25 Sep Current Affairs

25 Sep Current Affairs
25 Sep Current Affairs

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ग्लोबल गोलकीपर्स पुरस्काराने सन्मान

 • भारतात यशस्वीरित्या स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन’च्या प्रतिष्ठित अशा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
 • फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. दरम्यान, ज्या लोकांना हे अभियान जनआंदोलनात बदलले त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
 • “या अभियानाचा सर्वाधिक फायदा देशातील गरीब आणि महिला वर्गाला मिळाला आहे. भारत या विश्वाला आपलं कुटुंब मानतो. त्यामुळे या अभियानात भारताने दिलेल्या योगदानामुळे मला आनंद होत आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले.
 • “वसुधैव कुटुंबकम् अशी शिकवण आम्हाला हजारो वर्षांपासून देण्यात आली आहे. आम्ही स्वच्छतेच्या दृष्टीने जे लक्ष्य ठेवले आहे त्याच्या आम्ही जवळ पोहोचत आहोत. याव्यतिरिक्तही भारत अन्य अभियान राबवत आहे.
 • फिट इंडिया मुव्हमेंटद्वारे फिटनेस आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरला आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करत आहोत. जल जीवन अभियानाअंतर्गत पाणी वाचवण्यावर आणि त्याच्या पुनर्वापरावरही आम्ही काम करत आहोत.
 • भारत २०२२ पर्यंत एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त होण्यासाठीही अभियान राबवत आहे. आज जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधत आहे, त्याचवेळी भारताच्या अनेक भागांमध्ये प्लास्टिक गोळा करण्याचं काम सुरू आहे. मला माझ्या देशवासीयांवर पूर्ण विश्वास आहे, स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच हाती घेतलेली इतर कामंही यशस्वीरित्या पूर्ण होतील.
 • महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचे जे स्वप्न पाहिले होते, ते आज पूर्ण होताना दिसत आहे. जेव्हा एखादं गाव स्वच्छ असेल तेव्हाच ते आदर्श गावाच्या रूपात सर्वासमोर येऊ शकतं, असं गांधी म्हणत होते. आम्ही आदर्श देशच घडवण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करत आहोत.

पाककडून स्फोटके बंदुका पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर

 • जम्मू काश्मीरातून कलम 370 आणि 35 ए हटवल्यापासून पाकिस्तानकडून काश्मीरसह भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरात सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे केले जात आहे.
 • त्यात आता पंजाबामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत पाकिस्तानमधून तब्बल 80 किलो दारूगोळा, एके-47, बनावट नोटा आदी साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पाकिस्तानमधून मालवाहू ड्रोनच्या मदतीने हा शस्त्रसाठा पुरवण्यात आला आहे.
 • जम्मू काश्मीर प्रश्नांवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानकडून भारतात आत्मघाती हल्ले करण्याचे प्रयत्न केले जात आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनीही यासंदर्भात सुरक्षा यंत्रणांना सर्तक केले आहे.
 • गेल्या महिनाभरापासून पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराला चिथावणी देण्याचाही प्रयत्न होत आहे. या सगळ्या घडामोडी होत असतानाच पंजाबमध्ये पाक सीमेलगत असलेल्या तरनतारण आणि अमृतसर जिल्ह्यांमध्ये बनावट चलनासह प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
 • अमृतसर आणि तरनतारण जिल्ह्यात 9 ते 16 सप्टेंबर करण्यात आलेल्या कारवाईत 80 किलो दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या आयएसआयशी (आंतर-राज्य गुप्त यंत्रणा) संलग्नित असलेल्या खलिस्तान जिंदाबाद गटाने शस्त्रसाठा पुरवण्याचा कट पोलिसांनी 22 सप्टेंबर रोजी उधळून लावला. यात पाच एके-47 बंदूक, 16 दारूगोळे, नऊ हातबॉम्ब, पाच सॅटेलाईट फोन, दोन मोबाईल, दहा लाख किंमत असलेले बनावट चलनी नोटा यासह साहित्य जप्त केलं आहे.
 • विशेष म्हणजे जड माल घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या ड्रोनच्या मदतीने हे साहित्य पाकिस्तानातून पाठवण्यात आले आहे. हे ड्रोनही पाकिस्तानी आहेत.
 • खलिस्तान जिंदाबाद गटाकडून स्वतंत्र खलिस्तान प्रांताच्या मागणीसाठी पंजाबमध्ये आत्मघाती हल्ले करण्यासाठी हा शस्त्रसाठा आला होता, असा प्राथमिक चौकशीतून दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यातील काही साठा जम्मू काश्मीरमध्येही घातपात करण्यासाठी पाठवण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्याकडे मागितली मदत:-

 • आठ दिवसांत दहा फेऱ्यांमधून 80 किलो शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं या घटनांकडे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात सिंग यांनी ट्विट केलं असून, “कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहे. अलीकडेच पाकिस्तानी ड्रोनने मोठा शस्त्र आणि दारूगोळा पंजाबात आला आहे. हे धोकादायक असून, याची दखल घ्यावी.
25 Sep Current Affairs
25 Sep Current Affairs

पाकव्याप्त काश्मीरमध्ये शक्तीशाली भूकंप उत्तर भारतात जाणवले धक्के

 • राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील विविध भागात मंगळवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचे एका खासगी भूकंप निरिक्षण एजन्सीने स्पष्ट केले आहे.
 • ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही स्वरुपाच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.
 • आज (मंगळवारी) संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास नवी दिल्ली, चंदीगड, काश्मीर तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह खैबर पख्तून प्रांतासह काही शहरांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपीअन मेडिटेरनीन सिस्मोलॉजिकल सेंटरने याची माहिती दिली आहे.
 • पाकिस्तानच्या लाहोर प्रांतापासून उत्तर पश्चिम भागात १७३ किमी अंतरावर पीओकेत या भूकंपाचे केंद्र असल्याचे या एजन्सीने म्हटले आहे.

पीएमसी बँकेवर आरबीआय चे निर्बंध केवळ एक हजार रुपयेच काढता येणार

 • मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहून ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
 • बँकिंग नियमन कायदा ’35 अ’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तसेच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील.
 • रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, किंवा बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नयेत, अशाप्रकारचे निर्बंध बँकेवर असतील असं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 • हे निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. या निर्बंधांची माहिती बँकेने प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलीये.
 • दरम्यान, आरबीआयने निर्बंध लादल्याचं समजल्यापासून पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील पीएमसी बँकेच्या शाखेसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
 • दुसरीकडे, बँकेची सद्यस्थिती पाहता ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होते.
25 Sep Current Affairs
25 Sep Current Affairs

लिओनेल मेसीच सर्वोत्तम

 • ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारावर कारकीर्दीत प्रथमच मोहोर
 • विश्वातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जेटिनाच्या लिओनेल मेसीने प्रथमच ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर नाव कोरले.
 • महिलांमध्ये विश्वविजेत्या अमेरिकेच्या मेगान रॅपिनोने सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
 • ला स्काला ओपेरा हाऊस, इटली येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात मेसीने यंदाच्या चॅम्पियन्स लीगमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या लिव्हरपूलच्या व्हर्गिल व्हॅन डिकवर सरशी साधून अव्वल क्रमांक मिळवला. युव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तो या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.
 • २०१६पासून सुरू झालेल्या ‘फिफा’च्या पुरस्कारांवर दोन वेळा रोनाल्डोने (२०१६ व २०१७), तर एकदा क्रोएशियाच्या लुका मॉड्रिचने (२०१८) वर्चस्व गाजवले आहे. परंतु एकंदर कारकीर्दीतील विविध पुरस्कारांमध्ये मेसीने सहाव्यांदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला.
 • ३२ वर्षीय मेसीने काही महिन्यांपूर्वी बार्सिलोनाला सातव्यांदा ला लीगाचे विजेतेपद मिळवून देण्यात, तसेच चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीपर्यंत संघाला पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मेसीनेच यंदाच्या चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक १२ गोलसुद्धा नोंदवले होते. तसेच मेसीने या वर्षीच्या हंगामात अर्जेटिना आणि बार्सिलोनासाठी एकूण ५८ सामने खेळताना ५४ गोल केले. रोनाल्डो या यादीत ४७ सामन्यांतून ३१ गोलसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता वर्षांच्या अखेरीस देण्यात येणारा ‘बलोन डीऑर’ पुरस्कार कोण काबीज करणार, याकडे सर्व फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.
 • महिलांमध्ये ३४ वर्षीय मेगान अमेरिकेच्याच अ‍ॅलेक्स मॉर्गन आणि इंग्लंडची लुसी ब्राँज यांना मागे टाकून सर्वोत्तम ठरली. जुलैमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेने जगज्जेतेपद मिळवले होते. त्या स्पर्धेत मेगानने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवण्याबरोबरच विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही प्रस्थापित केला होता.
 • ‘फिफा’च्या संघाचे नेतृत्व अ‍ॅलिसनकडे : ब्राझिल आणि लिव्हरपूलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अ‍ॅलिसन बेकरचा ‘फिफा’ने दुहेरी सन्मान केला. वर्षांतील सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळवण्याबरोबरच २०१८-१९या वर्षांतील पुरुषांच्या सर्वोत्तम संघाचे नेतृत्वही अ‍ॅलिसनकडे सोपवण्यात आले आहे. मेसी, रोनाल्डो, व्हॅन डिक यांसारख्या नामांकितांना या संघात स्थान मिळाले असले तरी लिव्हरपूलच्या मोहम्मद सलाहला या संघातून वगळण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 • लिव्हरपूलला तब्बल १४ वर्षांनंतर चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक जर्गेन क्लोप यांना ‘फिफा’ने वर्षांतील सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्काराने गौरवले. महिलांमध्ये अमेरिकेला जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या जिल एलिस या सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

फिफा’चा संघ

 • गोलरक्षक आणि कर्णधार : अ‍ॅलिसन बेकर
 • बचावपटू : मॅथिग्स डीलेट, सर्जिओ रामोस, व्हर्गिल व्हॅन डिक, मार्सेलो
 • मध्यफळी : लुका मॉड्रिच, फ्रँक डीजाँग, एडन हझार्ड
 • आक्रमणपटू : लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, किलियान एम्बापे
 • क्लोप, एलिस सर्वोत्तम प्रशिक्षक


१५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत जे नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो. आजचा दिवस माझ्यासाठी फार खास आहे. या पुरस्कारामुळे देशासाठी आणि बार्सिलोनासाठी अधिकाधिक गोल करण्याची मला प्रेरणा मिळेल.
– लिओनेल मेसी

 

किम ह्युन यांचा राजीनामा

 • भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या कोरियाच्या किम जी ह्य़ुन यांनी मंगळवारी महिला एकेरीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
 • पती रिची मेर यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने ४५ वर्षीय किम तातडीने न्यूझीलंडला रवाना झाल्या असून त्यांच्या भारतात लवकर परतण्याच्या आशा कमीच आहेत. त्यामुळे आता २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकला वर्षभराहून कमी अवधी शिल्लक असताना किम यांनी राजीनामा दिल्यामुळे भारताच्या संघ व्यवस्थापनाला आता नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी झटावे लागणार आहे.
 • भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे (बीएआय) किम यांची या वर्षीच फेब्रुवारीत भारताच्या महिला खेळाडूंसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले.
 • ‘‘पतीच्या आजारपणामुळे किम यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त खरे आहे. जागतिक स्पर्धेदरम्यान रिची यांना हृदयविकाराचा झटका बसला होता. परंतु त्या वेळी व्यस्त असल्यामुळे किम यांना पतीची देखभाल करण्यासाठी जाता आले नाही. मात्र आता त्या किमान चार ते सहा महिने तरी न्यूझीलंडलाच राहणार असून पतीची तब्येत पूर्णपणे सुधारल्यानंतरच त्या भविष्यातील योजनेविषयी निर्णय घेतील,’’ असे भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणाले.
 • जगज्जेत्या सिंधूनेसुद्धा तिच्या भावना व्यक्त करताना रिची यांच्या तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘‘किम यांच्याशी माझे घट्ट नाते होते. त्यांच्या अशा अर्धवटच माघारी जाण्याने मला फार दु:ख होते आहे. परंतु मी त्यांच्या पतीला लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा देते,’’ असे सिंधू म्हणाली. परंतु खेळाडूच्या कारकीर्दीचा हा भाग असून नव्या प्रशिक्षकासह नव्याने सुरुवात करण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही सिंधूने सांगितले.
 • किम यांच्या अनुपस्थितीत पुरुष एकेरीचे प्रशिक्षक पार्ट ते संग यांचे मार्गदर्शन सिंधू घेईल, असे तिचे वडील पी. व्ही. रामण यांनी सांगितले.
 • ३ कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच राजीनामा देणाऱ्या किम या भारताच्या तिसऱ्या विदेशी प्रशिक्षका ठरल्या आहेत. यापूर्वी इंडोनेशियाच्या मुल्यो हंडोयो (२०१७) आणि मलेशियाचे टॅन किम हर (२०१८) यांनी अर्धवटच प्रशिक्षकपद सोडले होते.
 • किम यांच्याकडून अधिकृत राजीनामापत्र मिळालेले नाही!
 • कोरियाच्या किम यांनी भारताच्या महिला एकेरीच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असला तरी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी किम यांच्याकडून अद्याप अधिकृत राजीनामापत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे.
 • ‘‘किम यांच्या पतीची तब्येत बिघडली असल्याचे आम्हाला ठाऊक आहे; परंतु तूर्तास तरी संघटनेला अथवा भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) त्यांचे राजीनामापत्र मिळालेले नाही. अथवा यासंबंधी एखादे पत्र किंवा पूर्वकल्पनाही संघटनेला देण्यात आली नव्हती,’’ असे सिंघानिया म्हणाले. परंतु ऑलिम्पिकला अद्याप १० महिने शिल्लक असल्याने आम्ही किमशी संवाद कायम राखणार असून त्यांना लवकरात लवकर पुन्हा प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठीही विनंती करणार आहोत, असेही सिंघानिया यांनी सांगितले. २४ जुलैपासून टोक्यो ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे.
25 Sep Current Affairs
25 Sep Current Affairs

आशियाई वयोगट जलतरण स्पर्धा भारताच्या संघाला रीलेमध्ये सुवर्ण

 • आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी ४ बाय १०० मीटर पुरुषांच्या फ्रीस्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले.
 • भारतीय संघाने ३:२३.७२ सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणाऱ्या इराणच्या संघाने ३:२८.४६ सेकंद अशी वेळ नोंदवली, तर तिसऱ्या स्थानावरील उझबेकिस्तानच्या संघाने ३:३०.५९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.
 • भारताच्या आव्हानाला सुरुवात श्रीहरीने करताना ५०.६८ सेकंदांसह पहिला टप्पा पूर्ण केला. इराणचा सिना घोलमपौरला ५१.४२ सेकंद लागले. मग आनंदने आघाडी कायम राखताना ५१.२८ सेकंदांत अंतर पूर्ण केले, तर तिसऱ्या टप्प्यात साजनने ५१.३७ सेकंद अशी वेळ नोंदवली. अखेरच्या टप्प्यात वीरधवलने ५०.३९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.
 • महिलांच्या ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रुजूता खाडे (५९.८३ सेकंद), दिव्या सतिजा (१:०१.६१ सेकंद), शिवानी कटारिया (५९.५७ सेकंद) आणि माना पटेल (५९.७५ सेकंद) यांचा भारतीय संघात समावेश होता.
 • गट-दोन मुलांच्यांमध्येसुद्धा भारतीय संघाला ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात रौप्यपदक मिळले. वेदांत माधवन, उत्कर्ष पाटील, साहिल लष्कर आणि शोआन गांगुली यांचा समावेश असलेल्या संघाने ३:४१.४९ सेकंद अशी वेळ नोंदवली.

कुशाग्रला दुहेरी सुवर्ण:-

 • भारताच्या कुशाग्र रावतने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या २०० मीटर प्रकारात रावतने १:५२.३० सेकंदांनिशी सुवर्णपदक जिंकले, तर आनंद अनिलकुमारने १:५२.१९ सेकंदांसह कांस्यपदक पटकावले. सिरियाच्या अब्बास ओमरला कांस्यपदक मिळाले. मग ८०० मीटर स्पर्धेत त्याने ८:१०.०५ सेकंदांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.

भौगोलिक मानांकनासाठी जांभूळआख्यान

बहाडोलीच्या प्रसिद्ध जांभूळ फळ संवर्धनासाठी कृषी विभागाचा पुढाकार:-

 • पालघर तालुक्यातील बहाडोली गावामधील टपोरी जांभळांना भौगोलिक मानांकन मिळविण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशील आहे. हे मानांकन मिळाल्यास हा जांभूळ एकमेवाद्वितीय असल्याची पावती त्याला मिळेल, यासाठी येथील जांभूळ उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळेल, असे कृषी पर्यवेक्षक जगदीश पाटील यांनी बहाडोली या जांभूळ गावात सांगितले.
 • कृषी विभागामार्फत बहाडोली ग्रामपंचायत सभागृहात ही जांभूळ संवर्धन मार्गदर्शन सभा अलीकडेच पार पडली. राज्यभरात जांभळासाठी परिचित असलेल्या आणि जांभळांमुळे जांभूळगाव म्हणून सुप्रसिद्ध नाव पडलेल्या बहाडोलीतील टपोरी जांभळाच्या संवर्धनासाठी  कृषी विभागाबरोबरीने शेतकऱ्यांनीही सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 • या शेतकरी मार्गदर्शन बैठकीदरम्यान जांभूळ उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने हजर होते. जांभूळ संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि कृषी विभागाचे सहकार्य आदी बाबतीत यावेळी चर्चा करण्यात आली येथील जांभळाचे उत्पादन चांगल्या प्रतीचे असून अधिकाधिक जांभळाचे उत्पादन घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करावा व या गटाच्या माध्यमातून जांभूळ संवर्धनासाठी जांभळाच्या झाडांची लागवड करावी.  जेणेकरून येत्या काही काळात त्या झाडापासून येथील शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेता येईल. सध्या बाडोली गावात असलेल्या जांभळाच्या झाडाची संख्या ही पाच हजाराच्या सुमारास असून सर्व झाडांना चांगल्या प्रतीची जांभळे येत आहेत.
 • येथील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागामार्फत जांभूळ संवर्धनासाठी शेतीशाळा सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांना एका व्यासपीठावर आणून त्यामार्फत उत्पादन वाढीसाठी आवश्यक ते प्रशिक्षण दर आठवडय़ाला त्यातून देण्यात येणार आहे.

गटशेतीचा उपाय:-

 • कृषी विभाग जांभूळ उत्पादनासाठी जी जुनी झाडे आहेत, त्यांना अधिकाधिक फळ लागण्याच्या दृष्टीने जांभूळ जुन्या झाडांचे नव्याने रोपण करणे, जांभूळ झाड नव्याने लागवड करणे, फवारणी व खतांसाठी अवजारे उपलब्ध करून देणे, फळे काढणीसाठी शिडी अनुदान तत्त्वावर मिळवून देणे, बाजारपेठ उपलब्ध करून जास्तीत जास्त बाजार भाव मिळवून देणे, साठवणूक शीतगृह तयार करून देणे, जांभळापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे, गाव स्तरावरील विविध विभागाकडून योजना राबविण्यासाठी सहकार्य करणे, शेतकरी स्वयंसहायता गट स्थापन करून गटशेतीतून अनुदान मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे अशी कामे कृषी विभाग करणार आहेत.
25 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »