2 August Current Affairs

2 August Current Affairs
2 August Current Affairs

कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत देण्यासाठी पाकिस्ताननं ठेवल्यात या दोन अटी

हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आज भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय वकिलातीतल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना आज जाधव यांना भेट मिळेल, असं वृत्त आहे. मात्र यासाठी पाकिस्ताननं काही अटी घातल्या आहेत. या भेटीवेळी पाकिस्तानी अधिकारीही उपस्थित असतील आणि सर्व भेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साक्षीनं होईल, अशा दोन अटी कुलभूषणपर्यंत पोहचण्यासाठी पाकिस्ताननं भारतासमोर ठेवल्यात.

पण या दोन अटींमुळे कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव तयार करण्याचाही पाकिस्तानचा एक प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडावर स्थगिती आणत जाधव यांना पाकिस्तानने तातडीने राजनैतिक भेटीचा अधिकार द्यावा, असे आदेश दिले होते.
त्यानुसार १७ जुलैला पाकिस्तानने राजनैतिक भेटीचा अधिकार देण्याचं मान्य केलं. मात्र आता अटी लादण्यात आल्यामुळे भारताची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
याबाबत पाकिस्तानकडून प्रस्ताव आला असून त्याला राजनैतिक मार्गानं उत्तर दिलं जाईल, एवढंच भारतीय परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय. 'मी पद्धतीच्या विस्तारीत स्पष्टीकरणावर जाणार नाही. पण आम्हाला पाकिस्तानकडून एक प्रस्ताव मिळालाय आणि आम्ही आयसीजेचा निर्णय समोर ठेवून याचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतोय. राजनैतिक मार्गानं पाकिस्तानसोबत संवाद सुरू राहील' असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्लीत मीडियासमोर म्हटलंय.
 

ओसामापुत्र हमजा ठार अमेरिकेतील प्रसारमाध्यमांचे वृत्त

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा आणि अल-कायदाचा पुढील म्होरक्या हमजा बिन लादेन हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांनी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. मात्र हमजाच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात आहे की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हमजा लादेन ठार झाला असल्याची गोपनीय माहिती अमेरिकेला मिळाली असल्याचे वृत्त एनबीसी न्यूजने अमेरिकेतील तीन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे, मात्र या अधिकाऱ्यांची नावे कळू शकलेली नाहीत. हमजा ठार झाल्याचा पुरावा अमेरिकेला मिळाला असल्याचे एका अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले.
अमेरिकेतील दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने द न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कारवाईत हमजा ठार झाला असून या कारवाईमध्ये अमेरिकेचाही सहभाग आहे. मात्र हमजा नक्की कोठे आणि कधी ठार झाला त्याची माहिती मिळालेली नाही.
याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वार्ताहरांनी विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही अथवा त्याचा इन्कारही केलेला नाही. यावर आपल्याला कोणतेही भाष्य करावयाचे नाही, असे ट्रम्प म्हणाले.
हमजाचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला अमेरिकेने एक लाख डॉलरचे इमान जाहीर केले होते, मात्र त्यापूर्वीच हमजा ठार झाल्याचे सूचित करणारे वृत्त आहे. हमजा हा ओसामाच्या २० मुलांपैकी तिसऱ्या पत्नीचा १५ वा मुलगा असून तो ३० वर्षांचा आहे. ओसामा बिन लादेन याला ठार केल्यानंतर अल-कायदाची सूत्रे त्याच्याकडे होती.
ओसामाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हमजा अमेरिका आणि अन्य देशांवर हल्ले करण्याचे आदेश देत असतानाची एक दृक्श्राव्य फीत जारी करण्यात आली होती. अबोटाबादमध्ये हस्तगत केलेल्या दत्तावेजामधून हमजा हा दहशतवादी संघटनेचा पुढील म्होरक्या असल्याचे स्पष्ट झाले होते.
हमजा हा इराणमध्ये नजरकैदेत असल्याचे बोलले जात होते, त्याचप्रमाणे तो पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि सीरियामध्ये होता असेही वृत्त आहे.
 

2 August Current Affairs
2 August Current Affairs

भारताच्या सहकार्याचे अमेरिकेकडून कौतुक

इराणकडून तेलखरेदीचा प्रश्न
इराणकडून तेल खरेदी न करण्याच्या मुद्दय़ावर भारताकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारताचे कौतुक केले आहे. भारत हा अमेरिकेचा चांगला मित्र असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे.
इराण आणि भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत, मात्र अमेरिकेला सहकार्य करण्यासाठी भारताने इराणकडून तेल आयात मोठय़ा प्रमाणात कमी केली आहे. इराणवर आर्थिक निर्बंध लादून अमेरिकेने अन्य सहकारी देशांना इराणकडून तेलाची आयात बंद करण्यास सांगितले होते. सुरुवातीला अमेरिकेने भारतासह अन्य देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली होती. मात्र सहा महिन्यांनंतर ही सवलत बंद करण्यात आली होती.
इराणच्या आण्विक कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने २०१५च्या आण्विक करारातून माघार घेतली. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे.  इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असे निर्बंध अमेरिकेने लादले आहेत. त्यामुळे उभय देशांत मोठा तणाव निर्माण झाला आहे.
इराणची कोंडी:-
इराणवर लादण्यात आलेल्या र्निबधांचे उल्लंघन झाल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची जाणीव सहकारी देशांना आणि कंपन्यांना ट्रम्प प्रशासनाचे अधिकारी करून देत आहेत. अमेरिकेने लादलेल्या र्निबधांमुळे इराणची कोंडी झाली आहे, कारण तेल हा इराणच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. भारताने तेल खरेदी सुरू करावी यासाठी इराणचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अमेरिकेला दुखावणारा निर्णय भारताने अद्याप घेतलेला नाही.
इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांवरही अमेरिकेचे निर्बंध:-
इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झारिफ यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घातल्याने दोन्ही देशांमधील तणाव आणखीनच वाढला आहे.  र्निबधांमुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा येणार असून अमेरिकेतील त्यांची मालमत्ताही गोठविली जाणार आहे.झारिफ यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा बेपर्वाईचा कार्यक्रम जोमाने राबविला होता, ही वर्तणूक पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे असा संदेश अमेरिकेने दिला आहे. जून महिन्यात अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनी यांच्यावरही अशाच प्रकारचे निर्बंध लादले होते.
झारिफ हे केवळ इराणचे राजनैतिक शस्त्र नाही तर ते सर्वोच्च नेत्याच्या अस्थैर्याच्या धोरणांचे साधनही आहेत, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी केला आहे. झारिफ आणि त्यांचे परराष्ट्र मंत्रालय सर्वोच्च नेते आणि त्यांच्या कार्यालयाकडून आदेश घेत असतात.

स्थानिकांना ८० टक्के रोजगार महाराष्ट्र

राज्यातील उद्योगांनी स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या दिल्याच पाहिजे, असे १९६८पासूनचे शासकीय धोरण आहे. जे उद्योग या धोरणाची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा उद्योगांचे जीएसटी व अन्य करांचे परतावे रोखण्यात येतील, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या न देणाऱ्यांचे कर परतावे रोखण्यासाठी तातडीने नवा शासन आदेश जारी करण्यात येणार आहे. गरज पडली, तर आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर कायदा करण्यात येईल, असे उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी आंध्र प्रदेशाच्या नावाने महाराष्ट्रावर टीका करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून या प्रश्नावर रान उठविले होते. त्यामुळेच १८ नोव्हेंबर १९६८ रोजी महाराष्ट्र सरकारने स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या देण्याचे बंधन टाकणारा पहिला शासन आदेश जारी केला. त्यानंतरच्या काळात या धोरणात पाचवेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे देसाई यांनी आवर्जून सांगितले. 

राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्याचे आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यामुळेच राज्यात सध्या विविध उद्योगांमध्ये ९० टक्केपेक्षा अधिक स्थानिक लोकांना रोजगार दिला जात असल्याचा दावा उद्योग मंत्री या नात्याने देसाई यांनी केला आहे. राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी आणखी स्पष्ट पोटनियम करण्यात येतील. त्यात स्थानिक गावातील, तालुका आणि जिल्ह्यातील लोकांनाही स्वतंत्र आरक्षण देण्याचा पोटनियम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे पाच दशकापूर्वी शासनाने स्पष्ट आदेश काढला होता. त्यानंतर त्या धोरणात १९७०, १९७३, २००५, २००७ आणि २००८ अशा पाचवेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत. स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे धोरण आणखी कडक करण्यात येईल. ८० स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आरक्षण धोरण न राबवणाऱ्या उद्योगांचे जीएसटी आणि अन्य कर परतावे रोखले जातील. त्यासाठी स्वतंत्र शासन आदेश काढण्यात येईल. गरज पडली तर आंध्र प्रदेशच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करू, असेही देसाई म्हणाले. 

राज्यात उद्योगाच्या भांडवली गुंतवणुकीवर गतवर्षी तीन हजार ३५ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा दिला होता. ८० टक्के स्थानिक आरक्षण डावलणाऱ्या उद्योगांचा प्रोत्साहन परतावा बंद करण्यात येईल. त्यामुळे भुमिपुत्रांना नोकऱ्यात डावलण्याची हिंमत कोण करणार नाही, असेही देसाई यांनी सांगितले. राज्यात जे नवीन उद्योग, कंपन्या येत आहेत. तसेच सध्या कार्यरत कंपन्यांना आपापल्या आस्थापनेवर भूमिपुत्रांना दिलेल्या रोजगाराची माहिती ऑनलाइन ठेवण्याचे बंधन त्यांच्यावर टाकण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तर राज्यात विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती आढावा घेत असतात. राज्यातील तीन हजार ५२ मोठ्या उपक्रमात नऊ लाख ६९ हजार म्हणजे ८४ टक्के रोजगार; तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमात ८४ टक्के, पर्यवेक्षक श्रेणीत ८४ टक्के तर सर्वसामान्य श्रेणीत ९० टक्यांपर्यंत स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.
 

2 August Current Affairs
2 August Current Affairs

गणपतराव देशमुख

सांगोल्यासारख्या एकमेव दुष्काळी भागातून एकाच राजकीय पक्षाच्या उमेदवारीवर तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी शरीर साथ देत नसल्यामुळे विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांचे वय ९३ आहे. आता नव्या कार्यकर्त्यांलाच संधी द्यावी आणि आपल्या डोळ्यादेखत नवा उत्तराधिकारी आमदार म्हणून पुढे आला पाहिजे, अशी भावनिक इच्छा गणपतरावांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगोल्यात शेकापला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीस अवघे दोन महिने शिल्लक असताना खरोखर सक्षम असा नवा उत्तराधिकारी तयार होईल का, याबाबत सर्वत्र शंका व्यक्त होत असताना शेवटच्या क्षणी पुन्हा गणपतराव देशमुख यांच्याच गळ्यात पुन्हा उमेदवारीची माळ पडेल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तविला आहे.

शेकापचे झुंजार नेते आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून गणपतराव देशमुख ओळखले जातात. शेकापचे दिवंगत नेते उद्धवराव पाटील, दि. बा. पाटील, कृष्णराव धुळप यांसारख्या दिग्गज नेत्यांबरोबर विधिमंडळात खांद्याला खांदा लावून काम केलेले गणपतराव देशमुख यांच्याकडे अजातशत्रू आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून आदराने पाहिले जाते. स्वातंत्र्योत्तर काळात विशेषत: नव्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गणपतराव देशमुख यांचा उल्लेख कोणालाही टाळता येणार नाही. १९६२ साली पहिल्यांदा ते आमदार झाले. सांगोल्यासारख्या एकाच मतदारसंघातून पन्नास वर्षांहून अधिक काळ विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याच विक्रम त्यांच्या नावावर आहे. १९७२ साली काँग्रेसच्या लाटेत त्यांचा पराभव झाला होता. परंतु त्यांना पराभूत केलेले आमदार दुसऱ्याच वर्षी निधन पावले आणि त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा गणपतराव देशमुख निवडून आले होते. त्यानंतर १९९५ साली काँग्रेसचे अ‍ॅड. शहाजी पाटील यांनी त्यांचा अनपेक्षित पराभव केला होता. अशा दोन पराभवांचा अपवाद वगळता गणपतराव देशमुख उच्चांकी मताधिक्याने ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. आमदार म्हणून आतापर्यंत त्यांनी सुमारे ५२ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. १९७८ साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या पुलोद सरकारमध्ये गणपतराव कृषिमंत्री होते. त्यानंतर १९९९ साली त्यांना काँग्रेस आघाडी सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली होती. मंत्रिपद असताना त्यांनी कधीही सत्तेची हवा डोक्यात घेतली नव्हती. माण प्रदेशावरील दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी त्यांनी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला. अनेक वेळा रस्त्यावरची लढाई केली. वेळोवेळी पाणी परिषदाही घेतल्या. आजही सांगोल्याचा परिसर दुष्काळमुक्त झाला नाही.

सोलापूर जिल्ह्य़ावर दुष्काळाचे संकट कोसळते तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका सांगोल्याला बसतो. अशा दुष्काळी परिस्थितीत गणपतरावांनी तेथील शेतकऱ्याला निराश होऊ न देता जिद्दीने लढण्याची, संघर्ष करण्याची शिकवण दिली आहे. पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती ही सांगोल्याची परंपरा आहे. या परंपरेला छेद देत गणपतरावांनी शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांना फलोत्पदनाचे प्रयोग सुरू करायला लावले. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रोत्साहन दिले. परिणामी, सांगोल्यात बोर आणि डाळिंबाच्या बागांची लागवड होऊन त्यांचा झपाटय़ाने प्रसार आणि प्रचार झाला. सांगोल्याचे डाळिंब थेट इंग्लंडच्या बाजारात दिसू लागले. एरव्ही बैलगाडीतून फिरणारा सांगोल्याचा फाटका शेतकरी डाळिंबाच्या खरेदी-विक्रीसाठी नवी दिल्लीपर्यंत विमानाने जाऊ लागला. त्याच्या घरात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा अवतरली. दुसरीकडे तालुक्यातील ८१ गावांसाठी शिरभावी पाणी योजनेच्या माध्यमातून पंढरपुरातून भीमा नदीतून थेट पाणी आणण्याचेही काम गणपतराव देशमुख यांनी पूर्ण करून दाखविले आहे. परंतु आजही सांगोल्याला दुष्काळाच्या झळा सतावतात आणि त्यासाठी पाणी परिषदा घ्याव्या लागतातच.

अशा प्रकारे दुष्काळी भागात भरीव योगदान देताना आणखी तेथील सामान्य शेतकऱ्याची काळजी वाहणारे गणपतराव देशमुख हे सांगोल्यात एकखांबी नेतृत्व करीत आले आहेत. त्यांना काही जिवाभावाचे सहकारी भेटले. वसंतराव पाटील, रामभाऊ वाघमोडे, जगन्नाथ लिगाडे यांचा त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दुर्दैवाने हे तिन्ही सहकारी आज हयात नाहीत. त्यांच्या तोडीचे दुसरे सहकारी लाभणे दुरापास्त आहे. या पाश्र्वभूमीवर गणपतराव देशमुख यांचा वारसदार शोधायचे काम हे तितकेचे सरळ आणि सहज नाही. त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांच्याकडे वारसदार म्हणून पाहिले जाते. परंतु संपूर्ण मतदारसंघावर प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्याकडे दिसत नाही. अन्य दुसऱ्या सहकारी कार्यकर्त्यांनाही अशाच मर्यादा आहेत. दुसरे असे की, गणपतराव देशमुख यांनी मागील २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत, वयोमानानुसार (त्यावेळचे वय ८८ वर्षे) ही निवडणूक स्वत: लढविता दुसऱ्या सहकाऱ्याला उमेदवारी द्यावी, असा आग्रह केला होता. परंतु शेवटी उमेदवार म्हणून त्यांना पुढे यावे लागले. त्यावेळी ही आपली शेवटचीच निवडणूक असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. गेली पाच वर्षे त्यांना शरीराची साथ मिळेनासी झाली, परंतु तरीही त्यांनी बराचसा त्रास सहन करीत लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पेलली आहे. याउपर, आतापर्यंत अकरा वेळा विधानसभेवर निवडून गेलो. आता कोणत्याही परिस्थितीत थांबायला हवे, असे त्यांना वाटायला लागले आहे. त्यातूनच त्यांनी यापुढे विधानसभेसाठी स्वत:ऐवजी नव्या तरुण कार्यकर्त्यांला संधी मिळावी, अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे.

वारसदार शोधणे कठीण : विधानसभा निवडणुकीचे रण सुरू झाले असताना शेवटच्या क्षणी गणपतरावांनी निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त करून तरुण कार्यकर्त्यांला उमेदवारी देण्याचा आग्रह धरल्यामुळे आता ऐनवेळी नव्या उमेदवाराला तयारी करणे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात  आहे. खऱ्या अर्थाने नव्या वारसदाराला पुढे करायचे होते तर किमान दोन वर्षांपासून तयारी होणे अपेक्षित होते. दुसरीकडे निवडणुका वरचेवर खर्चीक होत चालल्या आहेत. त्यानुसार योग्य उमेदवार शोधायचा कोठे, असाही प्रश्न आहे. प्राप्त परिस्थितीत शेवटच्या क्षणी नवा वारसदार शोधण्यापेक्षा गणपतराव यांनाच मैदानात उतरवले जाऊ शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करतात.
 

माल्कम नॅश

फलंदाजांनी गोलंदाजांची धुलाई केली, की क्रिकेटचाहत्यांना विशेष चेव चढतो. आता टी-ट्वेन्टी सामने आणि आयपीएल आदी स्पर्धामुळे तर यास अधिक उधाण आले आहे. गोलंदाजीला त्यामुळे आलेले गौणत्व हा खरे तर चिंतेचाच विषय. परंतु क्रिकेट हे फलंदाजांइतकेच गोलंदाजांचेही आहे, हे खेळातून व त्यापल्याडच्या जीवनातूनही शांत, सौम्यपणे दाखवून देणारे खेळाडूही आहेत. क्रिकेटचे हे ‘खेळपण’ ज्यांनी जाणले, अशांमध्ये माल्कम नॅश यांचा समावेश करता येईल. साठ-सत्तरच्या दशकांत अष्टपैलू कामगिरी करत आपली कारकीर्द घडवलेल्या या ‘जंटलमन’चे मंगळवारी, ३० जुलैला वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

ग्लॅमॉर्गन या इंग्लंडच्या कौंटी संघाशी दीर्घकाळ जोडलेल्या नॅश यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली ती १९६६ साली. डाव्या हाताने मध्यमगती आणि फिरकी गोलंदाजी करणाऱ्या नॅश यांनी त्यानंतर दोनच वर्षांनी टाकलेल्या एका ‘षटका’मुळे ते आजही चर्चिले जातात. नॉर्दम्प्टनशायरकडून खेळणाऱ्या गॅरी सोबर्स यांनी नॅश यांच्या त्या षटकातले सहाही चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून विक्रमच केला. अशा स्थितीस तोंड द्यावे लागणाऱ्या गोलंदाजाला कशास सामोरे जावे लागते, हे इंग्लंडविरुद्ध युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या किंवा मुंबईकडून खेळताना रवी शास्त्रीने बडोद्याच्या तिलक राजच्या एकाच षटकात सहा षटकार लगावल्यानंतर आपण पाहिले आहे. तीच गत नॅश यांची झाली. आणि ते तर असे पहिले गोलंदाज होते. त्यामुळे त्याचे कवित्व पुढे अनेक वर्षे चालू राहिले. परंतु नॅश यांचे वेगळेपण इथून पुढे सुरू होते. घडले ते खेळाचा एक भाग होता, त्याने न थांबता, टवाळीने बुजून न जाता, आपला खेळ खेळत राहिले पाहिजे, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यामुळेच पुढे लँकशायरच्या फ्रँक हेजने त्यांच्या एकाच षटकात पाच षटकार आणि एक चौकार अशी आतषबाजी केल्यावरही नॅश बुजले नाहीत आणि आपले गोलंदाजी तंत्र त्यांनी सोडले नाही. त्यामुळेच १९६९ साली ग्लॅमॉर्गनच्या (तुलनेने दुर्मीळ) कौंटी चॅम्पियनशिप मिळवण्यात ते (२१ सामन्यांत ७१ गडी बाद करून) मोलाचा हातभार लावू शकले व पुढे १९८३ पर्यंत त्या संघात सातत्यपूर्ण खेळले. मुख्य म्हणजे सर सोबर्सनाही त्यांनी अनेकदा बाद केले, पण त्यात सूडभावनेपेक्षा खेळभावनाच होती. दोनेक वर्षे श्रॉपशायरकडून खेळून १९८५ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी नॅश ३३६ प्रथमश्रेणी सामने खेळले व त्यांत त्यांनी सात हजारांहून अधिक धावा केल्या, १४८ झेल घेतले व तब्बल ९९३ फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवले. नव्वदच्या दशकात कॅनडा आणि पुढे अमेरिकेत क्रिकेट प्रसार व प्रशिक्षणातही त्यांनी स्वत:स झोकून दिले. त्यांच्या जाण्याने क्रिकेटमधला खराखुरा ‘जंटलमन’ आपण गमावला आहे.

2 August Current Affairs
2 August Current Affairs

मिशन येमेन

his is a High Security Mission" असे मला या २०१६ च्या येमेन मिशनविषयी स्पष्ट कल्पना दिली होती. या अगोदर भारतीय म्हणून मला येमेनविषयी भारताच्या सरकारने २०१५ मध्ये "ऑपरेशन राहत" या नावाने जनरल व्ही. के. सिंग यांनी विलक्षण यशस्वी मोहीम राबवल्याचे माहिती होते. येमेनमधील भयानक यादवी युद्धात अडकून बसलेल्या हजारो भारतीय आणि शेकडो परदेशी नागरिकांना सोडवून आणले होते. परंतु, अजूनही तिथे बंडखोरी होती आणि अगोदरचे सरकार यांच्यात सशस्त्र यादवी संघर्ष चालूच होता. त्यात राजधानी सानावर हौतींनी ताबा घेतला होता. पूर्वीच्या सरकारमधील नेते मोठे बंदर असलेल्या एडेनमध्ये व त्यानंतर सौदी अरेबियात आश्रयास गेले होते. सशक्त सरकार नसल्याने अल कायदा आणि ईसीससारखे ग्रुप सक्रीय झाले होते. या यादवी युद्धात अगोदरच गरीब असलेल्या देशात लाखो लोक, महिला, मुले अगदी हताश आणि अकल्पनीय अवस्थेत होते. त्यात सौदी अरेबियाने आणखी काही देशांना (सौदी-अलायन्स) बरोबर घेऊन येमेनवर अनेक हवाई हल्ले चालू केले. एमएसएफचे हॉस्पिटल कॉ-ऑर्डिनेटस् सौदीला देऊनसुद्धा त्यावरही एअर स्ट्राइक केल्याने काही ठिकाणी एमएसएफने हॉस्पिटल्स बंदही केले. अशा धगधगत्या परिस्थितीत अडकलेल्या आणि वैद्यकीय सेवांपासून पूर्णपणे वंचित असलेल्या नागरिकांसाठी एमएसएफची वैद्यकीय सेवा काही ठिकाणी चालू होती. स्फोटक जखमांसाठी तिथे अस्थिरोगतज्ज्ञांची खूप गरज निर्माण झाली होती. माझी जायची इच्छा व्यक्त केल्यावर माझी पत्नी आणि कुटुंबियांनी मोठ्या धीराने मला परवानगी दिल्यानेच मी असे मिशन करू शकतो. हातून चांगले घडते तेव्हा, मानवतेच्या मूल्यांवर माझ्यासारखाच ठाम विश्वास असणारे माझे कुटुंबीयही माझ्या कार्यात असे सहभागी असतातच. येमेनमध्ये कोणीही असे जाऊ/प्रवेश करू शकत नाही, सौदी अरेबियाच्या सततच्या बॉम्बिंगमुळे, कोणतीही व्यावसायिक विमान कंपनी, राजधानी सानाला जात नाही. माझ्या व्हिसाची व्यवस्था होती. बंडखोरांच्या सरकारकडून झाली. प्रथम मी एमएसएफच्या जिनिव्हामधील कार्यालयात ब्रिफिंगसाठी गेलो. तेथून मला जिबोटी या आफ्रिकेच्या अगदी उत्तरेच्या टोकाला असलेल्या देशात एमएसएफने नेले. तेथे एक एमएसएफचे ८ सिटर छोटे विमान होते. एमएसएफने सौदी अरेबियाकडून चार तासाचा विंडो पिरिएड परवानगी घेतली होती. त्याचवेळेत, विशिष्ट उंचीवरून विमान नेणे आणि मी व माझे सहकारी (इटलीतील अॅनेस्थेटिस्ट धरून आणि काही जण), यांना साना विमानतळावर सोडून, परत जिबोटीला येणे गरजेचे होते. त्या छोट्या विमानात प्रत्येकी १५ किलो सामान नेण्यास परवानगी होती आणि त्याच्यात प्रत्येक प्रवाशाचे पण वेगळे वजन करून विमानातील लोडाचे गणित केले होते. एमएसएफच्या त्या छोट्याशा विमानात दोन वैमानिक सर्व मदत करत होते. जिबोटीहून या विमानाने उड्डाण केले. एवढ्या छोट्या विमानाचा सारखा धडधड आवाज येत होता. एडनची सामुद्रधुनी आणि रेड-सी ओलांडून येमेनच्या एअर-फील्डमध्ये आल्यावर वैमानिक जास्त काळजीने सौदीशी संपर्क साधून होते. साधारण दीड तासाच्या प्रवासानंतर येमेनची राजधानी सानाच्या विमानतळावर उतरले. उतरताना विमानाच्या खिडकीमधून उध्वस्त झालेल्या विमानांचे आणि हेलिकॉप्टरचे अवशेष बाजूला दिसत होते. त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे त्या दिवसाचे ते एकमेव विमान होते. अर्धवट उध्वस्त झालेल्या त्या विमानतळाच्या इमारतीत इमायग्रेशन झाल्यावर आम्हाला घ्यायला आलेला येमेनी सारखाचा लायेसन ऑफिसर भेटला. त्याच्या डोळ्यात, बोलण्यात, वागण्यात त्याच्या गरजू देशबांधवांना मदत करायला आलेल्या आमच्याविषयी विलक्षण कृतज्ञता दिसत होती. सानामधील त्याही रात्री तीन वेळा प्रचंड मोठे आवाज झाले. मिशनप्रमुखाला विचारले तर तो म्हणाला, सौदीचे असे एअर-स्ट्राइक रोज होतात, पण आपण डिप्लोमेटिक एरियामध्ये असल्याने या को-ऑर्डिनेट्सवर ते बॉम्ब टाकत नाही. या दिलाशावर, मी पुढच्या प्रवासासाठी सकाळची वाट बघू लागलो. धोकादायक परिस्थितीत चांगले काम करताना आम्ही एकमेकांना शुभेच्छा द्यायचो. "Take Care, Give Care". जगण्यासाठीचा काय छान मंत्र आहे हा!

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »