8 Sep Current Affairs

8 Sep Current Affairs
8 Sep Current Affairs

कार्डविना रोकड काढा; बँक ऑफ इंडियाची योजना

 • डिजिटल व्यवहारांमध्ये अधिकाधिक सुलभता आणण्याच्या दृष्टीने बँकांमध्ये मोठी चुरस असून एटीएममधून विनासायास रोकड काढण्यासाठी बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना एक नावीन्यपूर्ण सुविधा देऊ केली आहे. यानुसार बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून ग्राहकांना लवकरच डेबिट कार्डशिवाय रोख रक्कम काढता येईल. 
 • विशेष म्हणजे यासाठी ओटीपीचीदेखील (वन टाइम पासवर्ड) आवश्यकता नसून केवळ यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) व क्यूआर कोडच्या साह्याने ग्राहकांना एटीएममधून रोकड काढता येईल. अशी सुविधा देणारी बँक ऑफ इंडिया ही देशातील पहिलीच बँक ठरली आहे.
 • डिजिटल पेमेंटबाबत नवनवीन प्रणालींचे संशोधन करणाऱ्या एजीएस ट्रॅन्झॅक्ट टेक्नॉलॉजीतर्फे ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडियाच्या ११४ व्या स्थापनादिनाच्या औचित्याने या सुविधेची घोषणा करण्यात आली. 
 • येत्या तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत बँक ऑफ इंडियाच्या सर्व एटीएममध्ये ही सुविधा सुरू होईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष जी. पद्मनाभन यांनी दिली. 
 • यासाठी सध्याच्या एटीएममध्ये किरकोळ बदल करावे लागणार आहेत. या प्रणालीमुळे कार्ड स्किमिंगसारख्या सायबर गुन्ह्यांना वावच मिळणार नाही. मात्र ही सुविधा वापरण्यासाठी ग्राहकाचे बँक खाते यूपीआयशी संलग्न असणे तसेच, स्मार्टफोनमध्ये यूपीआय अॅप असणे गरजेचे आहे.

नेमकी प्रक्रिया काय?:-

 • यूपीआय व क्यूआर कोडच्या आधारे एटीएममधून रोकड काढण्यासाठी ग्राहकांना संबंधित एटीएमच्या स्क्रीनवरील क्यूआर कॅश या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर इच्छित रक्कम नोंदवून ओके बटन दाबावे लागेल. 
 • क्यूआर कोड स्कॅन करण्याची सूचना मिळाल्यानंतर आपल्या स्मार्टफोनमधील भीम वा अन्य यूपीआय अॅपच्या साह्याने हा कोड स्कॅन करता येईल.
 • यानंतर यूपीआयचा पिन टाकून व्यवहार पूर्ण होईल व त्यानंतर एटीएममधून इच्छित रोख रक्कम ग्राहकास मिळेल.

व्यवहारमर्यादा किती?:-

 • या प्रकारच्या व्यवहारांवर विशिष्ट दैनंदिन मर्यादा असून या माध्यमातून एकावेळी जास्तीत जास्त दोन हजार व दिवसभरात जास्तीत जास्त चार हजार रुपये काढता येतील.
 • तसेच, दिवसभरात जास्तीत जास्त दोन व्यवहार करता येतील, असे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

यूपीआय व्यवहारांत सहापटीने वाढ:-

 • गेल्या आर्थिक वर्षात यूपीआय अंतर्गत झालेल्या व्यवहारांत तब्बल सहापटीने वाढ झाली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात यूपीआयच्या माध्यमातून ५३५.३४ कोटी व्यवहार झाले.
 • यातून एकूण ८ लाख ७७ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात यूपीआयच्या माध्यमातून ९१ कोटी व्यवहार झाले व त्यांची उलाढाल १,०९,८०० कोटी रुपये होती.

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१९चा दया पवार स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार मेघना पेठे, ज्येष्ठ कवयित्री-लेखिका मलिका अमर शेख आणि नव्या पिढीच्या आघाडीच्या लोकशाहीर शीतल साठे यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे रंगकर्मी व कवी डॉ. मंगेश बनसोड यांना ‘उष्टं’ या अनुवादित आत्मकथनासाठी यंदाचा ‘बलुतं पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
२० सप्टेंबर रोजी सोहळा:-
हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता पार पडणार आहे. यंदाचा हा २३वा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी १० हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘बलुतं पुरस्कार’:-

 

गतवर्षी ‘बलुतं’च्या चाळीशीच्या निमित्ताने ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं पुरस्कार’ सुरू करण्यात आला होता. यावर्षी तो रंगकर्मी व कवी डॉ. मंगेश बनसोड यांना ‘उष्टं’ या अनुवादित आत्मकथनासाठी जाहीर करण्यात आला आहे. 

दिवंगत ज्येष्ठ हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ख्यातनाम ‘जूठन’ या आत्मकथनाचा मंगेश बनसोड यांनी मराठी अनुवाद केला आहे.

 • शीतल साठे
 • मेघना पेठे
 • मलिका अमर
 • डॉ. मंगेश बनसोड इ. यांना बलुतं पुरस्कार

मान्यवर राहणार उपस्थित:-

 • या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि वरिष्ठ पत्रकार-कथाकार प्रतिमा जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळ सराफ करणार असल्याची माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली आहे.

यापूर्वी यांनी पटकावला पुरस्कार:-

 • आतापर्यंत या पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.
8 Sep Current Affairs
8 Sep Current Affairs

मद्रास उच्च न्यायालय न्या.विजया ताहिलरामाणी यांचा राजीनामा

 • मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश विजया के. ताहिलरामाणी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजिअमने त्यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली केल्याच्या निर्णयाचा फेरविचार न केल्याने शुक्रवारी राजीनामा दिला. 
 • न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला असून त्याची एक प्रत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनाही पाठवली आहे.
 • २८ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने न्या. ताहिलरामाणी यांची बदली मेघालय उच्च न्यायालयात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा म्हणून न्या. ताहिलरमानी यांनी कॉलेजियमला विनंती केली होती. त्यांनी कॉलिजियमच्या बदली प्रस्तावालाही विरोध केला होता. पण त्यांची विनंती कॉलिजियमने नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिला. न्या. ताहिलरामानी २ ऑक्टोबर २०२० रोजी निवृत्त होणार होत्या.

महत्त्वाचे:-

 • न्या. ताहिलरामाणी यांच्या राजीनाम्यानंतर देशातल्या उच्च न्यायालयात फक्त आता एकच महिला मुख्य न्यायाधीश म्हणून उरल्या आहेत. सध्या जम्मू व काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी गीता मित्तल आहेत.
 • गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये न्या. ताहिलरामाणी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती.

न्या. ताहिलरामाणी:-

 • न्या. ताहिलरामाणी यांच्या कारकीर्दीची सुरवात महाराष्ट्र राज्याचे वकील म्हणून झाली होती. नंतर २६ जून २००१मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बढती मिळाली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीशपदही त्यांनी सांभाळले होते. या काळात त्यांनी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात सर्व ११ आरोपींना दोषी ठरवून त्यांना जन्मठेप सुनावली होती. न्या. ताहिलरामाणी यांनी महिला कैंद्यांना गर्भपात करण्याचा अधिकार आहे, असा ऐतिहासिक निकालही दिला होता.
 • कॉलेजियमशी मतभेद झाल्यानंतर राजीनामा देणाऱ्या न्या. ताहिलरामाणी या दुसऱ्या न्यायाधीश आहेत. २०१७मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जयंत पटेल यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली झाली होती. त्यावेळी न्या. पटेल यांनी कोणतेही कारण न देता राजीनामा दिला होता. न्या. पटेल यांनी गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले होते आणि त्यांनी इशरत जहाँ कथित चकमक प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले होते.
   

आसाममध्ये आफस्पा ला ६ महिन्यांची मुदतवाढ

 • आसाममधील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर, राज्यातील सशस्त्र दले विशेषाधिकार कायद्याची (आफस्पा) मुदत २८ ऑगस्टपासून सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली असल्याचे सरकारने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 • सुरक्षा दलांना मोहिमा राबवण्याचा, झडती घेण्याचा आणि कुणालाही पूर्वसूचनेशिवाय अटक करण्याचा अधिकार देणारा हा कायदा नोव्हेंबर १९९० पासून आसाममध्ये लागू आहे.
 • आसाममधील गेल्या सहा महिन्यांतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावी घेतल्यानंतर, राज्याच्या गृह आणि राजकीय विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे आणि आफस्पाच्या कलम ३ नुसार, राज्य सरकारने आसामला २८ ऑगस्टपासून सहा महिन्यांसाठी (आधी मागे न घेण्यात आल्यास) ‘अशांत क्षेत्र’ जाहीर केले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

AFSPA:-

 • "आर्म्ड फ़ोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट" उर्फ़ AFSPA. हा भारतीय संसदेने मंजुर केलेला सशस्त्र लष्करी/निमलष्करी/ अर्ध्वलष्करी दलांना विशिष्ट परीस्थीतीत विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांतर्गत कारवाई करतांना विशेषाधिकार देणारा एक जुना वादग्रस्त कायदा आहे.
 • आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट (AFSPA) लष्कराला जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील वादग्रस्त भागात विशेषाधिकार देतो. हा कायदा अनेक कारणांनी वादग्रस्त असून या कायद्याचा लष्कराकडून दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात असून तो हटवण्यात यावा अशी मागणीही अनेक काळापासून होत आहे.
 • अफस्पाच्या कलम ४ नुसार, सुरक्षा रक्षकांना कोणत्याही परिसराची तपासणी करण्याचे तसेच विना वॉरंट कोणालाही अटक करण्याचा अधिकार आहे. यामुळे वादग्रस्त भागात सुरक्षा रक्षक कोणत्याही थराला जाऊन आपल्या ताकदीचा वापर करू शकते.
 • संशयास्पद स्थितीत त्यांना कोणत्याही वाहनाला रोखण्याचे, त्याची तपासणी करण्याचे तसेच त्यावर जप्ती आणण्याचा अधिकार आहे.
 • सुरक्षा दलांच्या मतानुसार, १९५८ मध्ये पहिल्यांदा ईशान्य भारतात बंडखोरांशी मुकाबला करण्यासाठी संसदेत हा कायदा पारित करण्यात आला. या कायद्यामुळे कठीण परिस्थितीत दहशतवादी किंवा इतर धोक्यांशी लढणाऱ्या जवानांना कारवाईत सहकार्य मिळण्याबरोबरच सुरक्षा देखील मिळते.
   
8 Sep Current Affairs
8 Sep Current Affairs

आफ्रिकन फुटबॉलपटू इटोची निवृत्ती

 • चारवेळा आफ्रिकन सर्वोत्तम फुटबॉलपटूचा बहुमान मिळविणारा कॅमेरूनचा फुटबॉलपटू 38 वर्षीय सॅम्युअल इटोने शनिवारी येथे आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली.
 • इटोने आपल्या फुटबॉल कारकीर्दीत बार्सिलोना, इंटर मिलान आणि चेल्सी या क्लबचे प्रतिनिधीत्व केले होते. 19 वर्षांच्या फुटबॉल कारकीर्दीला आपण निरोप देत असल्याचे इटोने पत्रकार परिषदेत संगितले. 
 • आपल्याला पुढे विश्रांतीची जरूरी असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे, असेही तो म्हणाला. आफ्रिकन फुटबॉल क्षेत्रामध्ये इटोने आपले प्रतिष्ठेचे स्थान निर्माण केले होते.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »