21 August Current Affairs

21 August Current Affairs
21 August Current Affairs

अंतर्गत गुण पुन्हा वादात

 • इयत्ता दहावीसाठी भाषा आणि समाजशास्त्र या दोन विषयांचे २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करून राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. 
 • मात्र, याबाबतचा शासन निर्णय जाहीर होऊन दहा दिवस उलटूनही त्याच्या अंमलबजावणीसाठी अभ्यास मंडळाच्या बैठका आणि कार्यशाळा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेणार की बालभारती याबाबत वाद रंगला आहे.
 • इयत्ता दहावीचे अंतर्गत गुण बंद केल्यामुळे नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले. शिवाय हुशार विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले. यावरून सरकारवर टीका झाली. यानंतर सरकारने अंतर्गत मूल्यमापनाचा एका समितीमार्फत पुन्हा आढावा घेतला. 
 • समितीच्या शिफारशींनुसार नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले. यामुळे शैक्षणिक वर्ष २०१९-२०पासून भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठीच्या लेखी परीक्षेला ८० गुण व अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याचा निर्णय झाला. याबाबतची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे देण्यात आली आहे. 
 • मात्र, ऑक्टोबर, २०१७च्या शासन निर्णयानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीची जबाबदारी 'बालभारती'कडे देण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी शिक्षण मंडळांकडे असणारी अभ्यास मंडळे आता नाहीत. अशा वेळी अंतर्गत मूल्यांकनाच्या अंमलबजावणीची जबाबदारी 'बालभारती'मधील अभ्यास मंडळाला डावलून शिक्षण मंडळाकडे कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
   

परवानगीशिवाय डीजे वाजवल्यास ५ वर्षाची कैद

 • ध्वनी प्रदूषणावरून अलाहाबाद हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. परवानगी न घेता डीजे वाजवल्यास तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला ५ वर्षाची शिक्षा आणि १ लाख रुपये दंड बसू शकतो. जर डीजे वाजवल्याची तक्रार आल्यास त्या परिसरातील पोलीस स्टेशनमधील प्रभारीवर कारवाई करण्यात येणार आहे. 
 • न्यायाधीश पीकेएस बघेल आणि न्यायाधीश पंकज भाटिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. हासिमपूर प्रयागराज येथील निवासी सुशील चंद्र श्रीवास्तव व अन्य एका सुनावणी दरम्यान खंडपीठानं हा निर्णय दिला. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले की, हाशिमपूर रोडवर एलसीडी लावण्यात आला. त्याठिकाणी सकाळी ४ वाजेपासून रात्री मध्यरात्रीपर्यंत डीजे वाजत होता. माझी ८५ वर्षाची आई वयोवृद्ध आहे. जवळपास अनेक हॉस्पिटल आहेत. डीजेच्या आवाजाने हॉस्पिटलमधील रुग्णांना त्रास होत आहे. प्रशासनातील अधिकारी ध्वनी प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरत आहेत. ध्वनी प्रदूषणाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.
 • या याचिकेवर सुनावणी करताना कोर्ट म्हणाले, सर्व धार्मिक सणांच्या आधी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी बैठक घेऊन ध्वनी प्रदूषणांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायला हवा. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला ५ वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड लावला जाऊ शकतो. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत संबंधीत व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असेही कोर्टाने नमूद केले आहे.
21 August Current Affairs
21 August Current Affairs

चीनच्या खोटेपणाला फेसबुक ट्विटरचा लगाम

 • रशियाप्रमाणे चीननेही आपल्या बाजुने वातावरणनिर्मिती करण्यासाठी आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी फेसबुकचा वापर करायला सुरूवात केली आहे. हाँगकाँगमध्ये चीनच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक आणि युद्धाप्रमाणे भासवण्याचा प्रयत्न चीनने फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून सुरू केला होता.
 • फेसबुक आणि ट्विटरने याचं स्पष्टीकरण देणारं निवेदन मंगळवारी जारी केलं. दोन्ही सोशल मीडिया कंपन्यांच्या मते, 'चीनशी संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे हाँगकाँगमधील प्रदर्शनाला हिंसक दाखवलं जाण्याचा प्रयत्न होत आहे. फेसबुक आणि ट्विटरने हे अकाउंट बंद केले आहेत. 
 • फेसबुकने कळवले आहे की, '३ फेसबुक ग्रुप, ७ फेसबुक पेज आणि ५ अकाउंट्स हाँगकाँग आंदोलनाची खोटी माहिती दिल्याने बंद करण्यात आले आहेत.' ट्विटरनेदेखील असे ९३६ अकाउंट्स बंद केले आहेत. ही खाती चीनशी संबंधित असल्याची माहिती फेसबुक आणि ट्विटरला आयपी अॅड्रेसमुळे कळली.
   

पाक ISI ने सुरू केली दहशतवाद्यांची थेट भरती

 • भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेने नियंत्रण रेषेपार घुसखोरी करत काश्मीर खोऱ्यातील, तसेच देशभरातील तरुणांना आपल्याकडे खेचण्याचा करण्याचा कार्यक्रम आखला आहे. इतकेच नाही, तर तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत त्यांचा वापर दहशतवादासाठी करण्याची आयएसआयची योजना आहे. 
 • भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती आयएसआयच्या या योजनेची माहिती लागली लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कलम ३७० रद्द केल्याचा पाकिस्तानने निषेध केला आहे. अमेरिका आणि पाश्चात्य जगातील इतर राष्ट्रांना भारताविरोधात चिथावण्याचा प्रयत्नही पाकिस्तान करतंय. पाकिस्तानने भारताशी असलेले व्यापारी संबंधही कमी केले आहेत. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघातही भारताचा पाकिस्तानने विरोध केला आहे. पण पाकिस्तानची मुत्सद्देगिरी निष्फळ ठरत असल्यामुळे मागच्या दाराने हल्ला करण्याची तयारी पाकिस्तान करत आहे. दहशतवाद्यांना तयार करून नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचे आदेश पाकिस्तान देऊ शकतो अशी माहिती पुढे येत आहे. 
 • क्वेटा आणि लाहोरमध्ये तरुणांची मोठ्या प्रमाणात भरती आयएसआयने केली आहे. तसंच यांना युद्धपातळीवर प्रशिक्षणही देण्यात येतंय. या तरुणांना अंडरवॉटर प्रशिक्षणही दिलं जातं आहे. लवकरच हे दहशतवादी नियंत्रण रेषेवरून हल्ला करू शकतात अशी माहिती गुप्तहेर यंत्रणांनी दिली आहे. मीरपूर आणि सियालकोट परिसरात यासाठी विशेष कॅम्पही उघडण्यात आले आहेत. हे दहशतवादी भारतीय सैन्याच्या चौक्यांवर आत्मघातकी हल्लेही करू शकतात. 
 • दुसरीकडे कोणत्याही हल्ल्यासाठी भारतीय सैन्य सज्ज असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. युद्ध परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यास आपण तयार आहोत, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केलं होतं.
   
21 August Current Affairs
21 August Current Affairs

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवली काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची तयारी

 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा राग आळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी या मुद्द्यावर या आठवड्याच्या शेवटी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. फ्रान्समध्ये या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या जी ७ संमेलनात दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.
 • काही दिवसांपूर्वीदेखील काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखवली होती, पण जम्मू-काश्मीर हा दि्वपक्षीय मुद्दा असल्याचे सांगत भारताने ती चर्चा फेटाळून लावली होती. ट्रम्प व्हाइट हाऊस येथे पत्रकारांना म्हणाले, 'काश्मीरमध्ये धार्मिक वैविध्य असल्याने हा खूप जटिल प्रश्न आहे. मी याप्रश्नी मध्यस्थी करू शकतो किंवा जे शक्य ते मी करेन.' 
 • गेल्या चार दिवसात ट्रम्प यांनी आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, नंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुन्हा इम्रान खान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पाकिस्तानला या प्रश्नी मध्यस्थी हवी आहे. मात्र भारताने अशी कोणतीही मध्यस्थी नाकारली आहे. हा द्विपक्षी प्रश्न असल्याने दोन्ही देशांनीच तो चर्चेने सोडवायचा आहे, आणि तत्पूर्वी पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणं पूर्णपणे थांबवावं लागले, अशी भारताची भूमिका आहे.
   

मोदी जॉन्सन चर्चा

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. स्वातंत्र्यदिनी लंडनमध्ये भारतीय वकिलातीबाहेर भारतीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे.
 • बोरिस जॉन्सन यांनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, भारतीय वकिलात, तेथील कर्मचारी आणि अभ्यागतांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याचे आ‌श्वासन दिल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
21 August Current Affairs
21 August Current Affairs

पारले मध्ये मंदी हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

 • रिटेलसह वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीचा फटका कामगारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, आता बिस्कीटांचं उत्पादन घेणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा सामना करावा लागत आहे. मागणी घटल्यानं आगामी काळात आठ ते दहा हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. 
 • पारले कंपनीचे प्रमुख (कॅटेगरी) मयंक शाह यांच्या म्हणण्यानुसार, '१०० रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्कीटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी आम्ही केली आहे. सर्वसाधारण पाच रुपये किंवा त्याहून कमी किंमतीत पाकीटं विकली जातात. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर, कंपनीतील आठ ते दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढावे लागेल. विक्री घटल्यानं आम्हाला मोठं नुकसान सोसावं लागत आहे.' 
 • पारले-जी, मोनॅको आणि मारी बिस्कीटचं उत्पादन घेणाऱ्या पारलेची विक्री १० हजार कोटींहून अधिक होते. या कंपनीच्या १० प्रकल्पांमध्ये जवळपास एक लाख कर्मचारी काम करतात. जीएसटी लागू होण्यापूर्वी १०० रुपये प्रतिकिलोहून कमी किंमतीच्या बिस्कीटांवर १२ टक्के कर आकारला जात होता. प्रिमिअम बिस्कीटासाठी १२ टक्के आणि स्वस्त बिस्कीटांवर ५ टक्के जीएसटी दर निश्चित केला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, सरकारने दोन वर्षांपूर्वी जीएसटी लागू केल्यानंतर सर्व प्रकारच्या बिस्कीटांचा समावेश १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये केला. त्यामुळं कंपन्यांना किंमती वाढवाव्या लागल्या. त्याचा परिणाम विक्रीवर झाला. पारलेलाही ५ टक्क्यांनी किंमती वाढवाव्या लागल्या आणि त्यामुळं विक्रीत घट झाली, असं शाह यांनी सांगितलं.
   

रुपयाचा नवा नीचांक

 • अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने मंगळवारी सहा महिन्यांतील नीचांकी दराची नोंद केली. डॉलरच्या तुलनेत २८ पैशांनी घसरलेल्या रुपयाने ७१.७१ असा चिंताजनक स्तर गाठला. 
 • मंदावलेली अर्थव्यवस्था, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून माघारी नेण्यात येणारी गुंतवणूक व अन्य चलनांचेही अवमूल्यन आदी घटकांचा रुपयावर दबाव होता. 
 • रुपयातील अवमूल्यनामुळे देशाच्या इंधन देयकांत वाढ होऊन पेट्रोल व डिझेलची दरवाढ होण्याची शक्यता आहे. 
   
21 August Current Affairs
21 August Current Affairs

सॅमसंगची आक्रमक योजना

 • भारतातील महागड्या स्मार्टफोनच्या (३० हजार रुपयांपेक्षा अधिक) बाजारपेठेत ६५ टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट सॅमसंगने आखले आहे. 
 • गॅलक्सी नोट १० व १० प्लस हे नवे स्मार्टफोन सादर करताना सॅमसंगने ही घोषणा केली. महागड्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेत सॅमसंगचा सध्या ५२ टक्के हिस्सा आहे. 
   

सवलतींचा वर्षाव

 • देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी तसेच, संभाव्य मंदीला वेळीच रोखण्यासाठी सरकारी क्षेत्रातील आघाडीच्या स्टेट बँकेने ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव केला आहे. गृह व वाहन कर्जविषयक विविध घोषणांची स्टेट बँकेने मंगळवारी घोषणा केली. ही सवलत आगामी उत्सवी काळासाठी असून सध्या संकटात सापडलेल्या वाहन उद्योगासही यामुळे चालना मिळू शकेल. स्टेट बँकेने मंगळवारी एका विशेष प्रसिद्धीपत्रकाद्वारे या सवलतींची माहिती दिली. 
 • गणेशोत्सवापासून उत्सवी काळ सुरू होत असून दिवाळीपर्यंत बहुतांश क्षेत्रातील मागणीत वाढ होईल हे स्पष्ट आहे. अर्थव्यवस्थेत मरगळ असूनही या कालावधीत काही ना काही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. ग्राहकांच्या या कलास आणखी प्रोत्साहन देण्यासाठी स्टेट बँकेने या सवलती घोषित केल्या आहेत. स्वस्त व्याजदरात गृह व वाहन कर्ज, कर्जावरील प्रक्रिया शुल्कमाफी, डिजिटल माध्यमातून कर्जास पूर्वमंजुरी आदी सवलतींचा यात समावेश आहे. 
 • या सवलती नेमक्या कधीपासून कधीपर्यंत लागू असतील याची माहिती स्टेट बँकेने दिलेली नाही. मात्र या सवलतींना चांगला प्रतिसाद मिळाल्यास अन्य बँकांकडूनही त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 

वाहन कर्जास प्राधान्य:-

 • स्टेट बँकेच्या या सवलतींमध्ये वाहन कर्जास प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे वाहन उद्योगातील मंदी दूर होण्यास हातभार लागू शकेल. कारखरेदीसाठी किमान ८.७ टक्क्यांनी कर्ज मिळू शकेल. विशेष म्हणजे भविष्यातील संभाव्य दरवाढीपासून हे दर सुरक्षित असतील. स्टेट बँकेच्या योनो या अॅपद्वारे अथवा वेबसाइटद्वारे वाहन कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त .२५ टक्के व्याज सवलत मिळेल. हे अर्जदार नोकरी करणारे असतील तर त्यांना कारच्या किमतीच्या प्रमाणात ९० टक्के कर्ज मिळेल. 

गृहकर्जही स्वस्त:

 • रिझर्व्ह बँकेने केलेल्या रेपो दरकपातीस प्रतिसाद देत स्टेट बँकेने आपल्या गृहकर्जावरील व्याजदर .१५ टक्क्यांनी कमी केले आहेत. यापूर्वी त्यांनी .२० टक्क्यांनी व्याजदरकपात केली आहे. कर्जांवरील व्याजदर रेपो दराशी सुसंगत राखण्याचा निर्णय या बँकेने घेतला असल्याने गृहकर्जाचा व्याजदर ८.०५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. या नव्या व्याजदराची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून होणार असून जुन्या व नव्या अशा सर्व ग्राहकांसाठी हे व्याजदर लागू असतील. 

वैयक्तिक कर्जही सुलभ:-

 • उत्सवी काळासाठी स्टेट बँकेने वैयक्तिक कर्जाची वितरण प्रक्रिया आणखी सुलभ केली आहे. या कालावधीत ग्राहकांना २० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेता येईल. या कर्जावर १०.७५ टक्के व्याजदर आकारला जाईल व परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असेल. याशिवाय, स्टेट बँकेत पगाराची बचत खाती (सॅलरी अकाउंट्स) असणाऱ्या ग्राहकांना योनो अॅपद्वारे पाच लाख रुपयांचे पूर्वमंजूर कर्ज मिळू शकेल. 

शैक्षणिक कर्जाचीही सुविधा:-

 • देशातील व विदेशातील शिक्षणासाठी अनुक्रमे ५० लाख व दीड कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज ८.२५ टक्क्यांनी देण्याची योजनाही स्टेट बँकेने घोषित केली आहे. या कर्जाच्या परतफेडीसाठी १५ वर्षांचा कालावधी असेल. 
 1. वाहन कर्ज ८.७ टक्के
 2. गृहकर्ज ८.०५ टक्के 
 3. वैयक्तिक कर्ज १०.७५ टक्के 
 4. शैक्षणिक कर्ज ८.२५ टक्के
   
21 August Current Affairs
21 August Current Affairs

आता फूड डिलीव्हरीही करणार अॅमेझॉन

 • अॅमेझॉनने ऑनलाइन फूड डिलीव्हरी क्षेत्रात उतरायची तयारी केली आहे. कंपनीने हॉटेलांना आपल्यासोबत जोडायला सुरूवात केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. हॉटेलांना आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉन झोमॅटो आणि स्विगीच्या तुलनेत चांगल्या कमीशनची ऑफर देत आहे. दिवाळीच्या आसपास अॅमेझॉन बेंगळुरूतून या सेवेला सुरूवात करण्याची शक्यता आहे.
 • एका सूत्राने सांगितले की, 'जे रेस्टॉरंट्स आतापर्यंत फूड अॅग्रिगेटर्सना १५-१७ टक्के कमीशन देत होते, ते जास्त ऑर्डर मिळण्याच्या हमीसह ६-७ टक्के कमीशनची ऑफर देत आहे.' कंपनी आपल्या प्रिमीयम कस्टमर्सकडून रिपीट ऑर्डर मिळाल्यास अधिक फायदा करून देणार आहे. 
 • या माध्यमातूनही अॅमेझॉन प्राइम बेस युजर्स वाढवण्याकडे कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे. येत्या काळात कंपनी फार्मा डिलिव्हरी आणि सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रातही उतरणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. फ्रेशमेन्यू, रेबेल फूड्स, फूडपांडा, इट डॉट फिट सारखे क्लाउड किचन्स आणि मॅकडोनल्ड, डॉमिनोज आणि केएफसीसारख्या रेस्टॉरन्ट्सदेखील अॅमेझॉनने करार केला असल्याचे कळते.
   

श्रीशांतवरील कायमची बंदी उठली

 • स्पॉटफिक्सिंगप्रकरणी कायमची बंदी घालण्यात आलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतचा क्रिकेटमध्ये कार्यरत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बीसीसीआयचे आचारसंहिता अधिकारी डी. के. जैन यांनी त्याच्यावरील बंदी सात वर्षांवर आणल्यामुळे त्याचा बंदीचा कालावधी ऑगस्ट २०२०ला संपुष्टात येणार आहे. 
 • स्पॉटफिक्सिंगप्रकरणी ३६ वर्षीय श्रीशांतवर ऑगस्ट २०१३मध्ये बंदी घालण्यात आली होती. सोबत राजस्थान रॉयल्सचा त्याचा सहकारी अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही बंदी घातली गेली होती. जैन यांनी ७ ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार ही बंदी सात वर्षांवर आणण्यात आली असल्यामुळे त्याला ऑगस्ट २०२०ला पुन्हा क्रिकेट खेळता येईल. जैन यांनी ही बंदी कमी करण्यामागील कारण सांगितले की, श्रीशांतचे वय तिशीपलीकडे आहे. क्रिकेटपटू म्हणून त्याचा उच्च कामगिरी करण्याचा काळ आता संपुष्टात आला आहे. 
 • बीसीसीआयने २८ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सामन्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न श्रीशांतने केल्यामुळे त्याच्यावरील बंदी योग्यच आहे. त्यावर श्रीशांतच्या वकिलांनी सांगितले की, आयपीएल सामन्यादरम्यान कोणतेही स्पॉटफिक्सिंग झालेच नव्हते. त्याला आधार असलेले कोणतेही पुरावे नाहीत. बीसीसीआयचे वकील त्रिपाठी यांनी सांगितले की, दूरध्वनीवर झालेल्या संभाषणातून पैशांची देवाणघेवाण झाल्याचे स्पष्ट होते. आयपीएलमध्ये १४ धावा देण्यासाठी श्रीशांतला १० लाख देण्यात आले होते. श्रीशांतनेही हे आरोप फेटाळून लावले होते. श्रीशांत भारतासाठी शेवटचा २०११ मध्ये खेळला होता.
   
21 August Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »