22 July Current Affairs

22 July Current Affairs
22 July Current Affairs

भात पेंढ्यापासून इथेनॉलनिर्मितीचा पहिला प्रकल्प विदर्भात

केंद्र शासनाच्या इथेनॉलनिर्मितीच्या धोरणाला अनुसरून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ही शासन अंगीकृत संस्था भाताच्या पेंढ्यापासून इथेनॉलनिर्मिती प्रकल्प उभारण्याची तयारी करीत आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून, भातासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे तो उभारला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे 1,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 700 टन जैव इंधन तयार करण्याचा हा प्रकल्प एक वर्षामध्ये कार्यान्वित होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. भारतामध्ये कच्च्या तेलाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थाच्या आयातीसाठी देशाच्या तिजोरीवर परकीय चलनाचा मोठा ताण पडतो आहे. हा ताण कमी करून इंधनाच्या पातळीवर स्वयंपूर्ण होण्याकरिता भारत सरकारने सौरऊर्जा, इथेनॉलनिर्मिती आणि वीज या तीन ऊर्जास्रोतांवर अधिक भर दिला आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच महाराष्ट्रात साखर  उद्योगाला इथेनॉलकडे वळण्याचा सल्ला देताना, यापुढे साखर उद्योगाला सवलती मिळणार नाहीत, असे खडे बोल सुनावले होते.

केंद्रीय नीती आयोगाने विजेवर चालणार्‍या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखताना, 2024 पर्यंत राजधानी दिल्लीत 25 टक्के विजेवर चालणारी वाहने रस्त्यावर धावतील, असे नियोजन केले आहे. तर बहुतेक वाहन उद्योगांनी डिझेलवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती बंद करण्याकडे आपली पावले वळविली आहेत.

46 हेक्टर जमिनीवर उभा राहणार प्रकल्प

विदर्भातील भंडारा जिल्ह्यात मकरधोकडा या गावाच्या हद्दीमध्ये 46 हेक्टर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या परिसरात राज्य शासनाच्या मालकीची 146 हेक्टर जमीन आहे. ही जमीन औद्योगिक कारणासाठी उपयोगात आणण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडे जमीन वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जमिनीपैकी 46 हेक्टर जमीन ‘बीपीसीएल’कडे वर्ग करण्यात येईल. तेथे पर्यावरणाला धोका विषयीचा ‘ना हरकत’ दाखला उपलब्ध केल्यानंतर ‘बीपीसीएल’ इथेनॉल बायोरिफायनरी प्रकल्पाची उभारणी करणार आहे. 100 हेक्टर जागेवर अनुषंगिक उद्योग उभारण्याचे नियोजन आहे.विदर्भामध्ये भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकापासून दोन जिल्ह्यांत अनुक्रमे 3.62 लाख व 3.87 लाख मेट्रिक टन भाताचा पेंढा तयार होतो. या पेंढ्यापासून आता इथेनॉल बनवले जाणार आहे. भंडारा येथे उभारण्यात येणार्‍या ‘बीपीसीएल’च्या पहिल्या प्रकल्पाला दरवर्षी 2 लाख मेट्रिक टन भाताच्या पेंढ्याची गरज आहे. यामुळे प्रकल्पाला कच्च्या मालाची कोणतीही कमतरता भासणार नाही. याउलट प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासही मोठा वाव आहे.

भात उत्पादक शेतकर्‍यांंना होणार फायदा

भाताच्या पेंढ्याला चांगला दर मिळाल्याने भात उत्पादकांना फायदा मिळेल. शिवाय, भाताचा पेंढा गोळा करणे, तो विशिष्ट आकारात कापणे, सुकवणे या कामासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 10 हजार लोकांना नवे रोजगार उपलब्ध होऊ शकतील, असे यामागे नियोजन आहे.

 

आर्थिक मदत मिळण्याचे इम्रान यांच्यापुढे आव्हान

अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंध फारसे चांगले नसताना पंतप्रधान इम्रान खान यांचे येथे आगमन झाले असून या दौऱ्यात ते सोमवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.  द्विपक्षीय संबंधांना ऊर्जितावस्था देण्याचे आव्हान इम्रान यांच्यापुढे आहे. अमेरिकी अध्यक्षांनी वेळोवेळी पाकिस्तानवर टीका करून त्यांची आर्थिक मदत  बंद केली होती.

इम्रान खान (वय ६६) हे सोमवारी व्हाइट हाऊस येथे ट्रम्प यांना भेटणार असून त्यात ट्रम्प हे त्यांना चार शब्द सुनावण्याची शक्यता अधिक आहे. पाकिस्तानी  भूमीतून काम करणाऱ्या दहशतवादी गटांवर निर्णायक तसेच शाश्वत कारवाई करण्याचा आग्रह ट्रम्प धरतील असे सांगण्यात येते.

यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये शेवटचा अधिकृत अमेरिका दौरा केला होता. इम्रान खान हे तीन दिवस अमेरिकेत राहणार असून  ते ट्रम्प यांच्याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे हंगामी प्रमुख डेव्हिड लिप्टन, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास व परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेणार आहेत.

ट्रम्प यांच्याशी इमरान यांची ओव्हल ऑफिस येथे समोरासमोर चर्चा होणार असून सोमवारी व्हाइट हाऊस येथे पाकिस्तानी शिष्टमंडळासाठी दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनाही इम्रान भेटणार आहेत. इम्रान यांच्या समवेत लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा व आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद हे आहेत. अफगाण शांतता प्रक्रिया, दहशतवाद्यांना अर्थपुरवठा व पाकिस्तानला लष्करी मदत पुन्हा सुरू करण्याची पाकिस्तानची मागणी हे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तालिबान व अमेरिका यांच्यातील चर्चा निर्णायक टप्प्यात असताना ही भेट होत आहे. पाकिस्तानी दबावगट स्थापण्यासाठी एका आस्थापनेशी करारही करण्यात आला आहे.

सिंधच्या मुद्दय़ावर मोहीम

इम्रान खान यांच्याशी भेटीवेळी अध्यक्ष ट्रम्प यांनी सिंध प्रांतातील मानवी हक्क उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करावा अशी मागणी करण्यात आली आहे, त्यासाठी मोबाईल फलकांच्या मदतीने मोहीम राबवण्यात आली. अमेरिकेतील १० काँग्रेस सदस्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना सिंधचा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे. सिंधच्या मुद्दय़ावर इम्रान खान यांच्या दौऱ्यात व्हाइट हाऊस व कॅपिटॉल हील भागात निदर्शने केली जाणार आहेत.

अमेरिकी अधिकाऱ्यांची अनुपस्थिती?

इम्रान खान यांचे अमेरिकेत डलास आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले तेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी व पाकिस्तानी अमेरिकी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. कुरेशी हे आधीच अमेरिकेत गेले आहेत. यावेळी अमेरिकी अधिकारी उपस्थित नसल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमांत रंगली आहे.

 

22 July Current Affairs
22 July Current Affairs

तृतीयपंथीयांनी मिळवली राजकीय ओळख

तब्बल १९ वर्षांपूर्वी शबनम मौसींच्या रूपाने देशातील पहिली तृतीयपंथी आमदार मध्य प्रदेशातील सोहागपूरमधून निवडून आल्यानंतरही राजकारणात तृतीयपंथींयांचा वावर अपेक्षेइतका वाढला नाही. मात्र, तृतीयपंथीयांना कायद्याने स्वतंत्र ओळख आणि समलिंगी संबंधांना गुन्ह्याच्या कक्षेतून वगळणं हे दोन महत्त्वाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या समुदायामधील राजकीय सक्रियता वाढली आहे. शिवाय राजकीय पक्षांनीही त्यांच्यातील नेतृत्वगुणांची दखल घेऊन त्यांच्या महत्त्वाच्या पदांवर नेमणुकाही केल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथीयांचा राजकीय सहभाग वाढलेला दिसला. २०१९च्या निवडणुकीत एकूण ४१हजार २९२ तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. गेल्या निवडणुकीतील आकडेवारीपेक्षा ही वाढ सुमारे ४५ टक्के आहे. महाराष्ट्रात हा आकडा दोन हजारांच्या आसपास होता. अर्थात तृतीयपंथीयांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे.

यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान काही तृतीयपंथी नेत्यांची नावे ठळकपणे समोर आली. त्यात बहुजन वंचित आघाडीने दिशा शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रिया पाटील या दोघींची त्यांच्या पक्षांच्या प्रवक्त्या म्हणून नेमणूक केली. राज्यात हे प्रथमच घडले. हे राजकीय प्रतिनिधित्व स्वागतार्ह असले तरी हे पद केवळ प्रतीकात्मक ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त करून राजकीय पटलावर तृतीयपंथीयांना आपला ठसा उमटवण्यासाठी आणखी संघर्ष करावा लागेल, याची जाणीव असल्याचे सांगत निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग नाही, तोवर समुदायासाठी काही धोरणे ठरवणे अथवा निर्णय घेणे अवघड असल्याचे मत दोघींनी व्यक्त केले. केवळ तृतीयपंथीयच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिनिधी म्हणून आम्हाला ओळख मिळवायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिशा शेख या निवडणुकीदरम्यान अनेक जाहीर सभांमध्ये बोलल्या. एका वृत्तवाहिनीने त्यांना चर्चेसाठी बोलावले. पण पक्षाची प्रवक्ती म्हणून दिशा येत असल्याचे कळताच ऐनवेळी त्यांचे नाव वगळले गेले. त्यावर समाजमाध्यमांवर प्रचंड टीकाही झाली. दिशा यावर संताप व्यक्त करतात. 'तृतीयपंथी आहोत म्हणून केवळ तृतीयपंथीयांच्याच प्रश्नांविषयी बोलावे, ही अपेक्षा अन्यायकारक आहे. नुकताच अर्थसंकल्प मांडला गेला. कुणालाही तृतीयपंथीयांना याबाबत काय वाटते, हे विचारण्याची तसदी घेतली नाही,' अशी खंत त्या व्यक्त करतात.

'राजकीय पक्षांनी नेमणूक केलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र पक्षकार्यकर्त्यांमध्येही तृतीयपंथीयांविषयी संवेदनशीलता असल्याचे दिसत नाही. एक तृतीयपंथी कार्यकर्त्यांना काही सूचना देतो, विषय मांडतो हे अद्याप फारसे पचनी पडत नाही,' असे निरीक्षण मांडताना 'पक्षांनी प्रवक्तेपदासारखी पदे दिली याचे स्वागत आहेच पण प्रत्यक्ष निवणुकांचे तिकीट देणे कितपत साध्य होते,' हे पाहणे औत्सुक्याचे ठरावे, असे दिशा सांगतात.

प्रिया पाटील यांनी तर २०२२ ची महापालिकेची निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी प्रिया यांचा १०० दिवसांचा राजकीय दौरा आखला आहे. यातून महाराष्ट्रातील सर्व भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतील, स्थानिक प्रश्न समजून घेता येतील आणि तृतीयपंथी समुदायाशी संवाद साधता येईल, असे प्रिया यांना वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रिया सांगतात.

विधेयकाची प्रतीक्षा

देशात ऐतिहासिक ठरेल, अशा तृतीयपंथी विधेयकाच्या मसुद्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. या आठवड्यात ते लोकसभेत चर्चेला येईल. जुन्या मसुद्यात काही सुधारण करून ते येत्या आठवड्यात लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. तृतीयपंथीयांना भीक मागण्यास भाग पाडणाऱ्यांना शिक्षेची तरतूद अशी सुधारणा विधेयकात असल्याची चर्चा आहे. याला तृतीयपंथी समुदायाचा प्रचंड विरोध आहे. आमच्या रोजगाराची काहीही पर्यायी व्यवस्था नसताना भीक मागण्याबाबत बोलण्याचा सरकारलाअधिकार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर समुदायातील गुरूशिष्य परंपरेलाही ते धक्का देणारे असल्याचा दावा ते करतात. तृतीयपंथीयाचे लैंगिक शोषण झालं तर सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतच शिक्षेची तरतूद आहे. मात्र, महिला अथवा पुरुषावर बलात्कार झाला तर सात ते दहा वर्षे शिक्षा आहे. शिक्षेमध्ये भेदभाव असू नये, ही सुधारणाही नव्या विधेयकात असावी, अशी या नेत्यांची अपेक्षा आहे.

कल्याणकारी मंडळाचे भिजत घोंगडे

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र महामंडळाचा शासन निर्णय ६ सप्टेंबर २०१४ला आला. तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधींनी अनेकदा पाठपुरावा केला, पत्रव्यवहार झाला. पण काहीही घडले नाही. सामाजिक न्याय मंत्र्यांनी तर पंधरा दिवसांत मंडळ स्थापन करण्याचा केलेला वायदाही हवेतच विरला. आता पुढची विधानसभा निवडणूक आली, मंडळ मात्र कागदावरच राहिले आहे.

 

जेतेपदाची हुलकावणीच

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला यंदाच्या मोसमातील जेतेपदाचा दुष्काळ अद्याप संपवता आलेला नाही. हजार गुणांच्या इन्डोनेशिया ओपन स्पर्धेतही सिंधूला रविवारी जेतेपद पटकावता आले नाही. तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जेतेपदाच्या लढतीत जपानच्या चौथ्या सीडेड अकेन यामागुचीने पाचव्या सीडेड सिंधूवर २१-१५, २१-१६ अशी ५१ मिनिटांत सरळ गेममध्ये मात केली.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने याआधी यामागुचीविरुद्धच्या १४ लढतींपैकी १० लढती जिंकल्या होत्या; पण या रविवारी यामागुचीचा आक्रमक आणि अष्टपैलू खेळ सिंधूला निरुत्तर करून गेला. तसे असले तरी जागतिक रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावरील पीव्ही सिंधूची ही यंदाच्या बॅडमिंटन मोसमातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल. कारण याआधीच्या स्पर्धांमध्ये तिला अंतिम फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती. सिंगापूर आणि इंडिया ओपन या स्पर्धांच्या उपांत्य फेरीपर्यंत मारलेली मजल ही तिची सर्वोत्तम कामगिरी होती.

यामागुचीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. ज्यामुळे लढतीच्या सुरुवातीच्याच पहिल्या दोन रॅलीज अनुक्रमे २७ आणि ३१ शॉट्सच्या होत्या. सिंधूने तरीदेखील यामागुचीला 'उत्तर' देत सिंधूने पहिल्या गेमच्या मध्यंतराला ११-८ अशी आघाडी मिळवली होती. पुढे ही आघाडी १२-८ अशी करण्यात सिंधूने यश मिळवले खरे; पण यामागुचीने संयम न गमावता, खेळातील वेग आणि चपळता वाढवत पहिल्या गेमच्या उत्तरार्धावर वर्चस्व मिळवले. पुढील १६ पैकी १३ गेम यामागुचीने जिंकले, यावरूनच तिने आपल्या पूर्वार्धातील चुकांमधून धडे घेतलेल्याचे दिसते. चौथ्या सीडेड यामागुचीने दुसऱ्या सेटमध्ये मात्र पहिल्यापासूनच आक्रमणावर भर दिला. सिंधूने तिथेही ४-४ अशी बरोबरी साधली; पण यामागुचीने सिंधूची आघाडी कमी होणार नाही याची खबरदारी घेतली.

सिंधूवर 'बॉडी स्मॅशेस'चा भडिमार केला. यामुळे सिंधू हतबल ठरली. सिंधूला बॅकहँडचा सढळ वापर करता येणार नाही, याची खबरदारीही यामागुचीने घेतली. सिंधूचे लक्ष आता पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन स्पर्धेवर असेल.

यामागुची विरुद्धच्या आतापर्यंतच्या पंधरा लढतींमधील सिंधूचा हा पाचवा पराभव ठरला. गेल्यावर्षी ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंधूला यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर सिंधूने यामागुचीला वरचढ ठरण्याची संधी दिली नव्हती. त्यानंतरच्या या दोघींमधील चारही लढती सिंधूनेच जिंकल्या होत्या; पण रविवारी तिला यामागुचीला नमवणे जमले नाही.

उपविजेतेपदाचा सिलसिला:-

सिंधूला जेतेपदाने हुलकावणी देण्याचा सिलसिला इन्डोनेशिया स्पर्धेच्या निमित्ताने सुरूच राहिला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियाड, राष्ट्रकुल, थायलंड स्पर्धा, इंडियन स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये सिंधू उपविजेती ठरली आहे. तर यामागुचीचे हे यंदाच्या मोसमातील तिसरे जेतेपद ठरले आहे. तिने इन्डोनेशिया स्पर्धेआधी जर्मन आणि आशियाई चॅम्पियनशिप जिंकली आहे.

पहिल्या गेममधील चुका नडल्या:-

जकार्ताः यंदाच्या मोसमातील आपले पहिले जेतेपद पटकावण्यात रविवारी इन्डोनेशिया ओपन स्पर्धेत अपयश आल्याने सिंधू सहाजिकच निराश झाली आहे. पहिल्या गेममध्ये आघाडी असूनही मोक्याच्या क्षणी चुका केल्याने पराभव पदरी पडल्याचे तिने मान्य केले. सात महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबरमध्ये सिंधूने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचे जेतेपद पटकावत इतिहास घडवला होता. त्यानंतर तिला जेतेपद पटकावता आले नाही. 'लढतीत प्रदीर्घ रॅलीज झाल्या. पहिल्या गेममध्ये १२-८ अशी आघाडी असतानाही मी खूपच चुका केल्या. ज्या सहाजिकच अंगलट आल्या. तो पहिला गेम जिंकला असता, तर फायनला निकाल कदाचीत वेगळा दिसला अशता. दुसऱ्या गेममध्ये मी तुला आघाडी घेण्याची संधी दिली अन् नंतर तिला गाठणे मला कठीण होऊन बसले होते', असे सिंधू म्हणाली.

पहिल्या गेममध्ये आघाडी गमावल्यानंतर लगेचच सावरत कूच करायला हवी होती, असे सिंधूला वाटते आहे.

ऑलिम्पिकचा दृष्टिकोन

सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले. त्यानंतर महिला बॅडमिंटनमध्ये खेळाडूंच्या बाबतीत बरेच बदल झाल्याचे सिंधूला वाटते आहे. 'तेव्हाच्या तुलनेत आता खूप फरक पडला आहे. तेव्हाच्या काही खेळाडू आताही आहेत; पण नव्या महिला बॅडमिंटनपटूही उदयाला आल्या आहेत. ज्यात चिनी खेळाडूंचाही समावेश आहे. खेळही बदलला आहे. आता रॅलीजचा खेळ जास्त होतो, त्यामुळे संयम राखावा लागतो. आता रँकिंगमध्ये पिछाडीवर असलेल्या खेळाडूंबाबत अधिक सजग असावे लागते. आता कुणीही कुणाला हरवू शकते', असे सिंधू म्हणाली.

22 July Current Affairs

नवीन पाणबुड्यांना ब्रह्मोस चे कवच

नौदलाच्या ताफ्यात सहा अत्याधुनिक पाणबुड्या येणार आहेत. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. या पाणबुड्या 'ब्रह्मोस' या अत्याधुनिक क्षेपणास्त्राने सज्ज असतील. मुख्य म्हणजे, या क्षेपणास्त्राची समुद्राखालील चाचणीही झाली आहे.

'ब्रह्मोस' हे आवाजापेक्षा अधिक वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र भारत व रशिया संयुक्तपणे विकसित करीत आहे. त्यासाठी डीआरडीओअंतर्गत ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड या संयुक्त कंपनीची स्थापना झाली आहे. ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेडने आजवर जमिनीवरून जमिनीवर, आकाशातून जमिनीवर (सुखोईमधून) व समुद्राच्या पृष्ठभागावरून पृष्ठभागावर हल्ला करता येणारे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. आता समुद्राच्या आतून अर्थात पाण्याखालून मारा करता येणारे ब्रह्मोसही शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र नवीन पाणबुड्यांवर बसविण्याची योजना आहे.

नौदलाच्या ताफ्यातील जुन्या १३ पैकी पाच पाणबुड्यांची आता मोठी दुरुस्ती सुरू होणार आहे, तर एका पाणबुडीची दुरुस्ती सुरू झाली आहे. यामुळे निम्म्याहून अधिक पाणबुड्या पुढील किमान आठ ते दहा वर्षे ताफ्यात नसतील. त्या पार्श्वभूमीवर सहा पाणबुड्या खरेदी करणे किंवा परदेशी कंपनीच्या सहकार्याने त्या देशातच तयार करण्यासंबंधी संरक्षण मंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. या नवीन पाणबुड्या 'ब्रह्मोस'ने सज्ज करता याव्यात, यासाठीच ही चाचणी झाली. या पाणबुड्या तयार होण्यास किमान चार ते सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यादरम्यान समुद्राखालून मारा होणाऱ्या या ब्रह्मोसच्या आणखी चाचण्या घेतल्या जातील. एकूणच २०२४ पर्यंत हे क्षेपणास्त्र ताफ्यात आणण्याची योजना आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र आतापर्यंत प्रामुख्याने नौदल, भूदल व हवाई दल यांना वापरता येण्यासाठी अशा तीन श्रेणीत तयार झाले आहे. यापैकी नौदलाकडे असलेले समुद्री पृष्ठभागावरून डागता येणारे क्षेपणास्त्रच पाणबुडीसाठी वापरले जाणार आहे. त्याचीच चाचणी झाली आहे. ब्रह्मोस या क्रुझ श्रेणीतील क्षेपणास्त्राची अशी पाण्याखालील चाचणी करणारा भारत हा पहिलाच देश आहे. त्यामुळेच हे एक मोठे यश आहे.

पाणबुडीवरून डागता येणारे 'ब्रह्मोस'

वजन : २,५०० ते ३ हजार किलो

वेग : २.८ मॅक (ताशी ३,४०० किमी)

मारक क्षमता : ४५० किमी

डागण्याचा प्रकार : उभ्या पद्धतीने

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »