1 Nov Current Affairs

1 Nov Current Affairs
1 Nov Current Affairs

भारताचा नवा नकाशा पाहिला का

 • लोकसभेत मंजूर झालेल्या जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयकानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख गुरुवारी (३१ ऑक्टोबर २०१९ च्या) मध्यरात्री १२ वाजल्यापासून केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.
 • भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी हा मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
 • ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याचा निर्णय घेतला होता.
 • या निर्णयामुळे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेश रुपांतर करण्यात आले आहे. या निर्णयाबरोबरच भारताचा नकाशाही बदलला आहे.
 • आता जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रसाशित प्रदेश झाल्याचे भारताच्या नकाशामध्ये दिसत आहे.
 • देशामधील नकाशासंदर्भात काम करणाऱ्या मॅप्स ऑफ इंडिया या वेबसाईटने ३१ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरचा नकाशा प्रकाशित केला आहे. या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही भाग आता देशातील इतर राज्यांप्रमाणेच दाखवण्यात आले आहेत.
 • जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित झाल्यामुळे देशातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या ९ झाली असून राज्यांची संख्या एकने कमी होऊन २८ झाली आहे.

राज्यपालांनी घेतली शपथ:-

 • जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून गुजरात श्रेणीचे सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू यांनी तर माजी संरक्षण सचिव आर. के. माथुर यांनी लडाखच्या नायब राज्यपाल पदाची गुरुवारी शपथ घेतली.
 • मुर्मू हे मूळचे ओदिशाचे असून त्यांनी गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत काम केले होते. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुर्मू हे त्यांचे अतिरिक्त प्रधान सचिव होते. माथुर २०१५ मध्ये संरक्षण सचिव म्हणून निवृत्त झाले.
 • त्यानंतर त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांची मुख्य माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

(याबद्दल टेलेग्रामच्या माध्यमातून एक गृहपाठ दिला होता मला आशा आहे की तुम्ही तो पूर्ण केला असेल)

 

काश्मीरवरून भारताने चीनला फटकारले

 • देशांतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला
 • जम्मू-काश्मीरची पुनर्रचना हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून, चीनने त्यात हस्तक्षेप करू नये, अशा शब्दांत भारताने  गुरुवारी चीनला फटकारले.
 • जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या पाश्र्चभूमीवर गुरुवारी जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश बनले. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केली.
 • भारताने देशांतर्गत कायदा आणि प्रशासकीय विभागात एकतर्फी बदल करून चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याचे गेंग शुआंग यांनी म्हटले होते.
 • भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीर या राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांद्वारे पुनर्रचना करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. इतर देशांच्या अंतर्गत प्रश्नांत भारत हस्तक्षेप करत नाही.
 • त्याचप्रमाणे चीनसह इतर देशांनी आमच्या प्रश्नांत हस्तक्षेप करू नये, असे रवीशकुमार म्हणाले. चीन-पाकिस्तान कथित सीमा करार १९६३ नुसार चीनने पाकव्याप्त काश्मीरमधल्या भारतीय क्षेत्रावर बेकायदा ताबा मिळवला आहे.
 • तसेच कथित चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्पाबाबतही या दोन्ही देशांकडे आपले म्हणणे मांडण्यात आले आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.सीमावादाबाबत  शांततापूर्ण मार्गाने चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे उभय देशांनी आधीच मान्य केले आहे.
1 Nov Current Affairs
1 Nov Current Affairs

पाकिस्तानकडून व्हिएन्ना करारातील अटींचे उल्लंघन

 • कुलभूषण जाधव यांचे अटक प्रकरण
 • भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना अटक व स्थानबद्ध करताना, व्हिएन्ना करारानुसार बंधनकारक असलेल्या अटींचे पाकिस्तानने उल्लंघन केले, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे (आयसीजे) अध्यक्ष अब्दुअलकावी युसुफ यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेला सांगितले.
 • भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असलेले ४९ वर्षांचे जाधव यांना पाकिस्तानच्या एका लष्करी न्यायालयाने बंद कक्षात सुनावणी केल्यानंतर एप्रिल २०१७ मध्ये ‘हेरगिरी व दहशतवादाच्या’ आरोपांखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र सेवानिवृत्तीनंतर इराणमध्ये व्यापारासाठी गेलेले जाधव यांचे तेथून अपहरण करण्यात आल्याचे भारताचे म्हणणे आहे.
 • ‘व्हिएन्ना कराराच्या कलम ३६ अन्वये बंधनकारक असलेल्या अटींचे पाकिस्तानने उल्लंघन केले आहे आणि या प्रकरणात योग्य ते उपाय योजणे आवश्यक आहे’, असे १७ जुलैला दिलेल्या निकालात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नमूद केले आहे, असे १९३ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र आमसभेला आयसीजेचा अहवाल सादर करताना युसुफ यांनी सांगितले.
 • जाधव यांना सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेचा फेरविचार करावा, हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकाल भारताचा मोठा विजय मानला जातो. राजनैतिक संबंधांबाबत असलेल्या १९६३ सालच्या व्हिएन्ना कराराचा भंग करून आपल्या नागरिकाला राजनैतिक संपर्क नाकारला जात असल्याचा युक्तिवाद भारताने केला होता.
 • ‘कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवण्याच्या आणि शिक्षेच्या निर्णयाचा परिणामकारक आढावा घेऊन त्याचा फेरविचार करावा’, असा आदेश युसुफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला होता.
 • संयुक्त राष्ट्र आमसभेला आपला अहवाल सादर करताना युसुफ यांनी जाधव प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाच्या अनेक पैलूंची सविस्तर माहिती दिली. संबंधित व्यक्ती हेरगिरीची कृत्ये करत असेल, तर अशा परिस्थितीत, व्हिएन्ना कराराच्या कलम ३६ मध्ये नमूद केलेल्या राजनैतिक संपर्काचा अधिकार वगळला जाऊ शकतो काय, या मुद्दय़ावरही न्यायालयाला पडताळणी करायची होती. व्हिएन्ना करारात हेरगिरीच्या प्रकरणांचा काही संदर्भ नाही; तसेच हेरगिरीच्या संशयिताला राजनैतिक संपर्क न मिळू देण्याचाही त्यात उल्लेख नाही, असे न्यायालयाने नमूद केले असल्याचे युसुफ म्हणाले.

गुरुदास दासगुप्ता यांचे निधन

 • देशातील कामगार चळवळीतील अध्वर्यूपैकी एक असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरुदास दासगुप्ता यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी आहेत.
 • १९८५ सालापासून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले दासगुप्ता यांची तीन वेळा राज्यसभेवर, तर दोन वेळा पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवड झाली होती.
 • दासगुप्ता यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३६ रोजी सध्या बांगलादेशात असलेल्या अविभाजित बंगालच्या बारिशाल जिल्ह्य़ात झाला होता. विभाजनानंतर ते त्यांचे आईवडील व भावंडे यांच्यासह पश्चिम बंगालमध्ये आले. त्यांनी १९५०च्या दशकात अविभाजित बंगाल प्रांतिक विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून काम पाहिले आणि अनेकदा भूमिगत झाले.
 • १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी) स्थापन झाल्यानंतर दासगुप्ता यांनी मूळ पक्षात राहणे पसंत केले.
 • नंतर १९७० च्या सुरुवातीला त्यांना संघटित व असंघटित कामाला असलेल्या मजुरांमध्ये काम करण्यासाठी पक्षाच्या कामगार आघाडीत पाठवण्यात आले.
 • २००१ साली भाकपची कामगार संघटना आघाडी असलेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सरचिटणीसपद स्वीकारलेल्या दासगुप्ता यांना, फारशा माहीत नसलेल्या या संघटनेला देशातील आघाडीची कामगार संघटना बनवण्याचे श्रेय दिले जाते.
 • दासगुप्ता हे कट्टर कम्युनिस्ट असले, तरी ते पुराणमतवादी नव्हते आणि त्यांचे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. संसदेत ते एक चांगले वक्ते म्हणून ओळखले जात.
 • नेत्यांना शोक : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दासगुप्ता हे संसद सदस्य आणि प्रसिद्ध कामगार नेते होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतक यांच्याबद्दल मी शोकसंवेदना व्यक्त करतो, असे नायडू म्हणाले.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दासगुप्ता यांचे वर्णन ‘त्यांच्या विचारधारेचा अतिशय एकनिष्ठ आणि स्पष्ट पुरस्कर्ता’ असे केले. संसदेत ते अतिशय ठामपणे स्वत:ची मते मांडत आणि सर्वच राजकीय पक्षांचे लोक त्यांचे भाषण लक्ष देऊन ऐकत, असे मोदी यांनी ट्विटरवर लिहिले.
1 Nov Current Affairs
1 Nov Current Affairs

सामाजिक कार्यकर्ते पत्रकारांवर पाळत सरकारने व्हॉट्सअ‍ॅपकडे मागितले स्पष्टीकरण

 • व्हॉट्सअॅपद्वारे भारतीय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी झाल्याचे समोर आहे.
 • या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या माहिती व दूरसंचार मंत्रालयानेने व्हॉट्सअॅपकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
 • ४ नोव्हेंबरपर्यंत व्हॉट्सअॅपला यावर उत्तर द्यावे लागणार आहे.
 • फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने गुरुवारी खुलासा केला होती की, एका इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून जगभरातील अनेक व्हॉट्सअॅप युजर्सची हेरगिरी करण्यात आली आहे.
 • याला काही भारतीय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्तेही बळी पडले आहेत.
 • मात्र, किती भारतीयांची हेरगिरी करण्यात आली, हे व्हॉट्सअॅपने सांगितलेले नाही. व्हॉट्सअॅपने म्हटले, इस्रायली स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून हैकर्सने हेरगिरीसाठी सुमारे १४०० लोकांचे फोन हॅक केले आहेत. चार खंडातील व्हॉट्सअॅप युजर्स याचे शिकार झाले आहेत.
 • यामध्ये राजकीय व्यक्ती, पत्रकार, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

लवकरच धावणार देशातील पहिली वॉटर मेट्रो

 • लवकरच देशातील पहिली वॉटर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. सर्वकाही नियोजित राहिल्यास केरळमधील कोची शहरात नोव्हेंबर 2020 मध्ये ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही देशातील पहिली ‘वॉटर मेट्रो’ ठरेल.
 • या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून पर्यावरण विषयक मंजुरी देखील मिळाली आहे.
 • ही वॉटर मेट्रो 15 मार्गांवर चालेल आणि याद्वारे कोचीच्या आजुबाजूला असलेल्या 10 बेटांशी संपर्क होऊ शकेल.
 • 78 किमीचा प्रवास ही वॉटर मेट्रो करेल.
 • ‘कोची मेट्रो रेल लिमिटेड’कडे(केएमआरएल) या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी असून यामुळे बेटांवरील एक लाखांहून अधिक नागरिकांना फायदा होईल. “नोव्हेंबर 2020 पर्यंत जास्तीत जास्त टर्मिनल पूर्ण करण्याची आमची योजना आहे.
 • कोचीन शिपयार्डने नोव्हेंबर 2020 पर्यंत वॉटर मेट्रोची पहिली बोट सोपविण्याची तयारी दर्शविली आहे. एकदा हा वॉटर मेट्रोचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट जलवाहतूक प्रकल्प ठरेल, असं केएमआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अलकेश कुमार शर्मा म्हणालेत.
 • वॉटर मेट्रोद्वारे कोचीच्या आजुबाजूला असलेल्या 10 द्वीपांवरील 38 टर्मिनलशी संपर्क होऊ शकेल. यातील 18 टर्मिनल हे मुख्य बोट हबच्या रूपात तयार करण्यात आले आहेत. 819 कोटी रूपयांच्या या प्रकल्पाच्या 78 किमी मार्गावर दोन बोटयार्ड असतील.
 • मेट्रोसाठी 78 इको-फ्रेंडली, वेगवान आणि एअर कंडिशन बोटी तयार करण्यात आल्यात. जर्मनीच्या ‘केएफडब्ल्यू’ बँकेकडून या प्रकल्पासाठी आर्थिक मदत होत आहे.
1 Nov Current Affairs
1 Nov Current Affairs

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे निधन

 • ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे आज (गुरूवारी) वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि सूना असा परिवार आहे.
 • त्यांच्या नावावर १०० पेक्षा अधिक पुस्तकं आहेत. याशिवाय त्यांनी कथा,कांदबरी, प्रवासवर्णन याचबरोबर बालसाहित्यात मोलाचे काम केले आहे.
 • काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया साहित्य जगतातून व्यक्त होत आहे.
 • साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मसापचा ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाच्या कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री  साहित्यिका पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
 • किर्लोस्कर, प्रपंच, ललना इत्यादी मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. शिवाय त्यांनी विविध वाङ्मयप्रकारांत लेखन देखील केले आहे. १९६८ ते १९७८ या काळात अनुराधा मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले होते.
 • गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला इ. गिरिजाबाईंच्या कादंबऱ्याही लोकप्रिय आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आहेत.

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे सीमा भागात पाळला काळा दिवस

 • कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस १ नोव्हेंबर बेळगावसह सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो. आजच्याच दिवशी बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषिक भाग आणि ८१४ गावे कर्नाटकात सामील करण्यात आली होती.
 • त्याच्या निषेधार्थ बेळगावसह सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज काळा दिवस पाळण्यात येत आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी बेळगाव परिसर दणाणून सोडला.
 • बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेला महाराष्ट्रात यायचे आहे. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनेही केली. पण कर्नाटक सरकारने जुलमीपद्धतीने ही आंदोलनं दडपून टाकली.
 • बेळगावमधील संभाजी महाराज उद्यानातून मूक मोर्चा काढण्यात आला. महिलांबरोबर तरुणांचाही या मोर्चामध्ये समावेश होता.
 • गेल्या ६३ वर्षांपासून १ नोव्हेंबर काळा दिवस पाळण्यात येत आहे.
 • बेळगावच्या जनतेने कलम ३७० प्रमाणे हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. मुंबईत डिलाई रोड परिसरात राहणाऱ्या बेळगावच्या नागरीकांनी हाताला काळी रिबीन बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला.
1 Nov Current Affairs
1 Nov Current Affairs

शाकिबसाठी आता पुनरागमन करणं कठीणच

 • बांगलादेशचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्यावर ICC ने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे.
 • एकदिवसीय, टी २० आणि कसोटी क्रिकेट अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 • ICC च्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमावलीचा भंग केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याने त्याच्यावर लावण्यात आलेले नियमभंगाचे आरोप मान्य केले.
 • त्यामुळे त्याच्यावरील बंदीची कारवाई एका वर्षाची (back dated suspension) करण्यात आली.
 • त्यामुळे २९ ऑक्टोबर २०२० रोजी शाकिब पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतू शकतो.

राहुल द्रविडला बीसीसीआयची नोटीस लाभाचं पद भूषवल्याचा ठपका

 • भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळणाऱ्या राहुल द्रविडला बीसीसीआयने चौकशीसाठी बोलावलं आहे.
 • राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदासोबतच द्रविड सध्या चेन्नई सुपकिंग्जचे मालक एन.श्रीनीवासन यांच्या कंपनीत मोठा हुद्द्यावर कामाला आहे.
 • याच कारणामुळे लाभाचं पद भूषवल्याचा ठपका ठेवत बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी राहुलला नोटीस बजावली आहे.
 • याआधीही राहुल द्रविडला याच प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. १२ नोव्हेंबरला या प्रकरणावर निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
 • मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांच्याकडे तक्रार केली होती.
 • राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष असलेला द्रविड श्रीनीवासन यांच्या इंडियन सिमेंट कंपनीत कामाला आहे. आयपीएलमध्ये श्रीनीवासन यांचा चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ खेळतो, ज्यामुळे राहुल द्रविडवर परस्पर हितसंबंध जपल्याचा ठपका आहे.
 • याआधीही संजीव गुप्ता यांनी सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्याविरोधात तक्रार केली होती.
 • बीसीसीआयमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांनुसार, माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे अध्य क्षपदाची सुत्र हाती आली आहेत.
 • त्यामुळे भविष्यकाळात या प्रकरणात नेमका काय निर्णय घेतला जातोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
1 Nov Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »