केंद्र सरकार देणार सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार

केंद्र सरकार देणार सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार
केंद्र सरकार देणार सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार

सर्वोच्च नागरी पुरस्कार

 • देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी हातभार लावणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावे 'सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • पुरस्कार विजेत्याला रोख रक्कम दिली जाणर नसून वर्षभरात तीनपेक्षा जास्त लोकांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात येईल.
 • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावर भारताची एकात्मता आणि सार्वभौमत्वाच्या क्षेत्रात योगदानासाठी राष्ट्रीय एकता पुरस्कार दिला जाणार आहे. गृहमंत्रालयाने या पुरस्कारासाठी अधिसूचना काढली आहे. या पुरस्काराची घोषणा 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेलांच्या जयंतीदिनी होणार आहे.

पुरस्काराचा उद्देश:-

 • पुरस्काराचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वभौमत्वाला चालना देणे तसेच  बलशाली भारतासाठी उल्लेखनीय आणि प्रेरक योगदानासाठी सन्मानित करणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये केवडिया येथे या पुरस्काराची घोषणा केली होती.

पुरस्काराची पात्रता:-

 • अधिसूचनेनुसार जात, पेशा, पद अणि लिंग असा कुठलाच भेदभाव न करता राष्ट्रीय एकात्मतेसाठी विशेष योगदान देणारी व्यक्ती पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहे. हा पुरस्कार मरणोत्तर स्वरुपातही दिला जाऊ शकतो. पुरस्कार विजेत्यांची नावे भारत सरकारच्या गॅझेटमध्ये प्रकाशित केली जाणार आहेत. राष्ट्रपतींच्या आदेशावर याच्याशी संबंधित एक नोंदवहीही ठेवली जाणार आहे.

पुरस्काराचे स्वरुप:-

 • पुरस्काराची रचना कमळाच्या पाकळय़ांप्रमाणे असणार आहे. याच्या पदकाची लांबी 6 सेंटीमीटर, रुंदी 2 ते 6 सेंटीमीटर असेल. चांदी आणि सोन्याने निर्माण होणाऱया पदकावर सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार असे नमूद आहे.
 • पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. अत्यंत पात्र व्यक्तीलाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार नसल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.

लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल:-

 •  सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून अत्यंत आदराने गौरविले गेले आहे. महात्मा गांधी यांच्या जवळचे सहकारी म्हणून सरदार पटेल स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़पूर्ण होते. आपल्या कामावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य होते. ते खंबीर प्रशासक होते. कणखर धोरणांचा अवलंब करून ५६५ संस्थानांचे विलीनीकरण त्यांनी करून एकसंध भारत उभा केला.
 • सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील खेडा जिल्ह्यतील नाडियाड इथे ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. आणंद हे त्यांचे गाव. जवळच असलेल्या करमसाद या गावी त्यांची वडिलार्जित शेती होती. झव्हेरीभाई हे त्यांचे वडील. या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. वडिलांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता. त्यामुळे वल्लभभाई यांच्यावर घरीच राजकीय संस्कार झाले होते. त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि बोरसाड येथे वकिली सुरू केली. वल्लभभाई प्रत्येक केसचा बारकाईने अभ्यास करीत. एक अभ्यासू वकील म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पुढे ते प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढून बॅरिस्टर झाले. (सन १९१३) त्यांनी आता अहमदाबाद येथे वकिली सुरू केली. त्यांचा युक्तिवाद सरस असे.
 • उलटतपासणीच्या वेळी ते कसलेल्या साक्षीदाराचीही बोलती बंद करीत. विरोधक कोणते मुद्दे मांडतील याचा अभ्यास करून ते आपला बचाव तयार ठेवत असत. न्यायालयात ते अत्यंत निर्भीडपणे वागत असत. एक निष्णात वकील म्हणून त्यांचा अल्पावधीतच लौकिक झाला. वकिलीबरोबरच त्यांनी अहमदाबाद पालिकेची निवडणूक लढवली. तिथून त्यांचा राजकारण प्रवेश झाला.
 • १९१७ मध्ये खेडा जिल्ह्यत प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे खरिपाचे पीक पूर्णपणे गेले. पुढे उंदरांचा सुळसुळाट तसंच अन्य कीटकांमुळे रब्बीचेही पीक गेले होते. २५ टक्क्यांपेक्षाही पीक उत्पादन कमी येईल, अशी परिस्थिती होती. या दुष्काळामुळे शेतसाऱ्याची वसुली पुढे ढकलावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. १८ हजार सह्य असलेले एक निवेदन १५ नोव्हेंबर १९१७ रोजी सरकारला देण्यात आले.
 • दयालाल येथील होमरूल लीगच्या सभासदांनी असेच निवेदन सरकारला दिले. परंतु याचा काही उपयोग झाला नाही. इंग्रज सरकारने शेतकऱ्यांवर जप्तीचे आदेश काढले आणि भांडीकुंडी जप्त करून सारावसुली सुरू केली. काही शेतकऱ्यांनी जमिनीचा काही हिस्सा विकून तर काहींनी व्याजाने रक्कम काढून शेतसारा भरला. या अन्यायात शेतकरी भरडला जाऊ लागला.
 • महात्मा गांधी यांनी सक्तीच्या शेतसाऱ्याच्या वसुलीविरोधात खेडा जिल्ह्यतील हजारो शेतकऱ्यांची सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. या चळवळीचे नेतृत्व त्यांनी सरदार पटेल यांच्याकडे सोपविले. सरदार पटेल यांनी ६०० गावांतील हजारो सत्याग्रही शेतकऱ्यांचे आंदोलन अत्यंत निर्धाराने यशस्वी केले. यातूनच सरदार पटेल यांचे नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उदयास आले.
 • सन १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सरदार पटेल यांनी भाग घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून सरदार पटेल यांनी सन १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेतला.
 • इंग्रज सरकारने ९ ऑगस्ट १९४२ च्या पहाटेच गांधीजींसह सरदार वल्लभभाई पटेल, पं. नेहरू, आचार्य कृपलानी, मौलाना आझाद, गोविंद वल्लभपंत, असफअली या काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली. या वेळी दुसरे महायुद्ध चालू होते. इंग्रज सरकार अडचणीत होते. अमेरिकेच्या मदतीमुळे दोस्त राष्ट्रांचा– इंग्लंड–फ्रान्सचा विजय झाला. तरीही या युद्धात इंग्लंडचे कंबरडे मोडले.
 • भारताचा राज्यकारभार पाहण्याकरिता काँग्रेस, मुस्लीम लीग या अन्य पक्षांशी चर्चा करून इंग्रज सरकारने हंगामी सरकार सप्टेंबर १९४६ साली नियुक्त केले. या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत–पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर हिंदू–मुस्लीम यांच्यात उसळलेल्या प्रचंड जातीय दंगलीमध्ये कणखर भूमिका घेऊन त्यांनी जातीय दंगली आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न केले.
 • पाकिस्तानच्या आगळिकीविरुद्ध जोरदार इशारा दिला. हिंदू आणि मुस्लीम यांच्याशी व्यवहारवादी भूमिकेतून संवाद साधून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांच्या बोलण्यात आणि कृतीत धर्मनिरपेक्षता होती. दरम्यान, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
 • स्वतंत्र भारताचा राज्य कारभार पाहण्यासाठी पंतप्रधान पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले. त्यांच्याकडे गृहखाते, माहिती व नभोवाणी खाते, संस्थानांचा प्रश्न व निर्वासितांचे पुनर्वसन इ. खात्यांची जबाबदारी होती. सरदार पटेल यांनी तत्कालीन ५६५ संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला. सरदार पटेल यांची ही मोठी ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यांच्या या कामगिरीने सरदार पटेल खऱ्या अर्थाने पोलादी पुरुष आहेत हे इतिहासात सिद्ध झाले.
 • इंग्लंडचे माजी पंतप्रधान चर्चिल हे भारतद्वेषी होते. भारताच्या विरुद्ध कट–कारस्थानं करण्यात इंग्लंडच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चिल आघाडीवर होते. भारतातील ५६५ संस्थानांचं स्वतंत्र राज्य असावं अशी चर्चिल यांची योजना होती. त्यांची ही योजना पटेल यांना अस्वस्थ करीत होती. चर्चिल यांच्या योजनेनुसार कॅबिनेट मिशनने १२ मे आणि १६ मे १९४६ रोजी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
 • पहिल्या घोषणेनुसार जेव्हा ब्रिटिश भारतात एक किंवा दोन सरकारं अस्तित्वात येतील तेव्हा राजसत्तेचा संस्थानांवरचा अधिकार आपोआपच संपेल. या राज्यांनी मांडलिकत्व स्वीकारताना ब्रिटिश राजसत्तेला दिलेले अधिकार त्यांना परत दिले जातील. ही राज्यं नंतर नव्या सरकारबरोबर संघराज्यात सामील होतील किंवा स्वतंत्र राजकीय व्यवस्था निर्माण करतील. यामुळं हे राजे एका रात्रीत स्वतंत्र राजे होतील; ही स्थिती अतिशय धोकादायक आहे हे पटेलांनी तात्काळ ओळखले.
 • १६ मे १९४६ रोजी ब्रिटिशांनी पत्रक काढून या संस्थानांच्या सार्वभौमत्वावर जवळपास शिक्कामोर्तब केलं. या राज्यांचं स्वामित्व ब्रिटिश राजसत्ता स्वत:कडे ठेवणार नाही आणि नव्या सरकारकडे ते देणार नाही, असं या पत्रकात म्ह्टलं होतं. याप्रमाणे चर्चिल यांना भारतातील ५६५ संस्थानांचं ‘प्रिन्सेस स्थान’ करायचं होतं. म्हणजे चर्चिल यांना जाता जाता भारताचे अधिकाधिक तुकडे करून भारत दुबळा करायचा होता.
 • पोलिटिकल डिपार्टमेंटचे सचिव कॉनराड कोरफिल्ड यांनी २६ मार्च १९४७ रोजी माऊंटबॅटन यांच्या स्टाफ मिटिंग वेळी सांगितलं की, भारतीय संघराज्यात काही संस्थानांनी सामील व्हायचं नाही असा कट रचला होता. आणि या कटाला आपला पाठिंबा होता. अशा संस्थानिकांची एक तिसरी शक्ती उभी करण्याचा आपण प्रयत्न करीत होतो. चर्चिल यांच्या कल्पनेतील ‘प्रिन्सेसस्तान’ ते हेच होतं. संस्थानांच्या विलिनीकरणात सरदार पटेल यांनी जी कणखरता दाखवली तिचं महत्त्व या पाश्र्वभूमीवर लक्षात येतं.

राष्ट्रीय एकता दिन:-

 • देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर रोजी झाला असून, २०१४ पासून हा दिन ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
 • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रारंभी देशातील सुमारे ५०० संस्थानात राजे-महाराजांचा स्वतंत्र कारभार चालत होता.
 • परंतु सरदार पटेल यांनी या संस्थानांचे भारतात यशस्वी विलिनीकरण घडवून आणले. त्यामुळे देशाचे अनेक तुकड्यात विभाजन होण्याचे टाळण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा सिंहाचा वाटा आहे.

"Every citizen of India must remember that he is an Indian and he has every right in this country but with certain duties. "
-The Ironman of India Sardar Patel

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »