5 Sep Current Affairs

5 Sep Current Affairs
5 Sep Current Affairs

कर्तारपूर मध्ये व्हिसाशिवाय प्रवेश

 • शीख धर्मियांमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कर्तारपूर येथील दरबारसिंग गुरूद्वारा येथे भारतीय भाविकांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बुधवारी सहमती झाली. 
 • मात्र, या बैठकीमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यावर एकमत होऊ शकले नाही.
 • पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कर्तारपूर येथील गुरूद्वाऱ्याचे शीख धर्मियांमध्ये अतिशय महत्त्व आहे. 
 • गुरूदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या या गुरुद्वाऱ्यामध्ये शीख भाविकांना प्रवेश देण्याविषयी अनेक वर्षांपासून चर्चा होत होती. 
 • पाकिस्तानने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव दिल्यानंतर दोन्ही बाजूंकडून त्यावर चर्चा सुरू झाली. अमृतसर जिल्ह्यातील अट्टारी येथे बुधवारी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली. 
 • त्या वेळी भाविकांना प्रवेश देण्यासाठी शुल्क लावण्याचा पाकिस्तानचा आग्रह होता, तर भारताने त्याला आक्षेप घेतला; तसेच गुरूद्वाराच्या आवारामध्ये भारतीय राजनैतिक किंवा राजशिष्टाचार अधिकारी असावा, असे भारताचे म्हणणे आहे, तर पाकिस्तानचा त्याला विरोध आहे. 
 • पाकिस्तानने त्यांच्या या भूमिकेचा फेरविचार करावा, असे आवाहन भारतीय अधिकाऱ्यांनी केले. या बैठकीमध्ये कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यात यश आले नाही.  
 • रावी नदीवर पूल बांधण्याला दोन्ही बाजूंनी सहमती दाखविली आहे. पाकिस्तानच्या बाजूने पुलाचे काम अपूर्ण आहे. या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे संचालक (दक्षिण आशिया व सार्क) महंमद फैझल यांच्या नेतृत्वाखाली १५ सदस्य सहभागी झाले होते. 
 • या कॉरिडॉरविषयी दोन्ही देशांमधील ही तिसरी चर्चा आहे, तर केंद्र सरकारने ३७०वे कलम हटविल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले असताना झालेली ही दुसरी बैठक आहे.

सातही दिवस सुरू:-

 • भारतीय भाविकांना या गुरूद्वाऱ्यापर्यंत व्हिसा न घेताही प्रवेश देण्याला दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. त्यामध्ये अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे. दररोज ५००० भाविक या गुरूद्वाऱ्याला भेट देऊ शकतील; तसेच विशेष दिवसांमध्ये ही संख्या वाढू शकते. 
 • पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या सुविधांवर ही संख्या निश्चित होणार आहे. आठवड्यातील सातही दिवस हा कॉरिडॉर सुरू राहणार असून, गटाने किंवा वैयक्तिकरीत्या या गुरूद्वाऱ्याला भेट देण्याची मुभा भाविकांना असेल.
 • रावी नदी बद्दल माहिती मिळवा.
   

राहण्यायोग्य शहरांमध्ये दिल्लीचे स्थान 118 वे

 • नवी दिल्ली जगातील सर्वांत चांगल्या राहण्यायोग्य शहरांमध्ये दिल्लीचे स्थान सहा क्रमांकांनी घसरून ११८ व्या स्थानावर गेले आहे. यादीमध्ये गेल्यावर्षी दिल्लीचा क्रमांक ११२ होता. (नवी दिल्ली एकूण score 56.3.)
 • प्रदूषित हवा आणि वाढते गुन्हेगारीचे प्रमाण यांमुळे दिल्लीचे स्थान घसरले आहे. 'इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट'च्या (ईआययू) वार्षिक सर्व्हेमध्ये बुधवारी ही बाब समोर आली आहे. 
 • या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर सलग दुसऱ्या वर्षी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) या शहराने स्थान कायम राखले आहे. आशिया खंडामध्येदेखील दिल्लीचे स्थान घसरले आहे. (व्हिएन्ना score -99.1) 
 • मुंबईचे स्थानदेखील गेल्या दोन वर्षांत दोन अंकांनी घसरून ११९वे झाले आहे. (मुंबई score -56.2) भारतामध्ये पत्रकारांविरुद्ध गैरप्रकारांच्या घटनांमध्येदेखील वाढ झाल्याचे 'ईआययू' ने म्हटले आहे. 
 • सांस्कृतिक दर्जा खालावल्याने मुंबईचे स्थान घसरले आहे,  तर सांस्कृतिक आणि पर्यावरणीय बाबींमध्ये नवी दिल्ली कमी पडली आहे; तसेच दिल्लीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचीही नोंद करण्यात आली आहे. 
 • 'रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स प्रेस फ्रीडम इंडेक्स' च्या क्रमवारीमध्ये भारताचे स्थान शेवटच्या देशांमध्ये आहे. 
 • जागतिक सरासरीच्या तुलनेत आशिया खंडातील शहरांनी फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. 
 • पापुआ न्यू गिनीआमधील पोर्ट मोर्स्बी (१३५), पाकिस्तानमधील कराची (१३८) ही खालच्या क्रमांकावरील शहरे आहेत. 
 • अहवालात म्हटले आहे, 'राहण्यायोग्य वातावरणावर हवामान बदलाचाही मोठा परिणाम झाला आहे. नवी दिल्ली, इजिप्तमधील कैरो या शहरांचे मानांकन हवामान बदलामुळे खाली आले आहे. 
 • यामध्ये हवेचा दर्जा, सरासरी तापमानातील मोठा बदल, अपुरा पाणीपुरवठा आदी बाबींचा समावेश आहे.
 • यादीमध्ये शेवटच्या क्रमांकावर दमास्कस (सीरिया) शहराची नोंद आहे. 
 • हवामान बदलाचे मोठे आव्हान 'ईआययू'ने सांगितले, की 'स्थिरता, आरोग्य, संस्कृती, पर्यावरण, शिक्षण, पायाभूत सुविधा या निकषांवर १४० सर्वोत्कृष्ट राहण्यायोग्य शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक घटकासाठी स्वीकारार्ह, सहन करण्यायोग्य, फारसे आरामदायी नाही, हवे तसे नाही किंवा राहण्यायोग्य नाही असे पर्याय देण्यात आले होते.' 
 • 'ईआययू्'चे ग्लोबल फोरकास्टिंग संचालक अगाथे डेमारिस म्हणाले, 'येत्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाचा परिणाम राहण्यायोग्य वातावरणावर अधिकाधिक होण्याची अपेक्षा आहे.
 • इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट जागतिक राहण्यायोग्य यादीत काही प्रमुख घटकांचा प्रामुख्याने विचार केला जातो. ज्यामध्ये शहरामधील स्थिरता आणि सांस्कृतिक व पर्यावरण विषयक जाणीवा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. यासाठी प्रत्येकी २५ टक्के इतके गुणांकन आहे. आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधा यांच्यासाठी प्रत्येकी २० टक्के इतके गुणांकन आहे. तर शैक्षणिक सुविधा यांच्यासाठी १० टक्के इतके गुणांकन आहे.

ब्रिक्स देश:-

 • रिओ दी जानेरो  (ब्राझील)- 89th 
 • मॉस्को  (रशिया) - 68th 
 • सेंट  पीटर्सबर्ग  (रशिया) 71st

टॉप पाच देश:-

 1.  व्हिएन्ना, ऑस्ट्रिया 
 2. मेलबॉऊर्न, ऑस्ट्रेलिया 
 3. सिडनी, ऑस्ट्रेलिया 
 4. ओसाका, जपान
 5. कॅल्गरी, कॅनडा
   
5 Sep Current Affairs
5 Sep Current Affairs

मुद्रा तून १० टक्केच नव्या नोकऱ्या कर्जांचा दुरुपयोग

 

 • देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने राबविलेल्या महत्त्वाकांक्षी मुद्रा योजनेचा बोऱ्या वाजला असून, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याऐवजी केवळ १० टक्के नोकऱ्यांची निर्मिती झाल्याचे समोर आले आहे. 
 • केंद्रीय कामगार मंत्रालयाने सादर केलेल्या एका अहवालानुसार या योजनेतून कर्जे घेतलेल्या पाचपैकी केवळ एकानेच नवीन उद्योग सुरू केला आहे. बाकीच्यांनी मिळालेल्या कर्जाऊ रकमेतून जुन्याच उद्योगांमध्ये गुंतवणूक केल्याने योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
 • कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या लेबर ब्यूरोने केलेल्या सर्वेक्षणानुसार एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत १.१२ कोटी अतिरिक्त नोकऱ्यांची निर्मिती झाली. पैकी ५१.०६ लाख नोकऱ्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून तर, ६०.९४ लाख पगारदार नोकर आहेत. 
 • या ३३ महिन्यांच्या कालावधीत जेवढे कर्ज मुद्रा योजनेंतर्गत वितरित करण्यात आले, त्याच्या केवळ १० टक्केच नोकऱ्या निर्माण झाल्याचेही समोर आले आहे. 
 • सर्वेक्षणाचा मसुदा २७ मार्च २०१९ रोजी तयार करण्यात आला. त्यानुसार एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ९७,००० जणांनी मुद्रा योजनेचा लाभ घेतला.

४६,५३६ रुपयांचे सरासरी कर्जवाटप:-

 • मुद्रा योजनेंतर्गत एकूण ५.७१ लाख कोटी रुपयांच्या कर्जांचे शिशू, किशोर आणि तरुण या गटांतर्गत वाटप करण्यात आले. 
 • त्यातील १२.२७ कोटी रुपये पहिल्या तीन वर्षांतच वितरित करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या कर्जाची सरासरी ४६,५३६ रुपये आहे. 
 • आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये वाटप करण्यात आलेल्या एकूण कर्जांमध्ये शिशू कर्जाचे प्रमाण (५०,००० रुपयांपर्यंत कर्ज) ४२ टक्के आहे. 
 • त्याचवेळी किशोर कर्जाचे प्रमाण (५०,००० रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत) ३४ टक्के आणि तरुण गटातील कर्जाचे प्रमाण (पाच लाख रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंत) २४ टक्के असल्याचे आढळून आले आहे.
 • शिशू कर्जातून सर्वाधिक नोकऱ्या:-
 • आजपावेतो एकूण नोकऱ्यांपैकी ६६ टक्के नव्या नोकऱ्या शिशू कर्जाच्या वाटपातून निर्माण झाल्या आहेत. त्याचवेळी किशोर आणि तरुण गटातील कर्जांमुळे अनुक्रमे १८.८५ टक्के आणि १५.५१ टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. याच कालावधीत शेती क्षेत्रातून २२.७७ लाख नोकऱ्यांची तर, उत्पादन क्षेत्रातून १३.१० लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे.

मुद्रा योजना एका दृष्टिक्षेपात:-
•    नव्या उद्योगांसाठी दिलेली कर्जे १९,३९६ (२०.६ टक्के)
•    जुन्याच उद्योगांसाठी दिलेली कर्जे ७४,९७९ (७९.४ टक्के)
'मुद्रा'तून मिळालेले नवीन रोजगार:-
•    शिशू ७३,९१,९७४ (६५.९९ टक्के)
•    किशोर २१,११,१३४ (१८.८५ टक्के)
•    तरुण १६,९६,८७२ (१५.१५ टक्के)
•    एकूण १,११,९९,९८०
 

मारुती चेही शटडाउन दोन दिवस प्रकल्प बंद

 • वाहन उद्योगातील मंदीच्या बकासुराने हळूहळू का होईना आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, आता देशातील देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक असणाऱ्या मारुती सुझुकीलाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. 
 • कारच्या मागणीत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हरियाणातील प्रकल्प दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 • हरिणायातील मनेसर आणि गुरुग्राम येथील दोन उत्पादन प्रकल्प येत्या शनिवारी (७ सप्टेंबर) आणि सोमवारी (९ सप्टेंबर) बंद ठेवण्यात येणार आहेत. कंपनीतर्फे या दोन्हीही प्रकल्पांमध्ये वरील दोन्हीही दिवशी 'नो प्रॉडक्शन डे' घोषित करण्यात आला आहे. 
 • २०१२नंतर प्रथमच अशाप्रकारे उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ मारुती सुझुकीवर ओढावली आहे. सात सप्टेंबरला शनिवार असून, नऊ सप्टेंबरला रविवार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस सुट्टी मिळाली आहे. 
 • सलग सात महिने मागणीत घट नोंदविण्यात आल्याने ऑगस्टमध्ये कंपनीने उत्पादनात ३३.९९ टक्क्यांची घट केली. कंपनीने ऑगस्टमध्ये एकूण १,११,३७० युनिटचे उत्पादन घेतले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीने १,६८,७२५ युनिटचे उत्पादन घेतले होते.

वाहन उद्योगातील मंदी कारणीभूत:-

 • वाहन उद्योगातील मंदीपासून स्वत:ला दूर ठेवण्यात कोणतीही कंपनी यशस्वी ठरलेली नाही. मारुती सुझुकीही त्याला अपवाद ठरू शकलेली नाही. गेल्या सात महिन्यांपासून कंपनीने उत्पादनात घट केली आहे. 
 • कंपनीने ऑगस्ट २०१९मध्ये १,११,३७० युनिट वाहनांची निर्मिती केली. विक्रीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ऑगस्टमध्ये ३२.७ टक्क्यांची घट होऊन १,०६,४१३ वाहने विकली गेली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १,५८,१८९ कारची विक्री करण्यात मारुती सुझुकीला यश आले होते.

छोट्या कारनाही दणका:-

 • कंपनीच्या छोट्या कारपैकी अल्टो आणि वॅगनार या कारच्या विक्रीत याच कालावधीत ७१.८ टक्क्यांची घट होऊन ती १०,१२३वर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी याच कारची विक्री ३५,८९५ युनिट झाली होती. याचप्रमाणे कॉम्पॅक्ट सेगमेंटमधील कारच्या विक्रीत २३.९ टक्क्यांची घट होऊन ती ५४,२७४वर पोहोचली आहे. 
 • ऑगस्ट २०१८मध्ये या सेगमेंटमधील कारची विक्री ७१,३६४ इतकी होती. कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीच्या स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर आदी कारचा समावेश होतो.

'सियाझ'च्या विक्रीतही घट:-

 • कंपनीच्या मिड सेदान 'सियाझ'च्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ऑगस्ट २०१९मध्ये 'सियाझ'च्या १५९६ युनिटची विक्री झाली आहे. 
 • गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कारची ७,००२ युनिट विकली गेली होती. याच कालावधीत व्हिटारा ब्रेझा, एस क्रॉस आणि एर्टिगा या कारच्या विक्रीत ३.१ टक्क्यांची वाढ होऊन १८,५२२ युनिटची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या कारची एकूण विक्री १७,९७१ इतकी होती.

निर्यातीतही घट:-

 • ऑगस्ट २०१९मध्ये कंपनीच्या निर्यातीतही १०.८ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
 • ऑगस्टमध्ये ९,३५२ कारची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत १०,४८९ कारची निर्यात झाल होती.
5 Sep Current Affairs
5 Sep Current Affairs

कसोटीतला सर्वात तरुण कर्णधार बनला राशिद खान

 • अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज आणि नवनियुक्त कर्णधार राशिद खानने गुरुवारी बांगलादेश विरुद्धच्या कसोटीत एक नवा विक्रम केला आहे. 
 • राशिद खान कसोटी क्रिकेटचा आतापर्यंतचा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. राशिदचं वय २० वर्षे ३५० दिवस आहे. 
 • अफगाणिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि गुरुवारपासून तिथे हा एकमेव कसोटी सामना होणार आहे. अफगाणिस्तानला २०१७ मध्ये कसोटी संघाचा दर्जा मिळाला. 
 • या संघाचा कसोटी प्रवास जून २०१८ पासून सुरू झाला. अफगाणिस्तानने पहिली कसोटी स्पर्धा भारताविरुद्ध खेळली होती.

यापूर्वी हा विक्रम झिम्बाब्वेचा माजी कर्णधार टटेंडा तायबू याच्या नावावर:-

 • यापूर्वी हा विक्रम झिम्बाब्वेचा माजी कर्णधार टटेंडा तायबू याच्या नावावर होता.
 • तायबू २००४ मध्ये हरारे कसोटीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार होता, तेव्हा त्याचं वय २० वर्षे ३५८ दिवस होतं. 


तायबूचा आधी भारताचा माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडींच्या नावे हा विक्रम:-

 • तायबूचा आधी भारताचा माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडींच्या नावे हा विक्रम होता. 
 • २१ वर्षे ७७ दिवस वय असताना पतौडी यांनी १९६२ मध्ये ब्रिजटाऊनमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्या भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं.

 

पहिल्या इलेक्ट्रिक बसचे मुंबईत लोकार्पण

 • इलेक्ट्रिकवर चालणारी पहिली बस मुंबईत दाखल झाली आहे. 'शिवाई' असं या बसचं नामकरण करण्यात आलं असून ही बस दादर ते पुणे दरम्यान धावणार आहे. 
 • विजेवर चालणाऱ्या या पर्यावरण पूरक बसमुळे एसटी महामंडळाच्या खर्चात बचत होणार आहे. विजेवर चालणाऱ्या या बसचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
 • इंधन दरवाढीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी विजेवर चालणारी बस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला होता. त्यानुसार ही बस घेण्यात आली आहे. 
 • विजेवर चालणाऱ्या अशा एकूण १५० बसेस खरेदी करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या बसची आसन क्षमता ४४ इतकी आहे. 
 • ही बस वातानुकुलीत असून चार्ज केल्यानंतर ३०० किमीपर्यंतचा पल्ला गाठण्याची क्षमता या बसची आहे. शिवाय बस चार्ज होण्यासाठी १ ते ५ तासांचा कालावधी लागणार आहे. 
 • या बसचा खर्च शिवशाही बसपेक्षा अधिक आणि शिवनेरीपेक्षा कमी असणार असून या इलेक्ट्रिक बसमुळे प्रदुषणात घट होणार आहे.

'शिवाई'चे वैशिष्ट्य:-

 • सीसीटीव्ही
 • व्हिटीएस
 • आरामदायी आसने
 • प्रवाशांशी संपर्क साधण्यासाठी उद्घोषणा यंत्रणा

5 Sep Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »