा विचार करून यातून महाराष्ट्राच्या मराठीपणाची, मराठी संस्कृतीची माहिती देणे हा प्रमुख उद्देश आहे. म्हणूनच त्याला 'पाऊलखुणा महाराष्ट्राच्या' असे शीर्षक देण्यात आले आहे.
महाराष्ट्र किंवा मराठी माती काय आहे, हे सांगण्यासाठी कोकण, देश पठार, मराठवाडा, खान्देश व विदर्भ असे पाच विभाग या कार्निव्हलमध्ये करण्यात आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई तर अनेकांना माहिती आहे, पण मुंबईखेरीज अथांग असा समुद्रकिनारा लाभलेले कोकण, शेकडो किल्ल्यांद्वारे इतिहासाची साक्ष देणारे देश पठार, पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले मराठवाडा, मराठी साहित्याचा वसा-वारसा असलेले खान्देश आणि 'ऑरेंज सिटी' अशी ओळख असलेल्या नागपूरचा समावेश असलेले विदर्भ, या प्रत्येक भागातील माहिती याद्वारे दिली जात आहे.
'ऑरेंज सिटी' ही नागपूरची ओळख सर्वांनाच आहे, त्यानिमित्ताने विदर्भाची ओळख निर्माण झालेली आहेच. पण याखेरीज विदर्भ हा वनसंपदेने नटलेला आहे. पाच व्याघ्र प्रकल्प तेथे आहेत.
हे व्याघ्र प्रकल्प आज परदेशी पर्यटकांना खुणावत आहेत. याची माहिती या कार्निव्हल अंतर्गत चित्ररूपात दिली जात आहे. परदेशी प्रवासी उत्साहाने ती जाणून घेत आहेत. भारतरत्न लतादीदी परदेशात बऱ्यापैकी माहिती आहेत, पण या लतादीदींचा जन्म झालेले ठिकाण खान्देशात आहे. त्याची माहिती खान्देश विभागात पाहुण्यांना दिली जात आहे. जगप्रसिद्ध 'बिबी का मकबरा' असो वा अजंठा आणि वेरुळच्या लेण्या, यांची पर्यटकांना ओळख आहे. पण या जागा कुठल्या भागात आहेत. याची माहिती त्यांना नाही. यासाठीच कार्निव्हलमध्ये 'मराठवाडा' विभागाद्वारे ही माहिती दिली जात आहे. हजारो वर्षे जुने किल्ले, मंदिरे, लेण्या यांनी नटलेला हा भाग आज महाराष्ट्राची संपत्ती आहे, हे या माध्यमातून दाखवले जात आहे.
या कार्निव्हलमधील सर्वात महत्त्वाचा विभाग कोकण व देशपठार ठरला आहे. याचे कारण ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची ओळख जगाला करून दिली जात आहे, त्या छत्रपतींनी व त्यांच्या मावळ्यांनी पिंजून काढलेला भाग हा कोकण आणि देशपठारच आहे.
या दोन्ही भागात शिवाजीमहाराजांनी उभे केलेले शेकडो किल्ले, या माध्यमातून मराठा साम्राज्याची केलेली बांधणी, कृष्णा व गोदावरीसारख्या देशातील महत्त्वाच्या नद्या, नितांत सौंदर्याने नटलेला पश्चिम घाट हे सारे येथेच आहे. याखेरीज साताराजवळील कास पठाराला युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे.
हिमालयाच्या 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'शी त्याची तुलना केली जात आहे. कोल्हापूरची चप्पल असो किंवा कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा, तेथील लोककला, आदिवासी कला यांचीही माहिती या माध्यमातून विमानतळावरील प्रवाशांना दिली जात आहे.
महाराष्ट्र हा प्राचीन लोककलांनी नटला आहे. त्यामुळे या कार्निव्हलची सुरुवातच मुळात लोकनृत्याने होते. लोकनृत्याआधी छत्रपती शिवाजीमहाराजांची आठवण करुन देणारी तुतारी वाजवली जाते. तुतारीद्वारे लोकनृत्य सुरू होऊन प्रवाशांचे स्वागत होते. विमानतळासारख्या ठिकाणी तुतारी वाजणे, हे प्रवाशांसाठी आकर्षण ठरते आहे. प्रत्येक देशातील संस्कृतीत तेथील प्राचीन लोकवाद्यांना महत्त्वाचं स्थान आहे.
फूटबॉल विश्वचषक २०१० दक्षिण आफ्रिकेत झाला होता, त्यावेळी प्रेक्षकांनी सामन्यादरम्यान आफ्रिकन लोकवाद्य 'वूवूझेला' मनसोक्त वाजवले. हे वाद्य त्यानिमित्ताने जगाला कळले. त्यानुसारच आता मुंबईचे विमानतळ आंतरराष्ट्रीय आहे.
हजारो परदेशी प्रवासी येथे रोज येतात. त्यांच्यासमोर तुतारीचे वादन होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राची ओळख असलेली ही तुतारी आता जगात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र हा फक्त भौगोलिक व सांस्कृतिक विविधतेने नटलेला नाही. तर येथील खाद्यसंस्कृतीही भिन्न आहे. कोकणातील समुद्री खाद्यान्नाला आज ग्लॅमर मिळून त्याचे 'सी -फूड' झाले. पण हे खाद्यान्न तयार करण्याची पद्धत प्राचीन आहे, ती जाणून घ्यायची असल्यास या कार्निव्हलला भेट देता येईल. देश पठारावरील अस्सल पुणेरी मिसळ असो वा कोल्हापुरी पांढरा-तांबडा रस्सा किंवा राज्याच्या अन्य भागातील पारंपरिक खाद्य. या खाद्य-मेजवानीचा या कार्निव्हलमध्ये आनंद लुटता येईल.

विमानतळाच्या टर्मिनल २ इमारतीतील ६०० मीटर लांबीचा एक स्वतंत्र व्हरांडा यासाठी देण्यात आला आहे. महाराष्ट्राला व येथील मराठी मातीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. तो इतिहास जगाला कळावा, हाच मुळात या कार्निव्हला मुख्य उद्देश आहे. इतिहास असला की त्याच्याशी निगडित कथा, घटना असताताच. या घटनांना कथारूपात ऐकण्याची संधीही कार्निव्हलमध्ये आहे.
देशातील विविध विमानतळांना त्या-त्या प्रदेशातील ऐतिहासिक महत्त्वानुसार स्वरूप देण्याचा उपक्रम नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत भुवनेश्वर, इंदूर, जयपूर, पाटणा, लखनऊ येथील विमानतळाची मुख्य इमारत ऐतिहासिक वारसा सांगणारी आहे.
पण अशाप्रकारे सलग तीन महिने राज्याच्या इतिहासाला समर्पित असा कार्निव्हल आयोजित होणारे मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिलेच विमानतळ. सप्टेंबरअखेरपर्यंत त्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी या विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय अर्थात टर्मिनल २ ला आवर्जून भेट द्यायला हवीच!
(-मटा)

#मराठा आरक्षण विधेयकाला राज्यपालांची मंजुरी

शासकीय सेवेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास (मराठा समाज) वर्गाकरिता शिक्षण संस्थांमध्ये १२ टक्के आणि शासकीय सेवेत १३ टक्के आरक्षण लागू करण्याचे सुधारित विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले. त्याला राज्यपालांचीही मान्यता मिळाली आहे.
यामुळे आता शासकीय सेवेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. १३ टक्के मराठा आरक्षण लागू करून नोकरभरती सुरू करावी, असे आदेश राज्य शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त जागांपैकी ७२ हजार पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यातील पहिल्या टप्प्यात ३६ हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी विधिमंडळात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत नोकरभरतीला स्थगिती द्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केल्याने भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती.
राज्य सरकारने एसईबीसी कायद्यात मराठा समाजासाठी शिक्षण संस्था व शासकीय सेवेत १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली होती. परंतु या संदर्भात उच्च न्यायालयाने २७ जून २०१९ रोजी दिलेल्या अंतिम निकालात शिक्षणात १२ टक्के व शासकीय सेवेत १३ टक्के आरक्षण द्यावे, असा आदेश दिला. त्यानुसार राज्य सरकारने मूळ कायद्यात तशी सुधारणा केली व त्यासंबंधीचे विधेयक नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतले. त्यानंतर या सुधारित विधेयकाला गुरुवारी राज्यपालांनीही मान्यता दिली. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्व विभागांना पदभरतीचे आदेश
उच्च न्यायालयाचा आदेश आणि सुधारित कायद्यातील १३ टक्के मराठा आरक्षण लागू करून सर्व विभागांनी पदभरती सुरू करावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने ४ जुलै रोजी सर्व प्रशासकीय विभागप्रमुखांना तशी पत्रे पाठवून शासन आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
(-लोकसत्ता)

7 July Current Affairs
7 July Current Affairs

#आधार क्रमांकाने विवरणपत्र भरणाऱ्यांना पॅन क्रमांक आपोआप मिळणार

आधार क्रमांकाच्या मदतीने  विवरण पत्र  भरणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीकर विभागाकडून नवीन पॅन क्रमांक स्वत:हून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी यांनी सांगितले.
ज्या करदात्यांकडे पॅन क्रमांक नाही त्यांना आधार क्रमांकाच्या मदतीने प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची मुभा देण्याची घोषणा केंद्राय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.  करविवरण पत्र भरण्यासाठी आधारची बायोमेट्रिक ओळख पुरेशी आहे, असे सांगण्यात आले होते.

पॅन (पर्मनंट अकाउंट नंबर) ही व्यवस्था अजून बाद झालेली नाही, अर्थसंकल्पात जरी आधार क्रमांकाच्या आधारे विवरणपत्र भरण्यास मुभा दिली असली तरी जे लोक आधार क्रमांकाने प्राप्तिकर विवरणपत्र भरतील त्यांना पॅन क्रमांक प्रदान केला जाईल. दोन पद्धतीने विवरण पत्र भरण्याची मुभा ही अतिरिक्त सुविधा आहे.  आधार व  पॅन यांची एकमेकांना जोडणी सक्तीची केलेली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पॅन नाही व आधार क्रमांकाने विवरणपत्र भरले आहे त्यांना पॅन क्रमांक देऊन तो आधारशी जोडण्यात येईल, असे प्रमोद चंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासाठी आधार क्रमांक चालणार असेल तर आता पॅन नंबर बाद समजायचा का, या प्रश्नावर मोदी यांनी सांगितले, की आधार व पॅन या दोन्हींचा वापर करता येणार असला तरी पॅन क्रमांकही महत्त्वाचा आहे. पॅन क्रमांक बाद झालेला नाही. केवळ अतिरिक्त सुविधा म्हणून आधार क्रमांकास  परवानगी देण्यात आली आहे. यात प्राप्तिकर अधिकारी त्यांचे अधिकार वापरून पॅन क्रमांक संबंधित व्यक्तीला स्वत:हून जारी करू शकतात. पॅन क्रमांक न देता आधार क्रमांकाने विवरण पत्र भरले तर संबंधित अधिकारी पॅन क्रमांक देऊन तो आधारला जोडून टाकतील.
आधार क्रमांक हा युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केलेला असतो. तो सध्या भारतीयांना दिला जात असला तरी आता यापुढे अनिवासी भारतीयांनाही दिला जाणार आहे. तर पॅन क्रमांक हा १० आकडी क्रमांक प्राप्तिकर खाते देत असते, त्यात इंग्रजी अक्षरे व आकडे यांचा समावेश असतो.
पॅन क्रमांक जारी करण्याचा अधिकार
प्राप्तिकर कायद्यातील कलम १३९ अन्वये करमूल्यमापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना संबंधित विवरणपत्र भरणाऱ्या व्यक्तीस स्वत:हून पॅन क्रमांक जारी करण्याचा अधिकार असतो, फक्त त्यासाठी बायोमेट्रिक ओळख आवश्यक असते, ती आधार क्रमांकातून मिळणारच आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.
पॅन- आधार जोडणी अनिवार्य
सध्या प्राप्तिकर खाते व यूआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया)यांचे डाटाबेस जोडलेले असून त्यात पॅन व आधार क्रमांक यांची जोडणी आहे. त्यामुळे आधार क्रमांक पाहून कर अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक ओळख त्यातून समजणे सोपे जाणार आहे.
जी माहिती आधारसाठी दिलेली असते तीच पॅन क्रमांकासाठी पुरेशी किंवा आवश्यक आहे. सध्या १२० कोटी आधार क्रमांक जारी केलेले असून ४१ कोटी पॅन क्रमांक देण्यात आलेले आहेत. यातील २२ कोटी पॅन क्रमांक हे आधारला जोडलेले आहेत.
प्राप्तिकर कायदा कलम १३९ एए (२) अन्वये १ जुलै २०१७ रोजी पॅन क्रमांक असलेल्या व्यक्तींनी आधारला तो जोडणे अनिवार्य आहे.
यावर्षी मार्चमध्ये आधार व पॅन एकमेकांना जोडण्यासाठी ३० सप्टेंबपर्यंतची मुदत देण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते.
प्राप्तिकर विवरण पत्र भरताना आधार क्रमांक असणे बंधनकारक आहे,असा निकालही सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिला आहे.
(-लोकसत्ता)

#एक दोन पाच दहासोबत वीस रुपयांचं नाणंही लवकरच चलनात अर्थमंत्र्यांची घोषणा

एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नव्या नाण्यांच्या मालिकेसोबतच वीस रुपयांची नाणी बाजारात आणण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. अंध व्यक्तींनाही सहजपणे ओळखता येतील, अशा पद्धतीची या नाण्यांची रचना असेल.
सात मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक, दोन, पाच, दहा आणि वीस रुपयांच्या नव्या नाण्यांच्या सीरीजचं अनावरण केलं होतं. आता ही नाणी बाजारात आणण्याची घोषणा सीतारमण यांनी केली.
वीस रुपयांच्या नाण्याची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. या नाण्याला बारा कडा असतील, म्हणजेच हे नाणे बहुकोनी असेल. तांबं, जस्त आणि निकलपासून या नाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
सर्व किमतीच्या नाण्यांवर अशोकस्तंभ छापण्यात आला असून त्याखाली 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य लिहिलेलं असेल. एका बाजूला देवनागरीत भारत, दुसरीकडे इंडिया हा शब्द इंग्रजीत लिहिलेला आहे.
दहा रुपयांचं नाणं चलनात आल्यानंतर जवळपास दहा वर्षांच्या कालावधीनंतर ही नवीन नाणी बाजारात आणण्यात आली आहेत. दरम्यानच्या काळात दहा रुपयांची 13 वेगवेगळ्या प्रकारची नाणी बाजारात आली. त्यामुळे काही जणांनी ही नाणी खोटी असल्याचं सांगत नाकारल्याचे दावेही केले गेले

7 July Current Affairs
7 July Current Affairs

#भारताचा जसप्रित बूमरा: एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 100 बळी टिपण्याचा टप्पा पार करणारा दुसरा खेळाडू

भारताचा गोलंदाज जसप्रित बुमरा ह्याने ‘क्रिकेट विश्वचषक 2019’ या स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एक नवा विक्रम करीत त्या सामन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा पार केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने दिमुथ करुणारत्नेला बाद करुन 100 बळी टिपण्याचा विक्रम केला.
जसप्रित बुमराने केवळ 57 सामन्यांमध्ये हा विक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला आहे. तो सध्या ICCच्या एकदिवसीय गोलंदाजांच्या मानांकन यादीत प्रथम क्रमांकाचा गोलंदाज आहे.
अफगाणिस्तान संघाचा रशीद खान हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान म्हणजेच केवळ 44 सामन्यांमध्ये 100 बळी टिपण्याचा टप्पा पार करणारा प्रथम खेळाडू आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »