नेपाळच्या हिमालय पर्वत रांगांत नवे सरोवर सापडले असून हे जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर ठरणार आहे.
४,९१९ मीटर उंचावर असलेले तिलिचो सरोवर हे सध्या जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर आहे. विशेष म्हणजे, तिलिचो सरोवरही नेपाळातच आहे.
काही महिन्यांपूर्वी गिर्यारोहकांच्या एका पथकाला नेपाळातील मनंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पर्वत रांगात काजीन सारा सरोवर सापडले, असे वृत्त ‘हिमायलन टाइम्स’ने दिले आहे. हे सरोवर चामे ग्रामीण नगरपालिकेच्या हद्दीतील सिंगारखरका परिसरात आहे. गिर्यारोहकांनी केलेल्या नोंदीनुसार, हे सरोवर ५,२00 मीटर उंचावर आहे.
तथापि, याची अद्याप अधिकृत पडताळणी करण्यात आलेली नाही. हे सरोवर अंदाजे १,५00 मीटर लांब आणि ६00 मीटर रुंद आहे, असे चामे ग्रामीण नगरपालिकेचे प्रमुख लोकेंद्र घाले यांनी ‘हिमायलन टाइम्स’ला सांगितले.
घाले यांनी म्हटले की, नव्याने सापडलेले सरोवर ५ हजार मीटरपेक्षा अधिक उंचावर असल्यामुळे अधिकृत पडताळणीनंतर ते जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर ठरणार आहे.
तिलिचो सरोवर:-
सध्या सर्वाधिक उंचीवरील सरोवर असा किताब असलेले तिलिचो सरोवर ४,९१९ मीटर उंचावर असून त्याची लांबी ४ कि.मी., रुंदी १.२ कि. मी. तर खोली २00 मीटर आहे.
तिलिचो सरोवराच्या तुलनेत नवे सरोवर आकाराने छोटे आहे, तसेच त्याची खोलीही अद्याप मोजली गेलेली नाही.