8 Oct Current Affairs

8 Oct Current Affairs
8 Oct Current Affairs

दिल्ली मेट्रोने अशी वाचवली १३ हजार झाडे

 • मुंबई मेट्रो कारशेडच्या निर्मितीसाठी आरेमध्ये सुरू असलेला वृक्षतोडीचा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे. जोपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल होत होतं, त्यापूर्वीच २,१४१ झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली होती. कधी काळी दिल्ली मेट्रोला देखील या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे ३३७ कि.मी. लांबीच्या दिल्ली मेट्रो नेटवर्कने आपल्या विस्तारादरम्यान समंजसपणाने निर्णय घेत १३ हजार झाडांची छाटणी वाचवली होती.
 • फेज-३ च्या निर्मितीपर्यंत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) वृक्षतोडही टाळली आणि फेज १ च्या वेळी डेपोच्या निर्मितीसाठी प्रमुख स्मारके आणि क्लोज्ड लँडफिल साइट तुटण्यापासून वाचवल्या. फेज १ ते फेज ३ पर्यंत डीएमआरसीला ५६,३०७ झाडं तोडण्याची परवानगी मिळाली होती. तरीही या दरम्यान कॉर्पोरेशनने मोठ्या कौशल्याने १२,५८० झाडं वाचवली. अन्य ४३,७२७ झाडं तोडावी लागली. पण ही छाटणी रोखू शकता येणार नव्हती असं मेट्रोचं म्हणणं होतं.
 • मेट्रोच्या प्रवक्त्याने सांगितलं की 'प्रत्येक प्रकल्पासाठी पर्यावरण प्रभावाचे आकलन जरुरी आहे. जेव्हा आम्ही विस्तृत योजना अहवालानुसार काम सुरू करतो तेव्हा आम्ही जमिनीवर काही तडजोडी करू शकतो. ट्रॅकमध्ये थोडं संशोधन करून एक जरी झाड वाचवता आलं तरी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. जेथे शक्य नाही, तेथे मात्र झाडं तोडावीच लागतात.'
 • डीएमआरसीच्या म्हणण्यानुसार त्यांनी ट्री ट्रान्सप्लान्टेशनचा प्रयोगही केला. हा प्रयोग आताही अनेक ठिकाणी सुरू आहे. डीएमआरसीचे प्रवक्ता अनुज दयाल म्हणाले, 'एका झाडाला पाच कि.मी. च्या अंतरातच ट्रान्सप्लान्ट केले जाऊ शकते, तर त्याची जिवंत राहण्याची शक्यता असते. मात्र सर्वसाधारणपणे ट्रान्सप्लान्ट केलेल्या झाडांचं जिवंत राहण्याचं प्रमाण फारच कमी असतं.'
 • एका झाडाच्या बदल्यात डीएमआरसीला १० रोपं लावावी लागतात. या प्रमाणे वनविभागाच्या माध्यमातून आतापर्यंत ५,३५,१५० वृक्षारोपण केले आहे. यांच्या देखभालीची जबाबदारीही डीएमआरसीकडे आहे.

विवाह नोंदणी विधेयक संसदीय समितीकडे

 • अनिवासी भारतीय (एनआरआय) विवाह नोंदणी विधेयक संसदेच्या परराष्ट्र व्यवहार विषयावरील स्थायी समितीकडे पाठवण्यात आले आहे. एनआरआय व्यक्तीच्या विवाहाची नोंदणी विवाह झाल्यापासून ३० दिवसांच्या आत करणे बंधनकारक करण्याची तरतूद या विधेयकात आहे. 'अनिवासी भारतीय विवाह नोंदणी विधेयक, २०१९' असे या विधेयकाचे नाव आहे.
 • अनिवासी भारतीय व्यक्तीने विवाह झाल्यापासून त्याची नोंदणी ३० दिवसांच्या आत केली नाही, तर संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट किंवा प्रवासी कागदपत्रे रद्द करण्याचा अधिकार पासपोर्ट प्रशासनाला असेल, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
 • लोकसभा सभापतींनी राज्यसभा अध्यक्षांसोबत चर्चा करून हे विधेयक परीक्षणासाठी परराष्ट्र विषयावरील संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले आहे. समितीला दोन महिन्यांत त्याबाबत अहवाल द्यायचा आहे,' अशी माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे.
 • अनिवासी भारतीयासोबत खोट्या विवाहात अडकलेल्या भारतीय महिलेचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर अशा विवाहांची नोंदणी ३० दिवसांत करणे बंधनकारक असल्याची तरतूद असलेले हे विधेयक फेब्रुवारी महिन्यात राज्यसभेत मांडण्यात आले होते.
 • एनआरआय पुरुषाने त्याच्या विवाहाची नोंदणी ठरावीक कालावधीत केली नाही, तर त्याचा पासपोर्ट जप्त अथवा रद्द होऊ शकतो, अशी तरतूद या विधेयकात आहे.
 • याशिवाय अशा प्रकरणांमध्ये नोटीस बजावूनही न्यायालयासमोर हजर न होणाऱ्या व्यक्तींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचा अधिकारही न्यायालयाला असेल, अशी तरतूद यात आहे. भारतात किंवा भारताबाहेर भारतीय महिलेशी विवाह करणाऱ्या एनआरआय पुरुषाला या विधेयकातील तरतुदी लागू असतील.
 • दरम्यान, सिनमॅटोग्राफ (सुधारणा) विधेयक संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीकडे पाठवण्यात आले आहे; तर 'नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, 'आंत्रप्रेन्युअरशिप अँड मॅनेजमेंट' विधेयक संसदेच्या कृषीविषयक समितीकडे पाठवण्यात आले आहे. त्यावर या समित्यांना दोन महिन्यांत अहवाल द्यायचा आहे.
8 Oct Current Affairs
8 Oct Current Affairs

स्विस बँकेकडून खात्यांची माहिती सादर

 • भारत व स्वित्झर्लंड यांच्यात माहितीच्या देवाणघेवाणीसंदर्भात झालेल्या करारानंतर, स्विस बँकेतील भारतीयांशी संबंधित खात्यांबाबतची माहिती भारताला मिळाली आहे. यासंदर्भातील माहितीचा हा पहिला टप्पा असून यानंतर पुढील टप्प्यातील माहिती सप्टेंबर २०२०मध्ये मिळणार आहे. परदेशात ठेवलेल्या काळ्यापैशाविरोधात सरकारने सुरू केलेल्या मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
 • माहितीची आपोआप देवाणघेवाण अर्थात 'एईओआय' या व्यवस्थेनुसार, स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशनकडून (एफटीए) भारतासह ७५ देशांना अशा प्रकारची माहिती मिळाली आहे. एईओआय व्यवस्थेअंतर्गत सध्या सुरू असलेल्या बँक खात्यांसंदर्भातील माहितीची देवाणघेवाण केली जाते. तसेच हा करार ज्या वर्षी प्रत्यक्षात आला, त्या सन २०१८मध्ये बंद करण्यात आलेल्या बँक खात्यांचीही माहिती दिली जाते. या व्यवस्थेअंतर्गत भारताला प्रथमच ही माहिती मिळाली आहे.
 • दरम्यान, माहितीच्या देवाणघेवाणीसंदर्भातील व्यवस्थेअंतर्गत मिळालेल्या या माहितीमध्ये अधिकृतरित्या भारतीयांच्या नावावर असलेल्या बँक खात्यांची माहिती देण्यात आली असून यामध्ये व्यवसाय किंवा खऱ्या कारणांसाठी उघडलेल्या खात्यांचाही समावेश आहे.
 • स्वित्झर्लंडच्या एफटीएने करार झालेल्या देशांना एकूण ३१ लाख बँक खात्यांची माहिती दिली असून त्यांच्याकडून २४ लाख खात्यांची माहिती मिळवली आहे. मात्र भारतीयांशी संबंधित नेमकी किती खाती यामध्ये आहेत, तसेच यामध्ये किती रक्कम आहे, ही माहिती वृत्तसंस्थेला देण्यास एफटीएने गोपनीयतेच्या नियमांतर्गत नकार दिला.

ही माहिती मिळाली:-

 • स्विस बँकेकडून मिळालेल्या माहितीमध्ये खातेदाराचे नाव, पत्ता, निवासाचा देश, करसंबंधी ओळख क्रमांक तसेच वित्तीय संस्थेचे नाव, खात्यांतील शिल्लक आणि भांडवली उत्पन्न यांचा समावेश आहे. एफटीएने बँका, ट्रस्ट आणि विमा कंपन्यांकडून ही माहिती संकलित केली आहे.

भारताला मिळालं राफेल चं बळ

 • दसऱ्याच्या मुहूर्तावर आज जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेलं राफेल लढाऊ विमान भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झालं. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिलं राफेल विमान स्वीकारलं.
 • फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. यावेळी हवाईदलप्रमुख हरजीत सिंह अरोरा उपस्थित होते.

राफेल:-

 • राफेल हा फ्रेन्च शब्द असून त्याचा अर्थ धुळीचे वादळ असा होतो. बार्डोक्स हवाईतळावर राफेल निर्मिती कंपनी दसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी राजनाथ यांचं स्वागत केलं. त्यानंतर राफेल लढाऊ विमानाच्या हस्तांतरणाची औपचारिकता पार पडली. यावेळी बोलताना राजनाथ यांनी भारतासाठी हा ऐतिहासिक दिन असल्याचे सांगितले.
 • आज भारतात सर्वत्र विजयादशमी साजरी होत आहे. अपप्रवृत्तींचा विनाश करून सत्प्रवृत्तीचा विजयोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे. योगायोग म्हणजेच आजच वायुसेना दिनही आहे. अशा या शुभदिनी राफेल भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येत असून हवाईदल यामुळे अधिक शक्तिशाली होणार आहे.
 • भारत आणि फ्रान्समध्ये २३ सप्टेंबर २०१६ रोजी राफेल करार झाला होता. त्यानंतर आता योग्यवेळी राफेल भारताच्या ताब्यात येत आहे, भविष्यात हवाईदलाची क्षमता आणखी वाढवण्यावर भर राहणार आहे.

३६ राफेल विमाने भारताला मिळणार:-

 • भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये राफेल विमान करार झाला होता.
 • त्यानुसार ५९ हजार कोटी रुपये मोजून भारताला ३६ राफेल विमाने मिळणार आहेत.
 • यापैकी पहिलं राफेल विमान आज भारताकडे सोपवण्यात आलं आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढच्यावर्षी मे महिन्यात आणखी राफेल विमानं भारताला मिळणार आहेत.
 • राफेलच्या हस्तांतरण सोहळ्याआधी संरक्षण मंत्री राजनाथ यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
8 Oct Current Affairs
8 Oct Current Affairs

पाकिस्तान आणखी खोलात FATF

 • बेहिशेबी पैशांना आळा घालणे आणि दहशतवाद्यांना निधी रोखणे याबाबतच्या ४०पैकी केवळ एका शिफारशीवर पाकिस्तानचे समाधानकारक काम.
 1. नऊ शिफारशींवर बरे काम.
 2. २६ शिफारशींची केवळ निम्मीच अंमलबजावणी.
 3. चार शिफारशींकडे पूर्ण दुर्लक्ष.
 • दहशतवादाला खतपाणी देण्याच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय समुदायात एकटे पडत चाललेला पाकिस्तान आणखी खोलात जात आहे. दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत थांबवणे पाकिस्तानने थांबवलेले नसून, आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स'ने शिफारस केलेल्या चाळीसपैकी केवळ एकाच मुद्द्यावर पाकिस्तानने समाधानकारक कामगिरी केली आहे.
 • 'एशिया पॅसिफिक ग्रुप'च्या (एपीजी) अहवालातून ही बाब स्पष्ट झाली असून, त्यामुळे पाकिस्तानचे नाव 'ग्रे' यादीमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.
 • 'एफएटीएफ'ची शिखर बैठक दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर 'एपीजी'ने २२८ पानांचा अहवाल शनिवारी प्रसिद्ध केला. त्यात पाकिस्तानने गेल्या वर्षभरात समाधानकारक कामगिरी न केल्याचे म्हटले आहे.
 • 'एफएटीएफ'ने गेल्या वर्षी जून महिन्यात पाकिस्तानचा समावेश 'ग्रे' यादीमध्ये केला आहे. या यादीतून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानला ४० शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर २०१९पर्यंत या शिफारशी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
 • त्या पूर्ण करण्यात पाकिस्तानला अपयश आले, त्यामुळे पाकिस्तानचा समावेश इराण आणि उत्तर कोरियापाठोपाठ काळ्या यादीत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, पाकिस्तानने मात्र आपण गेल्या वर्षात चांगली कामगिरी केल्याचा दावा करत, स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आहे.

भारताविरोधात कांगावा:-

 • 'पाकिस्तानला 'एफएटीएफ' कधीही काळ्या यादीत टाकू शकते,' या भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानने सोमवारी तीव्र आक्षेप घेतला. पैशांच्या व्यवहाराबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे राजकीयीकरण करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
 • 'एशिया पॅसिफिक' संयुक्त गटाचे सहअध्यक्षपद भूषवणाऱ्या भारताची विश्वासार्हता यामुळे धोक्यात आल्याचा कांगावा पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने केला आहे.

हाफीजच्या याचिकेवर नोटिसा:-

 • दहशतवादाला पैसा पुरविण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानात अटक करण्यात आलेल्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफीज सईद याने त्याच्या अटकेला आव्हान दिले आहे.
 • त्याने लाहोर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्याच्या नोटिसा न्यायालयाने पंजाब सरकार आणि दहशतवादविरोधी विभागाला बजावल्या आहेत. २८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर द्यावे, अशी नोटीस देण्यात आली आहे.

जागतिक ब्रिज स्पर्धेत भारताला प्रथमच पदक

 • वुहान, चीन येथे झालेल्या जागतिक ब्रिज अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सीनियर गटात ब्राँझपदकाची कमाई केली.
 • प्रथमच भारताने या स्पर्धेत पदकाची कमाई करण्याचा पराक्रम केला. या सीनियर गटात श्रीधरन, सुकमल दास, जितेंद्र सोलानी, दीपक पोद्दार, सुब्रत साहा आणि सुभाष धाक्रस यांचा समावेश होता.
 • ही ४४ वी ब्रिज अजिंक्यपद स्पर्धा होती. दोन वर्षांपूर्वी भारताने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता, पण ब्राँझपदकाच्या झुंजीत नेदरलँड्सला हरवून त्यांनी हे पदक जिंकले.
 • यावेळी खुला गट, महिला गट, मिश्र गट आणि सीनियर गट अशा चार गटात भारतीय खेळाडू खेळले. या चारही गटासाठी भारत सरकार, क्रीडा प्राधिकरणाने भारतीय खेळाडूंचा संपूर्ण खर्च केला.
8 Oct Current Affairs
8 Oct Current Affairs

महाराष्ट्रात उभारणार कृष्णविवरांचा शोध घेणारी लायगो प्रयोगशाळा

 • हिंगोलीमधील औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा परिसरात लेसर इनफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (LIGO लायगो) हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
 • अशाप्रकारची ही जगातील केवळ तिसरी आणि अमेरिकेबाहेरची पहिलीच प्रयोगशाळा असणार आहे.
 • सध्या केवळ वॉशिंग्टन व लुईझियानामध्ये आहे.
 • मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या प्रकल्पासाठी वन विभागाची १२१ हेक्टर जमीन हस्तांतरणास केंद्राच्या वन व पर्यावरण विभागाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
 • या प्रकल्पासाठीची जमीन हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या उभारणीतील अडथळा दूर झाला असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे.
 • या प्रकल्पाला १७ फेब्रुवारी २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्त्वत मंजुरी दिली आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य आहे असे अमेरिकी वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
 • दुघाळा परिसरामध्ये उभारली जाणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा सुमारे १७१ हेक्टर क्षेत्रावर उभारली जाणार आहे. यामध्ये १२१ हेक्टर जमीन वन विभागाची आहे. अमेरिकेनंतर देशातील ही पहिलीच प्रयोगशाळा आहे.
 • गुरुत्वीय लहरींचा अभ्यास या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ या ठिकाणी थांबणार आहेत. या ठिकाणी सुमारे चार हेक्टर शासकीय जमीन लिगो प्रकल्पाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
 • ७१ शेतकऱ्यांची सुमारे ४५ हेक्टर जमीन प्रकल्पासाठी खरेदी करण्यात येणार आहे. भारतामध्ये उभारली जाणारी ही पहिलीच प्रयोगशाळा असल्यामुळे केंद्र शासनासह राज्य शासनाचे या प्रयोगशाळेच्या उभारणीकडे विशेष लक्ष देत आहे.
 • या प्रयोगात गांधीनगरची प्लाझ्मा संशोधन संस्था, पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिक केंद्र (आयुका), इंदोरचे राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र या संस्थांची भूमिका लायगो इंडिया प्रकल्पात महत्त्वाची ठरणार आहे.
 • लायगो इंडियाचे संपर्क अधिकारी व लायगो हॅनफोर्ड प्रयोगशाळेचे संचालक फ्रेड रॅब यांनी २०१६ मध्ये २०२३ पर्यंत या उपकरणाचे काम भारतात सुरू होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला होता.
 • लेसर इंटरफेरोमीटर या गुरुत्वीय लहरी प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांनी फेब्रुवारीमध्ये गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केले.
 • ११ फेब्रुवारी २०१६ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी लायगो (Laser Interfrometer Gravitaional Wave Observatroy)चे कार्यकारी संचालक प्रो. डेविड रिट्झ यांनी गुरुत्त्वीय लहरी सापडल्याची घोषणा केली आणि आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांताला अजून एकदा प्रबळ पुष्टी मिळाली.
 • १९१६ साली आइन्स्टाइन यांची या लहरी अस्तित्त्वात असाव्यात असे भाकीत त्यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या (General Relativiry) सिद्धांताच्या आधारे केले होते. त्याचा भक्कम पुरावा लायगो प्रकल्पामुळे मिळाला आहे. या गुरुत्त्वीय लहरी अतिसूक्ष्म व अतिक्षीण असल्याकारणाने त्यांचा शोध हा अतिशय अवघड, किचकट पण महत्त्वपूर्ण मुद्दा असतो.
 • पण या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या एलएससीच्या (LIGO scientific collaboration) एक हजारांहून अधिक सदस्यांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. अभिमानास्पद बाब म्हणजे यामध्ये ६० हून अधिक भारतीयांचा सहभाग होता.
 • गुरुत्वतरंग शोधण्याच्या प्रयत्नांना नव्वदच्या दशकात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यात अमेरिकेबरोबर इटली, ऑस्ट्रेलिया व अन्य काही देशांचाही सहभाग होता.
 • संयुक्तरीत्या लायगो प्रकल्प राबविण्यात येणार होता. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यातून माघार घेतली आणि भारताला आयती संधी मिळाली.
 • भारतीय वैज्ञानिकांनीही त्या संधीचे सोनेच केले. या यशात पुण्यातील ‘आयुका’सह अनेक वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे.
 • आता भारतामध्येही लायगो उपकरण बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा भारतीय वैज्ञानिकांना आधीच मिळालेल्या या अनुभवाचा फायदा त्यात नक्कीच होईल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
 • या तंत्रज्ञानाने सर्वात आधी २०१५ मध्ये शोधल्या १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवरच्या गुरुत्वीय लहरींचा पुरावा
 • वॉशिंग्टन व लुईझियाना येथे असलेल्या लायगो प्रयोगशाळांमधून २०१५ मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रथमच गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पुरावा शोधला गेला. त्यावेळी लायगोने पकडलेल्या गुरुत्वीय लहरी १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विलयातून तयार झाल्या होत्या.
 • त्यानंतर त्याच वर्षी तीन महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबरला गुरुत्वीय लहरींचा आणखी एक संदेश टिपण्यात लायगो प्रयोगशाळांना यश आले होते. दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या या गुरुत्वीय लहरी होत्या.
 • विशेष म्हणजे ही घटना १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर घडली होती. वॉशिंग्टन व लुईझियाना येथील प्रयोगशाळांचे एकमेकांपासूनचे अंतर ३००० कि.मी आहे. ही उपकरणे ६६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी शोधू शकतात.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »